ओडिशा आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये गेल्या १५ दिवसांमध्ये दोन तरुण मुलींच्या बाबतीत घडलेल्या घटना कमालीच्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. ओडिशामधील घटनेत बीएड् करणाऱ्या त्या अभागी मुलीचा विभागप्रमुखाकडून सतत छळ होत होता. त्याच्याकडून होणाऱ्या लैंगिक मागण्यांना कंटाळून तिने महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे तक्रारही केली होती. तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर प्राचार्यांच्या केबिनसमोर आपण जीव देऊ असेही तिने लेखी दिले होते. तिच्या तक्रारीची दखल तर घेतली गेली नाहीच, उलट विभागप्रमुख आणि प्राचार्यांनी संगनमताने तिच्या पाठीशी इतर कोणी उभे राहणार नाहीत, अशीही व्यवस्था केली. आपल्या तक्रारीचा काहीच उपयोग होत नाही, या उद्विग्नतेतून तिने स्वत:वर पेट्रोल ओतून घेऊन जाळून घेतले. आत्महत्या हा काही कोणत्याही प्रश्नावर उपाय नाही वगैरे तत्त्वज्ञान यावर झाडले जाईलच, पण एखाद्या मुलीच्या गंभीर तक्रारीची दखलच न घेणे आणि संबंधितांना वाचवणे हा देखील मार्ग नव्हे. एखाद्या जिवावर स्वत:वर पेट्रोल ओतून घेऊन जाळून घ्यावे एवढी वेळ येत असेल, तर त्याची त्या काळात किती तगमग झाली असेल या विचारानेच कुणाही संवेदनशील माणसाच्या अंगावर काटा येईल. लैंगिक छळाची तक्रार करायला आधीच एखादी स्त्री स्वत:हून पुढे येणे किती कठीण असते ते वेगळे सांगायला नको. अशा वेळी तिच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याऐवजी तिलाच आत्महत्या करायला भाग पाडणारी आपली व्यवस्था किती कोडगी आहे, ते दिसते. विशाखा समितीची तरतूद, स्त्रियांच्या बाजूने कायदे असे सगळे असतानाही असे घडते हे आणखी चीड आणणारे. कारण कायदा आपल्यासाठी नाही, आपल्या बाजूने नाही हा यातून जाणारा संदेश तर अशा घटनांना तोंड देणाऱ्या इतर स्त्रियांना आणखी नाउमेद करणारा आहे.

घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांना कसे वागवले जाते ते पाहा, असे म्हणावे तर दुसऱ्या एका घटनेत ओडिशाहून जवळपास १७०० किलोमीटर अंतरावर असलेल्या हरियाणामध्ये वडीलच मुलीचा खून करतात. वडिलांच्याच प्रोत्साहनाने टेनिस या खेळात कारकीर्द घडवलेल्या, टेनिस अकादमी चालवणाऱ्या, गाण्याच्या अल्बममध्ये सहभाग घेणाऱ्या राधिका यादव या गुणी मुलीची कहाणी दुर्दैवी ठरली. ती स्वयंपाकघरात काम करत असताना तिच्यावर तिच्या वडिलांनीच पाठीमागून एक नाही, दोन नाही, तर तब्बल पाच गोळ्या झाडल्या. बापलेकीच्या नात्यातील जिव्हाळा बंदुकीच्या गोळ्यांनी संपवण्याइतके क्रौर्य त्या बापात का निर्माण झाले असावे, याचे प्रथमदर्शनी मिळणारे उत्तर थेट मध्ययुगात नेणारे आणि तरीही आजच्या काळातील पुरुषप्रधान मानसिकतेची परिसीमा दाखवणारे आहे. राधिका यादवला तिच्या वडिलांनीच टेनिस खेळायला प्रोत्साहन दिले. तिचे सामने असत तेव्हा आईवडिलांपैकी कोणी तरी सतत तिच्याबरोबर असे. तिच्या वडिलांनीच तिला टेनिस अकादमी सुरू करायला मदत केली. त्यासाठी दोनेक कोटी रुपये खर्च केले असेही वृत्त आहे. भाडेतत्त्वावर दिलेल्या घरांमधून तिच्या वडिलांना चांगले उत्पन्न येत असे. तरीही ‘मुलगी कमावते आणि तिच्या पैशांवर तू जगतोस’ अशी शेरेबाजी गावात कुणी तरी केल्यावर या दीपक यादव नावाच्या इसमाचा अहंकार दुखावला आणि त्याने ‘टेनिस अकादमी बंद करून टाक’ असा लकडा मुलीमागे लावला. या गोष्टीला राधिका तयार नव्हती आणि त्यामुळे तिच्या वडिलांनी तिचा गोळ्या घालून खून केला असे म्हटले जात आहे. राधिकाचा मोकळा वावर, ती करत असलेले रील्स यावरही तिच्या वडिलांचा आक्षेप होता आणि त्या सगळ्या रागातून त्यांनी हे अत्यंत हिंस्रा पाऊल उचलले असे सांगितले जात आहे.

