‘विघटन रोखून’ देशाला गतवैभव मिळवून देण्याची भाषा करणारा, धर्मस्थळी झुकणारा, विरोधकांना संपवणारा नेता मिळाला की ‘समोर आहेच कोण’ असे जनतेला वाटू लागते…

समोर विरोधक नावालाही नसलेल्या निवडणुकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे ८७ टक्के मते पडून ‘विजयी’ झाले. पुढील काळात उरलेल्या १३ टक्क्यांची मते का मिळाली नाहीत आणि मुख्य म्हणजे ते १३ टक्के कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न पुतिन करणारच नाहीत, असे नाही. गेल्या पाच निवडणुकांत ते अशाच मताधिक्याने निवडून आले. त्या निवडणुकांत त्यांचे जे काही विरोधक होते ते नंतरच्या निवडणुकांत दिसेनासे होत गेले. एक सरळ क्रेमलिनसमोर गोळ्या घालून मारला गेला तर दुसरा तुरुंगात अचानक कोसळला. आणखी कोणी लंडनच्या उद्यानात विषबाधेने गेले तर कोणाचा मृतदेह परदेशातील त्याच्या निवासस्थानाच्या न्हाणीघरात आढळला. अर्थात यातील कोणाही हत्येचे मारेकरी कधीही सापडले नाहीत आणि त्यांचा शोध घेण्याची, त्यांस शासन केले जावे याची गरज बहुतांश सामान्य रशियनांस वाटली नाही. या सामान्य रशियनांचा पुतिन यांच्यावर विश्वास आहे. ते आपल्या देशास पुन्हा गतवैभव आणून देतील यावर या नागरिकांची श्रद्धा आहे. असे हजारो, लाखो नागरिक पुतिन यांच्या या निवडणूक विजयाने भारावून जात क्रेमलिनसमोर गर्दी करते झाले. आपल्या चाहत्यांचे हे प्रेम पाहून त्यामुळे पुतिनही भारावून गेले आणि मग त्यांनी उपस्थितांस रशिया जर पुन्हा कधी महान होणारच असेल तर ते फक्त मीच कसे करू शकतो यावर मार्गदर्शन केले.

Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
Hanuman Chalisa, Shrikant Shinde,
आधी संसदेत हनुमान चालिसा, आता थेट व्हिडीओ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून हनुमान जयंतीदिनी विशेष व्हिडीओ पोस्ट
BJP agenda is polarisation K C Venugopal Congress Loksabha Election 2024
“ध्रुवीकरण हाच नरेंद्र मोदींचा अजेंडा”; भाजपा वास्तवातील प्रश्नांपासून दिशाभूल करत असल्याचा काँग्रेसचा आरोप
Jalna Lok Sabha, Raosaheb Danve, Kalyan Kale,
जालन्यात पुन्हा दानवे विरुद्ध काळे सामना रंगणार

गेली २४ वर्षे हे असेच सुरू आहे आणि पुतिन यांच्या प्राणात प्राण आहेत तोपर्यंत हे असेच सुरू राहील. कारण आपणास रशियाच्या अध्यक्षपदी तहहयात राहता यावे अशी घटनादुरुस्ती पुतिन यांनी स्वहस्तेच करून घेतली असून त्यामुळे त्यांना आव्हान निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही. जे आव्हान देतात त्यांचे काय होते हे अलेक्सी नावाल्नी यांचे अलीकडे काय झाले यावरून दिसते. त्यामुळे सामान्य रशियनांतून कोणी पुतिन आव्हानवीर निर्माण होणे अवघड. पुतिन आज ७१ वर्षांचे आहेत आणि त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे ‘त्या’ आघाडीवरही काही विशेष घडण्याची आशा रशियनांस नसावी. तेव्हा जे काही रशियात सुरू आहे त्यावरून या अशा सामान्यांबाबत काही प्रश्न जरूर पडतात. पुतिन यांच्या या दणदणीत विजयामुळे यातील काही प्रश्नांस भिडणे समयोचित ठरेल.

