‘बहुपयोगी लढाऊ विमान’ मिळाल्याने गाफीलपणे आपण अधिकची कामेही त्यावर टाकली. परिणामी ‘उडत्या शवपेट्या’ हे अन्याय्य बिरुद त्यास लागले…

अंबाला हवाई तळावर १९६३मध्ये ‘मिग – २१’ या रशियन बनावटीच्या स्वनातीत लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचे आगमन झाले, त्या वेळी उपस्थितांपैकी अनेकांचे डोळे विस्फारलेले होते. तोपर्यंत अर्थातच त्यांच्यातील बहुतेकांनी असे अजब विमान पाहिलेले नव्हते. शिवाय प्राधान्याने भूदलकेंद्री असलेल्या त्या वेळच्या भारतीय सामरिक परिप्रेक्ष्यामध्ये स्वनातीत लढाऊ विमानांचे नेमके स्थान काय, याविषयीदेखील अनिश्चितता होती. परंतु भारताच्या सीमावर्ती भागांवर स्वामित्व सांगून तो बळकावण्याची मनीषा बाळगलेले दोन कुरापतखोर शेजारी भारताला जन्मजात लाभलेले असल्यामुळे ‘असे काही विमान’ हाताशी हवेच, असा विचार त्या वेळच्या राजकीय आणि कदाचित लष्करी नेतृत्वाने केला असावा.

तोपर्यंत चीनकडून १९६२ मध्ये आक्रमण झालेलेच होते. पाकिस्तान तशी आगळीक केव्हाही करेल अशी शक्यता वर्तवली गेली, जी अजिबात निराधार नव्हती हे नंतरच्या कित्येक दशकांनी वारंवार दाखवून दिलेच. पुढे मिग – २१ ही विमाने भारताने इतक्यांदा आणि इतक्या प्रमाणात वापरली की, त्यांची निर्मितीदेखील सोव्हिएत रशियाने भारताकडे सुपूर्द करून टाकली. क्रिकेट हा ब्रिटिशांनी शोधून काढलेला भारतीय खेळ आहे, असे म्हटले जाते. त्याच सुरात ‘मिग – २१’ हे रशियाने निर्मिलेले भारतीय विमान आहे किंवा होते असे सहज म्हणता येईल. इतर कोणत्याही हवाई दलाने – अगदी सोव्हिएत नि विद्यामान रशियासकट – इतक्या मोठ्या संख्येने, इतका प्रदीर्घ काळ नि इतक्या व्यामिश्र उद्दिष्टांसाठी हे विमान वापरलेले नाही.

या विमानाचे गारूड आपल्या हवाई दलावर इतके, की इतर विमाने खरीदण्याचे वा निर्मिण्याचे भानच आपल्याला अनेक वर्षे आले नव्हते. आताही आपल्या ताफ्यातील जवळपास तीसेक ‘मिग – २१’ विमाने किंवा शेवटच्या दोन स्क्वाड्रन्स वा तुकड्या सप्टेंबरमध्ये निवृत्त होतील, तेव्हा त्यांची जागा घेण्यासाठी आपल्याकडे सध्या विमानेच नाहीत! ही पोकळी कशी भरून काढायची, याविषयी धोरणस्पष्टता नाही. ‘तेजस’ ही एतद्देशीय विमाने दाखल होण्यात विलंब होत आहे.

तोपर्यंत सज्जता राखण्यासाठी राफेलसारखी विमाने घ्यायची, की आणखी अत्याधुनिक नि महागड्या विमानांकडे वळायचे, यावरूनही गोंधळ आहे. सध्याच्या अत्याधुनिक, चौथ्या-पाचव्या पिढीतील महाकाय विमानांच्या तुलनेत मिग – २१ चिमुकले आणि मागासच. दरम्यानच्या काळात भारताकडे सुखोई, मिराज, राफेल अशी अधिक कालसुसंगत विमाने आली. तरी कित्येक वर्षे आपले विश्लेषक आणि हवाई दल धुरीण मिग – २१ ला हवाई दलाचा कणा (बॅकबोन) मानत होते.

