तरुण भारतीय शास्त्रज्ञांना देशातच राहून काम करण्यास प्रोत्साहन देणारा ‘डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ दोन-दोन वर्षे दिलाच जात नाही, याचा अर्थ काय?
एखाद्या धर्मनिरपेक्ष देशात टीव्हीवर रामायण सुरू झाल्यावर टीव्हीला हळदीकुंकू वाहणारे प्रेक्षक असतात, हे समजण्यासारखे आहे. पण त्याच देशात ‘राफेल’ विमानाच्या चाकांखाली लिंबू-मिरची ठेवली जाते, संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होमहवन करून केले जाते, त्यासाठी एरवी मंदिरांमध्येच असायला हवीत अशी भगवी वस्त्रधारी मंडळी संसदेच्या आवारात वावरतात, याचा अर्थ कसा लावायचा? सरकारी कार्यालयांमध्ये दरवर्षी सत्यनारायणाची पूजा घातली जाते, याचे स्पष्टीकरण कसे द्यायचे? आजकाल चर्चिलेही न जाणारे हे प्रश्न इथे मांडण्यासाठी निमित्त ठरली आहे, ती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रात नुकतीच प्रसिद्ध झालेली शांतिस्वरूप भटनागर या देशातील सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्कारांबद्दलची एक बातमी. दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) स्थापनादिनी जाहीर केले जाणारे हे देशातील सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्कार मागील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये यादी तयार असूनही जाहीरच केले गेले नाहीत. या गोष्टीला दहा महिने उलटून गेले आहेत. आता पुन्हा सीएसआयआरचा स्थापना दिन जवळपास दीड महिन्यावर आला आहे, पण मागील वर्षीचे पुरस्कार देण्यासाठीची कोणतीही चर्चा वा तयारी सुरू नाही की २०२३ या वर्षांसाठीच्या पुरस्कारांचीही काहीच चाहूल दिसत नाही. दरवर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान या पुरस्कारासाठी नामांकने मागवली जातात. पण या वर्षीच्या पुरस्कारांसाठी ती मागवलीच गेली नाहीत. मागील वर्षीच्या २६ सप्टेंबरनंतर दुसऱ्याच दिवशी विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जितेंद्र प्रसाद यांना पुरस्कार न देण्याबद्दल विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले की विज्ञान मंत्रालये आणि विभागांद्वारे दिले जाणारे पुरस्कार ‘तर्कसंगत’ करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने भटनागर पुरस्कार रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
समजतो आहे ना याचा अर्थ? देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार मागील वर्षी दिले गेलेले नाहीत आणि या वर्षीही दिले जाण्याची चिन्हे नाहीत. विज्ञानाच्या शालेय पुस्तकांतून उत्क्रांती आदी धडे काढून टाकले, तेव्हाही ‘तर्कसंगत करणे’ हाच शब्दप्रयोग झाला होता. तो आता या पुरस्कारांबाबत होतो आहे. सीएसआयआरचे पहिले संचालक शांतिस्वरूप भटनागर यांच्या नावाने दिले जाणारे हे पुरस्कार भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, गणित, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र आणि पृथ्वी विज्ञान या सात वैज्ञानिक विषयांमध्ये दिले जातात. त्या पुरस्काराची रक्कमही पाच लाख रुपये अशी घसघशीत असते. पण इथे मुद्दा रकमेचा नसून पुरस्काराच्या प्रतिष्ठेचा आहे. पंचेचाळिशीच्या आतील शास्त्रज्ञांना हे पुरस्कार दिले जात असल्यामुळे बुद्धीच्या जोरावर विज्ञान क्षेत्रात काही तरी करून दाखवू इच्छिणाऱ्या तरुणांना तो मिळवण्याची आकांक्षा असते. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार मिळवलेल्या आजवरच्या शास्त्रज्ञांच्या यादीवर नजर टाकली तर या पुरस्काराचे महत्त्व लक्षात येईल. २०२० पर्यंत शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार मिळवलेल्या ५०० हून अधिक शास्त्रज्ञांपैकी १६ जणांना पुढल्या काळात पद्मविभूषण, ४९ जणांना पद्मभूषण तर ६९ जणांना पद्मश्री किताब मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या सात शास्त्रज्ञांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण हे तीनही सन्मान आहेत. हा पुरस्कार मिळवणाऱ्या सी. एन. आर. राव यांना तर २०१४ साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २५ भटनागर पुरस्कार विजेते रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे फेलो आहेत तर त्यांच्यापैकी १५ जण अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सहयोगी आहेत. आणि १४३ भटनागर पुरस्कार विजेते वल्र्ड अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो आहेत. भटनागर पुरस्कार विजेत्यांपैकी विक्रम साराभाई, जयंत नारळीकर, एम. एस. स्वामिनाथन, माधव गाडगीळ, रघुनाथ माशेलकर, के. कस्तुरीरंगन ही सर्वसामान्यांना माहीत असलेली नावे. म्हणजेच, पंचेचाळिशीच्या आत भटनागर पुरस्कार मिळवलेल्या या सगळय़ा मंडळींनी त्यानंतरही आपापल्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
