उत्सवखोरांचा उन्माद

धार्मिक उत्सवांतील उत्साहाच्या अतिरेकाची जाणीव करून देणे हेदेखील अलीकडे भावना दुखावणारे झाले आहे. युक्तिवाद असा की अन्य धर्मीय उत्सव याहीपेक्षा अधिक उपद्रवी आहेत त्यांना का कोणी का नाही सांगत,

धार्मिक उत्सवांतील उत्साहाच्या अतिरेकाची जाणीव करून देणे हेदेखील अलीकडे भावना दुखावणारे झाले आहे. युक्तिवाद असा की अन्य धर्मीय उत्सव याहीपेक्षा अधिक उपद्रवी आहेत त्यांना का कोणी का नाही सांगत, अशा युक्तिवादाचे उत्तर दिले की पुन्हा जीवघेणे उत्सव साजरे करण्यास सारे जण मोकळे..

हिंदू धर्मीयांच्या ३३ वा तत्सम कोटी देवतांमधील काहींना संकटमोचक म्हटले जाते. सांप्रत काळी या देवताच कोणा संकटमोचकाचा धावा करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे कारण या सर्व देवतांवर आणि त्यांच्या प्रामाणिक भक्तगणांवर सध्या एक शब्दश: जीवघेणे संकट उभे ठाकले आहे. ते म्हणजे त्या देवांच्या नावानेच साजरे केले जातात असा दावा होत असलेल्या उत्सवांचे. हे संकट जीवघेणे म्हणवून घेण्यास पात्र ठरते कारण त्यात खरोखरच काही जणांचा तरी जीव जातोच जातो. उदाहरणार्थ भगवान कृष्णाच्या नावे साजऱ्या होणाऱ्या गोकुळाष्टमीत मानवी मनोऱ्यांवरून कोसळून पाच-दहा जणांना मुक्ती मिळते, त्यानंतरच्या गणपती उत्सवात रात्रभराची झोप हराम झाल्याने, मिरवणुकांचा ताण सहन न झाल्याने वा एकंदर ध्वनिप्रदूषणामुळे काही जण अनंताच्या प्रवासाला निघतात. त्यानंतर खरे तर पितृपंधरवडा. इहलोक सोडून गेलेल्या आप्तेष्टांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी श्राद्धपक्ष करायचा काळ. या पितृपंधरवडय़ात ज्यांच्या नावे पिंडदान करावयाचे त्याच्या संख्येत त्या आधीच्या उत्सवांमुळे दरवर्षी वाढच होत आहे याचे भान या उत्सवी मंडळींना नाही. या पृथ्वीतलावर राहण्यापेक्षा मोक्षप्राप्ती मिळाल्यास बरे असे वाटण्याची सुरुवात दरवर्षी पितृपंधरवडा संपल्यानंतर पाठोपाठ येणाऱ्या नवरात्रीपासूनच सुरू होते. वास्तविकहा सण म्हणजे सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधके असे म्हणत त्या नारायणीस शरण जात नमोस्तुते म्हणण्याचा काळ. परंतु गेली काही वर्षे त्या नारायणीपेक्षा घागरा आणि पाठउघडी चोळी घालून नर्तन करणाऱ्या नारींच्या मागे जाण्याचा काळ असे या सणाचे स्वरूप झाले आहे. अर्थात कोणी कोणाच्या मागे वा पुढे जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, हे मान्यच. परंतु हे उत्सवीमागे जाणे कानठळ्या बसवणाऱ्या आणि डोळ्यासमोर अंधारी आणणाऱ्या दिव्यांच्या साक्षीने होत असेल तर ते इतरांसाठी उपद्रवच ठरत असते. अर्थातच ते सांगण्याची सोय नाही. या नवरात्रीनंतर सीमोल्लंघन साजरे करणारी विजयादशमी येते आणि त्यानंतर दिवाळी. हा सर्व काळ परमेश्वराने या भारतवर्षांतील नागरिकांना कान हा अवयव का म्हणून दिला असा प्रश्न पडावा. एके काळी विजयी होऊन येणाऱ्या राजेरजवडय़ांचे स्वागत करण्यासाठी रोषणाई केली जात असे आणि दळणवळणाची साधने एकूणच कमी असल्यामुळे या विजयाची द्वाही फटाके फोडून फिरविली जात असे. वास्तविक कालौघात आणि त्यातही २४ तास चालणाऱ्या दूरचित्रवाणीच्या काळात, इंटरनेट, व्हॉट्सअ‍ॅप आदींच्या जमान्यात बातमी पसरवणे हे अगदी बालकांच्यादेखील डाव्या हाताचा मळ झाला आहे. तेव्हा कोणा एकाचा दक्षिण दिग्विजय साजरा करण्यासाठी फटाके फोडण्याची गरज राहिलेली नाही. परंतु उत्क्रांतीच्या अवस्थेत मानवाची प्रगती होताना आंत्रपुच्छासारख्या काही मागास चीजा जशा मानवी शरीरात तशाच राहिलेल्या आहेत, तसेच या फटाके फोडण्याच्या सवयीचे झाले आहे. आता तर विवाहप्रसंगीदेखील काहींना हे फटाके फोडावेसे वाटतात. म्हणजे प्रगती होण्याऐवजी तशी अधोगतीच म्हणायचे. आता वास्तविक विवाह ही पूर्णपणे