कालौघात हे मानद बिरुद पुसले जाऊन पुढे ‘फ्लाइंग कॉफिन्स’ किंवा उडत्या शवपेट्या हे अधिक अभागी बिरुद या विमानाच्या नावापुढे अन्याय्यरीत्या लागले, तरी ती आवश्यक त्या संख्येने नि त्वरेने पेन्शनीत काढली गेली नाहीत. मिग – २१ ला चिकटून राहण्याची ही प्रवृत्ती आणि चालढकलीवर दिवस काढण्याची सवय यापेक्षा अधिक अस्सल भारतीय तमोगुण काय असू शकतात? मिग – २१ च्या गौरवशाली कारकीर्दीला मानवंदना देताना, या गाथेचा उत्तरार्ध काळवंडला कसा, किंबहुना तीच या अफलातून लढाऊ विमानाची चिरंतन ओळख का बनून राहिली याची चिकित्साही समयोचित.

जगातील कोणत्याही लढाऊ विमानाने सहा दशकांहून अधिक काळ सेवेत राहण्याचा विक्रम केला नसेल. मूळ मिग – २१ मध्ये अर्थातच या काळात अनेक बदल केले गेले. सोव्हिएत रशियाने भारतास ही विमाने देऊ केली, त्या वेळी आपल्या सामरिक धोरणांबाबत काहीसा गोंधळ होता हे नक्की. प्रथम चीन आणि नंतर पाकिस्तान या दोन देशांच्या महत्त्वाकांक्षी आक्रमकतेला तोंड देण्यासाठी, विशेषत: उत्तर सीमेवर जरब बसावी या उद्देशाने हवाई सुसज्जतेला प्राधान्य द्यावे लागले. पण यासाठी भारतासारख्या लोकशाही देशाला अमेरिका आणि पश्चिम युरोपसारख्या लोकशाही संरक्षक देशांनी वाऱ्यावर सोडले. त्यांनी साथ दिली लोकशाहीभक्षक पाकिस्तानला.

या परिस्थितीत भारताच्या मदतीस धावून आला दडपशाहीप्रधान सोव्हिएत रशिया. एरवी या देशाने भारताला ‘मिग – २१’ लढाऊ विमाने देण्याची गरज काय होती? पाकिस्तानला अमेरिकेची मदत मिळत राहिल्यामुळे फार तर त्यांच्या अंकित देशासमोर आपलाही एखादा आश्रित देश निर्माण असावा, असा विचार सोव्हिएत नेतृत्वाने केला नसेलच असे नाही. अर्थातच भारत अशा आश्रित, अंकित मानसिकतेचा देश नव्हता. महत्त्वाकांक्षा आपल्याकडेही होतीच. त्यामुळे मिग – २१ सारखी लढाऊ विमाने आपण घेत राहिलो. हवाई दलाची धार वाढवत राहिलो. या विमानांची उपस्थिती १९६५च्या युद्धात माफक होती. पण १९७१मध्ये त्यांची कामगिरी निर्णायक ठरली.

‘मिग – २१’चा हेवा अमेरिका आणि तिच्या ‘नेटो’ संघटनेतील सहकारी देशांना वाटायचा. ध्वनीच्या दुप्पट वेगाने ही विमाने संचार करायची, जमिनीपासून जवळपास ५० हजार फुटांपर्यंत उडू शकायची. अमेरिकेच्या तत्कालीन लढाऊ विमानांसारखी शस्त्रास्त्रे आणि पल्ला त्यांच्याकडे नसेल; पण या मर्यादांनीच कॉकपिटातील वैमानिकाला अधिक चतुर आणि जागरूक बनवले. हवाई झटापटीत लढाऊ विमानांचा लवचीकपणा नि चापल्य, वैमानिकांचे कौशल्य नि चातुर्य हे शस्त्रसामग्री आणि रडार यंत्रणेइतकेच – किंबहुना अधिक निर्णायक ठरते ही सोव्हिएत शिकवण आपल्या वैमानिकांच्या अंगी मुरलेली होती.

