नेपाळी तरुणांचा हिंसेचा मार्ग दुर्दैवीच, पण जगभरच्या अनेक देशांत कधी ना कधी तरुणांच्या संतापामुळेच अनपेक्षित राजकीय बदल घडून आलेले आहेत…
मारहाणीत माजी पंतप्रधान रक्तबंबाळ झाले आहेत, अर्थमंत्र्यांस लाथाबुक्क्यांनी तुडवले जात आहे, सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या कपड्यांस हात घातला गेला आहे आदी नेपाळमधील दृश्ये विषण्ण करणारी आहेत. तेथील तरुणांनी क्रांतीची वगैरे हाक दिलेली नव्हती आणि चे गव्हेरा-छापाचे कोणी त्यांचे नायक असल्याचे दिसून आले नव्हते. एके काळी ६०-७० च्या दशकात चे गव्हेरा, फिडेल कॅस्ट्रो हे देशोदेशीच्या तरुणांचे नायक होते आणि त्यांची क्रांतीची भाषा ही तरुणांच्या तोंडी सर्रास असे. तथापि नेपाळी तरुणांचा लौकिक काही असा क्रांतिस्नेही कधीच नव्हता. तरीही त्यांच्या हिमालयीन शांततेचा कडेलोट झाला आणि सत्ताधीशांचे वस्त्रहरण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. जे झाले ते धक्कादायक असले तरी यानिमित्ताने तरुणांच्या अशा राजकीय इतिहासाचा आढावा घेणे आणि नेपाळातील तरुणांच्या संतापामागील कारणे शोधणे अगत्याचे ठरते.
नेपाळातील सत्ताधीशांचा अथक भ्रष्टाचार, आर्थिक प्रगतीच्या संधींचा अभाव इत्यादी मुद्द्यांवर ‘‘ओली’गोपोली’ या संपादकीयात (१० सप्टेंबर) भाष्य आहेच. आता त्यातील तपशील. भारताप्रमाणे नेपाळही ‘लोकसंख्या लाभांश’ (डेमोग्राफिक डिव्हिडंड) अनुभवताना दिसतो. या देशाच्या जवळपास तीन कोटी लोकसंख्येतील ९६-९७ लाख हे १५ ते ३५ या वयोगटातील आहेत. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या साधारण एकतृतीयांश नागरिक या गटात मोडतात. परंतु या साऱ्यांच्या हातास काम मिळेल अशी तेथील अर्थव्यवस्था नाही. त्यामुळे एकूण रोजगारक्षमांतील एकपंचमांश तरुण आजही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्या देशाच्या भौगोलिक रचनेमुळे किती उद्याोग तेथे उभारले जाऊ शकतात यास मर्यादा असल्याने पर्यटन आणि अन्य सेवा हेच क्षेत्र रोजगार निर्मितीचा मोठा भार वाहते. तथापि त्या देशाच्या अर्थव्यवस्थेस भारताप्रमाणे सर्वात लक्षणीय हातभार लागतो तो परदेशस्थ नेपाळींकडून मायदेशी पाठवल्या जाणाऱ्या पैशामुळे. स्थानिक पातळीवरील संधीअभावी नेपाळी तरुण मोठ्या प्रमाणावर परदेशी जातात. त्यांच्या तेथील कमाईचा वाटा नेपाळकडे रवाना होतो. एके काळी जेमतेम दोन-अडीच टक्के असलेला हा प्रवाह आज चांगलाच धष्टपुष्ट झाला असून त्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ३०-३२ टक्के इतका वाटा हा परदेशस्थ नेपाळींच्या पैसा- प्रवाहातून येतो. आपल्याकडे परदेशस्थ भारतीयांकडून मायदेशी जवळपास १३,७०० कोटी डॉलर आले असले तरी आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात हे प्रमाण चार टक्के इतकेही नाही. ही बाब लक्षात घेतल्यास परदेशस्थ नेपाळींकडून मायदेशी जाणाऱ्या निधीचा आकार लक्षात यावा. या व अन्य कारणांमुळे नेपाळचे दरडोई उत्पन्न जेमतेम १४५८ डॉलर इतके आहे. म्हणजे भारताच्या निम्मे. अशा परिस्थितीत नेपाळी तरुणांस कायदा हाती घ्यावा असे वाटले यात आश्चर्य नाही. परंतु तरुणांचा उद्रेक सहन करावा लागलेला नेपाळ हा काही एकमेव देश नाही. आर्थिक विपन्नावस्था, प्रगती संधींचा अभाव आदी मुद्द्यांवर प्रस्थापित हे सोयीस्कर मौन बाळगण्याचे चातुर्य दर्शवण्यात धन्यता मानत असताना विकसित, विकसनशील अशा देशांत ही कोंडी फोडण्याचे काम तरुणांनीच केले, हा इतिहास आहे. त्याची उजळणी उद्बोधक ठरावी.
