शालेय शिक्षणादरम्यान मोबाइल- स्मार्टफोनचा नाद सोडा, असे सांगण्याची आणि मोबाइलचे मुलांवरील दुष्परिणाम मोजण्याची वेळ ‘युनेस्को’वर आली..

माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट, संपर्क क्रांती आणि डिजिटलायझेशन या तिन्हींच्या घुसळणीमधून निर्माण झालेल्या विलक्षण परिस्थितीत भिरभिरणाऱ्या सध्याच्या जगाला युनेस्कोच्या ‘ग्लोबल एज्युकेशन मॉनिटिरग’ अहवालाने चार खडे बोल सुनावले ते बरेच झाले. अर्थात विज्ञान तंत्रज्ञानाला विरोध म्हणजे प्रगतीला विरोध अशी मानसिकता असलेल्या सध्याच्या जगात ते खडे बोल ऐकून घेण्याच्या आणि त्यावर काही उपाययोजना करण्याच्या मन:स्थितीत कोणी आहे का, हा मुद्दा वेगळा. पण यानिमित्ताने एकूणच शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा शिरकाव आणि त्याचे भावी पिढीवर होणारे परिणाम या मुद्दय़ांवर गांभीर्याने चर्चा करण्याची गरज आहे, एवढे जरी अधोरेखित झाले तरी पुष्कळच झाले म्हणायचे. असे का ते समजून घेण्याआधी या अहवालाविषयी थोडे. ‘युनेस्को’ म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक संस्था. तिच्या वर उल्लेख केलेल्या अहवालात अगदी लहान वयातच मुलांच्या हातात येत असलेल्या स्मार्टफोनबाबत काळजी व्यक्त करण्यात आली आहेच शिवाय शिक्षणाच्या डिजिटलायझेशनचा कितीही उदोउदो केला तरी शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष संवादाला आणखी कशाचाही पर्याय असू शकत नाही, असे ठामपणे सांगितले गेले आहे. याशिवाय या अहवालात मोबाइलचा अतिवापर लहान मुलांच्या अध्ययन क्षमतेवर, भावनिकतेवर आणि सुरक्षेवर परिणाम करणारा कसा ठरत असून त्यामुळे शाळांमधून मोबाइल फोन हद्दपार करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. घरातली चिमुरडी स्मार्टफोन कसा सराईतपणे हाताळतात याचे कौतुक करणाऱ्या पालकांच्या आणि आपण कसे जास्तीत जास्त डिजिटल होत आहोत याची शेखी मिरवणाऱ्या शाळा तसेच शिक्षण व्यवस्थांच्या डोळय़ांमध्ये अंजन घालणाऱ्या या अहवालाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यकच.

Vidarbha State on the occasion of Maharashtra Day Review of progress Maharashtra Day 2024
विदर्भ: अनुशेष हा शब्द गायब पण वास्तव तेच..
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

शिक्षणाच्या क्षेत्रात मोबाइल फोनने खरे तर यशस्वी शिरकाव केला तो कोविडकाळात. त्याआधीच्या काळात घरातल्या मोठय़ा माणसांचे फोन सतत हातात घेऊन बसणाऱ्या लहानग्यांना त्या मोबाइलपासून दूर ठेवण्याचा आग्रह व्हायचा आणि तसा आटोकाट प्रयत्नही केला जायचा. पण दोन वर्षांच्या कोविडकाळात शाळाच मोबाइलमध्ये येऊन विसावली आणि पालकांचाही नाइलाज झाला. माणसांचा संपर्क टाळण्यासाठी शिक्षण ऑनलाइन झाले आणि सगळय़ाच गोष्टी झपाटय़ाने बदलत गेल्या. अवघ्या मुठीत मावणाऱ्या त्या मोबाइल नामक यंत्राने लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळय़ांनाच ‘स्मार्टपणाचा मंत्र’ दिला असला तरी वयसुलभ कुतूहलातून मुले त्या सगळय़ात अधिक गुरफटत गेली. पुढे लसीकरणानंतर करोनाच्या महासाथीतून जग पुन्हा बऱ्यापैकी ऑफलाइन रुळांवर आले असले तरी मुलांवरचेच नाही, तर प्रौढांवरचेही स्मार्टफोनचे गारूड उतरायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. गावातले उंदीर घालवण्यासाठी बोलावलेला बासरीवाला नंतर तीच बासरी वाजवून गावातली सगळी मुले घेऊन जातो, या गोष्टीसारखी परिस्थिती खरे तर मोबाइल स्मार्टफोनने निर्माण केली आहे.

