ट्रम्प यांच्याशी दोस्ताना वा साधर्म्य हे अन्य देशांत आतबट्ट्याचे ठरू शकते असा संदेश कॅनडातील निवडणूक निकालातून मिळतो.

एका देशाचा उचापतखोर नेता शेजारील देशाच्या निवडणुकीत इतका निर्णायक ठरतो याचे दुसरे उदाहरण सापडणे अवघड. पहिले कॅनडात २९ एप्रिलच्या निवडणुकीत जे काही झाले त्यात सापडावे. या निवडणुकीत सत्ताधारी ‘लिबरल’ पक्षाचे मार्क कार्नी विजयी झाले. या विधानातून पुरेसा बोध होणे अवघड. जानेवारीत ज्यास पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले ते जस्टीन ट्रुडो आणि कार्नी हे एकाच पक्षाचे. ट्रुडो गेले दशकभर पंतप्रधानपदी होते. या काळात ते कॅनडाचा जागतिक चेहरा बनून गेले होते आणि त्यांचा ‘लिबरल’ पक्ष दशकभराच्या सत्तापभोगाने सुस्त झालेला होता. त्यातूनही गेली दोन वर्षे ट्रुडो यांच्यासाठी घसरगुंडीची ठरली. कॅनडाची अर्थव्यवस्था मरगळू लागलेली होती आणि ती चेतवण्यासाठी ट्रुडो यांस नवीन काही चमकदार राबवता येत नव्हते. साधारण दशकभराच्या सत्तेत कोणताही, कितीही कार्यक्षम असलेला नेता नावीन्य हरवतो आणि पहिल्यांदा सत्तेत येण्यासाठी जे केले त्याच्याच रेघोट्या ओढत राहतो. तथापि नवे काही करता न आल्यास नेतृत्वावरील परतावा उत्तरोत्तर घसरू लागतो. अशा वेळी काही भावनिक, विद्वेषी मुद्दा आवश्यक. नपेक्षा सदर नेत्याचा नेतृत्वदीप मंदावू लागतो. ट्रुडो यांनी भारताविषयी विद्वेष निर्मिती करून तो प्रयोग करून पाहिला. पण फसला. कारण हा काही हिंदू-मुसलमान, इस्रायली-पॅलेस्टाईन, गोरे विरुद्ध कृष्णवर्णीय इतका तीव्र विषय नाही. त्यामुळे तो फसला यात आश्चर्य नाही. परिणामी ट्रुडो यांची लोकप्रियता झपाट्याने घसरली आणि त्यातूनच जानेवारीत त्यांस पदत्याग करावा लागला. ट्रुडो यांच्यामुळे त्यांच्या पक्षाविषयीदेखील इतकी नाराजी होती की निवडणुकीत हा पक्ष हरणार हे स्पष्ट जाणवू लागले. तथापि एका राजकीय चमत्काराने वातावरण बदलले.

तो घडला शेजारच्या अमेरिकेत. याआधी दोन महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे राज्यारोहण झाले आणि ही ‘वॉशिंग्टनची कुऱ्हाड’ कशीही वेडीवाकडी फिरू लागली. तिचा पहिला फटका शेजारील कॅनडास बसला. अमेरिकेस खेटून असलेला हा देश आपण ‘घेऊन’ टाकावा असे ट्रम्प यांस वाटले. हे वाटणे मनातल्या मनात असते तर एक वेळ ठीक. पण कोणताही मागचा-पुढचा विचार न करता मनातले धाडकन बोलून टाकायचे हा ट्रम्प यांचा खाक्या. तो याहीबाबत दिसून आला आणि कॅनडास अमेरिकेचे ५१ वे राज्य म्हणून अंकित करून टाकण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. पाठोपाठ आला आयात कॅनडीयन उत्पादनांवर आयात शुल्काचा दणका. साहजिकच कॅनडात हलकल्लोळ उडाला. हंगामी पंतप्रधान कार्नी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर टीकेची एकच झोड उठवली आणि ट्रम्प यांचे भाष्य हे कॅनडाचा मानभंग करणारे आहे, अशी भूमिका घेतली. इतकेच नाही तर कार्नी यांनी अमेरिकेशी काडीमोड घेऊन कॅनडाच्या अर्थव्यवस्थेतून लवकरात लवकर अमेरिकेस बेदखल करण्याची भाषा सुरू केली. कार्नी यांच्या गाठीशी बँक ऑफ कॅनडा तसेच बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाचा दांडगा अनुभव आहे. एक ज्येष्ठ बँकर या लौकिकामुळे त्याच्या वक्तव्यात बोलभांड ट्रम्प यांच्यापेक्षा किती तरी अधिक शहाणपण होते. त्यामुळे ते पाहता पाहता लोकप्रिय झाले आणि त्यांच्या पक्षाचा शून्याखाली गेलेला आलेख पुन्हा झपाट्याने वर जाऊ लागला. अखेर ते विजयी झाले.

