व्हिएतनाम युद्धात अमेरिकेची मानहानी झाली. व्हिएतनाम मोठे नुकसान सोसूनही सावरला. कथानके रचून विजय मिळत नाही, हेही दिसले…
थोडेथोडके नाही, ३० लाखांहून अधिक नागरिक मृत्युमुखी… त्याहून कित्येक जणांच्या तनावर आणि मनावर आजही त्या युद्धाचे व्रण… कोट्यवधींच्या वित्तहानीतून अजूनही सावरणे सुरूच… रसायनास्त्रांमुळे लाखो एकर जमीन नासाडलेली… त्यावर पोसलेल्या दोन पिढ्यांमध्ये आजही अनेक कर्करुग्ण आणि व्यंग्यधारी… इतके असूनही एखादा देश त्या गडदपर्वाच्या अंताचे स्मरण विजयोत्सवाने साजरे कसे करू शकतो, हा प्रश्न व्हिएतनामबाहेरच्या कुणाला पडेल. पण परवाच्या बुधवारी- ३० एप्रिल रोजी- व्हिएतनामची राजधानी हो चि मिन्ह सिटी (पूर्वीचे सायगाव) येथे जंगी संचलने झाली. तीत व्हिएतनामी फौजांच्या बरोबरीने चिनी तुकड्यांनीही भाग घेतला. अर्धशतकापूर्वी म्हणजे ३० एप्रिल १९७५ रोजी तत्कालीन सायगावमधून अमेरिकी सैनिकांच्या शेवटच्या तुकडीने मायदेशी उड्डाण केले होते. व्हिएतनाम युद्धाने त्याच नावाच्या देशाला ठळक अस्तित्व प्रदान केले. हे युद्ध अमेरिकेच्या इतिहासावरचा मोठाच डाग, कारण २० वर्षे झुंजूनही ५८ हजार सैनिक-निमसैनिक गमावण्याची मानहानी इतर कोणत्या युद्धात अमेरिकेने अनुभवलेली नाही. पण इतिहास किंवा आकडेवारीपलीकडे व्हिएतनाम युद्धाच्या परिणामांचा विचार करावा लागेल. तो परिणाम अमेरिकेच्या जनमानसावर झाला. त्या देशातील नागरिकांचा युद्धाकडे, सरकारकडे, माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच कायमस्वरूपी बदलला.
आजच्या काळात कथानक किंवा नॅरेटिव्ह हा शब्द परवलीचा आहे. असे नॅरेटिव्ह दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभी नाझी जर्मनीच्या गोबेल्सने वापरले आणि जनमानसाचा लोंढा पाहिजे तसा आणि तिथे वळवला. नॅरेटिव्हचा त्याच प्रकारे पण वेगळ्या रूपात स्वहितसंवर्धनासाठी वापर व्हिएतनाम युद्धात केला गेला. त्या वेळचे सरकार युद्धाबद्दल काहीही सांगायचे, तेच माध्यमे जनतेपर्यंत पोहोचवायची आणि जनता ते खरे मानून घ्यायची. या भाबड्या फुग्याला पहिली टाचणी १९६०च्या दशकात लागली आणि युद्धाची धग व्हिएतनाम किंवा आग्नेय आशियाच नव्हे, तर अमेरिकेलाही कवटाळू लागली. त्यातून शहाणे होऊन सावरण्यापूर्वी किमान ५८ हजार अमेरिकनांना प्राणाहुती द्यावी लागली. तब्बल चार वेगवेगळ्या अध्यक्षांनी व्हिएतनाम युद्धाच्या काळात अमेरिकेचे धोरण ठरवले होते. ड्वाइट आयसेनहॉवर, जॉन एफ. केनेडी, लिंडन जॉन्सन आणि रिचर्ड निक्सन. या कोणालाही विजयाची खात्री नव्हती. पण कम्युनिस्टांना बडवण्याची संधी सोडून माघार घेणे प्रत्येक अध्यक्षासाठी राजकीयदृष्ट्या अप्रतिष्ठेचे आणि जोखमीचे ठरणार होते. निर्णयक्षमतेबाबत कधी गोंधळ आणि कधी खोटेपणा यांचा आधार अमेरिकी नेतृत्वाने घेतला याचे कारण शत्रू नेमका कोण याविषयी संदिग्धता होती. व्हिएतनामच्या उत्तर भागाचे नेते हो चि मिन्ह आणि त्यांची व्हिएतकाँग ही बंडखोर संघटना हे लक्ष्य असावे, तर इतक्या फुटकळ शत्रूसाठी अर्धी पृथ्वी ओलांडून प्रथम सल्लागार आणि नंतर सैनिक पाठवण्याची गरज नव्हती. पण फ्रेंच इंडोचायना म्हणजे व्हिएतनाम, कम्बोडिया, लाओस तसेच तत्कालीन बर्मा अर्थात म्यानमार या विशाल टापूमध्ये सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्या साम्यवादी हस्तकांनी हातपाय पसरणे आरंभले होते.
