गेल्या आठवड्यात एअर इंडिया विमान अपघात, इस्रायलचा इराणवरील हल्ला आदी कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेने कसोटी क्रिकेट अजिंक्यपदाच्या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या विजयाकडे दुर्लक्ष झाले. हा विजय नेहमीसारखा ‘कोणी तरी जिंकणार – कोणी तरी हरणार…’ छापाचा नाही. तसे मानणे हा दक्षिण आफ्रिकेतील गौरेतरांचा अपमान ठरेल. दक्षिण आफ्रिकी संघ गेली कित्येक वर्षे मातबर म्हणून ओळखला जायचा. पण तो प्राधान्याने गोऱ्यांचा आणि गोऱ्यांकडूनच गौरवला गेलेला असा. पण त्या संघाला दिग्विजयी कधी बनता आले नाही. तो मान गौरेतरांचा सहभाग असलेल्या आणि एका गौरेतराच्या नेतृत्वाखालील संघाने पटकवला. यावर एका विजेतेपदाकडे अशा राजकीय नजरेने पाहू नये, असा सल्ला देणारे कोणी दिसले तर ते खचितच उच्चवर्णीय असतील. अशांच्या लबाड युक्तिवादाकडे दुर्लक्ष करून या विजयाचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक.
या विजयी संघाचा कर्णधार तेम्बा बवुमा, हा अस्सल मातीतला आणि कृष्णवर्णीय दक्षिण आफ्रिकी. उंची साडेपाच फुटांपेक्षा जेमतेम अधिक. काळेपणाविषयी न्यूनगंड नाही आणि गोऱ्यांना परास्त केल्याचा निष्कारण भावनोत्कट अहंगंड नाही. त्याच्या चणीच्या दोनतृतीयांश उंची असलेली विजेतेपदाची गदा लॉर्ड्स मैदानावर हातात घेऊन तो मिरवत होता त्या वेळी त्या गदेपेक्षा किती तरी अधिक मोठे ओझे त्याच्या खांद्यांवर होते. अपेक्षांचे आणि निराशामयी इतिहासाचे! दक्षिण आफ्रिकेला क्रिकेट जगताने तेथील सरकारच्या वर्णद्वेषी धोरणाचा निषेध म्हणून अधिकृतरीत्या बहिष्कृत केले, त्या वेळी म्हणजे १९७० च्या दशकात तो गोऱ्यांचा संघ होता. भारताच्या पुढाकाराने १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात दाखल झाला, त्या वेळीही तो गोऱ्यांचाच संघ होता. ज्या हॅन्सी क्रोनिएने १९९७ मध्ये दक्षिण आफ्रिकेला पहिले दखलपात्र विजेतेपद मिळवून दिले तो कर्णधारही गोराच. नि कलंकितही. दरम्यानच्या काळात दक्षिण आफ्रिकेने अनेक चढउतार पाहिले. वर्णद्वेषी मोजक्या गोऱ्यांचे जोखड झुगारून नेल्सन मंडेलांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेची वाटचाल सुरू झाली. पण देशात एकजिनसीपणा नव्हता. तो दुभंगलेला होता. गौरेतरांना देश धड चालवता तरी येईल का, अशी शंका घेणारे गोरे दक्षिण आफ्रिकेत होते नि बाहेरही. देश असो वा एखादा खेळ, प्रस्थापित मोजक्यांच्या हातातून सूत्रे बहुजनांकडे जाताना ते संक्रमण सरळ नसते. दक्षिण आफ्रिकेमध्ये हे संक्रमण ज्या एका खेळातून वारंवार दिसून येते तो खेळ म्हणजे क्रिकेट. हे सत्य लक्षात घेण्यासाठी भूतकाळात डोकवावे लागेल.
दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट आणले अर्थातच ब्रिटिशांनी आणि भारत, वेस्ट इंडिज बेटांप्रमाणेच या देशातही गोऱ्यांपाठोपाठ गौरेतर स्थानिकांनीही हा खेळ आत्मसात केला. परंतु भारताप्रमाणे इतरही वसाहतींना स्वातंत्र्य दिल्यानंतर ब्रिटिश निघून गेले, तसे दक्षिण आफ्रिकेत घडले नाही. मोजके गोरे दशकानुदशके दक्षिण आफ्रिकेतच राहिले आणि गेल्या शतकाचा बराच काळ सत्ताधीश म्हणूनच वावरले. गौरेतरांना इतर बहुतेक क्षेत्रांप्रमाणेच क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व अधिक. क्रिकेट या खेळाला दक्षिण आफ्रिकेतील प्रस्थापित गोऱ्यांनी वर्ण वर्चस्ववादाचे स्वरूप दिले. यासाठी काळ्यांना बाजूला ठेवले गेले. या धोरणात्मक विलगीकरणामुळेच दक्षिण आफ्रिकेवर इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच क्रिकेटसारख्या खेळांतूनही बंदी घातली गेली. यातून दक्षिण आफ्रिकेचे किती नुकसान झाले नि तो संघ बंदी घातली जाण्यापूर्वी कसा दिग्विजयी होता, याच्या कथा आजही सांगितल्या जातात. पण त्या बंदीमुळे दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या क्रिकेटपटूंचे फार नुकसान झाले नाही. नेल्सन मंडेलांना मुक्त केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे पहिले गौरेतर सरकार दक्षिण आफ्रिकेत स्थापले गेले. पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात फेरप्रवेश झाला, कारण आता तेथे सत्तेत गोरेही नव्हते नि वर्णद्वेषी धोरणही नव्हते. पण क्रिकेटची सूत्रे फिरून गोऱ्यांच्याच हाती आली! पहिली काही वर्षे त्या संघात एकच काळा क्रिकेटपटू होता. त्याचे नाव मखाया एन्टिनी. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या गोऱ्या संघात कोणी मित्र नव्हते. त्यामुळे अनेकदा हॉटेलवरून मैदानात जाताना तो संघाच्या बसच्या मागून चालत किंवा धावत जायचा. वेगळ्या टेबलावर जेवायला बसायचा नि पार्ट्यांनाही जायचा नाही कारण आमंत्रणच नसायचे. वर्णद्वेष धोरण म्हणून संपलेला होता, पण तो समाजात इतका खोल झिरपला होता त्याचे काय?
