भाजपचे काय बरोबर नाही यावर भर देतानाच आपलेही काय/ कोठे चुकते हे ‘इंडिया’च्या नेत्यांनी मान्य करावे व भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांकडून काही शिकावे…

‘इंडिया’ आघाडीच्या मुंबई मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय चर्चेचा विषय काय? तर राहुल गांधी हे शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधिस्थळी जाऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतील का? भूतकाळात ठाकरे हे काँग्रेसचे कडवे टीकाकार होते आणि गांधी कुटुंबीय हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य असत, ही या चर्चेची पार्श्वभूमी. याचा अर्थ एके काळच्या टीकाकारास आदरांजली वाहणे हे जणू अब्रह्मण्यम.

vishal patil sanjay raut
“…म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”, राऊतांचा विशाल पाटलांना टोला; म्हणाले, “त्यांच्यामागे…”
पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान

ही चर्चा ‘इंडिया’ आघाडीच्या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांत जशी होती तशी ‘इंडिया’ आघाडीविरोधात कुजबुज आघाडी उघडणाऱ्या राजकीय विरोधकांकडून समाजमाध्यमांतही घडवली जात होती. हे सध्याच्या राजकारण्यांच्या आणि त्यावरील भाष्यकार माध्यमांच्या उंचीचे निदर्शक. राजकारण हे प्रवाही असते आणि कोणा एका काळात आणि साच्यात ते कोरले गेलेले नसते. ‘ॲन आर्ट ऑफ द इम्पॉसिबल’ असे राजकारणाचे वर्णन केले जाते. म्हणजे अशक्य ते शक्य करणारी कला. त्यामुळे एके काळचे प्रतिस्पर्धी, आताचे मित्र इत्यादी चर्चा अस्थानी ठरतात. हे कदाचित तरुण माध्यमकर्मींस माहीत नसू शकते. तथापि ‘इंडिया’ आघाडीच्या विरोधकांस ते माहीत नाही, असे नाही. तरीही अशा चर्चा घडवून आणल्या जातात. याचे कारण ‘इंडिया’ आघाडी ही मतलबी, अप्पलपोट्या, विचारभ्रष्ट राजकीय पक्षांचे संमेलन आहे असे दाखवण्याचा प्रयत्न. राजकारण म्हणून तो स्तुत्य. पण या असल्या मुद्द्यांवर राजकारण करावयाचे तर रा. स्व. संघाचे कडवे विरोधक आणि या संघटनेवर कारवाई करणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक भाजपने उभारण्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधावे लागेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘आपलेसे’ करण्याचा प्रयत्न कोणकोणत्या राजकीय विरोधकांकडून होतो याचेही स्मरण करावे लागेल. सबब राजकीय पक्ष, त्याची विचारधारा कोणतीही असो. सत्तेच्या समीकरणात प्रत्येक पक्ष लवचीकता दाखवतो. ‘इंडिया’च्या राहुल गांधी यांनी ठाकरे स्मारकासमोर नतमस्तक होऊन हीच लवचीकता दाखवली. ती असमर्थनीय ठरवायची असेल तर वर उल्लेखलेल्या आणि अनेक भ्रष्टाचारी नेत्यांस पावन करून घेणाऱ्या लवचीकतेचेही समर्थन करावे लागेल. तेव्हा हे फुसकट मुद्दे सोडून या सभेचा परामर्श घ्यायला हवा.

तसे करताना राजकीय सभांतील गर्दी राजकारणाची दिशादर्शक अजिबात नसते हे सत्य गृहीत धरावे लागेल. गर्दीचे व्यवस्थापन ही कला आहे आणि प्रचंड संख्येने बेरोजगारी असलेल्या आपल्या देशात गर्दी जमवणे तितके अवघड नसते. तेव्हा गर्दीचा आकार हा मुद्दा विचारार्ह नाही. या गर्दीचा प्रतिसाद किती जिवंत होता अथवा नाही, याचा विचार करणे आवश्यक. तसे केल्यास लालूपुत्र तेजस्वी यादव यांचे भाषण उल्लेखनीय ठरते आणि त्याशिवाय शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच राहुल गांधी यांच्या भाषणांस मिळालेला प्रतिसादही दखलपात्र ठरतो. यादव यांच्या भाषणात लालू यांची झलक होती. लालूंसारखा राजकीय मनोरंजनकार अन्य पक्षांत नाही. लालूपुत्रात वडिलांची जागा घेण्याची क्षमता जरूर दिसते. त्याचा राजकीय परिणाम किती होतो हे आताच्या निवडणुकांत दिसेल. याआधी लालूंच्या पक्षास नितीशकुमार यांची साथ होती. त्यामुळे त्या उभयतांच्या यशात कोणाचा किती वाटा हे ठरवणे अवघड होते. नितीशकुमार यांच्या सरकारात उपमुख्यमंत्रीपदी राहिलेले यादव या निवडणुकांत स्वतंत्र आहेत. त्यांच्या यशापयशावर भाजप-प्रणीत ‘रालोआ’ ४०० चा टप्पा पार करणार किंवा काय हे अवलंबून असेल. हे यादवांचे नावीन्य वगळता अन्यांच्या भाषणात नवीन फार काही नव्हते.

