याची संभावना ‘सत्तेसाठी एकत्र आले’, ‘संधिसाधू’ अशी केली जात असेल; पण भाजपने इतके सारे गणंग गोळा केले ते काय धर्मार्थ पाणपोई चालवण्यासाठी?
उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या संयुक्त मेळाव्याबाबत महाराष्ट्रातील औत्सुक्य-लाटेची दखल न घेणे अवघड. राजकारणाशी काही देणे-घेणे असलेले आणि नसलेले अशा सर्वांत या घटनेबाबत कमालीचा उत्साह आणि उत्सुकता होती हे मान्य करावेच लागेल. एखाद्या राजकीय घटनेबाबत इतके कुतूहल या महाराष्ट्राने गेल्या कित्येक दशकांत अनुभवले नसावे. याची तुलना राज ठाकरे शिवसेनेतून फुटून जेव्हा स्वत:च्या स्वतंत्र पक्ष निर्मितीत उतरले तेव्हाच्या चीत्कारलाटेशी होऊ शकेल. संयुक्त महाराष्ट्रासाठी १९५६ साली झालेल्या मेळाव्याचे साक्षीदार जे कोणी मोजके हयात असतील त्यांच्या मनात या घटनेमुळे ‘त्या’ आठवणी जाग्या झाल्या असतील. फारा वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात तितकी उत्साहवर्धक घटना घडली हे निर्विवाद. तेव्हा या घटनेच्या केंद्रस्थानी असलेल्या ठाकरे बंधूंस यासाठी धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करून जे काही झाले त्याची विशुद्ध कारणमीमांसा करणे आवश्यक.
याचे कारण या घटनेच्या केंद्रस्थानी असले तरी या उत्साहनिर्मितीसाठी ठाकरे बंधू हे केवळ निमित्त ठरतात. म्हणजे असे की या बंधूंनी एकत्र येऊन काही समजूतदार राजकारण करावे ही केवळ त्यांच्या पक्षांचीच इच्छा नाही; तर ती समस्त महाराष्ट्राची भावना आहे. याचे कारण महाराष्ट्र-केंद्री राजकारण व्हावे ही काही या केवळ दोन भावांची भावना नाही. समस्त महाराष्ट्रास तसे वाटते. गेल्या शे-सव्वाशे वर्षात महाराष्ट्राने चार पक्षांचे जन्म अनुभवले. स्वातंत्र्यानंतर लगेच पुढच्याच वर्षी शेतकरी-कामगार पक्ष (शेकाप) जन्मास आला. आज त्या पक्षाच्या जयंत पाटील यांच्या राजकारणाकडे पाहून कोणास खरेही वाटणार नाही; पण या पक्षाने एकापेक्षा एक तेजस्वी नेते या राज्यास दिले. तो इतिहास दिव्य म्हणावा असा, पण त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील दिवटेच ठरतील. असो. त्यानंतर १९६६ साली शिवसेना जन्मली. अत्यंत प्रभावशाली नेत्यांत ज्यांची गणना करावी लागेल अशा बाळासाहेब ठाकरे यांनी निर्मिलेला हा पक्ष हा महाराष्ट्राची मर्यादित अर्थाने का होईना पण ओळख होती. त्यानंतर ३३ वर्षांनी काँग्रेसमधून फुटून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापला. काँग्रेसमध्ये असताना आणि नंतरही महाराष्ट्राचे राजकारण कोणास आवडो वा न आवडो पण शरद पवार यांच्याभोवती फिरले आणि अजूनही फिरते हे सत्य. आज राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या भाजपचा पायाच मुळात ‘पवार-विरोधी’ राजकारण हा राहिला. पवार हे भाजप-पंथीयांस वाटतात तितके लहान असते तर भाजपही राज्यात इतका मोठा होता ना. पुढे अवघ्या सात वर्षात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना जन्मली. राज्याचा राजकीय पट ज्यांनी व्यापला वा तो व्यापण्याची ज्यांची क्षमता होती/आहे असे हे पक्ष फक्त चार. यापैकी ठाकरे यांच्या शिवसेनेशी भाजपने दोस्ती केली आणि पुढे तो पक्ष उभा फोडला. पवार यांच्याशी भाजपस तसा दोस्ताना जमला नाही. मैत्री करून जे साध्य होऊ शकले नाही ते भाजपने पवार यांच्याबाबत राजकीय वैरातून केले. म्हणजे मैत्री असो वा नसो. हस्तांदोलन असो वा दोन हात; उभयतांस भाजपने एकाच ‘मापात’ मोजले. यातील हास्यास्पदता अशी की भाजप आज ज्यांस भ्रष्टाचारी इत्यादी ठरवतो ते उद्धव ठाकरे आणि मंडळी त्याच भाजपचे बराच काळचे सहकारी होते आणि ज्या पवारांस भाजपने इतिहासात भ्रष्टाचारी ठरवले त्या पवारांची एक पाती वर्तमानात भाजपची सहकारी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. पवार आणि ठाकरे यांस राजकीयदृष्ट्या पुसून टाकल्याखेरीज भाजपस महाराष्ट्रात स्वत:चे निर्विवाद प्रभावक्षेत्र निर्माण करता येणे अवघड. महाराष्ट्रातील पवार आणि ठाकरे यांच्याप्रमाणे पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी, पंजाबात अकाली दल, ओरिसात बिजू पटनाईक, तमिळनाडूत करुणानिधी-स्टालिन आदींस राजकीयदृष्ट्या संपवणे हे भाजपच्या ‘एक देश, एक धर्म, एक भाषा’ या (आणि कदाचित ‘एक पक्ष, एक नेता’) स्वप्नांच्या पूर्तीसाठी अत्यावश्यक घटक.
