१४२. कोरडा खांब!

अंतरंगात सद्भाव असेल, तर काय घडत नाही? नाथ सांगतात, ‘‘कोरडिये खांबीं धरितां सद्भावो।

अंतरंगात सद्भाव असेल, तर काय घडत नाही? नाथ सांगतात, ‘‘कोरडिये खांबीं धरितां सद्भावो। तेथेंचि प्रगटे देवाधिदेवो। मा सद्गुरू तंव तो पहा वो। स्वयें स्वयमेवो परब्रह्म।।५००।।’’ कोरडय़ा खांबातही परमेश्वर आहेच, हा प्रल्हादाचा सद्भाव दृढ होता म्हणून तिथेही तो देवाधिदेव प्रकटला! मग सद्गुरू तर प्रत्यक्ष, चालतंबोलतं ब्रह्म आहेत, असं शिवजींनीही गुरुगीतेत सांगितलं आहे. मग त्यांच्याकडे त्या दृढ भावानं का पाहात नाहीस? इथं या ओवीचा जो पूर्वार्ध आहे तो थोडा पाहू. सध्या काय आहे, समाजमाध्यमांच्या कह्य़ात आपण जगत आहोत. आणि त्यावर शेकडो संदेश येत असतात. काहींचे हेतू मात्र वरकरणी छान वाटले, तरी खोलात विचार करता त्यामागे काही गैरहेतू दडल्यासारखे वाटतात. असाच एक संदेश आला की, ‘‘मातीचा उंदीर ठेवून पाहा, मांजर त्याला तोंडही लावणार नाही, पण मातीच्या मूर्तीसमोर माणूस मात्र प्रार्थना करतो आणि त्या पूर्ण होतील, अशा अपेक्षा करतो!’’ वरकरणी हा संदेश चटपटीत आहे. पण तो मूर्तीपूजेला कमी लेखणारा आहे. आता मूर्तीपूजा योग्य की अयोग्य हा मुद्दा नाही, पण स्वत: तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की, ज्या नावेनं मी नदी पार केली तिचं काम आता नाही म्हणून मी काही ती बुडवणार नाही. दुसऱ्या कुणाला तिचा उपयोग होतच राहील! ‘अ’ अननसातला असं आपण मुलाला सचित्र शिकवतो, पण आपण पदवी घेतल्यावर अशा पुस्तकांची जगात गरजच नाही, असं मानतो का? कारण ती पुस्तकं नसती, तर आपणही आज जिथवर पोहोचलो, तिथवर आलोच नसतो. तेव्हा मूर्तीपूजा ही आपल्याच अंतरंगातली भावना जागृत करते आणि विकसित करते. एखाद्या मृत माणसाच्या छायाचित्राला आपण कवटाळतो, ते पाहताच आपल्या मनातला भाव जागा होतो, मग मातीच्या मूर्तीत कुणाला भगवंत दिसत असेल, तर तो कमी का? रामकृष्ण परमहंस तर म्हणत, अहो तो जर कणाकणांत आहे, तर मग या मातीच्या मूर्तीत कसा नसेल? तेवढा शुद्ध भाव मात्र आपला नसतो. त्यामुळे भक्तीच्या ढोंगात मातीच्या मूर्तीही ओढल्या जातात. मग मूर्तीच्या उंचींवरून भक्तीची व्यापकता ठरते! प्रल्हादाच्या हृदयातला भाव मात्र पक्व होता. या चराचरात तो कणाकणांत वसला आहे. त्या भावनेला आव्हान दिलं हिरण्यकशपुनं तेव्हा तो स्थिरचित्तानं म्हणाला, की ‘‘होय! तो या खांबातही आहे!’’ त्याच्या दृढ भावानं त्या खांबातही देवाला प्रकट व्हावं लागलं. मग नाथ विचारतात की, अहो त्या प्रल्हादाला कोरडय़ा खांबातही देव दिसला मग आपल्याला आपल्या समोर मनुष्य देहात असलेला भगवंत का दिसत नाही? प्रत्येकात देव आहेच, मग तो सद्गुरूत कसा नसेल? आहेच. कारण जे शाश्वत आहे त्याचंच दान देणारा तो खरा देव असेल, तर सद्गुरू हाच केवळ या जगात शाश्वत बोध देतो, शाश्वत सत्य मांडतो, अशाश्वताच्या आवडीतून सोडवत शाश्वताचं प्रेम निर्माण करतो.  म्हणून नाथ सांगतात, ‘‘यालागीं गुरुभजनापरता। भजावया मार्गु नाहीं आयता। ज्ञान-भक्ति जे तत्त्वतां। ते जाण सर्वथा सद्गुरूभक्ति।। ५०१।।’’ तेव्हा या सद्गुरूभजनापेक्षा भजनाचा सोपा मार्ग नाही. खरोखर ज्ञान-भक्ती जी काही म्हणतात ती सद्गुरूभक्तीच आहे. सद्गुरू भजनापेक्षा सोपं भजन नाही! हे वाक्य कळायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात आपल्याला कळलेलंच नसतं. कारण सद्गुरू भजन म्हणजे काय, हेच नीटसं कळलेलं नसतं!

– चैतन्य प्रेम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta ekatmatayog