‘मुस्लीम ब्रदरहूड’ या आद्य इस्लामी धार्मिक संघटनेचे खच्चीकरण करण्यासाठी जी मदत सौदी आणि इस्रायलकडूनही मिळाली, त्यामुळे इजिप्तची सत्ता आता अल सिसी यांच्याकडेच राहणार हे स्पष्ट झाले होते. सिसी यांनी निवडणुकीचा उपचारही पार पाडून घेऊन या सत्तेला लोकशाहीची महिरप दिली. ती बेगडी आहे हा भाग निराळा..
मतदारांनी मला निवडून दिल्यास मी त्यांना काहीही देऊ शकणार नाही इतकी प्रांजळ भूमिका इजिप्तचे भावी अध्यक्ष अब्दुल फताह अल सिसी यांनी निवडणुकीत घेतली होती आणि तरी सर्वसामान्य इजिप्तकरांनी त्यांनाच अध्यक्षपदी बसवले. यातून इजिप्तकरांची जशी असहायता दिसून येते तशीच त्या देशातील कुंठित राजकारणही कळून येते. हे अल सिसी गेल्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख होते. या पदावरील नियुक्तीची परतफेड त्यांनी तत्कालीन अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्याविरोधातील उठाव आणि त्यानंतर त्यांच्या पदच्युतीने केली. मोर्सी हे मुस्लीम ब्रदरहूड या इस्लामी धर्माधारित संघटनेचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यांच्या पदच्युतीनंतर सिसी यांनी ब्रदरहूडच्या विरोधात देशभर मोहीम राबवली आणि जवळपास १९ हजारांचे शिरकाण केले. त्याही वेळी वास्तविक आपण अध्यक्षपदासाठी उत्सुक आहात का, अशी विचारणा सिसी यांना करण्यात आली होती. परंतु सर्व हुकूमशहांच्या प्रारंभाप्रमाणे त्यांनीही आपणास राजकीय सत्तेत रस नसल्याचा दावा केला होता. पुढे तो किती पोकळ होता हे दिसून आले आणि त्यांची सत्ताकांक्षा उघड झाली. सिसी यांनी इजिप्तमधील न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि अन्य सर्व व्यवस्थांचे पद्धतशीर खच्चीकरण करून आपली सत्ताकांक्षा पूर्ण करण्याच्या मार्गात यांतील कोणीही येणार नाही याची खबरदारी घेतली. ब्रदरहूडच्या सहाशे जणांना घाऊक फाशी देण्याचा निर्णय हा त्यांच्याच दबावाखालील न्यायव्यवस्थेने घेतला, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे गेले दोन दिवस पार पडलेल्या निवडणुका कितपत प्रामाणिक, असाही प्रश्न विचारला जात असून सिसी यांच्या भव्य विजयाबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांची सत्ता उलथून पडल्यापासून इजिप्तमधून शांतता गायब झाली असून इजिप्तची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. इजिप्तच्या डोक्यावर २४,००० कोटी डॉलर्स इतके प्रचंड कर्ज आहे आणि सरकारची अर्थसंकल्पीय तूट तब्बल १४ टक्के इतकी महाप्रचंड झाली आहे. तेव्हा या निवडणुकीत सिसी यांनी ढासळती अर्थव्यवस्था हाच आपला प्रचाराचा केंद्रबिंदू ठरवला. परंतु तरीही त्यांनी प्रचार मात्र केला नाही. सिसी यांनी सुरक्षा व्यवस्थेचे कारण पुढे करीत ना प्रचारसभा घेतल्या ना ते मतदारांना भेटले. त्यांची मते निवडक स्वरूपात दूरचित्रवाणीवरून तेवढी लोकांपर्यंत पोहोचवली गेली. परंतु त्यातही त्यावर काही प्रश्न विचारल्यास स्पष्टीकरणासाठी ते उपलब्ध नव्हते. याचा अर्थ त्यांनी ही निवडणूक पूर्णपणे पडद्याआडून लढवली. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे असा त्यांचा आग्रह होता. परंतु गेल्या काही वर्षांच्या बजबजपुरीमुळे मतदारांत अपेक्षित उत्साह नव्हता. त्यामुळे अधिक मतदान व्हावे यासाठी या सिसी यांनी मतदानासाठी आणखी एक दिवस वाढवला. तेव्हा जी काही मते पडली त्यातील ९० टक्क्यांच्या आसपास सिसी यांच्या पारडय़ात पडल्याचे सांगितले जात आहे. हमदीन सबाही या सुधारणावादी विचारांच्या प्रतिस्पध्र्याने सिसी यांना निवडणुकीत आव्हान दिले होते. लष्कराने बराकीतच राहावे या त्यांच्या मतास तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत होता. परंतु तरीही सिसी यांच्यासमोर ते टिकाव धरू शकले नाहीत. तशी शक्यताही नव्हती. कारण सिसी य्ोांची निवडणूक ही फक्त औपचारिकता होती. ती पार पडली, इतकेच.
