या तणावातही बेजबाबदार वृत्तांकनाची दखल सरकारला घ्यावी लागते; याला सर्वस्वी वृत्तवाहिन्या आणि वृत्तनिवेदकांचा वावदूकपणा कारणीभूत आहे…

‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारतीय सैन्यदलांनी ६ मे रोजीच्या मध्यरात्रीनंतर केलेल्या धाडसी कारवाईचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या कारवाईने पाकिस्तानला गाफील पकडले. आपल्या कारवाईचे स्वरूप मर्यादित, संयमी तरी परिणामकारक असल्यामुळे पाकिस्तानची चरफड अधिक होत आहे. ही चरफड आणि चिडचिड पाकिस्तानकडून गेले ३६ तास सुरू असलेल्या कृत्यांतून प्रतिबिंबित होते. ड्रोन आणि हलक्या क्षेपणास्त्रांद्वारे भारतीय लष्करी आस्थापनांना लक्ष्य केले गेले. हे सर्व हल्ले यशस्वीरीत्या परतावून लावण्यात आले आहेत. त्याबद्दल सरकार आणि सैन्यदलांचे अभिनंदन. जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधी भंग करून तोफांचा मारा सुरू केला आहे. तर जम्मूसह पंजाब, राजस्थान या सीमावर्ती राज्यांमध्ये ड्रोन हल्ले केले. रात्रीच्या अंधारात हे ड्रोन हवेतच नष्ट करताना शस्त्रसिद्धतेचे दर्शन सैन्यदलांनी आणि विशेषत: हवाई दलाने घडवलेच. याशिवाय डोक्यावर ड्रोनची घरघर, हवाई हल्ल्यांचे इशारे देणारे भोंगे, दिवे मालवल्यामुळे सर्वत्र मिट्ट काळोख अशा वातावरणात सीमावर्ती शहरांमध्ये स्वाभाविक भीतीने ग्रासलेल्या नागरिकांना आश्वस्तही केले. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून आपल्या सैन्यदलांनी आणि सरकारने निर्धाराचे आणि संयमाचे दर्शन घडवले आहे. त्यातील काकणभर संयम जरी आपल्याकडील अनेक इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांनी उसना घेतला, तर देशभरातील ध्वनिप्रदूषण, अज्ञानप्रदूषण बरेच कमी होण्याची शक्यता संभवते. या कारवाईतून जितकी आपल्या सैन्यदलांची तयारी, सरकारचा निर्धार दिसला, तितकाच अशा कारवायांचे वार्तांकन करण्याबाबत आपल्याकडील विशेषत: इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांचा खुजेपणा आणि तोकडेपणाही अधोरेखित झाला. ही मंडळी प्रसवत असलेल्या अगाध माहितीचा नव्याने प्रसार, प्रचार करण्यासाठी आवश्यक समाजमाध्यमी बिनडोकांचा तुटवडा आपल्याकडे कधीच नव्हता. त्यातून जी माहिती दर्शकांवर आदळवली जात आहे, ती पाहता यांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक करावे, की मानसिक व नैतिक अधोगतीबद्दल शोक करावा याविषयी निर्णय करणे अवघड ठरते.

रात्रीच्या अंधारात भारतीय हवाई दल आणि लष्कराने मिळून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण तळांचा, त्यांच्या म्होरक्यांच्या हवेल्यांचा, मुख्यालयांचा वेध घेतला. प्रिसिजन स्ट्राइक किंवा अचूक प्रहार स्वरूपातली ही कारवाई करताना लष्करी आस्थापना आणि नागरी वस्त्यांची कोणतीही हानी होणार नाही याची विशेष दखल घेतली. भारताच्या दृष्टीने विषय तेथेच संपला होता. कारण पहलगाम हल्ला ही पाकिस्तानची कुरापत होती आणि ऑपरेशन सिंदूर हे त्यास प्रत्युत्तर होते असे आपण मानतो. तरीही पाकिस्तानने भारतावर अनेक ड्रोन हल्ले करण्याची चूक केली आणि आता खऱ्या अर्थाने ती त्यांना महागात पडते आहे. कारण भारताने त्यांचे हल्ले यशस्वीरीत्या परतवून लावलेच; पण दुसरीकडे भारतीय ड्रोन- हल्ल्यांना रोखण्याची तितकीच कार्यक्षम बचाव प्रणाली पाकिस्तानकडे उपलब्ध नाही. म्हणजे भारत हल्ले रोखूही शकतो आणि शक्य तेव्हा आणि तेथे प्रहारही करू शकतो. हे झाले वास्तव. इलेक्ट्रॉनिक माध्यमकर्मींची मजल त्यापेक्षा कितीतरी पुढे गेली. यातील काहींनी ‘भारतीय नौदलाकडून कराची उद्ध्वस्त’ झाल्याच्या बातम्या दिल्या. ‘पाकिस्तानी लष्करप्रमुख असिम मुनीर तुर्कीला पळून गेले,’ असे काहींचे ठाम मत. त्यांच्या बदली पाकिस्तानी लष्कराची सूत्रे ज्या कोणाकडे आली त्या गृहस्थाचे नावही जाहीर झाले. काहींच्या मते ‘भारतीय जवानांनी ‘एलओसी’ ओलांडली आणि एकामागोमाग एक पाकिस्तानी शहरे ताब्यात घेण्यास सुरुवात केली’. ‘पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी राजीनामा दिला’ असे कुणी ओरडून ओरडून सांगत होते. त्या व्यक्तीस बहुधा आपला आवाज सीमापार पोहोचवण्याची निकड वाटत असावी. ‘इस्लामाबाद, लाहोर, कराची, रावळपिंडी, सियालकोट ही शहरे बघताबघता भारताच्या हाती पडली. लष्कर, हवाई दल, नौदल अशा तिन्ही दलांनी पाकिस्तानला नेस्तनाबूत केले,’ असे कुणी शपथेवर सांगत होते. हे सगळे सांगितल्यानंतर आता वेगळे काय राहिले सांगायचे? त्यावर एकाने नामी क्लृप्ती लढवली. त्याने थेट ‘बलुचिस्तानमधून बलुची बंडखोर पाकिस्तानवर धावून गेले,’ असे ओरडायला सुरुवात केली! इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे दृश्यांवाचून कसे भागेल? वेगवेगळ्या ठिकाणांची, वेगवेगळ्या काळांत चित्रित झालेली दृश्ये संकलित करून ती पाकिस्तानातील म्हणून दाखवली गेली. ८ मे रोजी रात्री, मध्यरात्री, मग ९ मे रोजी दिवसभर हा कोलाहलवजा तमाशा माध्यमांवर सुरू होता. हा ज्वर इतका वाढला की, अखेर संरक्षण मंत्रालयास सूचनावली जारी करावी लागली. ‘जबाबदारीने वार्तांकन करावे. कोणत्याही परिस्थितीत सैन्यदलांची कारवाई योजना किंवा हालचाल शत्रूच्या नजरेस पडेल अशा प्रकारे दृश्ये दाखवू नये. कारगिल युद्ध, मुंबई दहशतवादी हल्ला या प्रसंगी असे भान पाळले गेले नव्हते, हे लक्षात ठेवावे’ हे आवाहन सरकारला आपल्याच देशातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांना करावे लागते.

