– चैतन्य प्रेम

पाणी हा गुरू कसा झाला, हे सांगताना अवधूत हा योग्याची महती अवचित गाऊ लागला. आणि इथं एक फार मोठी गोष्टही अवधूतानं प्रकट केली ती स्पर्शाची! नाथ लिहितात, ‘‘तापले आले उदकापाशीं। अंगस्पर्शे निववी त्यांसी। तैसिचि दशा योगियासी। स्पर्शे तापासी निवारी।। ४७०।। उदकें निवविलें ज्यासी। परतोनि ताप होय त्यासी। योगी कृपेनें स्पर्शे ज्यासी। त्रिविध तापांसी निर्मुक्त।। ४७१।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). म्हणजे तप्त जीवांना पाण्याच्या स्पर्शानंही गारवा मिळतो, तृप्ती मिळते. पण ती अखंड टिकणारी नसते. काही वेळानं हा जीव पुन्हा रणरणत्या उन्हात गेला, तर पुन्हा दग्ध होतो. योगी ज्याला कृपास्पर्श करतो, त्या स्पर्शानं त्रिविध ताप कायमचा शोषला जातो. इथंच थोडा गोंधळ होण्याचा धोका आहे आणि इथंच एक मोठी मेखही आहे. नुसत्या स्पर्शानं सांसारिक ताप दूर होईल का, असं कुणीही विचारील आणि ते स्वाभाविकही आहे. मात्र इथे अभिप्रेत स्पर्श हा शारीरिक नाही, तो फार वेगळा आहे; पण आधी शारीरिक स्पर्शापुरताही विचार करू. खरं तर जो खरा योगी आहे, तो सहज शारीरिक स्पर्श कुणालाही करीत नाही. इतकंच नव्हे, अन्य कुणी अगोचरपणे स्पर्श केलेला त्याला आवडतही नाही. कारण त्यात सूक्ष्म प्रपंचबुद्धीच असते. अशा योग्याचा जगातला वावर किती जपून असतो, हे श्रीज्ञानेश्वर माउलींनी ‘ज्ञानेश्वरी’च्या तेराव्या अध्यायात सांगितलं आहे. हा योगी पुरुष सहसा जास्त बोलत नाही आणि बोलतो तेव्हा मात्र, ‘‘पुढां स्नेह पाझरे। माघां चालती अक्षरें। शब्द पाठीं अवतरे। कृपा आधीं।।२६३।।’’ म्हणजे, प्रथम त्याच्या हृदयातून अपार प्रेमाचा प्रवाह सुरू होतो आणि मागाहून शब्द साकारतात! त्या शब्दांना कृपेचाच स्पर्श असतो. तो सहसा कुणाशी बोलतच नाही. आपल्या बोलण्यानं कुणाचंही मन दुखवू नये, असा भाव त्याच्या मनात असतो. पण तो जर काही बोललाच ना, तर- ‘‘..साच आणि मवाळ। मितले आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे।।’’ असं दिव्यत्व त्या शब्दांना असतं! हा योगी सहसा कुणाच्या नजरेला नजरही भिडवून पाहात नाही. माउली म्हणतात, ‘‘कां जे भूतीं वस्तु आहे। तिये रूपों शके विपायें। म्हणोनि वास न पाहे। बहुतकरूनि।।२७४।।’’ प्रत्येक प्राणिमात्रात एकच सद्वस्तू भरून आहे, मग माझी दृष्टी त्यांना बोचली तर? या भावनेनं तो कुणाकडे सहसा थेट बघतही नाही. मग असा हा योगी शारीरिक स्पर्श तरी सहजी करील का? मग हा जो त्रिविध तापांचं निवारण करणारा कृपास्पर्श आहे तो म्हणजे अनुग्रह आहे, शक्तिपात आहे, दीक्षा आहे. जनांवर ही कृपा व्हावी, यासाठी काय घडतं? नाथ लिहितात, ‘‘मेघमुखें अध:पतन। उदकाचें देखोनि जाण। अध:पातें निवती जन। अन्नदान सकळांसी।। ४७३।। तैसें योगियासी खालतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें। जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।। ४७४।।’’ म्हणजे मेघवर्षांव होतो तेव्हा आकाशातून पावसाच्या रूपानं पाणीच भूमीवर येतं, पण त्या ‘अध:पाता’नं सर्व जीव तृप्त होतात. तसाच योगी मृत्युलोकी जन्म घेतो, किंवा सर्वोच्च भावसमाधीतून उतरून-पण त्याच उच्च भावदशेत-सर्वसामान्य माणसाच्या पातळीवर वावरू लागतो, तेव्हा लोकांना आत्मजागृतीचा बोध करतो आणि आत्मज्ञानानं त्यांना तृप्त करतो. प्रपंचआसक्तीतून त्यांना सोडवून त्यांचा भवताप शोषून घेतो. हा खरा कृपास्पर्श! हा खरा कृपानुग्रह!!