या प्रश्नांतील मुख्य मुद्दा म्हणजे लोकशाही. रोजचे जगणे हेच आव्हान वाटणाऱ्या सामान्यांच्या मनांत आपल्या देशात लोकशाही आहे की हुकूमशाही असे काही प्रश्न उमटतात काय? परिस्थितीस सामोरे जाताना, समोरची आव्हाने पेलताना कोणाच्या आई-माईंचा उद्धार करणाऱ्या दोन-पाच शिव्या देणे हीच आणि इतपतच ज्यांची अभिव्यक्ती असू शकते त्यांच्यासाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिक व्यापक अर्थ तितका महत्त्वाचा असतो काय? वास्तविक रशिया ही साम्यवादाची गंगोत्री. रशियन राज्यक्रांतीप्रसंगी लेनिनने घालून दिलेल्या वैचारिक मार्गाने अनेक देशांनी पुढे प्रवास केला. पण नव्वदच्या दशकात रशियातच या साम्यवादाचा पराभव होत गेला आणि तत्कालीन रशियन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी स्वहस्ते स्वदेशाचे विघटन होऊ दिले. तोपर्यंतचा रशिया हा अक्राळ-विक्राळ, प्रचंड होता आणि अर्थव्यवस्था मोठी नसेल, त्याचा भव्य आकार हा अचंबित करणारा मुद्दा होता. गोर्बाचेव्ह यांच्या लोकशाही-प्रेमाने आपला घात झाला असे नंतरच्या बोरिस येल्तसिन यांनी थेट म्हटले नसले तरी त्यांचे उत्तराधिकारी पुतिन हे तसे बोलून दाखवू लागले. सामान्यांस आपल्या कथित गतवैभवाचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. त्यामुळे; ‘‘पूर्वी आपण महान होतो, पण अमुक-तमुकने आपली वाताहत केली. मला संधी द्या, मी पुन्हा आपल्या देशास त्या महानपदी नेतो’’, असे सांगणारा नेता अनेकांस नेहमीच आकर्षून घेतो. अशा देशांत प्रत्यक्ष प्रगती मोजमापाच्या कोणत्याच यंत्रणा नसल्याने आणि त्या मोजमापाबाबत प्रश्न विचारणारी माध्यमेही सत्ताशरण झाल्याने कसलेच वास्तव समोर येत नाही. अशा विरोधशून्य, प्रश्नशून्य वातावरणात पुतिन यांच्यासारख्यांचा उदय होतो आणि त्यांचा अस्त कसा असेल याचा विचारही करता येत नाही. त्यात आपल्या साम्यवादी देशात पुतिन हे चर्चच्या धर्मसंस्थेला उघड पाठिंबा देतात आणि प्रसंगी चर्चमध्येही जातात. त्यामुळे आपला अध्यक्ष आपल्यासारखाच आहे हे सामान्यांच्या मनावर सहज बिंबते आणि पुतिन यांच्यासारख्यांचा खुंटा न हलवताच बळकट होत जातो. धर्मसत्ता ही राजसत्तेच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंब्याशिवाय फोफावू शकत नाही. पोप हेच जेव्हा रोमचे राजे होते तेव्हा ख्रिाश्चन धर्माचा प्रसार अधिक झाला आणि सौदी संस्थापक महंमद बिन इब्न सौद यास पाठिंबा देण्याच्या शर्तीवर त्याने महंमद वहाब याच्या धर्मसत्तेस मदत केल्याने त्या परिसरात वहाब-पंथाचा विस्तार झाला. या अशा धर्मसत्ता-राजसत्ता साटेलोट्याचे अनेक दाखले आढळतील. सद्या:स्थितीत रशियातील चर्चच्या ‘सर्व गरजा’ पुतिन सुयोग्यपणे भागवत असल्यामुळे त्यांच्या राजवटीस धर्मसत्तेचा उघड पाठिंबा आहे. आणि जेव्हा सामान्यजन ज्यांच्यासमोर पापक्षालनासाठी, दैवी साहाय्यासाठी नतमस्तक होतात ती धर्मसत्ता हीच सत्ताधीशास पाठिंबा देताना दिसते तेव्हा सत्ताधीशांची सत्ता अधिक खोलवर रुजते. वास्तविक हे सर्व परस्पर-हितसंबंध रक्षण आहे, हे कळण्याइतकी समज सामान्यांस नसते. ही अशी सर्व समीकरणे जेव्हा जुळून येतात तेव्हा हुकूमशहाचा उदय होतो आणि त्याची सत्ता अबाधिताकडे वाटचाल करू लागते.