दोष त्या मोबाइलचा नसून साधनालाच साध्य समजणाऱ्या आपल्यासारख्यांचाच, हे तर उघड आहे. मोबाइलचे तंत्रज्ञान हातांत आले आणि कोविडकाळात ते शिक्षणासाठी वापरण्याची वेळ आली, हे खरे; पण त्याच्या माध्यमातून केवळ तंत्रज्ञानानेच नाही, तर बाजारयंत्रणेनेही शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. डिजिटल शिक्षणाचा सगळीकडे, सगळय़ा पातळय़ांवर इतका उदोउदो झाला आहे की त्याचे भरपूर फायदे असले, त्याच्या माध्यमातून शिक्षणाच्या शक्यता अफाट असल्या तरी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकमेकांच्या समोरासमोर असणं आणि त्यातून होणारी ज्ञानार्जनाची प्रक्रिया जास्त महत्त्वाची आहे, असे सांगण्याची वेळ युनेस्कोसारख्या जागतिक पातळीवर येते, यातच काय ते समजून घ्यावे. वेळ, अंतर हे अडथळे डिजिटल माध्यम पार करत असले तरी प्रत्यक्षातील संवादातून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये होणारी ज्ञानाची प्रक्रिया त्या दोघांनाही समृद्ध करत असते. जीव तोडून शिकवणारे शिक्षक आणि एखाद्या ‘सरां’वर किंवा ‘बाईं’वर जीव ओवाळून टाकायला तयार असणारे विद्यार्थी काही उगीचच तयार होत नाहीत. त्या प्रक्रियेतून हे दोन्ही घटक एकमेकांना जे काही देत असतात, ते आयुष्याला पुरणारे असते. त्याची मोजदाद कशातच करता येत नाही. शिक्षकांच्या नजरेचा धाक, त्यांचा एखादा रागाचा किंवा कौतुकाचा शब्द, त्यांची एखादी शाबासकीची थाप, प्रोत्साहन यांनी किती आयुष्ये उभी केली आहेत, त्याचा डेटा कुठल्या मोबाइलच्या मेमरीमध्ये सापडणार आहे?

शिक्षण क्षेत्रातील डिजिटलायझेशननंतर अभ्यासासाठी हातात आलेला मोबाइल मुले फक्त तेवढय़ासाठीच वापरत नाहीत, हे युनेस्कोआधी घरोघरीच्या पालकांना माहीत आहे. पण ‘त्यातून झालेल्या मोबाइलच्या अतिवापराने लहान मुलांची मनेही भंजाळून टाकली आहेत,’ असे हा अहवाल सांगतो. अभ्यासावरचे लक्ष कमी होणे, त्यात सतत व्यत्यय येणे, शैक्षणिक कामगिरी खालावणे, यापेक्षाही गंभीर गोष्ट म्हणजे भावनिक स्थैर्यावर होणारा नकारात्मक परिणाम. कोविड-कहराची दोन वर्षे घरातच राहून ऑनलाइन अभ्यास केलेल्या अनेक मुलांना नंतर रोज शाळेत जाणे, आठ तास बसणे, बरोबरीच्या विद्यार्थ्यांशी जमवून घेणे अवघड गेले होते ते त्यामुळेच. पण त्यानंतरही अभ्यासासाठी किंवा इतर कारणांसाठी सतत स्मार्टफोनमध्ये डोके घालून बसणारी मुले आपल्या आसपासचे भान न राखता चिडचिडेपणा करतात, वयसुलभ शारीरिक हालचाली नाकारतात असे चित्र अजूनही आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे पालक ओरडले किंवा त्यांनी मोबाइल दिला नाही म्हणून आत्महत्या केल्याची अतिटोकाची उदाहरणेही घडली आहेत. मुलांमधला तसेच शिक्षण क्षेत्रामधला स्मार्टफोनचा अतिवापर टाळा हा युनेस्कोच्या अहवालामधला इशारा म्हणूनच गांभीर्याने घ्यायची आणि शिक्षणाच्या प्रक्रियेकडे नव्याने पाहायची गरज आहे.

स्मार्टफोन हे व्यक्तीचे अधिकाधिक वैयक्तिकीकरण करणारे माध्यम; पण पाच ते १५ हा वयाच्या दहा वर्षांचा टप्पा शिक्षणाइतकाच महत्त्वाचा असतो तो त्या पाल्याच्या सामाजिकीकरणासाठी. या दोन्हीच्या घुसळणीतून सध्याची छोटी मुले जात आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यातून येऊ शकणारे एकाकीपण ही कदाचित उद्याची गंभीर समस्या असू शकते. आसपासचे जिवंत, रसरशीत जग प्रत्यक्षात न अनुभवता, हातातल्या मोबाइलमधून ते पाहू इच्छिणाऱ्यांना त्यांनी काय पाहायचे असते, ते ठरवणारे दुसरेच कुणी असू शकतात, हे कसे समजणार आहे? स्मार्टफोन घेण्याची ऐपत नसलेला समाजही असू शकतो आणि त्याला अनेक संधी नाकारल्या जाऊ शकतात हे कसे समजणार आहे? आणि अशी ऐपत नसलेल्या समाजातील विद्यार्थानी डिजिटलायझेशनच्या जमान्यात काय करायचे? सर्वसमावेशकतेच्या तत्त्वाचे काय? मुलांच्या शिक्षणासाठी पदराला खार लावून धडपडणारे मध्यमवर्गीय पालक या नव्या तंत्रज्ञानाच्या काळातील शिक्षणसम्राटांसाठी नवे कुरण तर ठरणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.

त्यांची उत्तरे आज कुणालाच देता येणार नाहीत, हे खरेच, पण आपला देश, आपला समाज, त्याच्या गरजा पाहून तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा करायचा हे तर नक्कीच ठरवता येते. शिक्षण विभाग, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सगळय़ांनी मिळून पार पाडायचा हा ‘घरचा अभ्यास’ आहे. त्याहीपुढे जाऊन सांगायचे तर कोविडच्या कसोटीच्या काळात स्मार्टफोनवरून अभ्यास कसा करावा हे शिकवणाऱ्या शाळांनी आता त्याच विद्यार्थ्यांना या स्मार्टफोनचा गरज म्हणून वापर कसा करावा, त्यापासून काही काळ दूर कसे राहावे, थोडक्यात डिजिटल उपवास कसा करावा याचा तास ठेवण्याची वेळ आली आहे.