देशभर नावलौकिक मिळवणाऱ्या कल्याणी कुटुंबातील मतभेद एका वेदनादायी प्रश्नास जन्म देतात, तो म्हणजे मराठी उद्योगांचे हे असे का होते?

आज अनेकांस ठाऊकही नसेल पण एकेकाळी या राज्यातील लक्ष्मणराव बळवंत फाटक नामे निवृत्त रेल्वे कारकुनास सरकारी कंत्राटांसाठी एक कंपनी काढावीशी वाटली आणि एका जैन परिचिताच्या साहाय्याने त्याने ती खरोखरच काढली. मुंबई-पुणे बोरघाटातील बोगद्यासह अनेक ऐतिहासिक रेल्वे कामे या फाटकांच्या कंपनीने केली. पण दोघांचे बिनसल्यानंतर ही कंपनी टाटा समूहात विलीन झाली. या फाटक यांच्या सहकारी भागीदाराचे नाव वालचंद हिराचंद. फाटक यांस अशी काही कल्पना सुचायच्या आधी याच राज्यातील एका तरुणास मुंबईतील जेजे कला महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे वाटले. पण जन्मजात रंगांधळेपणाच्या दोषामुळे त्यास कला शाखा सोडावी लागली. तथापि आरेखनाचा ध्यास स्वस्थ बसू देईना. त्यातूनच त्याने आसपासच्या शेतकऱ्यांस कायमस्वरूपी वापरता येईल असा पोलादी नांगर बनवला. पण यातून जमिनीस विषबाधा होते या भीतीने शेतकरी तो वापरेनात. त्यांच्या मनातील ही अंधश्रद्धा दूर करण्यात या तरुणाची दोन वर्षे गेली आणि नांगर उद्याोगासाठी जागा शोधण्यात आणखी काही काळ गेला. अखेर औंधच्या पंतप्रतिनिधींनी या तरुणास माळरान आंदण दिले आणि तेथेच देशातील पहिली औद्याोगिक नगरी उभी राहिली. तिचे नाव किर्लोस्करवाडी आणि ती स्थापणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर. त्याहीआधी त्याच परिसरात धनजीशा बोमनजी कूपर नामक धडपड्या युवकाने स्वतंत्र कारखाना काढला आणि १९३४ साली देशातील पहिले डिझेल इंजिन तेथे तयार झाले. हे सारे पाहून आणखी एकास पोलादाच्या क्षेत्रात असेच काही करण्याची ऊर्मी निर्माण झाली आणि त्याने महाराष्ट्र जन्मास येत असताना ओतीव पोलादाचा कारखाना काढला. स्वत:चा तरुण अभियंता मुलगा महिना ५०० रुपये पगारावर या कंपनीत त्याने कामास ठेवला. आज नीलकंठराव कल्याणी यांची ‘भारत फोर्ज’ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची पोलादी साचे बनवणारी कंपनी आहे आणि त्या वेळी ५०० रुपये वेतनावर काम करणारा नीलकंठरावांचा मुलगा बाबा कल्याणी यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीची उलाढाल ३०० कोटी डॉलर्सवर गेली आहे. अर्थात या उद्याोगांची गौरवगाथा सांगणे हे येथे प्रयोजन नाही.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial a property dispute in the family of bharat forge chairman and managing director baba kalyani amy
First published on: 29-03-2024 at 00:06 IST