लहानपण अस्पृश्यतेच्या शापाने काळवंडलेले, पण त्यातून पुढे येत कष्टांच्या जोरांवर यशस्वी उद्योजक झालेल्यांच्या यशोगाथा सांगणारे हे पुस्तक प्रेरक आहे.
सगळी स्वप्ने खरी होत नसतात, पण मोठी स्वप्ने बघायला काय हरकत आहे, असा विचार करणारी माणसे जर उद्योग क्षेत्रात असतील आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सगळी जोखीम पत्करण्याची, कष्ट करण्याची जर माणसाची तयारी असेल तर यशाची दारे त्यांच्यासाठी आपोआप किलकिली होतात. ‘डीफायिंग द ऑड्स – द राइज ऑफ दलित अ‍ॅन्त्र्यूप्रेनर्स’ हे पुस्तक वाचल्यानंतर याच गोष्टीची अनुभूती येते. देवेश कपूर, डी. श्याम बाबू आणि चंद्रभान प्रसाद या त्रयीने निवडक २१ दलित उद्योजकांच्या मुलाखती घेऊन त्यांचा उद्योगप्रवास या पुस्तकात चांगल्याप्रकारे उलगडून दाखवला आहे.
कोणत्याही सांख्यिकीय ठोकताळ्यावरून हे २१ उद्योजक दलित समाज किंवा दलित उद्योजकांचे प्रतिनिधी नाहीत. अशा हजारो दलित उद्योजकांना शोधणे हे मोठे काम होते, कारण त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देणारी कोणतीही अधिकृत नोंद कुठेही नाही. आश्चर्य म्हणजे ज्या दलित उद्योजकांना लेखक भेटले त्यांना इकॉनॉमिक सेन्सस म्हणजे आर्थिक पाहणी करणाऱ्या भारत सरकारचे सर्वेक्षकही कधी भेटले नाहीत. तरीही ते एका दीर्घ ऐतिहासिक बदलाचे प्रतीक आहेत. या बदलामुळे माणसाला अमानवी वागणूक देण्याची वर्षांनुवर्षे घडत आलेली सामाजिक व्यवस्था ढासळत आहे. या उद्योजकांना त्यांच्या जडणघडणीच्या काळात आलेले अनुभव आणि उद्योग क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतरच्या काळात आलेले अनुभव मार्मिक आहेत.  पुस्तकात या उद्योजकांचे असे जगण्यातले आणि व्यवसायातले अनेक अनुभव वाचायला मिळतात.
यातील थॉमस बर्नाबास आठवीत असतानाची एक घटना सांगतात. एकदा दुपारी ते आपल्या उच्चवर्णीय पण ख्रिश्चन वर्गमित्रासोबत घरी जात होते. दोघेही तहानलेले आणि थकलेले होते. मित्राचे घर वाटेवरच होते. ते  मित्राच्या घरी गेले तेव्हा वर्गमित्राने त्यांना पाणी दिले. मित्राच्या आईने त्यांना घरात बोलावले, इतकेच नाही तर मिठाई खायला दिली. मित्राचे वडील घरी आल्यावर त्यांनी थॉमसला खाऊपिऊ  घातल्याबद्दल बायकोला मारले आणि ज्या भांडय़ात त्याला खायला दिले त्या भांडय़ावर फावडे मारून ते निकामी केले. बायकोला घरातील जमीन शुद्ध करून घ्यायला सांगितली. अस्पृश्यतेचा हा अनुभव हृदयद्रावक होता. आज थॉमस यांची के. जे. एन. एन्टरप्रायजेस ही कंपनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पुनर्वापरातून २० कोटींची उलाढाल करीत आहेत.
दुसरा एक प्रसंग उमेश चौधरी मेडिकल स्कूलमध्ये असतानाचा. एका प्राध्यापकाने दलित आणि आदिवासी आरक्षणावर चर्चा करताना ‘आम्ही घोडे आणि माकडांना शिकवत आहोत असे वाटते’, असे म्हटले; पण लगेच सावरून घेत खुलासा केला की, घोडय़ांमध्येही काही काळे घोडे आहेत, तर काही पांढरे. म्हणून मग चौधरी यांनी पांढरा घोडा जर सर्वोत्तम असेल तर पांढरा घोडा बनून दाखवायचे  ठरवले. आज फैझाबादचे त्यांचे ‘चिरंजीव हॉस्पिटल’ सर्व सोयींनी सुसज्ज म्हणून नावाजले जाते. लहानपणी अनेक मैल लांब असलेल्या विहिरीवर पाणी भरायला जाणारे अशोक खाडे यांचे कुटुंबीय आज समुद्रावर तेलविहिरींसाठी तळ उभारीत आहेत. त्यांच्या दास ऑफशोअर या कंपनीचे काम सातासमुद्रापार पसरत आहे.
