खाद्यासंस्कृतीवर कोणत्याही धर्माचे शिक्के मारण्यापेक्षा त्यातली देवाणघेवाण हाच अधिक सुसंस्कृत आणि रसिक मार्ग आहे…

तो होता १५ ऑगस्ट १९८८ चा स्वातंत्र्य दिन. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांचे भाषण दूरदर्शनवरून प्रसारित झाल्यानंतर पीयूष पांडे यांनी लिहिलेले, अशोक पत्की यांनी संगीत दिलेले आणि पं. भीमसेन जोशी, एम. बालमुरलीकृष्ण, लता मंगेशकर यांच्यासह काहींनी गायलेले ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे गाणे ‘दूरदर्शन’वरून प्रदर्शित झाले आणि त्याने अवघ्या देशाला अक्षरश: वेड लावले. कला, क्रीडा यांसह वेगवेगळ्या क्षेत्रांतले त्या काळातले नामवंत त्या गाण्यात आपल्या देशात असलेल्या विविधतेतील एकतेबद्दल इतक्या सहजपणे सांगतात की तसे कुणी त्याआधी ऐकले-बघितले नव्हते. जेमतेम ३५ वर्षांपूर्वी या देशात, आपल्या आसपास असे काही घडत होते, सगळ्या देशाचे शरीर आणि आत्मा एकच आहे असे वाटावे असे काही वातावरण होते यावर आज कुणी तरी विश्वास ठेवेल का, या प्रश्नाचे उत्तर नाही, असेच द्यावे लागेल, असे बरेच काही आज घडताना दिसत आहे. जेमतेम ३५ वर्षांत एवढे होत्याचे नव्हते व्हावे एवढी मजल आपण मारली आहे, एवढाच त्याचा अर्थ. त्यातलीच एक घटना समाजमाध्यमांवरची. एरवी या माध्यमांवरचे ट्रोलिंग आणि तिथले जल्पक ही शहाण्यासुरत्या माणसाने दखल घेऊच नये अशी गोष्ट. पण आपल्या समाजाचा सध्याचा चेहरा जणू आरशातून पाहावे तसा दाखवणाऱ्या या एका घटनेने समाजामधले सगळेच सूर कसे विस्कटले आहेत, हे उघड केले. झाले असे की खाद्यापदार्थ, पाककृतीविषयक एका समाजमाध्यमी समूहामध्ये एक कल्पना मांडली गेली. रमजानचा महिना सुरू झाला आहे, तर आपण या समूहावर या काळात केल्या जाणाऱ्या आपल्याला माहीत असलेल्या पदार्थांची माहिती एकमेकांना देऊ. ज्यांना शक्य असेल, इच्छा असेल ते हे पदार्थ करून बघतील. या आवाहनानुसार एका महिला सदस्याने एका पदार्थाची पाककृती सचित्र सादर केली.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

हेही वाचा >>> अग्रलेख: म्हातारे तितुके..

समाजमाध्यमांवर चालणाऱ्या अनेक गोष्टींमधली ही खरे तर एक अगदी सरळसाधी गोष्ट. पण कावीळ झालेल्या रोग्याला सगळेच पिवळे दिसते असे म्हणतात, तसे झाले आणि एका साध्या खाद्यापदार्थाची माहिती इतरांना देऊ पाहणाऱ्या या महिला सदस्याला त्या समूहाबाहेरच्या लोकांनी प्रचंड प्रमाणात त्रास देणे आरंभले. संबंधित व्यक्तीला शिव्याशाप दिले गेले. धमक्या दिल्या गेल्या. ती आता दुसऱ्या धर्मात जाणार अशी आवई उठवली गेली. दिवसभर हा प्रकार सुरू होता. पण नंतर संबंधित महिला सदस्याने एक मोठी पोस्ट लिहून आपण कुणाला घाबरून मागे हटणार नाही, ही भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी तो पदार्थ करून त्याची छायाचित्रे सादर केली. अनेकांनी इतर धर्मांमधली आपली मित्रमंडळी, सुहृद, त्यांच्याबरोबरचे आत्मीय संबंध, त्यांच्याबरोबर होणारी खाद्यासंस्कृतीमधली देवाणघेवाण याबद्दलचे अत्यंत हृद्या अनुभव मांडले. एकूण काय तर एखाद्या धर्मसमूहाबद्दलचा टोकाचा द्वेष आणि समंजस, मानवी स्वीकार या दोन्हींचे दर्शन या एका प्रकरणातून घडले.

ही द्वेषाची लाट आणि तिला प्रेमाचे उत्तर हे सगळे आजकाल घडते त्याप्रमाणे दोनचार दिवस विहरत राहिले आणि मग ओसरले. पण त्यामुळे अनेकांच्या मनाला झालेली जखम आणि तिचा व्रण याचे काय करणार? त्याचे काय करायचे असते? मुळात आपण कुणाचा तरी द्वेष करतो तो का? आणि द्वेष करतो म्हणजे नेमके काय करतो? विशिष्ट धर्मीयांचा द्वेष करणारे अनेक जण आपल्या उभ्या आयुष्यात त्या विशिष्ट धर्मातल्या एकाही व्यक्तीला कधीही भेटलेले नसतात आणि हे त्यांच्या गावीही नसते. कुणी तरी त्यांच्या मनात पेरून दिलेल्या द्वेषाच्या बियांना रुजून आलेली विखारी फळे या आपल्या खऱ्या भावना नाहीत, हेही त्यांना समजत नाही. इतिहासात जे झाले त्याचा आधार घेऊन वर्तमान बिघडवायचे आणि भविष्य नासवायचे नसते, हजारभर वर्षांपूर्वीच्या कुणाच्या कृत्याचा आजच्या घडीला सूड उगवायचा नसतो हे त्यांना कुणी सांगितलेलेच नसते.