ओडिशा असो की हरियाणा, घर असो की दार, सगळीकडे पुरुषांची मानसिकता एकाच प्रकारची का आहे? आपल्याच प्रोत्साहनाने आपली लेक काही तरी करू पाहत असेल तर तिच्याभोवती आपल्या भक्कम आधाराचे संरक्षक कवच उभारावे असे या बापाला का वाटले नसेल? ‘तुम्हीही तुमच्या मुलीला असेच उभे करा’, असे टीकाकारांना ठामपणे का सांगता आले नसेल? लोक दोन्ही बाजूंनी बोलतात, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच बरे असे का वाटले नसेल? आपली मुलगी, बहीण, बायको यांनी आर्थिकदृष्ट्या आपापल्या पायांवर ठाम उभे असलेच पाहिजे, वेळ पडली तर आपल्याशिवायही त्यांना नीट जगता आले पाहिजे, असे अशा पुरुषांना का वाटत नाही? महत्त्वाकांक्षेचे पंख लेऊन आपल्या घरातली कोणीही स्त्री उडू पाहत असेल तर त्या पंखांना बळ द्यायचे, भक्कमपणे पाठीशी उभे राहायचे की ते पंखच छाटून टाकायचे? कुणी तरी उठून टीका करते तर त्या टीका करणाऱ्याला त्याची जागा दाखवायची की आपल्याच लेकीचा जीव घ्यायचा? मुळात बायको, मुलगी, बहीण यांच्या कमाईवर एखाद्या पुरुषाला कधी तरी जगावे लागले तर ते त्याला किंवा इतरांना इतके टोचावे ते का? खरे तर ते टोचणे सोयीनुसारच असते. बायकोच्या कमाईवर बिनदिक्कतपणे हक्क सांगत, उलट तिलाच न्यूनगंड देणाऱ्या पुरुषांची समाजात कमतरता नाही. पण इथे आपल्याकडे पैसा असतानाही आपल्याला ‘मुलीच्या पैशावर जगतोस’ असे हिणवले जाते, हा राग. म्हणजे पुन्हा अहंकाराला धक्काच. आदर्श राजा ठरण्याच्या नादात कुणाच्या तरी टीकेमुळे आपल्या गर्भवती पत्नीचा ‘त्याग’ करण्याच्या वृत्तीपेक्षा तो फारसा वेगळा नाही. काहीही झाले की त्याला धार्मिक वळण द्यायचे हा आपल्याकडचा अलीकडच्या काळातला आवडता छंद. राधिका यादवने इनाम उल हक या गायकाच्या ‘कारवाँ’ या अल्बममध्ये सहभाग घेतला होता. तसा एक व्हिडीओही तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर आहे. या सुतावरून स्वर्ग गाठत हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचाही दावा केला. पण दीपक यादवची कबुली आणि राधिका यादवच्या मित्रमंडळींची विधाने यामुळे तो वेळीच फेटाळून लावला गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओडिशामधली जळीत मुलगी असो की राधिका यादव, ही दोन्ही प्रकरणे आजच्या मुलींच्या महत्त्वाकांक्षा समजून न घेता आपला पुरुषप्रधान अहंकार कुरवाळत बसणाऱ्या वृत्तीचे प्रतिनिधित्व करतात. एका प्रकरणात शैक्षणिक महत्त्वाकांक्षा बाळगणारी मुलगी लैंगिक मागण्यांना नकार देते म्हणून तिला आत्महत्येच्या पायरीपर्यंत जाणे भाग पाडले जाते तर दुसऱ्या प्रकरणात करिअर करू पाहणारी मुलगी बापाच्या प्रतिष्ठेआड येते म्हणून जिवानिशी संपवली जाते. म्हणजे इच्छा, आकांक्षा, भावना, अहंकार हे सगळे आहे ते फक्त पुरुषांनाच. त्याला धक्का लावणारी स्त्री ओडिशामध्ये असो, हरियाणामध्ये असो, पश्चिम बंगालमध्ये असो की कर्नाटकात असो… देशाच्या कोणत्याही भागात तिच्या वाट्याला हेच प्राक्तन येते. पुरुषांनी कसे मर्द असले पाहिजे, पुरुषासारखे वागले पाहिजे, घरातल्या बाईच्या तालावर नाचता कामा नये, प्रत्येक बाबतीत स्त्रीपेक्षा वरचढच असले पाहिजे हे त्याला अगदी लहानपणापासून जे ‘बाळकडू’ दिले जाते, ते हळूहळू स्त्रीपुरुष संबंधांमधले कडू जहर बनून जाते. या वातावरणात वाढणारे पुरुष स्त्रीचा माणूस म्हणून कधीच विचार करू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या आसपास हवी असते ती त्यांच्या अंकित बनून राहायला तयार असणारी स्त्री. तशी ती असेलच असे नाही, म्हणून मग ती नकोच. तिने करिअर, नोकरी, व्यवसाय काहीही करायचे की नाही हा निर्णय तिचा नसतो. लग्न केले तर मूल व्हावे की नाही, हा निर्णय तिचा नसतो. हुंड्यासाठी तिला कधी मारून टाकले जाईल याचा नेम नसतो. गृहिणी म्हणून ती वावरत असेल तर तिच्या घरकामाला काडीची किंमत नसते. एकूण काय, तर तिने महत्त्वाकांक्षी असण्यापेक्षा जिवानिशी गेलेले बरे.