मुळात इंडोचायना ही फ्रेंच वसाहत. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीने फ्रान्सचा पाडाव केला, ती संधी साधून जपानने इंडोचायनातूनही फ्रेंचांना हुसकावून लावले. परंतु जर्मनी आणि पाठोपाठ जपानचाही पाडाव झाल्यानंतर फ्रान्ससारख्या वसाहतवादी देशाने पुन्हा इंडोचायनावर हक्क सांगणे अन्याय्य होते. पण तसे त्यांनी केले आणि त्यांस अमेरिकेचे समर्थन मिळाले. यातूनच व्हिएतनाम युद्धाची बीजे पेरली गेली. हो चि मिन्ह यांच्या लोकप्रियतेच्या आसपासही अमेरिका आणि फ्रान्सच्या हातचे बाहुले ठरलेले न्गो दीन दिएम हे पोहोचू शकत नव्हते. पहिल्या इंडोचायना युद्धसमाप्तीनंतर व्हिएतनामचे उत्तर आणि दक्षिण भागांमध्ये विभाजन झाले. तेव्हाच्या तहानुसार निवडणूक घेऊन दोन्ही देशांचे एकत्रीकरण अपेक्षित होते. पण पराभवाच्या भीतीने न्गो दीन दिएम यांनी निवडणूक घेतलीच नाही. त्यांनी अमेरिकेच्या मदतीने हो चि मिन्ह यांचा प्रतिकार करण्याचे पाऊल उचलले. तत्कालीन सोव्हिएत रशिया आणि चीनने हो चि मिन्ह यांना पैसा आणि सामग्री पुरवली. मात्र थेट युद्धात सहभागी होण्याची चूक टाळली. अमेरिकेने सुरुवातीस वित्तपुरवठा, सामग्री आणि सल्लागार धाडण्याचा निर्णय घेतला. पण युद्ध पुढे सरकू लागले, तसे म्हणजे १९६०च्या मध्यावर सैनिक धाडण्याचा निर्णय घेतला. या आत्मघातकी निर्णयापर्यंत अमेरिका कशी पोहोचली?
अमेरिकेने १९५०च्या मध्यावर व्हिएतनाममध्ये सक्रिय लक्ष घालण्यास सुरुवात केली, तो काळ अमेरिकनांच्या दृष्टीने वेगळ्याच आत्मविश्वासाचा होता. महायुद्धात मोठ्या भावाची भूमिका घेऊन मिळवलेले विजय, तुलनेने कमी मनुष्यहानी, दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने लष्करी उद्याोग उभारणीतून मिळालेले यश, अण्वस्त्रनिर्मितीत इतर देशांच्या तुलनेत घेतलेली आघाडी आणि कोणत्याही परिस्थितीत आपण अजेय आणि मूल्यरक्षकच असल्याचा समज अमेरिकेच्या निर्णयामागे होता. प्रेसिडेंट आयसेनहॉवर हे स्वत: यशस्वी लष्करी जनरल. शिवाय जगाला आता साम्यवादाचा धोका असून, नाझीवादाप्रमाणेच साम्यवाद संपवण्याची किंवा किमान रोखण्याची जबाबदारी अमेरिकाप्रणीत युरोपीय देशांचीच आहे असा समज तेथे पद्धतशीरपणे करून दिला गेला. पण व्हिएतनामी राष्ट्र आकांक्षा, गनिमी युद्धतंत्र, सोव्हिएत रशियाकडून व्हिएतकाँगला मिळालेली मदत या घटकांकडे अमेरिकी शासकांचे पूर्ण दुर्लक्ष झाले. उत्तर व्हिएतनामचा प्रतिकार वाढू लागला, तसा तो दडपण्यासाठी वेगवेगळ्या तीव्रतेने युद्धात उतरण्याची गरज अमेरिकेला वाटू लागली. दुसऱ्या महायुद्धातील