ठाकरे बंधूंच्या सभेमागील उत्साहास ही राजकीय पार्श्वभूमी आहे. या देशात लोकशाही टिकवायची असेल तर समर्थ विरोधी पक्षाची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करावयाची असेल तर राजकीय संघटन (कन्सॉलिडेशन) गरजेचे आहे. ही क्षमता आज एकट्या-दुकट्या पक्षात निदान महाराष्ट्रात तरी नाही. केंद्रीय चौकशी यंत्रणा, उद्याोगांतून आलेले अजस्रा अर्थसामर्थ्य तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणा या तिहेरी बलस्थानांस मिळालेली धर्मकारणाची जोड यामुळे आजचा भाजप अजेय भासू लागलेला आहे. एकेकाळी काँग्रेस जशी अभेद्या वाटत होती तसेच आजच्या भाजपचेही. दोहोंतील फरक हा की प्रादेशिक पक्षांशी युती करून काँग्रेसचा शक्तिपात झाला तर भाजपने युती करून प्रादेशिक पक्षांस शक्तिहीन केले. याचे भान आज नाही म्हटले तरी अनेक प्रादेशिक पक्षांस येताना दिसते. राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू यांतील एक. ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र समितीस त्या वेळी साम्यवादी, समाजवादी आणि अन्य येऊन मिळाले; त्याचप्रमाणे ठाकरे बंधूंच्या सभेस साम्यवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्यांनी हजेरी लावली. या सगळ्याची संभावना भाजपने ‘सत्तेसाठी एकत्र आले’, ‘संधिसाधू’ इत्यादी विशेषणांनी केली असेल. पण राजकारण शेवटी सत्तेसाठीच असते हे कसे नाकारणार? पंतप्रधानपदच नसेल तर ‘प्रधान सेवक’ या उपाधीस विचारतो कोण? भाजपने इतके सारे गणंग गोळा केले ते काय धर्मार्थ पाणपोई चालवण्यासाठी की काय? तेव्हा या टीकेत काही अर्थ नाही. महत्त्वाचा आहे तो एकच मुद्दा.
तो असा की गेली जवळपास २० वर्षे राजकीय/ वैयक्तिक कटुता, दुरावा या गर्तेत फिरल्यानंतर ते सर्व मागे सोडून शहाणपणा, दूरदृष्टी इत्यादी गुणांचे दर्शन घडवत ठाकरे बंधू पुढे वाटचाल करणार का? या उभयतांची पहिली सभा हा त्याचा मापदंड असू शकत नाही. इतक्या वर्षांचे अवघडलेपण एकाच सभेत पुसून निघणे अवघड. हे राज ठाकरे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून अधिक प्रकट होते. पुढे जायचे तर गद्दारादी विशेषणे, सरकार पाडल्याचे शल्य इत्यादी बाबी त्यांना मागे सोडाव्या लागतील. जे झाले ते झाले. आणि जे झाले त्यास खुद्द तेही जबाबदार आहेतच. तथापि ते उगाळण्याने स्वत:स कुरवाळून घेण्याच्या आनंदापलीकडे अधिक काही हाती लागणार नाही. तसेच पुढे जायचे तर मराठीचे व्यापक हित, मराठी शाळांची भयाण दुरवस्था, नामशेष होत चाललेले येथील संस्थाजीवन इत्यादी अनेक महत्त्वाच्या घटकांस स्पर्श करावा लागेल. नमनाच्या सभेत यातील काही मुद्द्यांस स्पर्श झाला असता तर ते अधिक उचित ठरले असते. ठीक. अजूनही वेळ गेलेली नाही. ती न गेलेली वेळ साधावयाची असेल तर उभयतांस त्वरा करावी लागेल. कारण अन्यथा केवळ महापालिका निवडणुका जिंकणे इतकाच या सगळ्याचा अर्थ असे मराठी जनांस वाटेल.
दुसरे असे की या आगामी निवडणुकांत भाजपसाठी ‘असून अडचण…’ ठरेल ती एकनाथ शिंदे यांची शिवसेना. त्या दृष्टिकोनातूनही उद्धव-राज ठाकरे यांच्या सहप्रवास प्रयासाकडे पहावे लागेल. त्यावर ‘लोकसत्ता’ कालौघात भाष्य करेलच. पण तूर्त मराठी जनांनी राम गणेशांच्या (तेही चांद्रसेनीय कायस्थ) ‘संगीत ‘भाऊ’बंधन’चा आनंद जरूर घ्यावा. पण आशावादात वाहून न जाता सावधपणा बाळगावा हे बरे.