आणि हेही सांगितलेले नसते की लाखो वर्षांच्या मानवी इतिहासात धर्मसंस्कृतीच्याही आधीपासून खाद्यासंस्कृती आहे. शिकार आणि कंदमुळांपासून सुरुवात करून माणूस आज खाद्यासंस्कृतीच्या प्रगत अशा टप्प्यावर आहे. तिच्यावर कोणत्याही धर्माचे शिक्के मारण्यापेक्षा त्यातली देवाणघेवाण हाच अधिक सुसंस्कृत आणि रसिक मार्ग आहे. कारण अन्नधान्य पिकवण्यापासून त्याचे विशिष्ट खाद्यापदार्थ रांधण्यापर्यंतच्या कोणत्याही प्रक्रियेवर आजच्या मानवाचा एकशतांशानेही स्वामित्वहक्क नाही. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेले पाककलेसह सर्व प्रकारच्या कलासंस्कृतींचे संचित स्वीकारणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे याशिवाय आपल्या हातात काय उरते?

हेही वाचा >>> अग्रलेख: ‘खट्टरों’का खिलाडी!

माणसाच्या भरणपोषणासाठी खाद्यापदार्थ असतील तर त्यांना धर्म कसा असू शकतो? आणि तो आहे, असे मानले तर आज आपलेच जगणे अवघड होऊन बसेल त्याचे काय? तसे असेल तर बिर्याणी बाद करून वरण-भातावर समाधान मानावे लागेल. समोशांवर काट मारावी लागेल. बटाटा, टोमॅटो, हिरवी मिरची हे पदार्थ तातडीने बंद करून दुधी, भोपळा, घोसाळे या ‘आपल्या’ भाज्याच नित्यनेमाने खाव्या लागतील. साबुदाणा वर्ज्य करून उपवास करावा लागेल. चहा-कॉफी सोडून द्यावी लागेल. पाव-बिस्किटे-केक यांनी किती जणांना ‘बाटवले’ होते याचा इतिहास फार जुना नाही. त्यामुळे त्यांना तर हातही लावता येणार नाही. आज गल्लोगल्ली मिळणारे आणि आवडीने खाल्ले जाणारे चायनीजदेखील ‘आपले’ नाही, हे आवर्जून लक्षात ठेवावे लागेल. आहे का हे सगळे शक्य?

म्हणूनच थोडा विचार करायला हवा. हजारभर वर्षांच्या काळात झालेली वेगवेगळी आक्रमणे, या आक्रमकांनी केलेला विध्वंस हा आपला अतिशय वेदनादायक इतिहास आहे, यात शंकाच नाही. पण हा इतिहास कुणी तरी चिघळवते आहे म्हणून आपण त्याला बळी पडायचे का? जगात इतरत्र जिथे जिथे इस्लामी आक्रमणे झाली, तिथे तिथे तिथली स्थानिक संस्कृती नष्ट झाली. एकट्या भारतातच या आक्रमकांना एक प्रकारचा ठहराव मिळाला. आक्रमकांना इथले सगळेच नष्ट करून टाकता आले नाही. उलट त्यांना इथलेच बनून राहावे लागले. यातून इथल्या पाककलेला, वास्तुकलेला, गायनकलेला, नृत्यकलेला, पेहरावाला, भाषेला नवे आयाम मिळाले. ताजमहालासारखी वास्तू ही आपल्या देशाची आज जगात ओळख आहे, हे कसे विसरायचे? आजची आधुनिक भारतीय स्त्री घालते तो सलवार कमीज- ओढणी हा पेहराव कुठे मूळचा भारतीय आहे? सूफी गायन इथल्या जीवांना जी तसल्ली देते, ते कुठल्याही अमुक धर्माचे कसे असू शकते? उर्दू ही अनेकांना जिव्हाळ्याची वाटणारी भाषा भारतातच तर निर्माण झाली. गावागावांत आजही हा सलोखा टिकून आहे, म्हणून तर ईदचा शीरकुर्मा आणि दिवाळीचा फराळ यांची देवाणघेवाण सुरू असते.

‘त्यांचा’ एखादा पदार्थ केला म्हणून समाजमाध्यमांवर धिंगाणा घालणारे खरे तर ‘आपले’ही नाहीत आणि ‘त्यांचे’ही नसावेत. तेव्हा आभासी दुनियेमधल्या या तथाकथित ‘त्रिशंकूं’ना करायचे ते करू द्यावे, आपण मात्र ‘…तो सूर बने हमारा’ म्हणत स्मरावे ते हमीद दलवाईसारख्यांना. कोकणातल्या त्यांच्या गावात सगळ्या मुस्लिमांचे एक मंडळ स्थापायचे ठरले. आणि ते स्थापले हे जाहीर करण्यासाठी जाऊन गावातल्या मारुतीपुढे नारळ फोडण्यात आला. आपल्याला सगळ्यांना हवा आहे, तो भारत अशा आडव्या सांस्कृतिक धाग्यांनी बांधलेला आहे, याचे विस्मरण कधीही होऊ न देणे, हे आपल्याच हातात आहे.