खासगी बाब. त्या प्रसंगी सामाजिक सुरक्षा अबाधित राहील म्हणून आनंद करावा. फटाक्यांची आतषबाजी करून विवाहाच्या मुहूर्तावरच आसपासच्यांचे शिव्याशाप घेण्याची काहीच गरज नाही. हे आपल्या समाजास अजूनही कळत नाही. त्यामुळे खासगी विवाह व्यवहाराचीदेखील सामाजिक उत्सवांच्या यादीत भर पडली असून त्यामुळे सामाजिक डोकेदुखीत सामुदायिक वाढच झाली आहे. याच्या जोडीला दर महिन्याला काही ना काही उत्सव येतच असतात आणि समाजाची कशीबशी व्यवस्थित असलेली घडी उसकटतच असतात. त्यात आता या आकाशातील परमेश्वराशी थेट नाते असल्याचा दावा करीत मधल्यामध्ये धार्मिक दलाली करणाऱ्यांच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होताना दिसते. यातील काही दलाल बाबा वगैरे नावांनी ओळखले जातात तर काही स्वत:ला बापू, जगद्गुरू, महाराज वगैरे म्हणवतात. त्यांच्या वार्षिक सोहळ्यांची भर या उत्सवांत अलीकडे पडलेली आहे. त्या दिवशी त्यांचे अनुयायी मोठय़ा संख्येने गाडय़ागिरद्या घेऊन कुठे तरी जमा होतात आणि त्या परिसरातल्यांना जगणे नकोसे करत असतात. या सगळ्यातून समोर येते ते हेच की आपल्या समाजात उत्सवांची संख्या उपद्रव वाटावा इतकी वाढली असून त्यामधून सामान्य नागरिकाचा उत्साह मात्र गायब झाला आहे.    
सामान्य, कायदाप्रेमी नागरिकांच्या छाताडावर नाचत साजऱ्या होणाऱ्या या उत्सवांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यात काही शिस्त आणण्याचा मध्यंतरी प्रयत्न केला. परंतु त्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश आले आहे वा येत आहे, असे म्हणता येणार नाही. नुकत्याच संपलेल्या गणेशोत्सवात त्याची प्रचीती आली. पुण्यातील गणेशोत्सव विसर्जनाची मिरवणूक २४ तास उलटून गेले तरी चालू होती आणि अन्यत्र कोठे तर प्रचंड कंपनसंख्येच्या ध्वनिलहरींनी भिंतही पाडून काय होऊ शकते याचा अंदाज दिला. गणेश हा विद्येचा देव मानतात. या विद्येच्या प्राप्तीसाठी काही कष्ट करावे लागतात. परंतु ज्यांना विद्या प्राप्त करावयाची आहे ती मंडळी दिवसचे दिवस रस्त्यांवर हे असे उत्सवी नाचण्यात घालवणार असतील तर त्यांना विद्येची किती गरज आहे, हे कळून येऊ शकेल. इतके तास मिरवणुका लांबतात म्हणजे तितका वेळ रस्त्यांवरची वाहतूक विस्कळीत होते, शाळा-महाविद्यालयांत, कार्यालयांत जाणाऱ्यांची गैरसोय होते आणि व्यवस्थेवरही ताण येतो. विद्यादेवतेच्या भक्तांना याची ना फिकीर ना खंत. ते आपले ढोल वाजवण्यात मग्न. शहाणीसुरती मंडळीही आपली असली नसलेली विचारक्षमता गहाण ठेवून हा असला सांस्कृतिक हुच्चपणा करण्यात धन्यता मानत असतील तर परिस्थिती एकंदरच काळजी वाटावी अशी आहे, हे जाणवावे. परंतु त्याची जाणीव करून देणे हेदेखील अलीकडे भावना दुखावणारे झाले आहे. सणासुदीच्या उत्सवातील उन्माद आणि उपद्रव कमी करा असे सांगू पाहणाऱ्यांस त्यांचे प्रत्युत्तर असे की हे हिंदूंनीच का करावयाचे? त्यांचा युक्तिवाद असा की अन्य धर्मीय उत्सव याहीपेक्षा अधिक उपद्रवी आहेत त्यांना का कोणी का नाही सांगत?
कोणाही विवेकीकडे या प्रश्नावर उत्तर असणार नाही. कारण एखाद्याचे चुकत असेल तर त्याला योग्य मार्गावर आणण्याऐवजी उलट आपणच अयोग्य मार्गाची कास धरावयाची हे नवे सामाजिक शहाणपण सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे म्हणावे लागेल. अशा गोंगाटी वातावरणात विवेक हा पहिला स्थलांतरित असतो. कारण तो कायमच क्षीण असतो. आपल्याकडे सध्या याचा अनुभव येत आहे. आपल्या धार्मिक उत्सवांची सूत्रे उन्मादी उत्सवखोरांकडे गेली असून त्यांच्याकडून शहाणपणा अपेक्षित नाही. अशा वेळी सामान्य नागरिकास हताश होण्याखेरीज पर्याय नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dangerous way of celebrating religious festival

ताज्या बातम्या