कथानक आणि पात्रे रंगवण्याचे तंत्र आणि तत्त्वचिंतनाची सखोलता मिलान कुंदेरा यांच्याकडे असूनही त्यांनी वाचकांना काहीही आयते दिले नाही..
‘द जोक’ ही मिलान कुंदेराची पहिली कादंबरी चेक भाषेत १९६७ साली आली, तेव्हा तो ३८ वर्षांचा होता. त्याची ती चेक भाषा बोलणारे फारतर दीडेक कोटी लोक जगात असतील.. म्हणजे कोंकणीपेक्षा निम्मे. पण ‘द जोक’ चेक भाषेत आल्यानंतर पुढल्याच वर्षी, म्हणजे कुंदेराने वयाची चाळिशी गाठण्याच्या आत फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन भाषेत या कादंबरीची भाषांतरे झाली. इंग्रजी वाचणाऱ्यांसाठी आज उपलब्ध आहे ती, ‘द जोक’च्या पहिल्या चार इंग्रजी अनुवादित पुस्तकांना कुंदेराने नापसंत केल्यामुळे पाचव्यांदा अनुवाद करावा लागून मग आलेली प्रत! इतकी मिजास हा कुठल्याशा आडभाषेतला लेखक कसा काय दाखवू शकला, याचे उत्तर त्याच्या साहित्यातून शोधावे लागते. तीन काव्यसंग्रह, चार नाटके, ११ कादंबऱ्या आणि साहित्य तसेच राजकारणाबद्दलच्या निबंधांची चार पुस्तके हा त्याच्या साहित्याचा आकार सांगून काही उपयोग नाही. यापैकी डझनभर पुस्तके खरोखरच जगभरात पोहोचली असली, तरीही नाही. कारण कुंदेराचे साहित्य वाचणारे हे उदाहरणार्थ आयन रॅन्ड किंवा जॉर्ज ऑर्वेल वाचणाऱ्यांपेक्षाही संख्येने कमी असतील. पण त्याच्या कादंबऱ्या ज्या कुणी वाचल्या, त्यांना काहीतरी महत्त्वाचे वाचल्याचे समाधान कुंदेराने दिले. हे महत्त्वाचे म्हणजे कसे, याचे उत्तर कदाचित वाचकागणिक निराळे असेल- कुंदेरा हा वाचकांना विचार करू देणारा लेखक होता, हे लक्षात घेतल्यास ते तसे असणारच. पण ११ जुलै रोजी मिलान कुंदेराच्या झालेल्या निधनानंतर तरी, कुंदेराने महत्त्वाचे काय सांगितले याचे काहीएक सामायिक उत्तर शोधणे पुढल्या काळासाठी आवश्यक ठरते.
राजकारणाच्या पलीकडे बरेच काही असते, असे म्हणत बहुतेकदा साहित्य आणि कलांकडे बोट दाखवले जाते. पण कुंदेरा हा तर व्यक्तित्वापासून राजकारण वेगळे काढता येतच नाही असे मानणारा. चेक व स्लोव्हाक प्रजासत्ताकांचा एकच चेकोस्लोव्हाकिया असलेला तत्कालीन कम्युनिस्ट देश सोडून कुंदेराने १९७१ साली फ्रान्समध्ये आश्रय घेतला, तो राजकारणामुळेच. पण त्याचे वैयक्तिक राजकारण इतके गुंतागुंतीचे की, ‘‘चेकोस्लोव्हाकिया हा शब्दच किती कृत्रिम आहे- मी नेहमी चेकोस्लोव्हाकियाऐवजी ‘बोहेमिया’ असेच लिहितो’’ असे म्हणणारा कुंदेरा हा त्या अर्थाने भाषिक राष्ट्रवाद मानणारा असला तरी अख्ख्या युरोपचा इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य आणि संगीत यांच्या वारशाचे आत्मीकरण त्याच्या लिखाणात दिसते. त्यामुळे त्याच्या कादंबऱ्या ‘राजकीय’ नसतात. ‘तत्त्वज्ञानपर कादंबरीकार’ असे कुणी कुंदेराला म्हटले की तो लगेच सांगे, ‘नाही. फारतर चिंतनपर म्हणा’! ऐतिहासिक