इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिकेच्या महासत्तापदास आव्हान देणारा चीन हे तीन मुद्दे ट्रम्प यांचे नेतृत्वकौशल्य जोखतीलच…

एखाद्याच्या केवळ सत्तारोहणामुळे जगभरात इतकी हुरहुर, साशंकता, संभ्रम आणि संशय भावना दाटून येत असेल तर ही बाब त्या व्यक्तीसाठी अभिमानास्पद की लज्जास्पद याची चर्चा आता करणे निरर्थक. अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष म्हणून आज, २० जानेवारीस, डोनाल्ड ट्रम्प शपथ घेत असताना ‘आता पुढे काय’ या प्रश्नचिन्हाच्या काळ्या सावलीचा झाकोळ सर्वत्र पसरलेला दिसतो. ट्रम्प यांचे व्यक्तिमत्त्व असे की ते याचा अभिमान बाळगतील. कोणताही आणि कोणत्याही देशातील नेता जनतेच्या मनात आश्वस्ततेची भावना निर्माण करण्याऐवजी भीती आणि दहशत यांस जन्म देत असेल आणि वर त्याचा अभिमान बाळगत असेल तर ते त्या समाजाचे अधोगती निदर्शक ठरते. ही अधोगती अमेरिकी समाज आता अनुभवेल. लोकशाहीत जनतेचा कौल शिरसावंद्या मानायला हवा, हे मान्य. त्यामुळे या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल सर्वांनी गोड मानून घ्यायला हवा, हेही मान्य. तथापि आधीच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तो कौल नाकारणारा, हिंसक आंदोलन करणारा आणि त्यासाठी न्यायालयात दोषी ठरलेला नेता ज्यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतो तेव्हा त्याच्या लोकशाही निष्ठा संशयास्पद असतात, हे अमान्य करता येत नाही. हे ट्रम्प यांच्याबाबत घडले. आता पुढील चार वर्षे समस्त विश्वास त्यांचे असणे सहन करावे लागणार आहे. हे सहन करणे सुरू होण्यापूर्वीच पुढे काय वाढून ठेवलेले आहे याची चुणूक ट्रम्प गेले दोन महिने दाखवत आहेत. अमेरिकी बाजारात येणाऱ्या परदेशी वस्तूंवर दणदणीत आयातशुल्क आकारण्यापासून त्या देशात स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्यांवर सणसणीत निर्बंध लादण्यापर्यंत ट्रम्प यांनी आपली धोरणदिशा स्पष्ट केलेली आहे. त्या बरोबरीने ट्रम्प यांची नेतृत्वक्षमता तीन मुद्द्यांवर जोखली जाईल.

हेही वाचा :अग्रलेख : मर्दुमकीच्या मर्यादा

इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिकेच्या महासत्तापदास आव्हान देणारा चीन हे तीन मुद्दे ट्रम्प यांचे नेतृत्वकौशल्य जोखतील. यातील पहिल्याबाबत ट्रम्प यांनी स्वत:ची शेखी आधीच मिरवलेली आहे. ‘‘मी केवळ निवडून आलो या घटनेनेच इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष मिटण्याची सुरुवात झाली’’ अशा अर्थाचे केवळ ट्रम्प-मुखातून निघू शकते असे विधान त्यांनी केले. आता या संघर्षाचे निखारे विझलेले राहतील याची खबरदारी घेण्यात त्यांची कसोटी लागेल. युक्रेन युद्धाबाबत ट्रम्प यांचा सल्ला रशियाचे अध्यक्ष पुतिन किती ऐकतील याचा अंदाज अद्याप कोणाला नाही. मुळात ट्रम्प हे पुतिन यांस या मुद्द्यावर रोखू इच्छितात किंवा काय, हा खरा प्रश्न. याआधी पुतिन यांनी ट्रम्प यांचे पाणी जोखलेले आहे आणि ट्रम्प यांच्या अध्यक्षपूर्व रशिया दौऱ्यात त्यांना कोणकोणत्या गोष्टी पुतिन यांनी ‘पुरवल्या’ याचीही चर्चा झालेली आहे. दुसरे असे की २०१६च्या अध्यक्षीय निवडणुकांत पुतिन यांची ढवळाढवळही सर्वश्रुत आहे. त्यामुळे ते ट्रम्प यांस कितपत भीक घालतील हा प्रश्न. तोच चीनच्या क्षी जिनपिंग यांसही लागू होतो. चीन आणि जिनपिंग हे विचित्र रसायन आहे. त्यांना केवळ चीन महासत्ता होण्यात रस नाही. त्यांचा भर आहे तो जगाची आहे ती घडी विस्कटून टाकण्यात. त्यासाठी चीनने स्वत:च्या अर्थव्यवस्थेचा आकार इतका वाढवला की जगातील अनेक देशांच्या बाजारपेठांतून आज चिनी उत्पादने ओसंडून वाहताना दिसतात. त्यामुळे अन्य देशांची- त्यातही अमेरिकेची अधिक- चीनशी व्यापार-तूट अचाट वाढलेली आहे. ती भरून काढण्यासाठी ट्रम्प हे चिनी उत्पादनांची आयात महाग करू इच्छितात. म्हणजे अमेरिकेच्या बाजारातील चिनी उत्पादनांवर भरभक्कम आयातशुल्क लावणे. ही अशी आकारणी एकतर्फी होणार नाही, हे उघड आहे. तसे झाल्यास प्रत्युत्तरात चीनही तशाच स्वरूपाचे काही उपाय योजेल. आज अमेरिकेचा सर्वात मोठा कर्जपुरवठादार चीन आहे. म्हणजे चिनी सरकारने डॉलर प्रचंड प्रमाणावर खरेदी केलेला आहे वा अमेरिकी रोख्यांत लक्षणीय गुंतवणूक केलेली आहे. चीन याचा वापर अस्त्र म्हणून करणारच नाही, असे नाही. तसे झाल्यास जग एका नव्या व्यापारयुद्धास सामोरे जाईल. हे वास्तवाचे ट्रम्प यांच्या दृष्टिकोनातून विवेचन.