नेपाळप्रमाणे अलीकडे बांगलादेश आणि श्रीलंकेतही आत्ममग्न सत्ताधीशांस भानावर आणण्याचे महत्त्वाचे काम तरुणांनीच केले. चीन या आपल्या आणखी एका शेजारील देशात डेंग झियाओ पिंग यांच्या अनाचारी आर्थिक धोरणांस विरोध केला तो तरुणांनीच. विख्यात तिआनानमेन चौकात अजस्रा रणगाड्यासमोर एकटा उभा ठाकलेल्या तरुणाचे छायाचित्र हे त्या वेळी आणि आजही आर्थिक अनाचाराच्या विरोधाचे प्रतीक बनले. डेंग हे आधुनिक चीनचे जनक. त्यांच्या आर्थिक धोरणांच्या मार्गावरूनच विद्यामान अध्यक्ष क्षी जिनपिंग मार्गक्रमण करताना दिसतात. विशेष आर्थिक क्षेत्रे (स्पेशल इकॉनॉमिक झोन्स) ही डेंग यांची देणगी. तथापि त्यावेळी त्यांच्या आर्थिक धोरणांविरोधात चीनमध्ये मोठी नाराजी होती. तिला तोंड फोडण्याचे ऐतिहासिक काम चिनी तरुणांनीच केले. त्याआधी दहा वर्षे अयातोल्ला रूहल्ला खोमेनी यांनी घडवून आणलेल्या क्रांतीत तरुणांचा सक्रिय सहभाग होता. त्याआधीचे इराणचे राज्यकर्ते शहा महंमद रझा पहलवी यांची गुलछबू राजवट खोमेनी यांनी उलथून पाडली आणि शहांना पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेच्या तेहरानमधील दूतावासात घुसून या संतप्त तरुणांनी तेथील कर्मचाऱ्यांस ओलीस ठेवले. इराणी तरुणांच्या त्या संतप्त आविष्काराने अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांची चांगलीच अब्रू गेली. इतकी की त्यामुळे अध्यक्षपदाची दुसरी खेप काही त्यांस मिळाली नाही. सोव्हिएत रशियाच्या अफगाणिस्तानातील घुसखोरीप्रमाणे अमेरिकेने व्हिएतनामवर लादलेले युद्ध हा त्या देशाच्या इतिहासातील काळा टप्पा. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना कसेही करून व्हिएतनाम जिंकायचे होते. परंतु त्या विजयाची किंमत काय असेल असा रास्त प्रश्न त्या देशातील माध्यमांनी उपस्थित केला आणि तरुणांनी त्यावर देशभर जागृती केली. ‘बीटल्स’ हा दंतकथा बनून गेलेला बँड, हिप्पी चळवळ ही त्या काळाची देणगी. मायदेशप्रमुखाच्या कृष्णकृत्यांनी संतापलेल्या तरुणांनी अमेरिकनांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे असते याचा धडा यातून घालून दिला. अमेरिकी माध्यमांस ललामभूत असे ‘वॉटरगेट’ प्रकरण उघडकीस आले ते याच काळात आणि ते ऐतिहासिक कार्य करणारे बॉब वुडवर्ड आणि कार्ल बर्नस्टीन यांची तरुण पत्रकारिताही याच काळातील. अमेरिकेचा शेजारी असलेल्या मेक्सिकोतही या काळात तरुणांचा उद्रेक दिसून आला आणि अगदी अलीकडे बोलिव्हियासारख्या देशात इलॉन मस्क याच्या अर्थकारणाविरोधात तरुणांच्या संतापापायी सत्ताबदल झाला. पलीकडील चिलीसारख्या देशातील अशांततेमागे गचाळ शिक्षण हे कारण होते, ही बाब लक्षात घ्यावी अशी. अन्यत्र आर्थिक सुसंधीअभावी तरुण संतापत असताना मेक्सिकोतील तरुणांना मात्र आपणास चांगले शिक्षण नाही, याचा राग येत होता. रोजगार, प्रगती, आर्थिक स्थैर्य यासाठी तरुणांचा उद्रेक नवीन नाही. तथापि असहिष्णू सरकार आणि मागास शिक्षण यासाठी तरुणांनी रस्त्यावर येणे ही मात्र नवलाई.
ती भारतातही दिसून आली. त्याचे आनंददायी उदाहरण म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीविरोधात उभारलेला लढा. त्यात प्रामुख्याने तरुणांचाच समावेश होता. ‘संपूर्ण क्रांती अब नारा है, भावी इतिहास हमारा है’ या घोषणेच्या स्फुल्लिंगाने चेतवली गेलेली अनेक तरुण मने त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या मागे उभी राहिली. इंदिरा गांधी यांची वाढती असहिष्णुता हा मुद्दा त्यावेळी ज्येष्ठांपेक्षा तरुणांनीच आपल्या खांद्यांवर तोलून धरला आणि अखेर इंदिरा गांधी यांच्यावर सत्तात्यागाची वेळ आणली. आपल्या स्वातंत्र्य युद्धातही तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. महात्मा गांधी यांना मिळणारे तरुणांचे समर्थन हे अनेकांसाठी आश्चर्यकारक होते. या सर्व चळवळी अहिंसक होत्या हे विशेष. हा अहिंसकतेचा धडा शेजारील नेपाळने मात्र घेतला नाही, हे दुर्दैव.
जगण्यासाठी महत्त्वाच्या प्रश्नांस भिडण्याची निकड आणि निग्रह यांचे प्रदर्शन तरुणांच्या वर्तनातून होत असताना त्यानिमित्ताने देशादेशांतील तरुणांच्या राजकीय सजगतेचा आणि सक्रियतेचा इतिहास हा पुरेसा सूचक म्हणावा असा. जागतिक घडामोडी, तरुणांसमोरील आव्हाने इत्यादींच्या पार्श्वभूमीवर विविध उत्सवांत आणि ‘…हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांत रममाण तरुण एका विख्यात अफ्रिकी लेखकाच्या ‘मला तुमच्या देशातील तरुण कोणाकडे आशेने पाहतात हे सांगा, मी तुमच्या देशाचे भविष्य वर्तवतो’ या वचनाचे स्मरण करून देतात. तरुण आणि करुण यांतील फरक त्यातून अधोरेखित होतो.