अजित पवार यांनी नाटय़कर्मीना दिलेला संदेश पाहता, त्यांचा अभिनय क्षेत्रातील अधिकार किती वादातीत आहे, हे लक्षात येऊ शकेल. राजकारणावर बोलण्याचा त्यांचा अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नाही, पण अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतील निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जे कान टोचले आहेत ते पाहता, त्यांना लवकरच नाटय़ परिषदेचे मानद सदस्यत्व बहाल केले जाईल, असे दिसते. नाटय़चित्रपट क्षेत्रातील कलावंत ‘मातोश्री’ आणि ‘कृष्णकुंज’मध्ये विभागले गेले आहेत, असा थेट आरोप करताना अजित पवारांनी ‘मग आम्हालाही त्याचा विचार करावा लागेल’, अशी थेट धमकी देऊन टाकली. त्यामुळे कसे वागावे याचे धडे कुणाकडून घ्यायचे, याची चिंता आता कलावंतांना राहिलेली नाही. पवारांचे दुखणे खरे तर वेगळेच आहे. ते म्हणजे, हे कलावंत त्यांच्याकडे येत नाहीत आणि त्यांचे काही ऐकतही नाहीत. बारामतीमध्ये झालेल्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे आयते चालून आलेले स्वागताध्यक्षपद त्यांनी याच कारणासाठी स्वीकारले होते. अजित पवार ज्या गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात बोलले, त्या देवलांचे कार्यकर्तृत्व समजावून घेण्याची त्यांना गरज वाटली असेल की नाही, हे सांगता येणार नसले तरीही नाटय़ परिषदेतील राजकारणाची बित्तंबातमी त्यांच्यापाशी असल्याचा पुरावाच जणू त्यांनी सादर केला. नाटय़ परिषदेच्या निवडणुकीतील राजकारणाने त्यांना आश्चर्यचकित व्हायला झाले, याचे कारण आपल्या सल्ल्याशिवाय कुणी राजकारणाचा आखाडा मारू शकतो, याची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर तोंडात बोटे घालण्याची वेळ आली, एवढेच नाही तर राजकारणातही कसलेल्या अशा कलावंतांना आपल्या पक्षात घेण्याचीही इच्छा त्यांना होऊ लागली. सामाजिक संदेश पोहोचवण्यासाठी नाही का कलावंतांना जाहिराती करायला लावतात, तसेच राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी अशा कलावंतांची मदत झाली, तर राष्ट्रवादीची नौका सहजपणे तीराला लागेल, अशी त्यांची अटकळ असावी. कलावंतांनी राजकारण करू नये आणि राजकारण्यांनीही नाटके करू नयेत, असे सांगणाऱ्या दादांना, नाटकवाल्यांनी राजकारण केल्यास काय होते, हे नाटय़ परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कळून चुकले. भूमिकांची ही अदलाबदल कोणाच्या फायद्याची आहे, हे दादांना वेगळे सांगायला नको. मुंबईतल्या नाटय़ परिषदेच्या निवडणुकांपाठोपाठ आता पुण्यातही त्या होऊ घातल्या आहेत. नाटकाशी प्रेक्षक म्हणूनही संबंध नसलेल्या अनेकांना आता अध्यक्षपदाचे डोहाळे लागले आहेत. वैद्यकी सोडून राजकारण करणाऱ्यांना जसे कोणतेच क्षेत्र वज्र्य नाही, तसेच तंबाखू, सुपारी विकणाऱ्यांना तरी का असावे, असा प्रश्न आता पुण्याच्या नाटय़वर्तुळात उपस्थित होऊ लागला आहे. अजितदादा पुण्याचे पालकमंत्री असल्याने त्यांना याही निवडणुकीत अधिकृतपणे मध्यस्थी करता येईल. येणाऱ्या काळात राजकारण्यांना कलेच्या प्रांतात आणि कलावंतांना राजकीय मैदानात उतरण्याच्या भल्या मोठय़ा संधी मिळण्याची शक्यता आहेच. दादांनी पुढाकार घेऊन कृष्णकुंज आणि मातोश्रीवर फेऱ्या मारणाऱ्यांना दहा टक्क्य़ातील घरे द्यावीत, त्यांच्या सगळ्या लीला पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, म्हणजे मग राजीनामानाटय़ अधिक आकर्षकपणे वठवणे त्यांना शक्य होईल. रुसवेफुगवे आणि फुरंगटून बसण्याचा अभिनय कसा करायचा, हेही समजेल!
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2013 रोजी प्रकाशित
अजितदादांचे नाटक
अजित पवार यांनी नाटय़कर्मीना दिलेला संदेश पाहता, त्यांचा अभिनय क्षेत्रातील अधिकार किती वादातीत आहे, हे लक्षात येऊ शकेल. राजकारणावर बोलण्याचा त्यांचा अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नाही, पण अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतील निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जे कान टोचले आहेत ते पाहता, त्यांना लवकरच नाटय़ परिषदेचे मानद सदस्यत्व बहाल केले जाईल, असे दिसते.

First published on: 17-06-2013 at 12:22 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drama of ajitdada pawar