संगणक क्षेत्रातील अभियंत्यांस बाबा/बापूची गरज वाटत असेल आणि डॉक्टरांस दहशतवादाचा आसरा घ्यावा लागत असेल तर उभयतांच्या शिक्षणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात...

दिल्लीतील बॉम्बस्फोट कटात काही वैद्याकांचा समावेश असल्याचे उघडकीस आल्याने अनेकांस आश्चर्याचा धक्का बसल्याचे दिसते. या धक्क्याचे दोन भाग. एका गटास बसलेला धक्का डॉक्टर असे कसे काय करू शकतो, असा. त्यास सर्वसाधारण म्हणता येईल. ज्यांनी प्राण वाचवायचे तेच प्राण घेण्याचा विचार कसा काय करू शकतात वगैरे भावना या गटांत व्यक्त होते. ते योग्य. तथापि दुसऱ्या गटात उमटलेली प्रतिक्रिया अशी नाही. ती वेगळी आहे. ‘त्यांच्या’त डॉक्टरही किती कट्टर असतात पाहा, अशा सुरात ती व्यक्त होते. डॉक्टर आपले आणि ‘त्यांचे’ अशी वर्गवारी करण्यासाठी या गटात जोमाने प्रयत्न सुरू झालेले दिसतात. ते सध्याच्या ‘ते’ आणि ‘आम्ही’ या अशी विभागणी करण्याच्या प्रथेशी सुसंगत म्हणता येईल. या दुसऱ्या वर्गातील प्रतिक्रियाधारकांस डॉ. सुदाम मुंडे या कुख्यात वैद्याकाचे स्मरण या प्रसंगी करून देणे त्यांच्या वर्गवारी-मानसिकतेवर उतारा ठरावे. या डॉ. मुंडे यांनी किती स्त्री गर्भांची हत्या केली याची गणतीच नाही. दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींप्रमाणे या डॉ. मुंडे यांनी बॉम्ब फोडला नसेलही. पण त्या बॉम्बस्फोटापेक्षा अधिक जीव त्यांनी घेतले असण्याची शक्यता आहे आणि त्यांचे बेकायदा कृत्य बॉम्ब कटात सहभागी होणाऱ्या डॉक्टरांइतकेच, किंबहुना अधिकच, निंदनीय ठरते. त्यावेळी ज्या प्रमाणे डॉक्टरांचा- म्हणजे डॉ. मुंडे यांचा- धर्म विचारात न घेता प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या त्याच प्रमाणे दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरांचा धर्म विचारात न घेता भाष्य होणे गरजेचे आहे. ते तसे केले तर आणि तरच यातील कळीच्या मुद्द्यापर्यंत पोहोचणे शक्य होईल.

हा कळीचा मुद्दा आहे तो सुशिक्षितांच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अध:पतनाचा. दिल्ली येथील बॉम्बस्फोट हा मुसलमान सुशिक्षितांच्या सक्रिय सहभागाचे पहिले उदाहरण नाही. तसे पहिले उदाहरण अमेरिकेत २००१ साली झालेला ९/११ उत्पात हे असेल. त्या प्रकरणात तर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’सारख्या अतिबुद्धिमानांच्या शिक्षण संस्थेतील स्नातकाचा सहभाग होता. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींवर ज्यांनी विमाने आदळवली त्यातील एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतील होता. याचा अर्थ असा की शिक्षण केवळ व्यक्तीस फार फार तर साक्षर करू शकते. पण म्हणून शिक्षणाने ती व्यक्ती सुसंस्कारित होईलच असे नाही. किंबहुना तशी ती नसते. आपल्याकडे बाबा/ बापू अथवा कथित जागृत म्हणवणाऱ्या वा नवसाला पावणाऱ्या धर्मस्थळी दर्शनासाठी अथवा आशीर्वादासाठी रांगा लावणाऱ्यांतील बहुसंख्य सुशिक्षितच असतात. पण शिक्षणाने ते शहाणे झाले असे त्यांच्या वर्तनावरून ठामपणे म्हणता येतेच असे नाही. बऱ्याच प्रकरणी वास्तव उलटेच असते. परंतु असे जरी असले तरी इस्लामधर्मीयांतील असे अंधश्रद्धाळू आणि हिंदुधर्मीयांमधील असे आणि इतके अंधश्रद्धाळू यांच्या संख्येत लक्षणीय अंतर दिसते. ही समाधानाची बाब असली तरी त्याबाबत दोन मुद्दे महत्त्वाचे ठरतात. एक म्हणजे हिंदुधर्मीयांची आणि इस्लामधर्मीयांची लोकसंख्या यातील तफावत. ती लक्षात घेतल्यास ‘आमच्यात अंधश्रद्धाळू इतके कमी नाहीत’, हा दंभ दूर होण्यास मदत होईल. दुसरा मुद्दा हिंदू धर्मात झालेल्या समाजसुधारणा. पुराणकालीन चार्वाक आदी द्रष्टे असोत वा महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी अनेकांनी याबाबत केलेले कार्य. हिंदू धर्मात इतके अतिरेकी झाले नाहीत आणि हिंदू धर्मीय इतका एकारलेला झाला नाही याचे बहुश: श्रेय या समाज सुधारकांस जाते. याबाबतही, म्हणजे या धर्म सुधारकांशी अन्य समाज घटकांचे वर्तन लक्षात घेता आपला इतिहास अभिमानाने मिरवावा असा नाही. मग ती फुले दाम्पत्यावर झालेली शेण-फेक असो वा आगरकरांच्या डोळ्यादेखत त्यांची काढण्यात आलेली अंत्ययात्रा असो. धर्मप्रेमींचे या सुधारकांशी होते ते वर्तन समंजस होते असे म्हणता येणार नाही. ते वर्तन ‘तालिबानी’ नव्हते असे ठरवता येणे अवघड. हमीद दलवाई या समाजसुधारकाशी मुसलमानांचे वर्तन असेच होते. हे वास्तव नव्या मुद्द्यास जन्म देते. हा मुद्दा म्हणजे समाज सुधारकांची घुसमट आणि त्याचवेळी धर्मवाद्यांची वाढती शिरजोरी. अलीकडे तर नास्तिक असणे दूर, पण निधर्मी असणे हेदेखील अनेकांस अवघड वाटू लागले आहे. सहिष्णुतावादी, समंजस, सर्व धर्मातिरेकांपासून सम अंतर राखून राहाणे अलीकडे समाजमान्य आणि त्याहीपेक्षा राजमान्य मानले जात नाही. त्याचा परिणाम असा की हिंदू धर्मात आजही आणि अजूनही मोठ्या प्रमाणावर असणारे सुधारणावादी मौनात जाणे पसंत करतात. कोणाच्या तरी कोणत्या तरी मुद्द्यावर संघर्ष ओढवून घेण्यापेक्षा गप्प बसलेले बरे, असे अनेकांस वाटत असेल तर मोठी चूक तसे वाटायला लावणाऱ्या व्यवस्थेची आहे. गप्प बसणाऱ्यांची नाही. अशावेळी महत्त्वाचे ठरते ते शिक्षण आणि त्याचा दर्जा.