त्यांच्यापुढे आव्हान होते पीअर पॉइलीव्हर यांच्या ‘कंझर्व्हेटिव्ह’ या प्रतिगामी पक्षाचे. या पॉइलीव्हर यांचे वर्णन कॅनडाचे ट्रम्प असे केल्यास वावगे ठरणार नाही. वावदूकपणाबाबत दोघांतील साम्य कौतुकास्पद. प्रत्यक्षात औषधासाठी वापरणे अपेक्षित असलेले पण अमली पदार्थ म्हणून गैरवापर होते त्या फेंटानिल रसायनाच्या निर्मितीवर पूर्ण बंदी घालण्याची भाषा, धनाढ्यांवरील कर वाढवण्यास नकार, उदारमतवादी विद्यापीठांचे केंद्रीय अनुदान थांबवण्याचा इशारा इत्यादी मुद्द्यांमुळे हे पॉइलीव्हर चांगलेच लोकप्रिय होते. आर्थिक विपन्नावस्था अनुभवणारा समाज नेहमीच धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतिगामींकडे आकृष्ट होत असतो. याची उदाहरणे अनेक. त्यामुळे पॉइलीव्हर हे कॅनडात चांगलेच लोकप्रिय होते. त्यात त्यांनी ट्रुडो सरकारवर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवस्थापनासाठी केलेली घणाघाती टीका त्यांच्या लोकप्रियतेत भर घालत होती. ट्रुडो यांच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात कॅनडाची अधोगतीच झाली आणि हे दशक राष्ट्रउभारणीच्या कार्यात पूर्ण वाया गेले ही त्यांची टीका कॅनडात बहुतेकांस स्वीकारार्ह होती. त्यामुळे पॉइलीव्हर यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण झाले भलतेच. शेजारील अमेरिकेत ट्रम्प यांचा झंझावात आला आणि त्यात कॅनडातील प्रति-ट्रम्प पॉइलीव्हर यांचा राजकीय तंबू उन्मळून पडला. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाची इतकी वाताहत झाली की खुद्द पॉइलीव्हर यांनाही पराभव पत्करावा लागला. गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत पॉइलीव्हर यांच्या ‘प्रतिगामी’ पक्षास मिळालेल्या मतांच्या प्रमाणात काहीशी वाढ झाली खरी, पण तिचे रूपांतर ते विजयात करू शकले नाहीत.

या निवडणुकांतील आपल्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे खलिस्तानवादी ‘द न्यू डेमॉक्रॅटिक पार्टी’चा झालेला दारुण पराभव. जगमित सिंग यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाच्या मत टक्केवारीत चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत या वेळी चक्क डझनभर टक्क्यांची घट झाली. सत्ता बनवण्यात सहभागी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या पक्षास राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान राखता येईल इतकीही मते पडली नाहीत. खुद्द सिंग यांसही पराभवाचा सामना करावा लागला. ही ब्याद तसेच पंतप्रधान ट्रुडो कॅनडाच्या लोकप्रतिनिधिगृहात आता नसतील. त्यामुळे भारत-कॅनडा यांच्यातील फाटलेले संबंध सुधारण्याची खात्री बाळगता येईल. भारतीय वंशाचे लाखो नागरिक आणि तितकेच भारतीय विद्यार्थी आज कॅनडात विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी उभय देशांचे संबंध सुधारले जाणे गरजेचे होते. जगमित-ट्रुडो यांच्या पराभवामुळे आणि त्याहीपेक्षा अधिक कार्नी यांच्या विजयामुळे संबंध सुधार प्रक्रियेस गती मिळेल. आपण ट्रुडो यांच्या विविध विषयांवरील धोरणांपासून फारकत घेऊ असे कार्नी यांनी गेल्या तीन महिन्यांत अनेकदा सूचित केले. एक यशस्वी बँकर या नात्याने कोठे गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळतो याचे ज्ञान त्यांना अर्थातच इतरांपेक्षा अधिक असणार. त्यामुळे ट्रुडो यांच्याप्रमाणे काही भावनिक मुद्द्यांवर ते आपली ऊर्जा खर्च करणार नाहीत. तेव्हा कार्नी यांच्या उदयामुळे भारत-कॅनडा संबंधांचे नवे पर्व सुरू होण्याची शक्यता अधिक. विशेषत: यापुढे कॅनडाचे संबंध अमेरिकेशी पूर्वीप्रमाणे असणार नाहीत असे स्पष्ट विधान कार्नी यांनी केलेले असल्याने त्यांना नवीन व्यापार भागीदारांची गरज अधिक असणार हे उघड आहे. ही बाब आपल्यासाठीही सोयीची. अशा तऱ्हेने कॅनडाच्या निवडणुकांचा निकाल स्वागतार्ह ठरतो. त्याविषयी समाधान व्यक्त करताना एक निरीक्षण नोंदवणे आवश्यक. ते पराभूत पीअर पॉइलीव्हर यांच्याविषयी आहे. आपल्या धोरणांमुळे ते ट्रम्प यांना जवळचे मानले जात. ट्रम्प यांच्या अमेरिकी प्रतिगामी रिपब्लिकन पक्षाप्रमाणे पॉइलीव्हर हेही कॅनडातील प्रतिगामी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. पण या ट्रम्प-साधर्म्य आणि साहचर्यामुळेच कॅनडातील मतदारांनी त्यांना दूर राखले. शेजारील देशात एक असताना आपल्याही देशात प्रति-ट्रम्प नको असा विचार मतदारांनी केला असणार. म्हणजे ट्रम्प यांच्याशी दोस्ताना वा साधर्म्य हे अन्य देशांत आतबट्ट्याचे ठरू शकते असा संदेश या निवडणुकीतून मिळतो. हरते कार्नी जिंकले ते ट्रम्प यांच्यामुळे आणि विजय मार्गावरील पॉइलीव्हर पराभूत झाले तेही ट्रम्प यांच्यामुळे. अशा तऱ्हेने कॅनडाच्या निवडणुकीत ट्रम्प हरले, ट्रम्प जिंकले असे म्हणता येईल.