नेल्सन मंडेलांसमोर महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग यांचा आदर्श होता. त्यांनी एकच सांगितले – इतिहास उगाळून सूडबुद्धीने वागणे नको! सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेच्या सर्वच क्रीडा संघांमध्ये – रग्बी, क्रिकेट इत्यादी – गौरेतर क्रिकेटपटूंना जवळपास नगण्य प्रतिनिधित्व होते. त्यांची संख्या वाढवणे आवश्यक होते, पण हे कसे साधायचे? यासाठी काही प्रमाणात राखीव जागा ठरवण्यात आल्या. ज्युनियर संघ, विद्यापीठ संघ, प्रांतिक संघ, सीनियर संघांमध्ये कृष्णवर्णीय, मिश्रवर्णीय क्रिकेटपटूंसाठी काही जागा राखीव ठेवणे अनिवार्य बनले. यामुळे बिचाऱ्या गोऱ्या क्रिकेटपटूंचे काय होणार, त्यांना संधी कशी मिळणार वगैरे परिचित सूर पद्धतशीरपणे आळवला गेला. काही गोऱ्या क्रिकेटपटूंनी मग इंग्लिश कौंटी क्रिकेटचा आधार घेतला. ‘कोट्यामुळे संधी नाकारली गेली’ असा शिक्का बसलेल्यांपैकी बहुतांना गोऱ्या जगाची सहानुभूतीही मिळायची. संक्रमणाच्या या काळात अधिकाधिक गौरेतर क्रिकेटपटू दक्षिण आफ्रिकेत मुख्य प्रवाहात खेळू लागले. आणि अधिकाधिक स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ मोक्याच्या वेळी गळपटू लागला. ‘चोकर्स’ असा शिक्का ज्या वेळी दक्षिण आफ्रिकेवर १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या सुप्रसिद्ध पराभवानंतर बसला त्या वेळी त्या संघात गोऱ्यांचेच प्राबल्य होते. तरीदेखील या संघात गोऱ्या क्रिकेटपटूंचे प्रमाण कमी होणे आणि या संघाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जेतेपदांची पाटी कोरी राहणे, याचा परस्परसंबंध निष्कारण जोडला गेला.
या शंका-कुशंकास तेम्बा बवुमाच्या संघाने लॉर्ड्सच्या हिरवळीवर मूठमाती दिली. ‘गोऱ्यांवरील अन्याय’ हा धागा पकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांचा संहार होतो असा हास्यास्पद दावा करत अमेरिकेची कवाडे तेथील ‘अन्यायग्रस्त’ गोऱ्यांसाठी खुली केली. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा अमेरिका भेटीवर गेले असताना, ट्रम्प यांनी तथाकथित संहाराच्या बनावट चित्रफिती व्हाइट हाउसमध्ये त्यांच्या समक्ष दाखवल्या. त्या वेळी ट्रम्प यांच्यासमवेत इलॉन मस्क उपस्थित होते. तेही मूळचे दक्षिण आफ्रिकी गोरे. ट्रम्प यांना उत्तर देण्याच्या फंदात रामाफोसा पडले नाहीत. दक्षिण आफ्रिकेतील गौरेतरांनी आणि विशेषत: कृष्णवर्णीयांनी हाच मार्ग अनुसरलेला आहे. मोजक्या गोऱ्यांच्या धारणा बदलण्यातला फोलपणा त्यांना लक्षात आलेला आहे. त्याबद्दल कटुता न बाळगता अशा गोऱ्यांना त्यांनी माफ केले आहे. पण त्याच वेळी यशोशिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. बवुमाच्या नेतृत्वाखालील, मोठ्या संख्येने गौरेतर क्रिकेटपटूंचा समावेश असलेला दक्षिण आफ्रिकेचा विजय या शहाणिवेचा आविष्कार आहे. उत्तर कामगिरीतून द्यायचे, भावनावेगात वाहून जायचे नाही हे ते शहाणपण. या एकाच विजयाने तेम्बा बवुमाने भारत, इंग्लंड नि ऑस्ट्रेलिया या क्रिकेटमधील प्रस्थापितांना उत्तर दिले आहे नि दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या प्रस्थापितांनाही त्यांची जागा दाखवून दिली आहे. बवुमा आणि आधीच्या पिढ्यांसाठी हा विजय इतक्या वर्षांचे वर्ण-वंश व्रण बुजवणारा म्हणून महत्त्वाचा.