‘विशुद्ध’ हिंदीच्या आग्रहाने इतरांना कमी लेखण्याचा प्रकार काय किंवा हिंदीला ‘राष्ट्रभाषा’ म्हणण्याचा अडाणी अहंकार काय, अशा बऱ्याच विकारांपासून हिंदी भाषकांना दूर राहावे लागेल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या देशात जे कथित हिंदीप्रेमी, ‘हिंदीसेवक’ किंवा या भाषेपायी चाललेल्या राजकारणाकडे दुर्लक्ष करणारे हिंदीभाषक आहेत, त्यांच्यामुळे हा लेख लिहिण्याची वेळ कधी तरी येणारच होती. ती आताच येण्याचे ताजे निमित्त म्हणजे, अलीकडेच अजय देवगण या सिनेकलावंताने हिंदीप्रेमाचे केलेले प्रदर्शन. हिंदी जणू काही सर्वाचीच मातृभाषा आहे आणि तीच मुख्य भाषा आहे, अशा थाटात हे भाषाप्रेम यापूर्वीही अनेकांनी प्रदर्शित केलेले आहेच. कन्नड सिनेकलावंत किच्चा सुदीप यांनी दक्षिण भारतीय भाषांतील चित्रपटांच्या दमदार आणि सार्वत्रिक यशानंतर केलेल्या विधानाचा समाचार वगैरे घेण्याची काहीएक गरज नसताना अजय देवगण यांनी त्यांचे हिंदीप्रेम चव्हाटय़ावर आणले.

‘आता दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटांनी हिंदीच्या वळचणीला जाण्याची गरज नाही, कारण आता हिंदी ही काही राष्ट्रीय भाषा राहिलेली नाही’ असे सुदीप यांचे मूळ विधान, त्याकडे दुर्लक्षही करता आले असते कारण अशी विधाने सटीसामाशी होतच असतात आणि दक्षिणेतील भाषांतले चित्रपट हिंदीत ‘डब’ करावेत की कसे, हा निर्णय बाजाराचा कल पाहणारे निर्माते, वितरक आदी घेतच असतात. पण अजय देवगण (ते कुठल्या राजकीय पक्षाकडे झुकले आहेत याची उठाठेव इथे करणे गैरलागू आहे) ट्विटरवरून सुदीप यांना प्रत्युत्तर देण्यासाठी लगेच जागे झाले आणि डब केलेल्या चित्रपटांचा उल्लेख देवगण यांनी केला. वर, हे चित्रपट डब होण्याचे कारण ‘हिंदी हमारी मातृभाषा है और राष्ट्रीय भाषा थी, है और हमेशा रहेगी। जन गण मन।’ अशा शब्दांत, हिंदी ही जणू राष्ट्रभाषाच होती वा आहे, अशी वल्गना केली. ‘हमारी’ हा शब्द तर हिंदीत ‘आमची’ आणि ‘आपली’ अशा दोन्ही अर्थानी वापरला जातो, देवगण हिंदीला ‘हमारी’ म्हणजे नक्की कुणाची मातृभाषा ठरवत होते?

‘हिंदीच राष्ट्रभाषा’ असा असत्याग्रह धरल्यावर पुढे जो वाद वाढतो, तो इथेही वाढला. अगदी (भाजपशासित) कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि तेथील विरोधी पक्ष- म्हणजे काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेतेही या वादात उतरले, त्या सर्वानी हिंदीचे वर्चस्व लादले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हा वाद इंग्रजी प्रसारमाध्यमांनी बरोब्बर लावून धरला आणि त्यावरल्या स्फुटांमधून अस्फुटपणे का होईना, हिंदी ही संवादभाषासुद्धा नसून भारताची भाषा इंग्रजीच, असेही सूचित केले. अखेर इंग्रजीवादी, हिंदीवादी अशांना एकाच भाषेचा दुरभिमान असतो, तोही इतका की तो व्यर्थ आहे, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळेच हिंदीप्रेमी, हिंदीवादी लोकांसाठी मी पाच पथ्ये इथे सांगतो आहे.

