‘एआय’ अथवा कोणतेही तंत्रज्ञान भेदाभेद करत नसते. त्याचा वापर करणाऱ्यांचे पूर्वग्रह, मूल्ये या सहअस्तित्वाचे भवितव्य ठरवणार असतात…

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ८० च्या दशकात आणलेल्या संगणक क्रांतीमुळे नंतरच्या काळात बदलांचा जो काही झपाटा निर्माण झाला ती किरकोळ झुळूक वाटावी अशी परिस्थिती येत्या काही काळात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशयल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ आणू शकते अशी चिन्हे आहेत. पण ती दिसतील, जाणवतील ती डोळे उघडे ठेवून बघितले तरच. आपला सामाजिक अवकाश कबुतरे, हत्ती, श्वान हे पक्षीप्राणी, कोणी काय खावे अथवा खाऊ नये याविषयीचे आग्रह आणि माझी जात आणि तुझा धर्म असे वाद यांनीच व्यापलेला असताना त्यापलीकडचे जग काहीच्या काही बदलते आहे आणि त्याची आपल्याला कल्पनाही नाही.

वैयक्तिक आणि सामाजिक भेदाभेद कुरवाळण्यात सारेच गढून गेले असताना कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचा माणसानेच जन्माला घातलेला भस्मासुर माणसाच्या सगळ्याच जगण्याची उलथापालथ करायला निघाला आहे. त्याला कसे हाताळायचे, त्याला आपल्यावर स्वार होऊ द्यायचे की आपण त्याच्यावर स्वार व्हायचे याचे भान येण्यासाठी आधी आपले डोके ताळ्यावर हवे. ते तसे असेल तरच आजूबाजूला घडणाऱ्या घटना, होणारे बदल यांचा अर्थ उलगडू शकतो.

विजय सुब्रमणियन नावाच्या निर्मात्याने ‘एआय’चा वापर करून ‘चिरंजीवी हनुमान’ हा चित्रपट तयार केला असून तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र दिग्दर्शक अनुराग कश्यपसह अनेक जाणकारांनी त्याच्यावर टीका केली आहे. सिनेमानिर्मिती हा उद्योग असला तरी त्याच्या मुळाशी अभिनय, लेखन, गायन, संगीत अशा आणखी कितीतरी कला आहेत. ‘एआय’च्या एका फटकाऱ्याने या उद्याोगातले कितीतरी रोजगार जाऊ शकतात आणि त्याहीपेक्षा त्यातल्या मानवी कला आणि कौशल्याची माती होऊ शकते हा त्यातला आक्षेपाचा मुद्दा आहे.

तो योग्यच, पण हा रेटा कोण, कसे आणि कितीसा रोखू शकणार आहे? अलीकडच्या तरुणाईला भुरळ घातलेल्या ‘सैय्यारा’ सिनेमातील सर्व गाणी किशोरकुमारच्या आवाजात ऐकायला मिळणे ही ‘एआय’चीच करामत. कोणतीही गाणी कोणाच्याही आवाजात, कोणत्याही ढंगात, कोणत्याही प्रकारच्या संगीतासह या ‘एआय’ करत असलेल्या करामतीने सध्या धुमाकूळ घातलेला आहे. तो इतका की ‘बुगडी माझी सांडली गं…’ ही लावणी शकिरा किंवा मॅडोनासारख्या पाश्चात्त्य गायिकांच्या आवाजातही ऐकायला मिळू शकेल.

‘एआय’ कसे वापरायचे हे तंत्र माहीत असलेली कोणीही व्यक्ती ते करू शकेल. गीतकार गाणे लिहितो आणि निसर्गत: सुरेल गळ्याची देणगी असलेले गायक आणि काहीएक संगीतसाधना असलेले संगीतकार त्यावर मेहनत घेतात. त्यामागे अंगभूत गुण असतातच पण कौशल्य वाढवण्यासाठी वर्षानुवर्षांची मेहनत असते. ‘एआय’मुळे हे सगळे एका सेकंदात करून साधना ही गोष्टच भुईसपाट ठरू शकते. आता तर अख्खा चित्रपटच ‘एआय’ने तयार केला आहे. कलानिर्मिती ही माणसाच्या प्रतिभेची कमाल मानली जाते. ते काम ‘एआय’ करणार असेल तर माणूस काय करणार?

अर्थात हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे, हे ‘एआय’चे इतर उपयोग पाहता लक्षात येते. उदाहरणच द्यायचे तर स्वयंपाकघरात वापरता येईल अशा ‘एआय’ आधारित रोबोचे आगमन परदेशात झाले आहेच, पण भारतीय बाजारपेठांमध्येही भारतीय पद्धतीचे अनेक खाद्यापदार्थ करता येतील असे ‘एआय’ आधारित किचन असिस्टंट किंवा रोबो येताना दिसत आहेत. ते आज भले तुलनेत प्राथमिक अवस्थेत असतील; पण केवळ आहारपद्धतीच नाही तर थेट विवाहसंस्थेतील श्रमव्यवस्थाच बदलून टाकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, हे नाकारता येणार नाही. गुंतागुंतीच्या भारतीय आहारसंस्कृतीने आजवर त्या त्या कुटुंबातील स्त्रीचा वेळ आणि श्रम यांच्यावर आणि पर्यायाने तिच्या व्यक्तिमत्त्वावरच घाला घातला आहे.