राहुल गांधी यांनी रडक्या काँग्रेस नेत्याचा केलेला उल्लेख हा एक त्यातल्या त्यात अपवाद. या नेत्याचे नावही राहुल गांधी यांनी सांगितले असते तर बरे झाले असते. कारण असेही भाजपस सत्ता मिळाली तर हा नेता काही पुन्हा विरोधकांच्या ‘अशोकवनात’ परतण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांचा परिचय करून देणे समयोचित ठरले असते. आणि दुसरे असे की अलीकडे अन्य पक्षांतून भाजपत जाणारा प्रत्येक नेता हा ‘ईडी-पीडे’च्या भीतीने जातो, असे मानले जाऊ लागले आहे. ‘ईडी-पीडाग्रस्त’ नेते हे प्राधान्याने भाजपत जातात हे सत्य असले तरी प्रत्येक भाजप-गमनी नेता हा ‘ईडी-पीडाग्रस्त’ असतो असे नाही. सत्तालोभाने आणि त्याहीपेक्षा काँग्रेस वा अन्य विरोधी पक्षात राहिल्यास या लोभपूर्तीची शक्यता नसल्याने भाजपत जाणारेही कमी नाहीत. तेव्हा या अश्रुपतित नेत्याचे नाव राहुल गांधी यांनी उघड केले असते तर निदान केंद्रीय यंत्रणांना दिल्या जाणाऱ्या श्रेयाचा आकार काही प्रमाणात तरी कमी झाला असता. आणि त्यामुळे आपल्या पक्षांस सत्तासंधी का मिळत नाही या प्रश्नास भिडण्याची गरज ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांस वाटली असती. केंद्रीय सत्ताधारी भाजप हा विविध यंत्रणांद्वारे विरोधी पक्षीय नेत्यांवर दबाव आणतो, त्यांस वाकवून पक्षांतरांस बळी पाडतो इत्यादी आरोप त्या पक्षाचे समर्थकही नाकारणार नाहीत. पण तेवढे एकच कारण विरोधी पक्षीयांस जनता नाकारते यामागे नाही. ते तसे आहे असे मानणे पराजित विरोधकांसाठी सुखकारक असले तरी ती आत्मवंचना ठरेल. त्यातून विरोधी पक्षीय एका स्वान्तसुखद कोशात गुरफटून जात असून त्यातून उलट सत्ताधारी पक्षाचेच फावते.

म्हणून या ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी भाजपचे काय बरोबर नाही यावर भर देतानाच आपलेही काय आणि कोठे चुकते हे प्रामाणिकपणे मान्य करायला हवे आणि त्याच्या दुरुस्तीसाठी पावले उचलायला हवीत. तसे करायचे तर फुकाचा मोठेपणा आणि स्वत:विषयीचा दंभ सोडून द्यावयाची तयारी हवी. ती कशी करायची हे त्यांनी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांकडून शिकावे. भाजप धुरीणांविषयी अत्यंत जहाल भाषेत टीका करणाऱ्या, धर्मांधतेचा आरोप करणाऱ्या नितीशकुमार आदींस जितक्या सहजपणे भाजपने गळामिठीत घेतले ते थक्क करणारे होते. सत्ता राखण्याची शक्यता अधिक असलेला भाजप आघाड्या बनवण्यात, विरोधकांस आपलेसे करण्यात जी चतुराई आणि गती दाखवतो त्याच्या निम्म्यानेही सत्ताकांक्षी ‘इंडिया’ आघाडी ही विरोधकांस एकत्र राखण्यात, जे आपलेच आहेत ते आपल्याकडे राहतील यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. भाजप आणि त्या पक्षाच्या समर्थकांनी कितीही दावे केले तरी निवडणुकोत्तर सत्तासमीकरणांत आघाड्यांस महत्त्व येण्याची शक्यताच अधिक. असे असताना सत्ता राखण्याची खात्री असलेल्या भाजपपेक्षा सत्ता मिळवण्याचे आव्हान असलेल्या ‘इंडिया’ आघाडीने अधिक राजकीय चापल्य दाखवणे गरजेचे.

तेव्हा भारत जोडो अथवा न्याय यात्रा, इंडिया आघाडीची संयुक्त सभा इत्यादी कृत्ये आवश्यकच. ती झाली. आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून मतदारांपर्यंत पोहोचणे, आपण सत्ताधाऱ्यांस आव्हान देऊ शकतो असे चित्र निर्माण करणे अधिक महत्त्वाचे. सत्ताधाऱ्यांचे चुकते म्हणून आम्हा विरोधकांचे बरोबर हे राजकीय आव्हानांचे सुलभीकरण झाले. त्यावर विसंबून राहण्याचा काळ मागे पडला. आता आम्ही सत्तासमीकरणासाठी किती सक्षम आहोत हे विरोधकांनी मतदारांवर अधिकाधिक ठसवण्याची गरज अधिक. त्यासाठी पुढल्या अगदी थोड्या दिवसांत अपार कष्ट करण्यास पर्याय नाही. आगामी राजकीय लढाईचे तागडे हे विद्यामान सत्ताधीशांच्या बाजूने झुकल्यासारखे वाटत असले तरी ते तिकडे पूर्णपणे कललेले नाही. म्हणून विरोधकांसाठी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यासाठी ‘इंडिया’ आघाडीस अशा मेळाव्यांतील छायाचित्रसंधीपलीकडे जाऊन अपार कष्ट करावे लागतील. ‘आधी कष्ट, मग फळ / कष्टचि नाही ते निर्फळ’ हे सत्य राजकारणासही लागू पडते.