पेपरबॅक आवृत्त्यांमुळे इंग्रजी पुस्तकं मोठय़ा आणि सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहचू लागली आणि पर्यायाने पुस्तकांचं लोकशाहीकरण व्हायला पुष्कळच मदत झाली. पण हा झाला पूर्वेतिहास.
गेल्या दोन-तीन वर्षांत इंग्रजी पुस्तकांच्या पेपरबॅक आवृत्त्यांपेक्षा त्यांच्या ई-बुक आवृत्त्या ज्या झपाटय़ाने विकल्या जात आहेत, त्यावरून भविष्यात पेपरबॅक आवृत्त्यांवर गंडांतर येईल की काय, अशी भीती इंग्रजी प्रकाशकांना ग्रासू लागली आहे.
गतवर्षी अ‍ॅमेझॉन डॉट कॉमवरून ई-बुकची जी विक्री झाली, ती त्या पुस्तकांच्या पेपरबॅक आवृत्त्यांपेक्षा ४५ पट अधिक आहे. ‘पब्लिशर्स वीकली’ या नामांकित साप्ताहिकानेही २०११-१२ मध्ये पेपरबॅक आवृत्त्यांची विक्री साडेआठ टक्क्यांपेक्षाही जास्त प्रमाणात घसरल्याची माहिती दिली आहे.
ई-बुकमुळे पेपरबॅक आवृत्त्यांची विक्री कमी होत असली तरी हार्डकव्हर आवृत्त्यांची विक्री मात्र जैसे थे आहे. म्हणजे ई-बुकची विक्री सातत्याने अशीच वाढत राहिली तर त्याचा फटका फक्त पेपरबॅक आवृत्त्यांना बसून त्यांचा ऱ्हासकाळ सुरू होऊ शकतो. परिणामी इंग्रजी पुस्तकं परत महागडी होऊ शकतात.

