नाशिवंत देह जाणार सकळ। आयुष्य खातो काळ सावधान।। हा चरण बुवांनी पुन्हा उच्चारला आणि घंटा वाजताच तिची घणघण जशी घुमत विरत जावी तसा हा चरण अंतर्मनाला आंदोलित करीत गेला.
प्रज्ञा – पण विठोबादादा, प्रश्न असा की सावधान व्हावं कसं? परमार्थाकडे वळायचं म्हणजे तरी काय करायचं? तो परमार्थही शुद्ध हवा ना? नाहीतर संसारात गोंधळ होता, तोच परमार्थात सुरू राहिला तर तो गोंधळ सावधानता थोडीच शिकवील?
प्रज्ञाच्या प्रश्नानं सर्वाचेच चेहरे उजळले. ज्ञानेंद्रनंही कौतुकानं एक कटाक्ष टाकला.
बुवा – तुमचा प्रश्न फार सुरेख आहे..
दादासाहेब – (कौतुकानं) दयार्णवाची सून शोभताहात!
दादांच्या उद्गारांवर प्रज्ञा नुसतं हसली. स्त्रीचं स्वत:चं व्यक्तिमत्त्व असतंच ना? तिनं कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी सून, कुणाची तरी मुलगी म्हणून का शोभावं? पण दादांचं वय आणि त्यांचा काळ वेगळा होता, हे मनात आणून ती काही न बोलता बुवांकडे पाहू लागली..
बुवा – अगदी खरं आहे सूनबाई.. प्रपंचात इतकी व्यवधानं आहेत की आधी परमार्थाचं खरं अवधानच येत नाही. कधी विजेसारखा विचार चमकला आणि पावलं परमार्थाकडे वळली तरी प्रपंचातली व्यवधानं आणि त्यांची ओढ कायम असली तर परमार्थातही खरी सावधानता, खरी अवधानता येत नाही.. मग परमार्थही प्रपंचासारखाच ‘मी’केंद्रित होतो.. तुम्ही नसताना सावता माळी महाराजांच्या एका अभंगाच्या निमित्तानं हाच मुद्दा निघाला होता की आपण भक्ती का करतो आणि खरंच करतो का? ज्यानं परमेश्वरापासून अधिकाधिक विभक्त होत जातो, ती भक्ती कशी? ज्यानं अज्ञानच वाढतं ते ज्ञान कसं? ज्यानं परमात्म्याचा वियोगच वाढतो तो योग कसा?
दादासाहेब – फार छान.. फार छान..
हृदयेंद्र – बुवा पुन्हा मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवला.. (बुवा कौतुकानं पाहातात) पण पूर्ण आठवत नाही.. पहिली ओळच आठवते.. अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती। तयाचियें चित्तीं बोध कैंचा।।
बुवा – हो हो.. पण मलाही या क्षणी तो पूर्ण आठवत नाही..
ज्ञानेंद्र – थांबा गाथाच आणतो.. (अभ्यासिकेतून गाथा आणून देतो त्यातील सूचीतून अभंग शोधत हृदयेंद्र म्हणतो..)
हृदयेंद्र – सापडला.. २८५०वा अभंग आहे.. हं, ऐका.. अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती। तयाचियें चित्तीं बोध कैंचा।। अज्ञानाची पूजा कामिक भावना। तयाचि ध्याना देव कैंचा।। अज्ञानाचें कर्म फळीं ठेवी मन। निष्काम साधन तया कैंचें।। अज्ञानाचें ज्ञान विषयावरी ध्यान। ब्रह्म सनातन तया कैंचें।। तुका म्हणे जळो ऐसियांचें तोंड। अज्ञानाचें बंड वाढविती।।
बुवा – भक्ती म्हणजे नेमकी काय, तिचा हेतू काय, उद्दिष्ट काय हे माहीत नाही. भक्तीनं आपली सांपत्तिक स्थिती सुधारावी हाच हेतू असेल तर ती भक्ती संपत्तीची झाली, देवाची नव्हे! अशा ‘लक्ष्मी’भक्तांच्या चित्तात खरा बोध कसा रुजणार? मनात कामना ठेवून जे विविध पूजा करीत राहातात त्यांच्या ध्यानात देव येईल की अडीअडचणी येतील? कर्म करताना जे त्याचं अज्ञानप्रेरित फळही मनात ठेवतात त्यांच्याकडून निष्काम साधन कधी तरी घडेल का? ज्यांना अज्ञान हेच ज्ञान वाटतं आणि ज्यांचं अहोरात्र ध्यान विषयावरच असतं त्यांना सनातन ज्ञान कधीतरी गवसेल का? तुकाराम महाराज म्हणतात की असे अज्ञानी हे अज्ञानाचाच पसारा वाढवत जातील! म्हणजेच खरी भक्ती माहीत नाही, खरा योग माहीत नाही, खरं ज्ञान माहीत नाही; अज्ञानातून उद्भवलेली भक्ती हीच खरी भक्ती म्हणून ते तिचा डिंडिम वाजवतील.. तीच गत योगाची, ज्ञानाची..
हृदयेंद्र – जो स्वत: चिखलात रुतला आहे, अनंत इच्छांच्या साखळदंडांमध्ये जखडला आहे तो चिखलात रुतलेल्या दुसऱ्या माणसाला कसं बाहेर काढू शकेल? दुसऱ्याला बंधनातून कसं मुक्त करू शकेल? उलट याच्याबरोरब तोही आणखीनच गाळात जाईल! तेव्हा प्रज्ञाचं म्हणणं खरंच आहे. आधी शुद्ध परमार्थ उमगला पाहिजे आणि तो उमगायचा तर ज्याचं जगणं हाच शुद्ध परमार्थ आहे अशाचा संग लाभला पाहिजे! तेव्हाचं व्यवधानातूनही खरं अवधान येत जाईल!
चैतन्य प्रेम

nashik, police, complainants
नाशिक : जप्त एक कोटीचा मुद्देमाल पोलिसांकडून तक्रारदारांना परत
satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
politicle war, shrimant shau maharaj , sanjay mandlik, kolhapur lok sabha election 2024 campaign
कोल्हापुरात प्रचाराची हवा तापली, ‘ मान गादीला मत मोदीला ‘
ranjitsinh naik nimbalkar marathi news
“बटन दाबले आणि समस्या सुटली, असे होत नाही…”, रणजितसिंह निंबाळकरांच्या वक्तव्याने….