त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे आपल्या नजरेतून ट्रम्पोदयाकडे पाहणे. गुरपतवंत पन्नू या खलिस्तानवादी दहशतवाद्याच्या हत्याकटाबाबत आपल्या बदललेल्या भूमिकेचे ‘श्रेय’ या ट्रम्पोदयाकडे जाते. या पन्नू याच्या हत्याकटात एकही भारतीय गुंतलेला नाही, ही आपली आतापर्यंतची छातीठोक भूमिका. हे पन्नू प्रकरण कॅनडावासी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर समोर आले. निज्जर हत्येसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतास जाहीर बोल लावले. त्यानंतर काही महिन्यांतच अमेरिकेच्या न्याय खात्याने निज्जर हत्याकटाबाबत वाच्यता केली आणि त्यास मारण्याचा प्रयत्न भारतीयाकडून झाल्याचे सूचित केले. त्यासाठी अमेरिकेने कोणा निखिल गुप्ता यांचे नाव पुढे केले. या निखिल गुप्तास २०२३च्या जून महिन्यात प्राग येथे अटक करून २०२४च्या जून महिन्यात अमेरिकेच्या हाती सुपूर्द केले गेले. अमेरिकी व्यवस्थेने इतके सारे तपशील उघड केल्याने आपली चांगलीच कोंडी झाली. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी आदी देश एकमेकांत हेरगिरीची देवाण-घेवाण करतात. तसा करार आहे. त्यानुसार निज्जर हत्येचा पुरावा जमा करण्यात अमेरिकी यंत्रणाही सहभागी होत्या. त्यामुळे या मुद्द्यावर कॅनडास अमेरिकेपासून दूर करण्याचा आपला प्रयत्न फसला. त्यानंतर उघड झाला पन्नू हत्याकट. त्यातही अमेरिकी यंत्रणांनी थेट भारत सरकारला बोल लावून आपली चांगलीच अडचण केली. तेव्हा आम्ही असे काहीही केलेले नाही असे आपणास सांगावे लागले. पण ही छातीठोक अस्थानी ठरली आणि अमेरिकेने या मुद्द्यावर एक पाऊलही मागे घेण्यास नकार दिल्यानंतर ‘उच्चस्तरीय चौकशी’ची घोषणाही आपणास करावी लागली.

हेही वाचा :अग्रलेख : राखावी बाबूंची अंतरे..

या ‘उच्चस्तरीय चौकशी’चा अहवाल नुकताच सादर झाला. त्यात पन्नू हत्याकटात कोणा भारतीयाचा हात असू शकतो अशी ‘कबुली’ आपणास द्यावी लागली. ट्रम्प यांच्या राज्यारोहणास काही दिवस राहिलेले असताना ही कबुली आपणास द्यावी लागणे हा योगायोग खचित नाही. पन्नू हत्याकटातील हा भारतीय ‘गुन्हेगारी’ पार्श्वभूमीचा असल्याचे या ‘उच्चस्तरीय’ समितीस आढळले. तथापि हा भारतीय कोण हे समितीने उघड केलेले नाही. तथापि त्याच्यावर कारवाई केली जावी, अशीही शिफारस ही ‘उच्चस्तरीय’ समिती करते. म्हणजे ज्या कटात हात असल्याचे आपणास अजिबात मान्य नव्हते आणि तसे बाणेदारपणे आपण सांगितले होते ती आपली भूमिका पूर्ण बदलली असून आता कटात सहभाग असल्याचे मान्य करण्यापासून कारवाईच्या शिफारशीपर्यंत आपली मजल गेली आहे. या बदलाबद्दल अमेरिकेचे मावळते राजदूत एरिक गारिसेट्टी यांनी भारत सरकारचे ‘अभिनंदन’ केले आणि पुढे जात ‘आम्हाला हवे तसे घडत’ असल्याचे सांगत आपल्या मुत्सद्देगिरीच्या जखमेवर मीठ चोळले. ते चोळताना यात अधिक कारवाईची अपेक्षाही अमेरिका व्यक्त करते. याचे ‘श्रेय’ निर्विवाद ट्रम्प यांचे. हा गृहस्थ काहीही बोलू शकतो आणि त्याचबरोबर काहीही करू शकतो. त्यामुळे न जाणो उद्या याप्रकरणी काही थेट भाष्य त्याने केले तर आपली भलतीच अडचण व्हायची. ती टाळण्यासाठी आपण या हत्याकटात भारतीयाच्या सहभागाची कबुली दिली, हे निर्विवाद.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा तऱ्हेने ट्रम्पोदयाने सारे जगच टरकलेल्या अवस्थेत असून जागतिकीकरण, व्यापार यासह अनेक मुद्द्यांवर हे महाशय काय भूमिका घेतात याकडे सारे जग श्वास रोखून पाहात राहील.