रशियात पुतिन यांचे असे झाले आहे. त्यामुळे त्यांचे परत अध्यक्षपदी येणे हा मुद्दा सध्याच्या निवडणुकीत रशियनेतरांसाठी कधीच महत्त्वाचा नव्हता. त्यांच्या मते खरा प्रश्न म्हणजे पुतिन पुन्हा अध्यक्षपदी येऊन नक्की करणार काय? बहुतांश रशियन अभ्यासकांत या प्रश्नाच्या उत्तरात एकमत दिसते. ते म्हणजे ‘‘गेली २४ वर्षे त्यांनी जे केले तेच पुढील सहा वर्षे ते करणार’’. याचे कारण त्याखेरीज अन्य काही ते करू शकत नाहीत. तसा प्रयत्न जरी त्यांनी केला तरी लोकांस लोकशाहीचे स्मरण होईल आणि मग त्यांची तुलना गोर्बाचेव्ह यांच्याशी होऊ लागेल. ते पुतिन यांस परवडणारे नाही. सर्व लोकशाही व्यवस्थांस भेडसावणाऱ्या समस्या जवळपास सारख्याच असतात. म्हणून त्यामुळे लोकशाहीस तिलांजली देणारे अनेकांस आवडू लागतात. म्हणजे तिकडे अमेरिकेत पुन्हा अध्यक्षपदी येऊ पाहणारे डोनाल्ड ट्रम्प. ‘‘मी निवडून आलो नाही तर अमेरिकेत रक्तपात होईल’’, असे ते उघड म्हणतात आणि ‘‘मला सत्ता मिळाल्याखेरीज रशिया पुन्हा गतवैभव मिळवू शकणार नाही’’, असे पुतिन म्हणतात. यातील साम्य हा योगायोग नाही. पुतिन यांनी पुन्हा अध्यक्षपदी निवडून आल्यावर केलेले भाषण हे सत्य अधोरेखित करेल. ‘आपण क्रायमिआबाबत केलेली कृती योग्यच’, ‘युक्रेनवर हल्ला तर करायलाच हवा’, ‘तो तर आपलाच भाग’, ‘आपल्याच देशाचे विघटन आपण कसे काय सहन करणार’, ‘मी ते होऊ देणार नाही’, ‘मला कोणा पाश्चात्त्य ताकदीने विरोध केला तर तिसरे महायुद्ध होईल’ इत्यादी इत्यादी त्यांची विधाने रशियाच्या उद्धारासाठी आपणाखेरीज तुम्हा पामरांस कसा पर्याय नाही, हे सामान्य रशियनांना सांगतात.

म्हणूनच पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाल्यावर पुतिन हेच सांगत राहतील. त्यांना तेच सांगत राहावे लागेल आणि माझ्याशिवाय तुम्हास तरणोपाय नाही, हेच बिंबवत राहावे लागेल. समोर विरोधक आणि प्रश्न विचारणारी माध्यमे दोन्ही नसल्याने त्यांच्या या कार्यात अजिबात अडथळा येणार नाही. या अशा ‘मी’पणात हरपून बसलेले नेते हे लोकशाहीसमोरील खरे आव्हान असे इतरांस वाटत असले तरी सामान्य रशियनांस त्याची झळ बसत नसल्याने पुतिन फोफावणे अटळ.