आजघडीला असे अनेक दलित उद्योजक टाकाऊ  गोष्टींचा पुनर्वापर, उत्पादन क्षेत्र, बांधकाम व्यवसाय, शिक्षण, आरोग्य सेवेसारखी नव्याने निर्माण झालेली सेवा क्षेत्रे, अशा बहुविध क्षेत्रांत यशस्वीपणे काम करत आहेत.
नवीन उद्योगाच्या भांडवलासाठी या होतकरू उद्योजकांना करावा लागलेला ‘जुगाड’ हा या सगळ्या कथांमध्ये सापडणारा समान धागा. अनेकदा त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांनी किंवा मित्रांनी हे पैसे जमवण्यासाठी प्रयत्न केले आहेत- पत्नीने आपले दागिने विकले आहेत, आईने आपली सगळी पुंजी पणाला लावली आहे, तसेच इतर कुटुंब सदस्य आणि हितचिंतक यांनीही भांडवल उभारणीसाठी खारीचा वाटा उचललेला दिसतो.
पुस्तकात अनेक ठिकाणी नेमके व्यवसाय करण्यामागची प्रेरणा यावर लेखकांनी भर दिला आहे. त्यामुळे या कथा प्रेरक झाल्या आहेत. मिलिंद कांबळेंच्या या पुस्तकातील प्रोफाइलची सुरुवातच दै. ‘लोकसत्ता’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असतानाच्या त्यांच्या अर्धे पान जाहिरातीच्या छायाचित्राने होते. मिलिंद कांबळे हे डिक्कीचे अध्यक्ष आहेत. इतर दलित उद्योजकांना प्रेरित करण्यात आणि या पुस्तकाच्या उभारणीत त्यांचा वाटा आहे. खाऊनपिऊन सुखी असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मिलिंद कांबळे यांना इंजिनीअर व्हायची इच्छा होती. वाघमारे नावाचे मित्र त्यांना पोलिटेक्निकला जायचा सल्ला देतात आणि कांबळे तो स्वीकारतात. सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदविका घेतात. कॉलेजात असताना प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी गेलेल्या मिलिंदला लहान वयात कंत्राटदारीचे काम करणारा बियानीसारखा माणूस भेटतो आणि त्यांच्या मनात विचार घोळू लागतो. त्यांनी केलेले दलित पँथरचे काम, अभाविपचे काम, पुढे घेतलेली छोटी-मोठी कंत्राटे आणि स्वत:ची कंपनी स्थापन करणे, त्याचबरोबर त्यांनी १४ एप्रिल २००३ रोजी स्थापन केलेली ‘दलित चेंबर ऑफ कॉमर्स’ या संघटनेची उभारणी आणि संघटन, मिळालेले यश हा सर्व प्रवास यात आला आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘फोर्चून’, ‘टाइम’, ‘न्यू यॉर्क टाइम्स’ यासारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मिलिंद कांबळे यांच्या कामाची दखल घेतली आहे.
या पुस्तकाच्या लेखकांपैकी देवेश कपूर हे युनिव्हर्सिटी ऑफ पेनिनसिल्व्हानियामधील सेंटर फॉर द अ‍ॅडव्हान्स स्टडी ऑफ इंडियाचे संचालक आहेत, डी. श्याम बाबू हे दिल्लीतील सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चमधील अनुभवी व्यक्ती आहेत आणि चंद्रभान प्रसाद हे ‘पायोनियर’चे स्तंभलेखक आणि ‘दलित चेंबर ऑफ कॉमर्स’ (डिक्की)चे सल्लागार आहेत. या तिघांनी सुंदर भाषेत हे पुस्तक लिहिले आहे. ती भाषा अतिशय प्रवाही आणि वाचनीय आहे. थोडक्यात उद्योजकांच्या या कथा केवळ दलित उद्योजकांनाच नव्हे, तर प्रत्येकाला उभारी घेण्यासाठी बळ देणाऱ्या आहेत.
डीफायिंग द ऑड्स – द राइज ऑफ दलित अ‍ॅन्त्र्यूप्रेनर्स :
देवेश कपूर, डी. श्याम बाबू आणि चंद्रभान प्रसाद
रॅण्डम हाऊस, नवी दिल्ली,
पाने : ३२०, किंमत : २९९ रुपये.