पण १००-१५० प्रकारचे खाद्यापदार्थ तयार करू शकणारे ‘एआय’-आधारित साधन स्वयंपाकघरात असेल तर कुटुंबातील पारंपरिक श्रमविभागणीच थेट बदलून जाऊ शकते. गॅससमोरून मोकळ्या झालेल्या स्त्रीची ऊर्जा तिला आवडणाऱ्या कोणत्याही कामात लावली जाऊ शकते. स्वयंपाक हे स्त्रीचेच काम हे गृहीतकच कायमसाठी पुसले जाऊ शकते. त्यामुळे पुढच्या काही पिढ्यांनंतर कदाचित ‘आईच्या हातचे’ किंवा ‘बायकोच्या हातचे’ पदार्थ हा प्रकारच माहीत असणार नाही. नसूदे. शतकानुशतकाच्या मोठ्या दुष्टचक्रातून स्त्रीची सुटका झाल्याचे समाधान त्यापेक्षा मोठे नाही का?

तसे ‘एआय’ने आपले रोजचे आयुष्य आधीच व्यापून टाकले आहे. हल्ली बाजारात आलेले ‘एआय’ चष्मे नुसती तोंडी आज्ञा ऐकून छायाचित्रण किंवा चलत्चित्रण करतात. त्याआधी आपल्या हातातले मोबाइल, त्यातली उपयोजने अर्थात अॅप्स, ऑनलाइन शॉपिंग, स्मार्ट वॉच, फेस रेकग्निशन, उंच इमारतींच्या लिफ्ट या सर्वांत ‘एआय’चा वापर होऊ लागला आहेच. अलीकडे जाहिरात होते ती स्मार्ट घरे, येऊ घातलेल्या चालकविरहित मोटारगाड्या, ही ‘एआय’ची किमयादेखील उच्च मध्यमवर्गापासून फार दूर नाही. हे सगळे बदल आपल्या आयुष्यात मांजराच्या पावलाने आले, पण यापुढच्या काळात मात्र तसे होण्याची शक्यता नाही.

संगणक क्रांतीच्या झुळकेपेक्षा इंटरनेट क्रांतीचे वारे वेगवान होते, त्याहीपेक्षा मोबाइल-स्मार्टफोन क्रांतीचा झंझावात मोठा ठरला आणि आता ‘एआय’ हे तर वादळ आहे. त्याने शिक्षण, मनोरंजन, उत्पादक उद्याोग अशी सगळी क्षेत्रे ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. ‘एआय’मुळे कोणत्या क्षेत्रातल्या किती लोकांचे रोजगार गेले यांसारख्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. अर्थात संगणक आले, तेव्हाही हीच ओरड झाली, पण संगणकाने नवे रोजगार निर्माणही केले. तसेच ‘एआय’च्या बाबतीतही होऊ शकते. पण त्यासाठी समाज म्हणून आपण तयार आहोत का, हा प्रश्न आहे. तो पडण्याचे कारण म्हणजे आपल्या देशात असलेली डिजिटल दरी.

प्रचंड लोकसंख्या, गरिबी यासह इतरही कारणांमुळे असलेला शिक्षणाचा अभाव हे या दरीचे कारण आहे. आहे त्या शिक्षणपद्धतीमधून आपण आज आपल्या लोकसंख्येसाठी पुरेसे रोजगार निर्माण करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. असे असताना ‘एआय’साठी आवश्यक ठरतील असे रोजगार निर्माण करणारे शिक्षण द्यायला हवे, याचा विचार आपण केव्हा करणार? केरळ हे देशातले पहिले १०० टक्के डिजिटली साक्षर राज्य म्हणून जाहीर झाले, अशी बातमी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. याच पद्धतीने देशातल्या अगदी तळागाळातल्या तरुणाला ‘एआय’साक्षर, ‘एआय’सक्षम करावे लागेल.

‘एआय’चे सहअस्तित्व मान्य करून अधिक चांगले कसे जगता येईल यावर काम करावे लागेल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे सांगणे आहे. हे वाटते तितके सोपे नाही. कारण कमी लोकसंख्येच्या देशांमध्ये कदाचित ‘एआय’ हे वरदान ठरेल; पण भारतासारख्या सामाजिक- सांस्कृतिक- राजकीय पातळीवर गुंतागुंतीच्या असलेल्या देशामध्ये ‘एआय’ साधने कोणाच्या हातात आहेत, यावरून त्यांचा वापर कसा होईल, हे ठरू शकते. तंत्रज्ञान आणि आधुनिकता कोणतेही भेदाभेद करत नसले तरी त्यांचा वापर करणाऱ्यांचे पूर्वग्रह, मूल्ये या सहअस्तित्वाचे भवितव्य ठरवणार आहेत. म्हणूनच ‘एआय’ हे वादळ माणसाळवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होणे आवश्यक आहे.