वैज्ञानिक वातावरणनिर्मितीसाठी कारणीभूत ठरणारे हे पुरस्कार ज्यांच्या नावाने दिले जातात, ते शांतिस्वरूप भटनागर हे सीएसआयआरचे संस्थापक संचालक. १९४२ साली या स्वायत्त संस्थेची स्थापना झाली. भारतातील प्रयोगशाळांची उभारणी करण्याची बहुमोल कामगिरी त्यांनी केली. आज ती देशातील सर्वोच्च वैज्ञानिक संस्था आहे. ३७ प्रयोगशाळा, ३९ आऊटरीच संस्था, तीन इनोव्हेशन सेंटर्स आणि पाच केंद्रे चालवणाऱ्या या संस्थेशी जवळपास ४६०० शास्त्रज्ञ, आठ हजार तंत्रज्ञ आणि १४ हजार कर्मचारी जोडले गेले आहेत. तिच्याकडे जवळजवळ तीन हजार आंतरराष्ट्रीय तर दीड हजार भारतीय पेटंट्स आहेत. तिला भारतीय पेटंट कार्यालयाकडून २०१८ चा सर्वोत्कृष्ट संशोधन संस्था म्हणून राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार देण्यात आला आहे. देशाच्या उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासून वैज्ञानिक तसेच औद्योगिक वातावरण असावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले, तशी पावले उचलली गेली. वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आज देश ज्या टप्प्यावर उभा आहे, त्याच्या तळाशी हा पाया आहे. आज आपण पाठवलेले तिसरे चांद्रयान हीदेखील ८० वर्षांपूर्वी घातलेल्या या पायाचीच परिणती, असे म्हणणे एका अक्षराचीही अतिशयोक्ती ठरणार नाही. असे असताना वैज्ञानिक क्षेत्रासाठी असलेले शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार थोपवून धरले जातात? पुढील २५ वर्षांच्या ज्या अमृतकाळाबद्दल आणि त्यात अपेक्षित असलेल्या ज्या प्रगतीबद्दल सतत कानीकपाळी सांगितले जात आहे, ती प्रगती विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीशिवाय, त्यास पोषक वातावरण असल्याशिवाय कशी केली जाणार आहे? इथे आमच्या क्षमतेला योग्य वाव मिळत नाही, असे म्हणत देशाबाहेर निघून जाणारी तरुण बुद्धिमत्ता अशा वातावरणात आपण कशाच्या जोरावर थोपवून धरणार आहोत? मध्यंतरी एका विज्ञान काँग्रेसमध्ये पुराणातली विमाने भिरभिरली होती. त्यानंतरही सर्व आधुनिक गोष्टी आमच्याकडे वेदकाळातच कशा होत्या, हे सांगण्याची अहमहमिका सुरू असते. टेस्ट टय़ूब बेबीसारखे अनेक शोध प्राचीन ऋषीमुनींनीच कसे लावले होते, कोणत्याही क्षार-नत्रयुक्त द्रवापेक्षा गोमूत्र हेच कसे औषधी आणि त्याचाच वापर कसा वैज्ञानिक हे सिद्ध करण्याची जणू स्पर्धाच आपल्याकडे गेला बराच काळ सुरू आहे. असे दावे करणारे जगात सगळीकडेच आणि कायमच असणार, हे गृहीत धरले तरी त्याला शुद्ध बिनतोड उत्तर वैज्ञानिक वातावरणाच्या निर्मितीतच असू शकते. विज्ञानाला माहीत असते, ते फक्त वास्तव आणि हे वास्तवदेखील सतत परिवर्तनीय असते, या पायावरच विज्ञान उभे असते. आपली तत्त्वे अपरिवर्तनीय मानणाऱ्या धर्माचे आणि विज्ञानाचे मुळापासूनच वावडे. विज्ञान सतत प्रश्न विचारायला उद्युक्त करते आणि ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’चा धर्माचा आग्रह. एकीकडे साक्षरतेच्या आणि शिक्षणाच्या प्रसारातून विज्ञान शिकणाऱ्यांचे वाढते प्रमाण आणि दुसरीकडे धर्माचा पगडा पद्धतशीरपणे वाढवत नेऊन भुसभुशीत डोकी वाढवण्याचा उद्योग या द्वंद्वात आपला सगळा समाजच सापडलेला असताना दरवर्षी नेमाने दिला जाणारा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार देण्यासाठी सरकारला ‘मुहूर्त’च न मिळणे हे अजिबात अनाकलनीय नाही. आपली मोठी रेघ आखण्याची कुवत नसणारे आहे ती रेघ पुसून टाकण्यातच धन्यता मानतात, तसेच हे आहे. कोणत्याही पुरस्कारांच्या क्षेत्रात राजकारण असते, हे एव्हाना सगळय़ांनाच कळून चुकले आहे. पण ते करताना समाजाचे नुकसान होत असेल तर ती गंभीरच बाब म्हणायला हवी. त्यामुळे शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार थोपवले जाणे हे समाजाचे घोर नुकसान आहे. या क्षेत्रातील बुद्धिमान तरुणांचे नुकसान आहे. त्यांना नाकारून उद्या गोमूत्रातील पावित्र्याचा अंश शोधणाऱ्या एखाद्याला हा पुरस्कार दिला गेला तरी आश्चर्य न वाटून घेता, पुरस्कार अखेर जाहीर झाले म्हणजे विज्ञानाला लागलेली ‘साडेसाती’ संपली, म्हणून आनंद मानावा लागेल!