पहिले पथ्य : आपल्या राज्यघटनेत कोठेही ‘राष्ट्रभाषा’ असा उल्लेख नाही. भारताचा राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे आणि ‘राष्ट्रीय गीत’सुद्धा आहे, राष्ट्रीय प्राणी आहे, राष्ट्रीय पक्षी आहे, पण ‘राष्ट्रीय भाषा’ नाही, याचे कारण संविधान सभेने- घटना सभेने- बऱ्याच चर्चेअंती एखाद्याच भाषेला असा वरचढ दर्जा न देण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतलेला आहे. राज्यघटनेला आठवे परिशिष्ट किंवा अनुसूची जोडण्याचा निर्णय नंतर झाला आणि या परिशिष्टात २२ भाषा आहेत, त्या सर्व समानच आहेत. हे लक्षात घेता हिंदीला ‘राष्ट्रभाषा’ म्हणणे केवळ अज्ञानाचेच नव्हे तर अहंकाराचेही प्रदर्शन ठरते. त्यामुळे हिंदी भाषकांनी किंवा हिंदीप्रेमींनी, हिंदीला कधीही ‘राष्ट्रभाषा’ न म्हणण्याचे पथ्य पाळावे.

दुसरे पथ्य : देशातील भाषावार लोकसंख्येचा विचार केला तर हिंदी बहुसंख्यांची भाषा ठरते का? आकडे पाहू. गेल्या जनगणनेनुसार ती ४४ टक्के भारतीयांची मातृभाषा आहे आणि ५७ टक्के जणांना ती कळते. म्हणजेच, हिंदी ही मातृभाषा नसलेल्यांची संख्या अधिक आहे. भाषेचा इतिहास- तिचे वय आणि तिच्यातील शब्दसंपदा या दोन्ही निकषांवर हिंदी ही अन्य भारतीय भाषांची लहान बहीणच शोभेल.

तमिळ आणि कन्नड भाषा सुमारे अडीच हजार वर्षे जुन्या आहेत, म्हणजे हिंदीपेक्षा ६०० वर्षे जुन्या. त्यातही ज्या प्रकारची हिंदी भाषा आज बोलली वा ऐकली जाते, ती फार तर २०० ते २५० वर्षांपूर्वीच रुळली. अन्य भाषांचे मोठेपण जाणून घेण्याचा काडीचाही प्रयत्न न करता त्यांच्याबद्दल उलटसुलट ग्रह करून घेणे ही त्या भाषांची क्रूर चेष्टाच ठरते. अनेक राज्यांमध्ये ‘त्रिभाषा सूत्रा’नुसार हिंदी भाषादेखील शाळेत शिकवली जाते, म्हणून हिंदी समजणाऱ्यांची संख्या वाढली.. तसे प्रयत्न हिंदी पट्टय़ातील राज्यांनी केले नाहीत, म्हणून मराठीबद्दल, बंगालीबद्दल वा कन्नडबद्दल हिंदीभाषकांना परकेपणा राहिला. हा परकेपणा सोडून, अन्य भाषाही समजून घेण्याचे पथ्य हिंदी भाषकांनी पाळले पाहिजे.

तिसरे पथ्य : ज्यांना आपण ‘बोली’, ‘उपभाषा’ वगैरे म्हणतो, अशा भाषांतच एखाद्या भाषेची मुळे असतात. हिंदीची तर नक्कीच आहेत. पण या भाषांना ‘बोली’ ठरवले गेल्यामुळे दहा टक्के भारतीय असे आहेत की, हिंदी ही त्यांची मातृभाषा नसूनसुद्धा त्यांना ‘हिंदीभाषी’ म्हणूनच मोजले जाते. भोजपुरी, मगही, ओराओं, गोंडी, अवधी, ब्रज, बुंदेली, बघेली, छत्तीसगढी, माळवी, निमाडी, हाडौली, भीली, मारवाडी, मेवाडी, बांगडी, मेवाती, कुमाऊनी, गढवाली, पहाडी.. अशा किती भाषांची नावे घ्यावीत! सरकारदरबारी मात्र हिंदीच्या ५६ ‘बोली’ म्हणूनच त्यांची नोंद आहे. वास्तविक या भाषांचे प्रश्नसुद्धा भारतातील ‘बोली’ ठरलेल्या अन्य भाषांप्रमाणेच साहित्य, लिपी, शब्दसंपदा, भाषक लोक यांच्या ऱ्हासाचे प्रश्न आहेत. हिंदी भाषकांनी आपल्या भाषेची मुळे या ‘बोलीं’मधून ओळखण्याचे, त्यांना बोली न मानता भाषा म्हणूनच त्यांचा आदर करण्याचे पथ्य पाळले तर त्या टिकतील.