कादंबरी लिहिणाऱ्यांपैकी तर तो नव्हताच पण ‘इतिहासाच्या पुनरावृत्ती’चे शोकांतिका आणि प्रहसन असे दोन्ही पैलू मात्र तो आवर्जून दाखवतो. उदाहरणार्थ, जर्मन महाकवी गटे याच्या व्यभिचारामुळे त्याच्या पत्नीने स्वत:च्या बहिणीच्या िझज्या ओढत तिला जिन्यावरून उतरवले होते, याची आठवण ‘इम्मॉर्टलिटी’ या कादंबरीतल्या अॅग्नेसच्या निमित्ताने तो देतो. गटेचे आणखीही संदर्भ ‘इम्मॉर्टलिटी’त येतात पण ही कादंबरी मात्र ना गटेची असते, ना अॅग्नेसची.. किंवा, ‘अनबेअरेबल लाइटनेस ऑफ बीइंग’मधल्या थॉमसवर राजद्रोहाचा ठपका ठेवला जातो, पण हा थॉमस चिंताग्रस्त होत नाही. बीथोवनची ‘एस मुस्स झाइन..’ (अटळ घडणारच) ही रचना हा थॉमस अक्षरश: जगतो. पण कुंदेराचा वाचक जर वरच्या पट्टीचा बीथोवन-अभ्यासक असेल तर पाळत ठेवणाऱ्या, कुणालाही राजद्रोही ठरवू शकणाऱ्या अशा क्लेमेन्स मॅटर्निशचा दरारा असणाऱ्या ऑस्ट्रियात बीथोवन राहात होता, हेही आठवेल आणि कादंबरी ना बीथोवनची ठरेल, ना थॉमसची उरेल!
कुंदेराची पात्रे कादंबरीत असतात कशासाठी? पात्रयोजनेमागे लेखकांचे ढोबळ हेतू असतात : मानवी स्वभाव उलगडणे, विशिष्ट काळाचे दर्शन घडवणे वगैरे.. ते कुंदेराच्या पात्रांमध्ये शोधताच येत नाहीत. बऱ्याचदा कुंदेराच सुरुवातीला मुख्य पात्रांबद्दलही ‘अमुक हा इंजिनीअर’ ‘तमुक ही खेडवळ तरुणी किंवा मध्यमवयीन बाई’, ‘बऱ्याच रखेल्या असणारा प्रथितयश सर्जन’ असे धोपटपाठ- क्लीशे- मांडूनच करून देतो. नंतर मात्र वाचकांना धोपटपाठापासून दूर नेऊन, पात्रांचे रंग खुलवून, ‘अमक्या पात्राच्या जागी आपणच आहोत’वाला वाचकांचा आवडता खेळही खेळू देतो.. पण हा निव्वळ कुंदेराच्या लेखनतंत्राचा भाग असतो. प्रत्यक्षात वाचकांशी कुंदेराच खेळत असतो- ‘आले मोठे माझ्या पात्रांच्या जागी स्वत:ला पाहणारे.. हे पात्र पुढे काय करणार आहे पाहा.. मग ठरवा!’ असा दणका त्याच्या कथानकांतून अनेकदा मिळतो. असल्या दणक्यांच्या थरारालाच वाचक सोकावू नयेत, यासाठी आधीच कुंदेरा तत्त्वचिंतनाच्या फैरी झाडून त्यांना गपगार करतो. म्हणजे कसे? तर उदाहरणार्थ, एक घरजावई नायक सासूशी रत होतो. दुसरा कवी नायक खेडय़ाचा अनुभव घेण्यासाठी ग्रामीण भागात जातो पण तिथल्या एका बाईशी मैत्री करून, तिला शहरात बोलावून, तिला कविसंमेलनाच्या प्रेक्षकांमध्ये ताटकळवून अखेर तिला ‘लॉजवर’ नेतो आणि तिला बहुधा घाणेरडा रोग झालेला असतो.. अशा एरवी कुणी लिहू नयेत आणि कुणी वाचू नयेत अशा प्रसंगांतूनही वाचकाला मात्र शहाणीव मिळते. अर्थात, ‘जुन्याचे नव्याला आणि नव्याचे जुन्याला आकर्षण कितीही वाटले तरी त्याला मर्यादा असतात’ किंवा ‘तरुण कवीला खेडय़ाचे वाटलेले आकर्षण हे मूलत: स्वत:च्या क्षमतांचेच आकर्षण नव्हते काय?’ अशी नैतिकतावादी तात्पर्ये कुंदेरा-गुरुजी अजिबात सांगत नाहीत.
