देशभर नावलौकिक मिळवणाऱ्या कल्याणी कुटुंबातील मतभेद एका वेदनादायी प्रश्नास जन्म देतात, तो म्हणजे मराठी उद्योगांचे हे असे का होते?
आज अनेकांस ठाऊकही नसेल पण एकेकाळी या राज्यातील लक्ष्मणराव बळवंत फाटक नामे निवृत्त रेल्वे कारकुनास सरकारी कंत्राटांसाठी एक कंपनी काढावीशी वाटली आणि एका जैन परिचिताच्या साहाय्याने त्याने ती खरोखरच काढली. मुंबई-पुणे बोरघाटातील बोगद्यासह अनेक ऐतिहासिक रेल्वे कामे या फाटकांच्या कंपनीने केली. पण दोघांचे बिनसल्यानंतर ही कंपनी टाटा समूहात विलीन झाली. या फाटक यांच्या सहकारी भागीदाराचे नाव वालचंद हिराचंद. फाटक यांस अशी काही कल्पना सुचायच्या आधी याच राज्यातील एका तरुणास मुंबईतील जेजे कला महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे वाटले. पण जन्मजात रंगांधळेपणाच्या दोषामुळे त्यास कला शाखा सोडावी लागली. तथापि आरेखनाचा ध्यास स्वस्थ बसू देईना. त्यातूनच त्याने आसपासच्या शेतकऱ्यांस कायमस्वरूपी वापरता येईल असा पोलादी नांगर बनवला. पण यातून जमिनीस विषबाधा होते या भीतीने शेतकरी तो वापरेनात. त्यांच्या मनातील ही अंधश्रद्धा दूर करण्यात या तरुणाची दोन वर्षे गेली आणि नांगर उद्याोगासाठी जागा शोधण्यात आणखी काही काळ गेला. अखेर औंधच्या पंतप्रतिनिधींनी या तरुणास माळरान आंदण दिले आणि तेथेच देशातील पहिली औद्याोगिक नगरी उभी राहिली. तिचे नाव किर्लोस्करवाडी आणि ती स्थापणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर. त्याहीआधी त्याच परिसरात धनजीशा बोमनजी कूपर नामक धडपड्या युवकाने स्वतंत्र कारखाना काढला आणि १९३४ साली देशातील पहिले डिझेल इंजिन तेथे तयार झाले. हे सारे पाहून आणखी एकास पोलादाच्या क्षेत्रात असेच काही करण्याची ऊर्मी निर्माण झाली आणि त्याने महाराष्ट्र जन्मास येत असताना ओतीव पोलादाचा कारखाना काढला. स्वत:चा तरुण अभियंता मुलगा महिना ५०० रुपये पगारावर या कंपनीत त्याने कामास ठेवला. आज नीलकंठराव कल्याणी यांची ‘भारत फोर्ज’ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची पोलादी साचे बनवणारी कंपनी आहे आणि त्या वेळी ५०० रुपये वेतनावर काम करणारा नीलकंठरावांचा मुलगा बाबा कल्याणी यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीची उलाढाल ३०० कोटी डॉलर्सवर गेली आहे. अर्थात या उद्याोगांची गौरवगाथा सांगणे हे येथे प्रयोजन नाही.
तर यातील बहुतांश उद्याोग हे कसे कौटुंबिक कलहाचा दुभंग अनुभवतात याची चर्चा करणे हा येथील उद्देश. एकेकाळी देशभर नावलौकिक मिळवणाऱ्या या सर्वच मराठी उद्याोजकांच्या आकसण्यास केवळ कौटुंबिक कलह हेच कारण आहे असे नाही. हा कुटुंब कलहाचा मुद्दा येतो तो उफाळून आलेल्या कल्याणी कुटुंबातील मतभेदांमुळे. इतके दिवस बाबा कल्याणी आणि त्यांच्या भगिनीतील मतभेद आता पुढच्या पिढीकडे संक्रमित झाले असून मामा-भाचे, काका-पुतणे या पातळींवरही चकमकी सुरू झाल्याचे दिसते. बाबांचे तीर्थरूप नीलकंठ कल्याणी यांचे प्रेरणास्थान असलेल्या किर्लोस्कर समूहात तर केवळ भावा-भावांतच नव्हे तर मायलेकरातही विसंवाद आहे. किर्लोस्कर उद्याोगाचा व्यापही आता मर्यादित क्षेत्रांपुरता दिसतो. पुण्यातील गरवारे समूहाचे नाव आता फारसे कानी येत नाही. प्लास्टिक हा शब्ददेखील कोणास माहीत नव्हता त्या वेळी जुन्या मोटारींच्या व्यवसायात असलेले आबासाहेब गरवारे प्लास्टिक उद्याोगात शिरले आणि त्यांनी मोठी भरारी घेतली. आज या क्षेत्रावर रिलायन्सचा अंमल चालतो. एकेकाळी यातील वालचंद समूह रावळगाव शुगर, इंडियन ह्युम पाइप, विमान-मोटार निर्मिती, बंदर, चित्रपट निर्मिती इत्यादी कित्येक क्षेत्रांत होता. आज त्यातील अजित गुलाबचंद यांच्या नेतृत्वाखालील ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन्स कंपनी’ (एचसीसी) आपला आब राखून आहे. आज मार्गनामामुळे ओळखले जाणारे अप्पासाहेब मराठे, कॅम्लिनचे संस्थापक दांडेकर बंधू, ‘विको वज्रदंती’कार पेंढरकर, आगाशे, आपटे आदी काही मराठी उद्याोग घराण्यांचा दाखला येथे देता येईल. यात कॅम्लिन आणि दांडेकर हे नाते आता पहिल्यासारखे नाही. विको मात्र पतंजलीदी नव्या आव्हानांच्या गर्दीत आपले अस्तित्व चांगल्या प्रकारे टिकवून आहे. हा इतिहास एका वेदनादायी प्रश्नास जन्म देतो: मराठी उद्याोगांचे हे असे का होते?
