मूडीज ही आर्थिक संशोधन संस्था, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांच्यातील एक साम्य म्हणजे या साऱ्यांचा संबंध आर्थिक क्षेत्राशी आहे. दुसरे आणि परवाच्या शुक्रवारपासूनच उद्भवलेले साम्य म्हणजे, या तिघांना भारतात सहिष्णुता, सलोखा आणि मोकळे वातावरण यांची गरज आता वाटू लागली आहे! देशात सहिष्णुता नसावी, सलोखा नसावा किंवा मोकळय़ा वातावरणाऐवजी दडपणेच अधिक असावीत असे कोणीही कधीही कोणत्याही देशाबद्दल उघडपणे म्हणत नसते. पण सहिष्णुता हवी, सलोखा हवा आदी अपेक्षा जेव्हा जाहीरपणे व्यक्त केल्या जातात तेव्हा हे सध्या नाही किंवा कमी आहे, आणि देश चालवणाऱ्यांनी त्यांची जबाबदारी ओळखली पाहिजे, हेच सांगितले जाते. मूडीजने ते स्वच्छपणे सांगितले. जातीय सलोखा राखल्याखेरीज आणि असहिष्णुतेतून होणारा हिंसाचार रोखल्याखेरीज भारतात गुंतवणुकीला मोठय़ा आशा नाहीत, अशा अर्थाची वाक्ये या संस्थेच्या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात आहेत. देशांच्या गुंतवणूक-योग्यतेचे गुण जोखण्यासाठी ज्या संस्थांवर जगभरात विश्वास ठेवला जातो, त्यांपैकी मूडीज ही एक.

मूडीजसारखी संस्था कोणत्याही देशाच्या व्यवस्थेत ज्यांचा अंतर्भाव करते, त्यात त्या देशाची रिझव्‍‌र्ह बँक आणि तिचे गव्हर्नरही येतात. परंतु आपल्या रिझव्‍‌र्ह बँकेचे रघुराम राजन यांनी, प्रश्न विचारण्याची संस्कृती अबाधित ठेवा अशा शब्दांत सर्वच प्रकारची दडपणे रोखण्याचे जाहीर आवाहन दिल्लीच्या आयआयटीतील भाषणातून केले, तेही मूडीजचा अहवाल आल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी. नेमक्या त्याच दिवशी, इन्फोसिसचे नारायणमूर्ती यांनी एका चित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा तपशील प्रकाशित झाला. शिवसेनेने १९६० च्या दशकात दाक्षिणात्त्यांविरुद्ध केलेल्या आंदोलनासह अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे, पण आज देशातील सहिष्णुता इतकी खालावली आहे की माझ्यासह अनेकांना भीती वाटते, असे नारायणमूर्ती यांचे म्हणणे. ही तीन्ही विधाने योग्य की अयोग्य, हा मुद्दा सध्या बाजूला राहिला आहे. टीका काय आहे, ती कशाबद्दल आहे याचा अजिबात विचार न करता ती ज्याने केली त्याला प्रतिटीकेचे लक्ष्य करायचे किंवा त्याची लायकी काढायची, हा नेहमीचा मार्ग या तिघांबद्दल अवलंबला गेल्यामुळे टीका राहिली बाजूला, असे होण्याचा धोका अधिक आहे.

मूडीजच्या विश्लेषणात बिगर-आर्थिक बाबी घुसडल्या जाण्यामागे ‘मूठभर बुद्धिवंतांची फूस’ आहे, किंवा पाय जायबंदी झालेल्या नारायणमूर्तीना घरबसल्या टीका करण्याचे काही कारणच नाही आणि त्यांनी आधी स्वतच्या कंपनीला सावरावे, असे टीकेचे सूर आता निघू लागले आहे. केवळ समाजमाध्यमांत नव्हे तर प्रसारमाध्यमांपर्यंतही टीकाकारांवरच ओढलेले हे कोरडे आता धडकू लागले आहेत. ‘रघुराम राजन आजोबां’नी आधी स्वतचे काम नीट करावे, असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिलेला आहे आणि त्यातून राजन यांच्या विधानांकडे न पाहता शाळकरी खिल्लीबाज पातळीला राजन यांचा विचार केला जाणार, हे स्पष्ट होत आहे.

टीका ऐकूनच न घेणाऱ्यांवर टीका करणे, हे झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करण्याहून महाकठीण! आणि टीका ऐकूनच न घेणाऱ्यांचे पहिले लक्षण हे की, टीका काय आहे यापेक्षाही ती कोणी केली आहे याच्या तपशिलाला महत्त्व दिले जाते. हीच परिस्थिती कायम राहिल्यास, मतांतर किंवा सत्ताधाऱ्यांपेक्षा आणि बहुसंख्यांच्या मतांपेक्षा भिन्न मत हे ‘अल्पसंख्य’ ठरण्याचा धोका मोठा आहे. त्यांची संख्या कमी असणारच, म्हणजे त्या अर्थाने ते आजही अल्पसंख्यच आहेत. पण संख्या कमी असल्यामुळे आपण गप्प राहून फक्त सहन करायचे, हा धडा एखाद्याला शिकावा लागणे ही सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक बाब असते. या तिघांवरील टीकेतून या घातक बाबीची अत्यंत प्राथमिक पातळीवरील चुणूक दिसली आहे.