मिकोयान गुरेविच कंपनीकडून १९८०च्या दशकामध्ये या विमानांच्या निर्मितीचा परवाना हिंदुस्थान एरॉनॉटिक्स या भारतीय कंपनीला मिळाला नि ही विमाने भारतातच बनवली जाऊ लागली. तोवर इतर हवाई दलांनी ही विमाने वापरणे बंद केले होते. पण भारतात मात्र नवीन सहस्राक उजाडेपर्यंत ती हवाई दलाचा आधार बनून राहिली. ही विमाने कधी तरी जुनाट होतील, त्यांची जागा घेण्यासाठी तेवढ्या मोठ्या प्रमाणात भारतातच विमाने बनवावी लागतील, हेदेखील फार पूर्वी ठरले होते.

साधारण १९८३ मध्ये हलक्या लढाऊ विमानांच्या देशांतर्गत निर्मितीचा प्रस्ताव अंतिम झाला. पण अशा गुंतागुंतीच्या विमानांच्या जुळणीसाठी आवश्यक तंत्रज्ञाननिर्मिती आणि इच्छाशक्ती भारतीय नेतृत्वाला दाखवता आली नाही. सरत्या सहस्राकाच्या अखेरीस भारतीय विमानाचे ‘तेजस’ असे नामकरण झाले, पण त्यापुढे गाडे हलेना. परिणामी मिग – २१च्या उपलब्ध ताफ्यातच या ना त्या सुधारणा करून, काही वेळा कामचलाऊ उपकरणे वापरून आपण हीच विमाने उडवत राहिलो. ‘मिग – २१’ विमानाचा मूळ उद्देश हवाई लढती आणि भारतीय अवकाश सुनिश्चित करणे हा होता. परंतु या विमानांकडून लांब पल्ल्याची उड्डाणे, जमिनीवरील हल्ले, टेहळणी अशा विविध तिरकस जबाबदाऱ्याही पार पाडल्या गेल्या. यांसाठी ही विमाने पुरेशी तंत्रसज्ज नव्हती. याची जबर किंमत पुढे मोजावी लागली.

जवळपास ८५० विमाने भारतात निर्मिली गेली; पण विविध कारणांस्तव पावणेदोनशेहून अधिक वैमानिकांना प्राण गमवावे लागले. सप्टेंबरमध्ये या विमानांच्या अखेरच्या दोन तुकड्या निवृत्त होतील, त्या वेळी भारतीय हवाई दलाकडे २९ तुकड्याच शिल्लक राहतील. सहा दशकांपूर्वी हीच परिस्थिती होती. पाकिस्तानी हवाई दलाकडे सध्या २५ तुकड्या आहेत, यावरून संख्यात्मक वर्चस्व भारताकडे कितीसे शिल्लक आहे याची कल्पना येते.

दोन्ही शत्रूंचा सामना कधीही करावा लागेल, याची छोटी झलक ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने मिळालीच आहे. तसे झाल्यास भारताला ४२ तुकड्या उड्डाणक्षम अवस्थेत लागतील. हा खड्डा एका रात्रीत, एका वर्षात वा दशकात निर्माण झालेला नाही. अनेक दशकांपूर्वी या संकटाचा अंदाज आला होता. तरीदेखील ‘मिग – २१’सारखे बहुपयोगी विमान हाताशी असल्यामुळे आपण गाफील राहिलो. मिग युगाचा अंत होताना आपण पुन्हा एकदा सहा दशके मागे जातो, हे विमानाचे यश तितकेच आपले अपयशही!