ज्या वेळी देशातील अन्य प्रांत अजगरासारखे सुस्त होते त्यावेळी पुण्यात महादेव बल्लाळ नामजोशी नामे तरुणाने ‘किरण’ हे केवळ अर्थविषयास वाहिलेले नियतकालिक काढले होते आणि त्यात केशव साठ्ये नामे तेथील पोलाद व्यापाऱ्याची आर्थिक गुंतवणूक होती. टिळक-आगरकर यांच्या ‘केसरी’ झंझावातातही ‘किरण’प्रभा प्रभावी होती. याच पुण्यात टिळकांनी विसावे शतक उगवलेही नव्हते तेव्हा मराठी माणसांस ‘जॉइंट स्टॉक कंपन्या’ काढा असा सल्ला दिला होता आणि जर्मनीतील लघुउद्याोजकांचे अनुकरण करण्याची सूचना केली होती. खुद्द टिळकांनीही अर्थविकासाचे महत्त्व लक्षात घेऊन काच कारखानादी उद्याोग स्थापण्यात सक्रिय सहभाग घेतला. त्याच पुण्यातील नामदार गोपाल कृष्ण गोखले हे अर्थज्ञानासाठी ओळखले जात आणि पुढे त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत धनंजयराव गाडगीळ यांच्यासारख्यांनी अर्थकारणास नवी दिशा दिली. तथापि आज त्याच पुण्यात नाव घ्यावेत असे मराठी उद्याोजक किती असतील? खरे तर याच पुण्यात इन्फोसिस या विख्यात कंपनीचा जन्म. याच पुण्यात नंदन निलेकणी आणि सुधा व नारायण मूर्ती आदींनी इन्फोसिसची मुहूर्तमेढ रोवली. पण ती कंपनी पुढे रुजली, वाढली मात्र बेंगळूरुत. एखाद्या नदीने उगमस्थळापेक्षा दूरवरच्या प्रांतालाच आनंद शिंपण करावे तसे हे. आज ‘पर्सिस्टंट’चे आनंद देशपांडे, ‘प्राज’चे प्रमोद चौधरी हे काही या पुण्यभूतील सन्माननीय अपवाद. बाकी तसा आनंदी-आनंदच!
वेदनादायक बाब ही की हे मराठीचे दुर्भिक्ष केवळ उद्याोग क्षेत्रापुरतेच नाही. दिल्ली वा अन्य प्रांतातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे क्षेत्र असो वा बँकिंग असो वा खासगी कंपन्यांतील मुख्य कार्यकारी अधिकारी पदांवरील व्यक्ती असोत. मराठी नावे औषधालाही सापडत नाहीत. किंवा सापडली तर औषधापुरतीच आढळतात. एकेकाळी सरकारी मालकीच्या राष्ट्रीयीकृत बँकांत उत्तम मराठी टक्का होता. सरकारी भ्रष्टाचारास ताठ मानेने विरोध करून पदत्याग करणारे स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक मनोहर भिडे, संस्कृत वाङ्मय ते नाट्यसंगीत अशा अनेक क्षेत्रांत विहरणारे महाराष्ट्र बँकेचे वसंतराव पटवर्धन वा सेंट्रल बँकेचे मोहनराव टांकसाळे अशी अनेक नामांकित मराठी व्यक्तिमत्त्वे बँकिंग क्षेत्रात होती. ही पदे राहिली दूर. आज अनेक बँकांत मराठी कारकून आढळला तरी ‘आनंदी आनंद गडे’ म्हणावेसे वाटेल.
याहूनही अधिक वेदनादायी बाब म्हणजे या मराठी दुष्काळाबाबत कोणालाच काहीही न वाटणे. हे भयंकर आहे. मुदलात मराठी उद्याोग तीन पिढ्यांच्या पुढे जास्त टिकत नाहीत. पहिल्या पिढीतील संस्थापक हाडाची काडे करून उद्याोग स्थापतो. त्याचे उत्तराधिकारी तो वाढवतात. पण त्या पुढच्या पिढीकाळात मात्र कज्जेदलाली, दूरदृष्टिहीनता वा काळाची पावले ओळखण्यातील अपयश इत्यादी कारणांमुळे उद्याोगांस घरघर लागायला सुरुवात होते. त्यातील काही मराठी उद्याोग मग पुढे एखाद्या अन्यभाषी उद्याोजकाचा घास बनून दिसेनासे होतात. त्याच वेळी टाटा, गोदरेज, महिंद्र आदी उद्याोग घराणी मात्र पिढ्यानपिढ्या टिकतात आणि फोफावतातही. मराठी माणसाच्या जनुकातच काही दोष आहे म्हणावे तर इतिहासकाली देदीप्यमान कामगिरी हा समज खोटा ठरवते. तेव्हा मराठी उद्याोगजगात सर्रास दिसणारा हा ‘तीन पिढ्यांचा तमाशा’ लवकरात लवकर कसा थांबवता येईल यासाठी समस्त मराठी जनांचे प्रयत्न हवेत. नपेक्षा वडा-पावची गाडी इतकीच काय ती मराठी उद्याोजकांची ओळख राहील.