चौथे पथ्य : संस्कृतीला ‘संस्क्रति’ किंवा कारागृहाला ‘काराग्रिह’ म्हणणे एक वेळ ठीक.. असते एकेकाची लकब.. पण तेच खरे, असे मानणारे ‘विशुद्ध’ हिंदी भाषक हे बोलतानाही शुद्धतेचा दुराग्रह इतका धरतात की भाषा मुळात संवादाचे साधन आहे याचीसुद्धा शुद्धच त्यांना राहात नाही. मग यांना ‘बम्बइया हिंदी’ किंवा ‘बिहारी हिंदी’ म्हणजे कमअस्सल वाटू लागते. तरी यांचा तोरा मात्र हिंदी अख्ख्या देशाची भाषा असल्याचा.. हे असे कसे चालेल? स्पेलिंगांच्या बाबतीत कर्मठ मानल्या जाणाऱ्या इंग्रजीनेही एकेका शब्दाची एकापेक्षा जास्त स्पेलिंगे आताशा स्वीकारली आहेत. हिंदीमध्ये अन्य भाषिक शब्दांचे ‘मिक्चर’ (मिक्श्चर) झाल्यावरही ती ‘टकाटक’ बोलता येते आणि उर्दू शब्द मिसळले काय वा अन्य कुठल्या भाषेचा आधार हिंदीने घेतला काय, गुफ्तगूसाठी भावना महत्त्वाची असते, हे कसे विसरणार? भाषेच्या विस्तारासाठी भाषकांचे हृदय अन्य भाषांनाही खुशाल सामावून घेण्याइतके विशाल असावे लागते, हे साधे आणि सार्वकालिक भाषाशास्त्रीय सत्य, असल्या हिंदीवाल्यांनी पथ्य म्हणून तरी पाळावे की!

पाचवे आणि अखेरचे पथ्य असे की, हिंदीचे देव्हारे माजवण्याऐवजी हिंदीचा रास्त वापर करण्याचा प्रयत्न हिंदीप्रेमी वा हिंदी भाषकांनी केला पाहिजे. ‘हिंदी दिवस’ पाळण्याचा बडेजाव आणि सर्व कर्मचाऱ्यांना त्यासाठी हजेरी लावण्याचे आदेश, हिंदीच अमुक भाषा नि तमुक भाषा असल्याच्या वल्गना करीत हिंदीसाठी जणू धर्मयुद्ध लढण्याचा अभिनिवेश, हे सारे सोडून हिंदीत ज्या चांगल्या कथा-कादंबऱ्या, कविता लिहिल्या जातात, त्यांचा साहित्यगंध अन्य भाषकांपर्यंत पोहोचवण्याचे काम थोडे तरी करतात का हो हे हिंदीनिष्ठ? आज हिंदीत बालसाहित्य वा किशोरांसाठी साहित्य लिहिणे, हिंदीचा ‘थिसॉरस’ म्हणजे शब्दरत्नाकर ‘ऑनलाइन’ सर्वासाठी उपलब्ध करून देणे, ही हिंदी भाषेची खरी सेवा ठरेल. जगाच्या बातम्या सांगणे, त्यावरली चर्चा करणे हे सारे शांतपणे आणि बुद्धिनिष्ठपणेसुद्धा हिंदीत करता येते, हेही पाहू दे की लोकांना.. तर मग आज नाइलाजाने इंग्रजी वृत्तवाहिन्यांकडे वळणारे काही जण हिंदीकडे वळतील.

हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा कधीही नव्हती आणि या बहुभाषी देशात तशी अपेक्षाही हिंदीने बाळगू नये. आपल्या देशाला एखाद्याच राष्ट्रभाषेची गरजही नाही. गरज आहे तरी संवादभाषेची, जोडणाऱ्या भाषासाधनाची.. ते काम हिंदी करू शकते, पण केव्हा?

.. या पाच पथ्यांचे ‘पंचशील’ हिंदी भाषक पाळतील तेव्हा आणि मुख्य म्हणजे, अन्य अनेक भारतीय भाषांमधले सर्वाना कळतील असे शब्द घेऊन हिंदीची समृद्धी व्यापक होईल, तेव्हा!

yyopinion@gmail.com

मराठीतील सर्व देशकाल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paths hindi speakers national language country alleged hindi lover speakers ysh
First published on: 06-05-2022 at 00:02 IST