मुसलमान तर चीनमध्येही आहेत, पण निवडणूक प्रचारात हिंदूमुसलमान दुही निर्मितीसाठी कधी चीनचे नाव घेतले जात नाही…

अखेर आपल्या निवडणुकांस अपेक्षित वळण मिळाले म्हणायचे. या निवडणुकीत पाकिस्तानचे आगमन एकदाचे झाले. काँग्रेस पक्षास मत दिले तर पाकिस्तानात आनंदसोहळा साजरा होईल वा काँग्रेस पक्ष जिंकला तर पाकिस्तानात दिवाळी साजरी केली जाईल ही विधाने अथवा ‘‘तुमच्या मताने कोठे जल्लोष व्हायला हवा आहे… भारतात की पाकिस्तानात’’ हा सत्ताधारी भाजपच्या जाहिरातीतील प्रश्न ही या निवडणुकांत पाकिस्तानचे सुखेनैव आगमन झाल्याची चिन्हे. गेली दहा वर्षे खरे तर आपल्या देशावर कडव्या देशभक्त, राष्ट्रवादी, देशाच्या सुरक्षेत सदैव जागरूक इत्यादी पक्षाचे सरकार आहे. म्हणजे पाकिस्तानची डाळ शिजण्याचा प्रश्न नाही. तसेच या सरकारच्या काळात विकासाचा वारू चौखूर उधळत असल्याचेही आपणास सांगितले जात आहे. या विकासाच्या गतीने विकसित देशांच्या नेत्यांचे डोळे दिपून त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आल्याची माहिती जनतेस दिली जात आहे. इतकेच नव्हे तर भारताच्या पंतप्रधानांचा मानमरातब आता अमेरिकादी बड्या देशांच्या प्रमुखांस झाकोळून टाकेल हेही सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे, असे विविध वृत्तवाहिन्यांचे देशप्रेमी तरुण-तडफदार वृत्तनिवेदक आपणास सांगत असतात. अशा तऱ्हेने विविध आघाड्यांवर भारताच्या प्रगतीने दातखीळ बसलेले जगभरातील बडे बडे नेते भारतीयांचा दमदार नेतृत्वासाठी हेवा करू लागले असून अनेक देशांतील जनतेच्या मनात भारतासारखे नेतृत्व आपणास कधी मिळणार अशा प्रकारची इच्छा दाटून येऊ लागली आहे. तेव्हा इतके सारे असताना आणि वर पुन्हा भारतास अभेद्या नेतृत्व लाभलेले असताना या निवडणुकीत तरी पाकिस्तान असा नकारात्मक उल्लेखाने शिरणार नाही असा अनेकांचा कयास होता. आणि परत हा पाकिस्तानचा असा नकारात्मक प्रवेश भाजपच्या आरोपांतून झाला, हेही तसे आश्चर्य. कारण ‘अखंड भारत’ हे भाजपच्या विचारकुलाचे स्वप्न आहे. अखंड भारत म्हणजे पाकिस्तान आलाच. तेव्हा खरे तर काँग्रेसचा विजय इत्यादींमुळे पाकिस्तानात जर आनंदलाटा तयार होणार असतील तर त्यामुळे उलट अखंड भारताचे स्वप्न एक पाऊल पुढे जाते, असाच त्याचा अर्थ नव्हे काय? म्हणून उलट भाजपने काँग्रेसचे या ‘विचार’परिवर्तनासाठी अभिनंदन करायला हवे. त्याऐवजी पाकिस्तानचा उल्लेख निवडणुकांत असा नकारात्मक अंगाने का, हा प्रश्न. अर्थात तो कितीही तर्कसंगत असला तरी सद्या:स्थिती अशा तर्काधिष्ठित चर्चेस योग्य नव्हे हे वास्तव लक्षात घेऊन या पाकिस्तान प्रवेशाचा समाचार घेणे योग्य.

