सद्गुरू हाच सुखाचा स्रोत आहे, असं गेल्या भागात सांगितलं, पण म्हणजे नेमकं काय? तर आपला प्रत्येक प्रयत्न सुखासाठीच होत असला, तरी सुख बरेचदा आपल्याला हुलकावणी देत असतं. तेव्हा सद्गुरू बोधाच्या आधारावर सुख म्हणजे नेमकं काय आणि या जगात नेमकं कसं वावरावं, हे केवळ सद्गुरूंच्या बोधानुसारच उमगू लागतं. कारण आपण नेहमीच अनवधानानं जगत असतो आणि सद्गुरू बोधानं जगण्यात अवधान येऊ लागतं. अनवधानानंच आपण वागू नये तसं वागतो, बोलू नये ते बोलतो आणि त्यातूनच चुका घडतात आणि दु:ख, चिंता, काळजी, अस्वस्थता वाटय़ाला येत असते. अवधानानं जेव्हा आपण जगू लागतो तेव्हा वागू नये तसं न वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतो, बोलू नये ते न बोलण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा वर्तणुकीतल्या अनेक चुका टळतात आणि त्यामुळे दु:खाच्या अनेक शक्यतांमध्येही घट होते. तेव्हा जग, जगातली माणसं, जगातली परिस्थिती या माध्यमातून ‘सुख’ आणि ‘दु:ख’ आपल्या वाटय़ाला येत असलं, तरी त्या ‘सुखा’कडे आणि ‘दु:खा’कडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, त्यांना सामोरं कसं जावं आणि त्यांना प्रतिसाद कसा द्यावा, हे सद्गुरू बोधाच्या आधारावरच उमगू लागतं आणि जगण्यात उतरू लागतं. थोडक्यात जगात वावरताना वृत्ती भजनशील होऊ लागते. भगवंताचं स्मरण सहजतेनं टिकू लागतं. आपल्या जीवनावर भगवंताची सत्ता आहे, हे जाणवू लागतं. मग संकुचित तळमळ कमी होऊ लागते आणि मन व्यापक होण्याची प्रक्रिया संथपणे का होईना, पण सुरू होते. मग असं भगवंताचं अर्थात परमतत्त्वाचं म्हणजेच सद्गुरूंचं स्मरण, चिंतन, मनन अंत:करणात रुजू लागलं की, ‘‘सकळ कर्मी समाधी’’ ही स्थिती सहज होऊ लागते. ज्यांना असं वाटतं की नित्य जीवन जगत असताना मनाची समाधी अवस्था टिकू शकत नाही, ‘‘ते पावले नाहीं निजात्मबोधीं’’ त्यांना निजात्मबोधाची प्राप्ती झालेली नाही, असं कवि नारायण अगदी ठामपणे सांगतो! निजात्मबोध म्हणजे काय? तर असा बोध जो अनुभवातून अंत:करणात ठसल्यानं तो कधीच विस्मरणात जात नाही. तो सदैव ताजा आणि जिवंत असतो! निजात्मबोधातून सहजतेनं वृत्तीला व्यापून टाकणारी जी समाधी अवस्था असते ती कशानंही मोडत नाही. कवि नारायण तर सांगतो की, ‘‘पाहें पां देवर्षि नारदु। विनोदें न मोडे समाधिबोधु।’’ अहो नारदालाच पाहा! त्याच्या स्वभावात एक प्रसन्न विनोदीपणाही होता, पण म्हणून काही त्याचा समाधीबोध भंगला नाही! आणि तुम्ही पहा, अनेक सत्पुरुषांच्या स्वभावात एक प्रसन्न विनोदही असतो. कारण ‘खेळाऐसा प्रपंच मानावा,’ ही जाणही आहे. म्हणजे हे जग आणि आपला प्रपंच ही सगळी भगवंताची लीला आहे. त्याच्या मायेचा हा पसारा आहे. त्या पसाऱ्याला चिमटीत पकडण्याच्या धडपडीत जन्म घालवण्यापेक्षा हा पसारा ज्याच्या पकडीत आहे त्या भगवंतालाच धरून राहणं योग्य, हे सत्य ते जगण्यातून दाखवत असतात. मग हा सगळा प्रपंच खेळच असेल, तर खेळाचे नियम काटेकोरपणे पाळत तो प्रसन्न वृत्तीनं का खेळू नये, असंच ते जणू बिंबवत असतात. पण याचा अर्थ सवंगतेनं जीवनाची संधी वाया घालवत रहावी, हे त्यांना अभिप्रेत नसतं. त्यामुळे भगवंताच्या भाव भक्तीप्रेमात आकंठ बुडाले असतानाही ते जगात अगदी सहजतेनं आणि प्रसन्नतेनं वावरत असतात. त्या प्रसन्नतेचा आणि भावप्रेमाचा संस्कार त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकावर होतोच.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2019 रोजी प्रकाशित
११८. निजात्मबोध
भगवंताचं स्मरण सहजतेनं टिकू लागतं. आपल्या जीवनावर भगवंताची सत्ता आहे, हे जाणवू लागतं.
Written by चैतन्य प्रेम
First published on: 18-06-2019 at 00:09 IST
मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekatmatayog article number