संगणक क्षेत्रातील अभियंत्यांस बाबा/बापूची गरज वाटत असेल आणि डॉक्टरांस दहशतवादाचा आसरा घ्यावा लागत असेल तर उभयतांच्या शिक्षणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. आपले शिक्षण गुण कसे मिळवायचे ते सांगते. पण गुणवान कसे व्हायचे ते त्यातून उमगतेच असे नाही. परिणामी सर्व स्पर्धा असते ती अधिकाधिक गुण कसे मिळवता येतील ही. हे वास्तव अनेक अंगांनी समजून घेता येईल. उदाहरणार्थ अभियांत्रिकी. आपल्याकडे जगात सर्वाधिक संख्येने अभियंते तयार होतात. परंतु जगातील किती उत्पादने भारतीय अभियंत्यांच्या कल्पनेतून साकारलेली आहेत? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रास तर भारत मनुष्यबळ पुरवतो. परंतु माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील किती उत्पादने भारतीयांनी दिलेली आहेत? या क्षेत्रात आपण अभिमान बाळगतो तो सेवा क्षेत्रात आघाडीवर असण्याचा. हे म्हणजे वाईटातही चांगले शोधण्याचा अट्टहास. तो मिरवणे म्हणजे ‘आम्ही राजवाडे बांधू शकत नाही; पण आम्ही उत्तम निष्ठेने राजवाडे सांभाळतो’, असे म्हणणे. यात अभिमान बाळगावा असे काहीही नाही. तरीही आपण हा मुद्दा मिरवत असू तर या वास्तवास काय म्हणावे? आपले केंद्र सरकार देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील एक टक्का रक्कमही विज्ञान आणि उच्च तंत्रज्ञानावर खर्च करणार नसेल तर मूलभूत संशोधन तसेच सामाजिक शैक्षणिक जाणीव तयार होणार कशी? आज चीन हा अभियांत्रिकीच्या बाबत अमेरिकेपेक्षाही अव्वल मानला जातो. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे माओ यांच्यानंतर चीनचे सर्व देशप्रमुख हे अभियांत्रिकी शाखेतील होते. डेंग शियाओ पिंग, हू जिंताव इत्यादींपासून ते आजच्या क्षी जिनपिंग यांच्यापर्यंत चिनी शासक हे अभियंते होते. चीनमध्ये अभियांत्रिकी संशोधन सरकारी प्राधान्यक्रमावर असून कृत्रिम प्रज्ञा आदी मुद्द्यांवर हा देश आज अमेरिकेसही मागे टाकेल अशी परिस्थिती आहे, याचे हे महत्त्वाचे कारण.

या पार्श्वभूमीवर आपण कोणाचे अनुकरण करावे हा प्रश्न. भारतीय मुसलमान अजूनही पाकिस्तानादी अप्रगत देशांच्या कच्छपि लागणार असतील तर त्या समाजात दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींसारखेच अधिक निपजणार असे भाकीत वर्तवण्यास ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे प्रश्न ‘त्यां’चा नाही. तो त्यांना ‘ते’ मानणाऱ्या ‘आपल्यां’चा आहे. त्या प्रश्नास भिडण्याचा प्रामाणिकपणा दाखवता आला तरच बुद्धिवंतांचे ब्रेनवॉश किती धोकादायक आहे ते कळेल. मग तो धर्म कोणताही असो.