हेही वाचा >>> अग्रलेख: समर्थांची संशयास्पद संवेदना

कारण त्यामुळे हा प्रश्न निर्माण करणाऱ्यांची पराभूत मानसिकता दिसते, असे म्हणावे लागेल. आपले राज्यकर्ते भारतास आणखी किती दिवस डब्यात गेलेल्या पाकिस्तानशी बांधून ठेवणार? या स्तंभात याआधीही लिहिल्यानुसार आपल्या एका ‘टीसीएस’सारख्या कंपनीचा आकार कराची भांडवल-बाजाराच्या समग्र उलाढालींपेक्षाही अधिक आहे. असे वास्तव असताना भारताने स्वत:स पाकिस्तानपासून विलग (डी-कपल) करायला हवे. त्या खड्ड्यात गेलेल्या देशाशी कसली आहे बरोबरी? बरोबरीच करावयाची तर भारताने ती चीनशी करण्याची हिंमत दाखवावी. काँग्रेसच्या विजयाने चीनमध्ये आनंद वगैरे आरोप तरी करावेत! नाही तरी काँग्रेसला चीनकडून अर्थसाहाय्य झाल्याचाही आरोप सत्ताधाऱ्यांनी केलेला आहेच. त्याचा धागा पकडत काँग्रेसला पाकिस्तानधार्जिणे ठरवण्यापेक्षा चीनच्या कच्छपी लागल्याचा आरोप करणे त्या पक्षासाठी अधिक दूरगामी नुकसानकारक ठरेल. भाजपच्या धुरीणांस हा मुद्दा कसा काय सुचला नाही हे आश्चर्य. अर्थात धर्माच्या मुद्द्यावर भारतीय निवडणुकीत चीनपेक्षा पाकिस्तान अधिक ‘उपयुक्त’ ठरतो, हे सत्य यामागे नसेलच असे नाही. वास्तविक चीनमध्येही मोठ्या प्रमाणावर विघूर मुसलमान आहेत. भारतातील निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनाही चेपण्याची संधी आपण साधली असती तर चिनी सत्ताधीशांना आनंद होऊन त्या बदल्यात डोकलाम परिसरात त्यांच्याकडून काही सवलतींची अपेक्षा तरी करता आली असती. ते झाले नाही. हिंदू-मुसलमान दुही निर्मितीसाठी आपला पाकिस्तान-मोह काही सुटत नाही.

हेही वाचा >>> अग्रलेख : पुष्किनचे रहस्य

यात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी कसाबला आणून आपली पक्षीय जबाबदारी पार पाडली. ती पार पाडताना त्यांच्या दोन चुका झाल्या. एक म्हणजे त्यांनी हेमंत करकरे यांच्या हत्येबाबत काही विधान केले. देशासाठी शहीद झालेल्याच्या शहादतीबाबत संभ्रम निर्माण करण्याची काहीही गरज नव्हती. दुसरी चूक म्हणजे कसाबला फाशी दिली जाणे आणि त्यात विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या कर्तृत्वाचे मोजमाप करणे. वैदर्भीय व्यक्ती एकंदरच अतिशयोक्ती अलंकाराचा सढळ वापर करण्यासाठी ओळखल्या जातात. वडेट्टीवार हे तिकडले. त्यामुळे ते निकम यांस तालुका स्तरावरील वकील म्हणाले. वास्तविक कसाबला फासावर लटकावण्यास ग्रामपंचायत पातळीवरील वकीलही पुरेसे ठरले असते. भारताविरोधात इतका हिंसाचार करताना पकडला गेलेल्यास दुसरी कोणतीही शिक्षा होणे अशक्यच. तेव्हा निकमांच्या कथित बौद्धिक उज्ज्वलतेचा संबंध कसाबच्या फाशीशी अजिबात नाही. तो जोडला जावा अशी इच्छा निकम यांची असली तरी त्यांचा हेतू स्वत:चे राजकीय भविष्य उज्ज्वल व्हावे इतकाच आहे. कसाब प्रकरणानंतर काही उचापतखोरांनी स्वत:स ‘पद्मा’ पुरस्कार कसे मिळतील यासाठी बऱ्याच खटपटी करून पाहिल्या. त्यावर तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अधिक ‘उज्ज्वल’ प्रकाश टाकू शकतील. या अशा खटपट्यांत निकम यांचा समावेश होता किंवा काय, हेही त्यामुळे कळू शकेल. असो. तेव्हा निकम यांच्या विधिपांडित्याविषयी वडेट्टीवार बोलले ते काही अयोग्य नाही. पण त्यासाठी त्यांनी हेमंत करकरे यांस मध्ये आणण्याची गरज नव्हती. त्या मुद्द्यावर ते चुकलेच. त्याची ‘शिक्षा’ त्यांच्या पक्षास पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात मिळेलच मिळेल. काँग्रेस पक्षाचे लागेबांधे पाकिस्तानात असल्याचा आणि तो पक्ष पाकिस्तानवादी असल्याचा आरोप होईल. हे कशाचे लक्षण?