आणीबाणीच्या स्थितीतही या बेजबाबदारपणाची दखल सरकारला घ्यावी लागते, याला सर्वस्वी वृत्तवाहिन्यांचा वावदूकपणा आणि कोतेपणा जबाबदार आहे. ज्या संयमाने सरकारने या कारवाईचे नियोजन केले आहे, तितक्याच संयमाने त्याविषयी माहिती दिली जात आहे. ती जारी करण्यासाठी काही काळ जावा लागतो. सगळ्याच बाबी उघड करता येत नाहीत. कारवाईचे स्वरूप जाहीर असले, तरी बारकावे गोपनीयच असतात. कोणतेही कुशल सैन्य आणि जबाबदार सरकार युद्धज्वर चेतवून मार्गक्रमण करत नाही. तसे केल्यास काय होते, यासाठी जरा सीमेपलीकडे पाहावेच. तेथील संरक्षणमंत्र्याची परदेशी माध्यमांसमोर जाहीर फजिती होते. हाच संरक्षणमंत्री तेथील संसदेमध्ये हास्यास्पद खुलासे करतो. दोन सरकारांच्या परिपक्वपणातील तफावत यातून दिसून येते. तशी ती दोन्ही देशांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आहे असे म्हणता येईल? प्रेक्षकांना गुंतवण्याच्या एकाच उद्देशाने आणि ‘टीआरपी’ नामे तद्दन अशास्त्रीय मापकाच्या प्रभावाखाली येऊन हे चाळे सुरू आहेत. पण हा स्वार्थ देशातील मोठ्या संख्येने जनतेवर कसा प्रभाव पाडत आहे, हे कित्येकांच्या समाजमाध्यमी संदेशातून प्रकटते. खोटी माहिती किंवा फेकन्यूजचा हा गुन्हेगारी स्वरूपाचा आविष्कार आहे. हा बेजबाबदारपणा अंगाशी येऊ शकतो. आज जम्मू-काश्मीर, पंजाब, हरयाणा, राजस्थानातील सामान्य नागरिक ज्या दडपणाखाली आहेत त्याची यांना खबरही नाही. तोफगोळ्यांचा मारा चुकवत किंवा सहन करत सीमावर्ती भागातील नागरिक किती तणावाखाली राहताहेत याची फिकीर नाही. अत्यंत व्यामिश्र कारवाया पार पडण्यासाठी काय पराकोटीची एकाग्रता आणि निर्धार आपली सैन्यदले दाखवत आहेत, हे तर यांच्या आकलनापलीकडले आहे. जुन्या आणि खुनशी शत्रूशी आपले सरकार लढत आहे. या लढाईची व्याप्ती कदाचित वाढू शकते. अशा वेळी सरकारला साथ हवी आहे सहकार्यशील नागरिकांची आणि जबाबदार माध्यमांची. मुद्रित माध्यमांनी ते भान बहुतांशी दाखवलेले दिसते. पण जबाबदारी आणि भान हे शब्दच ज्यांच्या शब्दकोशातून लुप्तवत झाले, त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी हे तारतम्य दाखवलेले नाही.

उत्क्रांतीच्या वाटेवर आपल्या एक पाऊल मागे असलेले मर्कट मानवाचे बहुतेक सर्व गुण दर्शवू शकते. पण संयम हा गुण त्याच्या जनुकात नसल्याने ते जे काय करते, त्यास मर्कटलीला असे संबोधले जाते. मद्यासमूहातील पेयाचे फायदे-तोटे कोणते हे सांगण्याची ही वेळ आणि जागा नाही. पण कशाचाही अंमल अधिक झाल्यास संयम हा एक गुण पहिल्यांदा हातचा जातो. मर्कटबुद्धी आणि संयम नष्ट करणारी धुंदी यांच्या दुहेरी प्रभावातून जे अद्भुत रसायन संभवते, ते विद्यामान कोलाहली मंडळींच्या सर्वांत जवळ जाणारे ठरते!