कारण कुंदेरा हा गुरुजी नाहीच. तो भाष्य करतो, पण तात्पर्य सांगत नाही. ‘इम्मॉर्टलिटी’ या कादंबरीत ‘इमेजॉलॉजी’ अशी संकल्पना तो मांडतो. ‘प्रतिमा तयार करण्याच्या धंद्या’वर अर्थातच नापसंती व्यक्त करतो. गटे या ‘महाकवी’ची जी काही प्रतिमा जर्मनीने तयार केली, तिच्याशी या नापसंतीचा संबंध आहे का हे कादंबरीच्या ओघात बसणारे असूनही तो ते सांगत नाही. किंवा ‘स्लोनेस’ ही कादंबरी १९९४ मध्ये लिहितो आणि एक प्रकारे, हल्ली जे काही ‘स्लो लििव्हग’चे प्रयोग चालले आहेत त्यांचा संकल्पनाकार ठरतो, पण म्हणून काही तो सावकाशीने जगण्याचा प्रचार करण्याच्या फंदात पडत नाही. अखेरच्या ‘फेस्टिव्हल ऑफ इनसिग्निफिकन्स’ या कादंबरीतल्या ‘बिनमहत्त्वाचेपणा’ या संकल्पनेबाबतही तेच. इथे स्टालिनकडून कोणा सहकाऱ्याला बिनमहत्त्वाचा ठरवला जाण्याचा संदर्भ आहे की एक प्राध्यापक स्वत:हून पार्टीत वेटरचे काम करून बिनमहत्त्वाचेपणाचा स्वेच्छानुभव घेतो आहे, अशा कथानकात वाचकांनी गुरफटावे हवे तर, पण कुंदेराला तेच म्हणायचे असेल असेही नाही. ‘एकदाच काय म्हणायचे ते मोठ्ठय़ाने बांग देऊन म्हण- तेही कमी शब्दांत’ असे वाचकांचे खडसावणे कुंदेराने मान्य केले असतेच, तर बहुधा तो ‘आधुनिकता खतरेमें’ अशा आशयाचे काहीतरी म्हणाला असता! वयाच्या चौदाव्या वर्षी कुंदेराला काफ्काची ‘द ट्रायल’ कादंबरी भिडली, तेव्हापासून पुढल्या ८० वर्षांच्या आयुष्यात त्याने आधुनिकतावादाचा मूल्य-ऱ्हासच तर डोळसपणे पाहिला. फ्रान्सिस फुकुयामाच्या आधी त्याने ‘एण्ड ऑफ आयडिऑलॉजी’ ही अवस्था अनुभवली होती, इतिहासही आता लिहू तसा लिहिला जाणार हे ओळखले होते आणि अखेरच्या वर्षांतील स्वनिर्मित एकांतवास त्याने ‘बिनमहत्त्वाचेपणाचा उत्सव’ (फेस्टिव्हल ऑफ इनसिग्निफिकन्स) लिहिण्यापुरताच संपवला होता.. म्हणजे त्याला ‘नोबेल’ सतत नाकारणाऱ्यांच्याच नव्हे, तर स्वत:च्याही लेखी तो बिनमहत्त्वाचा होता का? – असेल, तरीही कुंदेरा वाचून विचार करता येतो हे अधिक महत्त्वाचे!