भारतातील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात ‘पाकिस्तान’ची अशी मदत आपणास का घ्यावी लागावी? आपण, आपला पक्ष फक्त तेवढा राष्ट्रप्रेमी; अन्य सर्वांची शत्रुपक्षाशी हातमिळवणी हे कोणते राजकारण? दुसरे असे की पाकिस्तानशी ‘संधान’ असलेल्या काँग्रेस पक्षांतील अनेक धुरीण सध्या भाजपत ‘थंडा थंडा कूल कूल’ वातावरणाचा आनंद घेत आहेत. अशा पाक-पापी नेत्यांस भाजपने मुळात आपले म्हटलेच कसे? त्यांच्या या पापांकडे दुर्लक्ष करणे हे देखील अधिक गंभीर पाप नव्हे काय? उद्या समजा लोकशाहीच्या दुर्दैवाने भाजपवर सत्ता स्थापनेसाठी काही मूठभरांचा ‘पाठिंबा’ घेण्याची वेळ आलीच; तर या ‘पाकिस्तानवादी’ पक्षातील नेत्यांस आपण स्पर्श करणार नाही, याचे जाहीर वचन आज भाजप देईल काय? तसे न केल्यास त्यातून भाजपचा ‘आपला तेवढा देशप्रेमी, दुसऱ्याचा तो देशद्रोही’ असा दृष्टिकोन दिसेल. तेही एकवेळ ठीक. परंतु अलीकडे अन्यपक्षीय भ्रष्ट मंडळी भाजपत आली की ज्याप्रमाणे ‘स्वच्छ’ होतात त्याप्रमाणे अन्य पक्षीय देशद्रोही हे भाजपत आले की देशप्रेमी ठरतात; असा नवाच पायंडा पडायचा. त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकास, विकसित भारत इत्यादी सकारात्मक मुद्द्यांच्या आधारे निवडणुकीस सामोरे जाणाऱ्यांस पाकिस्तानची ‘अशी’ गरज मुळात वाटावीच का? कर्तृत्ववान हे आपल्यासमोरील आव्हाने पेलण्यातील यशाप्रमाणेच अपयशाचीही जबाबदारी घेतात. परंतु आत्मविश्वास- अभावग्रस्त व्यक्ती वा समाज हा स्वत:समोरील आव्हानांसाठी नेहमीच इतरांस जबाबदार धरतो. भाजप आणि त्या पक्षाच्या नेतृत्वात आत्मविश्वास नाही, असे त्यांचे कडवे प्रतिस्पर्धीही म्हणणार नाहीत. तेव्हा पाकिस्तान मुद्दा भाजपने फार ताणू नये. निवडणुकीत हा शेजार‘धर्म’ कामी येणार नाही.