निवडणुकीत ट्रम्प यांच्या मागे तरुणांची फौजच्या फौज उभी करण्याच्या ‘गुणा’मुळेच ट्रम्प यांच्या ‘मागा’ या मोहिमेचे चार्ली कर्क हे बिनीचे शिलेदार होते.

‘‘अमेरिका इज द ओन्ली कंट्री दॅट वेंट फ्रॉम बार्बेरिझम टू डेकेडन्स विदाउट सिव्हिलायझेशन इन बिट्वीन,’’ असे विख्यात लेखक ऑस्कर वाईल्ड अमेरिकेविषयी म्हणून गेले. त्याची प्रचीती गेले काही महिने येत असतानाच ताज्या घटनेत हे सत्य अधोरेखित झाले. चार्ली कर्क यांची हत्या हे ते सत्य. चार्ली ही कोणी साधी असामी नव्हे. चार्ली फक्त ३१ वर्षांचे होते आणि एका महाविद्यालयातील कार्यक्रमासाठी गेले असता दूरवरील इमारतीतून केल्या गेलेल्या गोळीबारात त्यांची हत्या झाली. अमेरिकेत धार्मिक, सांस्कृतिक पुराणमतवादाचा जो उन्माद गेले काही महिने दिसून येतो त्या प्रतिगामित्वास तरुणांपर्यंत नेऊन अमेरिकेच्या घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यातील एक महानुभाव म्हणजे चार्ली कर्क. साहजिकच त्यांच्या निधनाने अशा विचारसमूहाचे कुलपती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला. म्हणूनच ख्रिस्ती धर्मगुरूंनी चार्लीच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या मागे तरुणांची फौजच्या फौज उभी करण्याचे श्रेय या चार्ली कर्क यांस जाते. अलीकडेच झालेल्या आपल्या आशिया दौऱ्यात या चार्ली यांनी ‘मी ट्रम्प यांना निवडून आणले’, अशी दर्पोक्ती जाहीरपणे केली ती काही अस्थानी नव्हती. या त्यांच्या गुणांमुळेच ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ म्हणजेच ‘मागा’ या मोहिमेचे ते बिनीचे शिलेदार होते. त्यांची हत्या ही अमेरिकेतील प्रतिगामी शक्तींच्या संघटनकार्यास मोठा फटका असेल असे मानले जाते. या नव्या अमेरिकेच्या केंद्रस्थानी असलेल्या कर्क यांचे जाणे म्हणून दखलपात्र ठरते.

आजच्या एकविसाव्या शतकात हा तरुण कार्यकर्ता ‘‘महिलांनी लवकरात लवकर विवाहबद्ध होऊन अधिकाधिक मुले प्रसवावीत’’, असे उघडपणे सांगायला कमी करत नसे. ‘‘तिशीतील तरुणींच्या प्रेमात पडू नका, त्यांचा बहर ओसरलेला असतो’’ (दे हॅव पास्ड देअर प्राइम), असा ‘सल्ला’ देण्यास त्यांस काहीच गैर वाटत नसे. ‘‘वैमानिक काळे असतील तर मी विमानात बसताना जरा घाबरलेलाच असतो’’, इतकी वंशवादी भूमिका ते उघड घेत. अलीकडच्या आशिया दौऱ्यात दक्षिण कोरियात त्याचे जंगी स्वागत झाले. त्याची परतफेड त्यांनी कोरियन तरुणांना ‘‘जागतिकीकरण वगैरेंच्या विचारात पडू नका’’ असा सल्ला देऊन केली. चांगल्या सुशिक्षित घरात जन्मलेल्या चार्ली यांनी शालेय वयाच्या उत्तरकाळात मिल्टन फ्रिडमन वाचले आणि त्यांच्या राजकीय ऊर्मी जाग्या होऊ लागल्या. वास्तविक त्यांचे अर्थविचार आणि फ्रिडमन यांची मांडणी यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता हे खरे. किंबहुना जे जे मिल्टन यांनी सांगितले, त्याच्या बरोबर उलट चार्ली यांची राजकीय कृती होती. हे अपश्रेय त्यांच्या वक्तृत्वकलेची नोंद घेणाऱ्या स्थानिक रिपब्लिकन नेत्याचे. त्याने चार्ली यांस पंखाखाली घेतले आणि उत्तम बुद्धिभेद करून त्यांचे रूपांतर एका कडव्या, प्रतिगामी नेत्यात यशस्वीपणे करून दाखवले. त्यानंतर चार्ली यांस सूर गवसला आणि जगात अलीकडे वाढू लागलेल्या उजव्या कंठाळी गटाचे ते म्होरके बनले. त्यांनी स्वत:ची संघटना स्थापली. ‘टर्निंग पॉइंट यूएसए’ हे तिचे नाव. सर्व प्रतिगामी विचारांची ती गंगोत्री बनली. मुद्दा मग स्त्रियांस गर्भपाताचा अधिकार हवा की नको हा असो अथवा पारलिंगींच्या अधिकारांचा असो. ‘टर्निंग पॉइंट यूएसए’ अशा सर्व प्रागतिक मुद्द्यांवर कमालीची कंठाळी भूमिका घेत असे. बघता बघता चार्ली कर्क यांची ही ‘टर्निंग पॉइंट यूएसए’ ही संघटना ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ची तरुण शाखा ठरली. पण मुद्दा केवळ चार्ली प्रतिगामी होते हा नाही.