पेपर बॅक-सुचिता देशपांडे

साध्या, सच्च्या, रंजक गोष्टी!
रस्किन बॉण्ड लिखित ‘स्टोरीज शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट’ या बालकथासंग्रहातील गोष्टी हिमालयाच्या कुशीतल्या लहानशा गावांत घडतात.. या गोष्टी तिथल्या निसर्गासारख्याच ताज्या आणि तिथल्या माणसांसारख्याच साध्यासरळ आहेत.. काळजाला हात घालणाऱ्या!
या संग्रहातील बहुतेक गोष्टींत डोकावणारे भोवतालचे दाट जंगल, त्यातील पानंफुलं, तिथले वन्यचर, बर्फाची शिखरं त्या कथाबीजाचा अपरिहार्य भाग आहेत आणि हा निसर्ग एका व्यक्तिरेखेसारखा गोष्ट आकार घेण्यात मोठी भूमिका बजावतो. गोठवणारी थंडी असो, कुंद पावसाळी वातावरण असो किंवा सोनेरी, उबदार सूर्यप्रकाशाचा दिवस असो, या गोष्टींतला ऋतू  त्यांची वीण घट्ट करतो आणि व्यक्तिरेखांची मानसिकताही अधोरेखित करतो. या पुस्तकातील बहुतेक गोष्टींचा नायक हा किशोरवयीन मुलगा आहे. आणि या गोष्टींतून त्याचं स्वच्छ मन, त्याच्या जीवननिष्ठा प्रतीत होतात.
‘दोज थ्री बेअर्स’ ही गोष्ट मुलाने पाहिलेल्या तीन अस्वलांसंदर्भातील आहे. अस्वलांचं हुंगणं, गुरगुरणं, निरीक्षणक्षमता, अस्वलांचं वेगानं पळणं अशा अनेक लकबींच्या बारीकसारीक नोंदी त्यात आहेत. ‘दि कोरल ट्री’ या गोष्टीत समोरच्या झाडावरची फुलं काढून मागणाऱ्या एका लहानग्या तरतरीत मुलीमुळे नॉस्टॅल्जिक झालेल्या एका युवकाची गोष्ट आहे, जो त्या दिवशीच आपलं घर सोडून कायमचा परगावी चाललाय.. तिच्या निमित्ताने लहानपणी झाडावर चढणं, त्या परिसरात व्यतीत झालेलं बालपण, त्या घराशी जडल्या गेलेल्या आठवणी हे सारं त्याला साद घालतं. ‘आय एम लास्ट टु गो. नॉट बिकॉज आय वॉन्ट टु गो बट आय हॅव टु’ या त्याच्या ओळी तर वाचकांनाही नॉस्टॅल्जिक करतात.. वाघावर स्वार होऊन भटकणाऱ्या फकिरावर बेतलेली ‘हु राइड्स अ टायगर’ ही गोष्ट एका दंतकथेसारखी आहे. ‘द व्हाइट पिजन’ ही कथादेखील दंतकथेच्याच जातकुळीतील आहे.  ‘द थीफ्ज स्टोरी’ ही आणखी एक नितांत सुंदर गोष्ट. एका चोराच्या आयुष्यात घडलेली. एखाद्यावर टाकल्या गेलेल्या विश्वासाचं मोल गहिरं करणारी आणि माणुसकीचं मोठेपण सांगणारी..
वाचकांना निसर्गाच्या जवळ नेणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ‘व्हेन द ट्रीज वॉक्ड’. नदीच्या कोरडय़ा पात्रांलगतच्या प्रदेशात, दगडी, नापीक जमिनींत रोपटी लावणाऱ्या आजोबांसोबत जाणाऱ्या नातवाला आजोबांच्या तिथं झाडं लावण्याचं कुतूहल वाटायचं. इतकी सुंदर झाडं इथे कशाला लावायची आणि कुणासाठी, हा प्रश्न त्याला पडे..  खूप खूप वर्षांनी त्या भागात परतलेल्या त्याला आजोबांनी लावलेल्या रोपटय़ांचे झालेले देखणे, मोठे वृक्ष नजरेस पडले आणि आजोबांनी त्या वेळेस दिलेलं उत्तरही उमजलं. आजोबा म्हणाले होते- ‘द ट्रीज विल मूव्ह अगेन.’
वयोवृद्ध मिस मॅकेन्झी यांच्या बागेत फुलं तोडायला गेलेल्या किशोरवयीन मुलाशी जडलेल्या त्यांच्या भावबंधाची गोष्ट म्हणजे ‘द बुके ऑफ लव्ह’. त्याच्या पानाफुलांना जाणून घेण्याच्या जिज्ञासेला शमवणारा दुर्मीळ ग्रंथ जेव्हा देतात, तो प्रसंग हेलावणारा आहे. ‘प्रेट इन दि हाउस’ ही आणखी एक धम्माल गोष्ट. घरात शिरलेलं एक भूत आपल्या वात्रटपणाने साऱ्यांना सळो की पळो करतं आणि मग ते कुटुंब घर सोडण्याचा निर्णय घेतं. पुढे काय होतं, हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट वाचायलाच हवी. ‘द ओव्हरकोट’, ‘द टनेल’ या गोष्टी गूढ वळणाच्या आहेत. साजेशी वातावरणनिर्मिती, राखलेले गौप्य यामुळे त्या उठावदार झाल्या आहेत. एका किशोरवयीन मुलाच्या भावविश्वात खळबळ माजवणारी ‘द वाइल्ड फ्रुट’ ही गोष्ट खूप काही सांगून जाते.
अत्यंत सोपी भाषा, सशक्त कथाबीजे आणि अत्यंत हृद्य, सच्चा आशय ही रस्किन बॉण्ड या थोर लेखकाची शक्तिस्थानं. या कथांनी तो दर्जा कायम राखला आहे. अलवार तरीही विचार करायला लावणाऱ्या, मजेशीर तरीही आठवणीत रुंजी घालणाऱ्या, अशा या गोष्टी आहेत. हे पुस्तक लहान मुलांसाठी असले तरी मोठय़ांनाही आनंद देईल, असे आहे.
स्टोरीज शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट – रस्किन बॉण्ड,
रेड टर्टल-रूपा, नवी दिल्ली,
पाने :  ८७,
किंमत : १५० रुपये.