परंतु इजिप्तमधील कथित निवडणुकीमुळे अरब जगातील जे काही पैलू नव्याने समोर आले, ते अधिक महत्त्वाचे आणि दखलपात्र आहेत. त्यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे एकूणच मुस्लीम ब्रदरहूडच्या विरोधात प्रमुख इस्लामी देशांत तयार होत असलेले वातावरण. इस्लामी धार्मिक अतिरेकी संघटनांच्या मालिकेत ब्रदरहूड ही सर्वात आद्य. पन्नासच्या दशकात स्थापन झालेल्या या संघटनेचा तत्कालीन संस्थापक हसन अल बन्ना याला थेट अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष जनरल आयसेनहॉवर यांनी व्हाइट हाऊसमध्येच थारा दिला होता. त्यानंतरच्या शीतयुद्धात पश्चिम आशियाच्या वाळवंटात कम्युनिस्टांना रोखण्यासाठी अमेरिकेने या संघटनेचा वापर केला आणि पुढे या संघटनेची अनेक उपांगेही तयार झाली. परंतु मोहम्मद मोर्सी इजिप्तमध्ये सत्तेवर येईपर्यंत ब्रदरहूडला थेट राज्य करण्याची संधी कधीही कोणत्याही देशात मिळालेली नव्हती. त्यानंतर मात्र सौदी अरेबियाने इजिप्तचे सिसी यांना हाताशी धरीत या संघटनेचा पुरता बीमोड केला. इजिप्तची सध्याची निवडणूक महत्त्वाची ठरते ती त्यामुळे. सिसी यांना या निवडणुकीत सौदी अरेबियाची सढळ मदत मिळत होती. त्या देशाचे धनाढय़ राजपुत्र- प्रिन्स तलाल हे जातीने या निवडणुकीत लक्ष घालीत होते. यातील आश्चर्याचा दुसरा भाग म्हणजे सौदीप्रमाणे इस्लामी जगाशी वरकरणी मतभेद दाखवणाऱ्या इस्रायलनेदेखील सिसी यांना अप्रत्यक्षपणे सत्तास्थापनेसाठी केलेले साह्य़. त्यामुळे ब्रदरहूडचा बंदोबस्त हा जणू एकमेव कार्यक्रम असल्यासारखे हे देश पुढे आले आणि सिसी यांच्या मागे ताकद उभी करीत ब्रदरहूडचे खच्चीकरण केले गेले. इस्लामी जगतात सर्वात महत्त्वाची सत्ता आहे ती सौदी अरेबियाची. कारण सौदी राजा हा मक्का आणि मदिना या दोन अत्यंत पवित्र धर्मस्थळांचा अधिकृत रक्षक असतो. तेव्हा या धर्मस्थानांच्या रक्षकाच्या सत्तेला कोणी आव्हान देताना दिसल्यास सौदी अरेबियात अस्वस्थता असते. या आधी तालिबान, अल कईदा यांच्या निर्मितीमुळे ती सौदीने अनुभवली होती आणि अनुभवत आहे. त्यात मुस्लीम ब्रदरहूडच्या पुनरुज्जीवनामुळे आणखी एकाची भर पडावयास नको, असाही विचार सौदी राज्यकर्त्यांनी केला असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यास दुसरे परिमाण आहे ते आर्थिक. सौदी राजपुत्र तलाल हा जगातील सध्याच्या आघाडीच्या गुंतवणूकदारांत गणला जातो. अमेरिकेतील बलाढय़ सिटी बँक असो वा अॅपल वा मोटोरोला वा फॉक्स न्यूज. या आणि अशा अनेक कंपन्यांत या तलाल याची लक्षणीय गुंतवणूक असून जगभरातील अनेक आलिशान हॉटेलांच्या मालकीतही त्याचा वाटा आहे. या तलाल याच्या वतीने आगामी काळात गुंतवणुकीच्या महत्त्वाकांक्षी योजना असून पश्चिम आशियातील अशांतता हे एक त्यापुढील आव्हान आहे. सीरियापासून ते इराकपर्यंत या अशांततेने सर्व देशांना ग्रासले असून ब्रदरहूड संघटनेचा मोठा वाटा त्यामागे आहे. परिणामी या ब्रदरहूडला कह्य़ात ठेवण्यात वा तिचा नायनाट करण्यात या परिसरात अनेकांना स्वारस्य होते. त्याचा फायदा सिसी यांनी घेतला आणि आपले घोडे यशस्वीपणे दामटले.
यामुळे इतिहासाचे एक चक्र पूर्ण झाले असे म्हणता येईल. इजिप्तचे गमाल अब्दुल नासर यांना एकेकाळी अखिल अरब जगताचा नेता होण्याच्या स्वप्नाने पछाडलेले होते. पन्नासच्या दशकात सुवेझ कालव्यावरील संघर्ष आदी त्यातूनच उद्भवले. नासर यांच्या अकाली निधनानंतर अन्वर सादात सत्तेवर आले. त्यांची हत्या झाली. त्यानंतर दीर्घकाळ सत्ता उपभोगणाऱ्या होस्नी मुबारक यांची रवानगी चार वर्षांपूर्वीच्या उठावात तुरुंगात झाली आणि आजही ते गजांआडच आहेत. तेव्हापासून इजिप्तची जनता राजकीय स्थैर्यास पारखी झाली असून सिसी यांच्या निवडीमुळे तरी ते मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु ती फोल ठरण्याचीच शक्यता अधिक. बुद्धिबळातल्या सिसिलियन चालीप्रमाणे इजिप्ती राजकारणाची ही सिसिलियन खेळी फक्त लोकशाहीचा आभास निर्माण करणारीच आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2014 रोजी प्रकाशित
‘सिसी’लियन चाल
‘मुस्लीम ब्रदरहूड’ या आद्य इस्लामी धार्मिक संघटनेचे खच्चीकरण करण्यासाठी जी मदत सौदी आणि इस्रायलकडूनही मिळाली

First published on: 29-05-2014 at 02:47 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Egypt voter turnout sisi mandate