तर या प्रतिगामित्वाचे, आपल्या घृणास्पद वर्तनाचे आणि कालबाह्य विचारांचे ते अत्यंत यशस्वी प्रसारक होते आणि महाविद्यालयीन तरुणांत त्यांची लोकप्रियता हेवा वाटावी अशी होती. आताही यूटा येथील महाविद्यालयात ते या वैचारिक भूमिकेच्या समर्थनार्थ हजर होते. ‘‘मला चुकीचे ठरवून दाखवा’’, असे त्यांचे आव्हान असे आणि कोणीही पुरोगामी, उदारमतवादी, आधुनिक विचारांच्या पुरस्कर्त्याने आपणास वादात जिंकून दाखवावे असा त्यांचा पवित्रा असे. भलेभले त्यांस टाळत. एखाद्याने वावदूकपणाच करायचा म्हटले की समोरच्या शहाण्यांवर मर्यादा येतात. बेजबाबदार व्यक्ती जी भाषा सहज करू शकतात त्या भाषेचा वापर शहाण्यांच्या तत्त्वांत बसत नाही. अशा वेळी अशा बडबडखोराशी दोन हात करण्यापेक्षा त्याला टाळलेले बरे असाच विचार सुज्ञ करतात. त्यामुळे चार्ली कर्क यांच्यासारख्यांचे फावते आणि आपण अजेय असल्याची भावना त्यांच्या मनी दाटते. चार्ली यांच्याबाबत हेच घडले होते. आताही महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या वाचाळतेचा आनंद लुटण्यासाठी हजारो विद्यार्थी हजर होते. चार्ली यांच्या हत्येमागील काव्यात्म न्यायाचा (कु)योग असा की त्यांस प्रश्न विचारला गेला तो अमेरिकेतील बंदूक संस्कृतीबाबत. चार्ली असो वा रिपब्लिकन ट्रम्प वा त्या पक्षाचे अन्य कोणी. या सर्वांचा अमेरिकेच्या मुक्त बंदूक संस्कृतीस पाठिंबा असतो. खनिज तेल उद्याोगाप्रमाणे अमेरिकेतील ‘गन लॉबी’ अत्यंत ताकदवान आहे. त्यामुळे रिपब्लिकन-चलित राज्यांतील दुकानांमध्ये शीतपेयाची बाटली घ्यावी इतक्या सहजपणे बंदुका, काडतुसे यांची खरेदी करता येते. त्याचा परिणाम असा की अमेरिकी समाजजीवनात बंदुकांचा सुळसुळाट झाला असून साध्या साध्या संघर्षांचा शेवट बेछूट गोळीबारात होताना दिसतो. अगदी शालेय वयापासून या बंदुका सर्रास उपलब्ध असतात. अलीकडे अनेक शाळा, दुकाने यांत गोळीबाराच्या घटनांत अनेकांचे प्राण गेले ते या बंदूक उपलब्धतेमुळे. बराक ओबामा, बिल क्लिंटन, जो बायडेन आदींचा डेमॉक्रॅटिक पक्ष या बंदूक संस्कृतीवर नियंत्रण आणावे या मताचा आहे. पण रिपब्लिकन तिचे सर्रास समर्थन करतात. चार्ली यांनीही याच अनुषंगाने उत्तर दिले आणि काही क्षणांत दूरवरील इमारतीतून आलेल्या बंदुकीच्या गोळीने त्यांचे प्राण घेतले. त्यांचा मारेकरी कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणा संघटनेनेही त्यांच्या हत्येची जबाबदारी घेतलेली नाही. पण जे झाले त्यामुळे अमेरिकी समाजाभ्यासक गंभीर चिंतेत आहेत.

याचे कारण ट्रम्प सत्तेवर आल्यापासून वाढू लागलेले राजकीय हत्यांचे वा हल्ल्यांचे प्रमाण. ट्रम्प यांच्या समर्थकांनी ताज्या हल्ल्यासाठी लगेच पुरोगामी, अमेरिकाविरोधी शक्तींच्या नावे बोटे मोडणे सुरू केले असून त्यामुळे अशा वातावरणात हत्यासत्रच सुरू होणार की काय, याची चिंता तेथे व्यक्त होताना दिसते. ज्याप्रमाणे ट्रम्प आणि चार्ली समर्थक चिथावणीखोर भाषा करू लागले आहेत, ते लक्षात घेतल्यास अशा हत्यासत्राची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात स्वत:चा पराभव मान्य न करता त्या विरोधात कॅपिटॉल हिलवर आपल्या समर्थकांकरवी हल्ला घडवून आणणारे महाशय अध्यक्षपदी असताना सबुरी, शहाणपण यांची अपेक्षा करणेही व्यर्थ. तेव्हा ‘उजव्याच्या’ हत्येचा सूड म्हणून कोणा ‘डाव्यास’ आता असेच प्राण गमवावे लागणार की काय, ही अमेरिकेची चिंता. अमेरिकी माध्यमांत ती व्यक्त होऊ लागली असून ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ऊर्फ ‘मागा’विचारसरणीची ही परिणती असल्याचे मानले जाते. आता तरी केवळ अमेरिकेलाच नाही, तर अन्य काही देशांनाही या ‘मागा’सांची मगरमिठी किती जीवघेणी आहे, हे पाहून शहाणपण सुचेल ही आशा. अन्यथा चार्ली कर्क यांच्या हत्येचे पडसाद अमेरिका आणि अन्यत्रही उमटतील.