लहानग्यांसाठी रामायण
हिंदू धर्म आणि त्यातील पौराणिक कथांचा फारसा परिचय नसलेल्या इंग्लंडमधल्या बालवाचकांना राम आणि सीता या महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचा परिचय करून देण्यासाठी रस्किन बॉण्ड यांनी ‘दि अ‍ॅडव्हेन्चर्स ऑफ राम अ‍ॅण्ड सीता’ हे गोष्टीचे पुस्तक १९८७ साली लिहिले. अत्यंत साध्या सोप्या आणि रसाळ शैलीतील हे पुस्तक ‘हनुमान टू द रेस्क्यू’ या शीर्षकाने आता पुनप्र्रकाशित करण्यात आले आहे.
भरताला राज्य मिळावे आणि रामाला वनवासी धाडावे हा कैकेयीने दशरथ राजाकडे मागितलेला वर आणि त्यानुसार राम, सीता आणि लक्ष्मणाचे वनवासी जाणे, रावणाचे सीताहरण आणि त्यानंतर हनुमान, सुग्रीव आणि वानरसेनेच्या मदतीने रामाने रावणाचा केलेला पराभव आणि अखेरीस अयोध्येत राम परतल्यानंतर प्रजेने साजरा केलेला जल्लोष.. रामायणातील हे सारे संदर्भ लहानग्यांना समजतील अशा साध्यासोप्या शैलीत, कथारूपात उलगडून सांगितले आहेत. मात्र, लक्ष्मणाने आखलेली लक्ष्मणरेषा, लंकेत पोहोचण्यासाठी समुद्रावर पूल बांधताना त्यात वानरांना खारींनी केलेली मदत हे संदर्भ हरवले आहेत, असे कदाचित वाटू शकेल. पण लहानग्यांना कळेल इतपतच रामायणातील संदर्भ यात आहेत, असे लेखकाने प्रस्तावनेत म्हटल्याने याला पुस्तकातील उणीव म्हणता येणार नाही.
suchita.deshpande@expressindia.com
हनुमान टु द रेस्क्यू –
रस्किन बॉण्ड,
रेड टर्टल-रूपा, नवी दिल्ली,
पाने : ८७,
किंमत : १५० रुपये.

फ्रंट शेल्फ
सौजन्य :
फ्लिपकार्ट डॉट कॉम
टॉप  ५ फिक्शन


द सी ऑफ इनोसन्स : किश्वर देसाई, पाने : ४००३५० रुपये.
शोज ऑफ डेड : कोटा नीलिमा, पाने : २८८४९५ रुपये.
व्हेन स्ट्रेंजर्स मीट.. : के. हरी कुमार, पाने : २१६१०० रुपये.
जेकब हिल्स : इस्मिता टंडन धंकेर, पाने : २६८२९९ रुपये.
कफ सिरप : थरून जेम्स जीमानी, पाने : २७६२५० रुपये.
टॉप  ५ नॉन-फिक्शन
द न्यू डिजिटल एज : एरिक स्मित-जेरेड कोहेन, पाने : ३१५६५० रुपये.
हाऊ एशिया वर्क्स : जो स्टुडवेल, पाने : २८८४९९ रुपये.
द ऑरफन मास्टर्स सन : अ‍ॅडम्स जॉन्सन, पाने : ५९२/४५० रुपये.
मार्गारेट थॅचर-द ऑथराइज्ड बायोग्रफी : चार्ल्स मूर, पाने : ८९६८९९ रुपये.
कम ऑन इनर पिस-आय डोन्ट हॅव ऑल डे : सचिन गर्ग, पाने : १३०१०० रुपये.