लढाईचे तंत्र कालबाह्य ठरले, पुरेशी भौगोलिक माहिती न घेता झालेल्या कारवाया आत्मघातकी ठरू लागल्या आणि बघता बघता व्हिएतनामच्या- पर्यायाने साम्यवादाच्या- पाडावाचे स्वप्न निसटू लागले. त्या वेळी मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही अमेरिकेच्या जनतेची दिशाभूल केली. दुसऱ्या महायुद्धापर्यंत सरकारच्या निर्णयावर विश्वास ठेवणारी अमेरिकी जनता व्हिएतनाम युद्धाच्या उत्तरार्धात अधिकाधिक संशयी आणि हताश होऊ लागली. व्हिएतनामला धाडण्यासाठी १९६५ मध्ये घराघरांतून सैनिकभरती होऊ लागली, तेव्हा भयंकराची आणि सैनिकांपेक्षा अधिक शवपेट्याच मायदेशी परततील याची भयाण जाणीव अमेरिकनांना झाली.
व्हिएतनाम युद्ध अमेरिकेच्या नेत्यांनी प्रतिष्ठेचे बनवले. त्यासाठी माध्यमांना हाताशी धरले गेले. रानटी शत्रूला चिरडण्यासाठी आपल्याकडे पुरेशी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. काही दिवसांचाच हा खेळ असे सातत्याने सांगितले, रेटले गेले. असंघटित, बरेचसे खेडवळ परंतु प्रखर राष्ट्राभिमानी अशा व्हिएतनामींविरोधात अमेरिकेची प्रशिक्षित फौज ठायीठायी पराभूत होत होती. प्रचंड बॉम्बफेक, ‘एजंट ऑरेंज’सारख्या विषारी तणनाशकाची अनिर्बंध फवारणी अशा उपायांनी व्हिएतनामचे लाखो नागरिक मरण पावले, जायबंदी झाले. पण व्हिएतनामचा पाडाव झाला नाही. हा ‘खेळ’ अमेरिकेच्या माघारीने १९७५ मध्ये संपला, त्या वेळी अमेरिकेच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल झालेला होता.
व्हिएतनामपासून धडा घेतलेल्या तेथील माध्यमांनी पुढे पेंटॅगॉन पेपर्स, वॉटरगेटसारख्या प्रकरणांतून अमेरिकी नेत्यांचा भ्रष्टाचार, युद्धज्वर चव्हाट्यावर आणला. काही प्रमाणात ते पापक्षालनच. पण राजकीय नेत्यांबाबत तेथील जनतेचा विश्वास ढळला तो कायमचाच. पुढे इराक युद्धात असाच खोटेपणा करावा लागला आणि इराकसह अफगाणिस्तान, सोमालिया या युद्धांत किंवा कारवायांमध्ये आधुनिक शस्त्रे असूनही आपले सैनिक बळी जाणारच हा धडा अमेरिकेला मिळत गेला, तेव्हा राजकीय नेतृत्व हे युद्धाच्या बाबतीत कधीच विश्वासार्ह वागत नाही, अशी अमेरिकनांची खात्री पटली. प्रत्येक युद्धज्वर हे कथानकच असते. यात युद्धाचा उद्देश साध्य होत नाहीच, पण राष्ट्रप्रेमाचा कैफ चढवून सर्वसामान्य नागरिक आणि सैनिकांना वेदीवर चढवले जाते. ज्यांना प्रत्यक्ष लढावे लागत नाही, तेच युद्धज्वर फैलावत असतात. व्हिएतनामसारखा देश किंमत मोजतो आणि टिकतो. अमेरिकेसारख्या महासत्तेला युद्ध ‘खेळून’ पाहिल्यानंतर शहाणपण सुचण्यासाठी अफगाणिस्तान घडावे लागते.