चैतन्य प्रेम

यदु राजा आणि अवधूताच्या संवादातून आपल्या अवतीभोवतीच्या सृष्टीतील गुरुतत्त्व उलगडत आहे. पृथ्वी या पहिल्या गुरूकडून आपण शांति, समत्व आणि दातृत्व हे तीन गुण कसे ग्रहण केले, हे अवधूतानं सांगितलं. मग वायू या दुसऱ्या गुरूकडून समदृष्टी आणि अलिप्तपणा कसा शिकलो, हे त्यानं मांडलं. पृथ्वी आणि वायूनंतर आकाश हा अवधूताचा तिसरा गुरू आहे. या आकाशाला गुरू का केलं किंवा या आकाशापासून आपण कोणते गुण ग्रहण केले, हे उलगडून दाखवताना अवधूत यदुराजाला सांगतो की, ‘‘सर्व पदार्थी समत्व। यालागीं आकाशासी गुरुत्व। असंगत्व अभेदत्व। निर्मळत्व जाणोनि।। ४३२।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय सातवा). अवधूत म्हणतो की, ‘आकाश सर्व पदार्थाना समत्वाने व्यापून आहे! पण ही भेदविरहित स्थिती असूनही, ते असंग आहे, निर्मळ आहे.’ बघा, सर्वत्र असणं, पण कुठेही लिप्त नसणं, गुंतलेलं नसणं, ही किती मोठी स्थिती आहे! आपण जिथं जिथं असतो तिथं तिथं गुंतूनच असतो. हे गुंतणं का असतं? थोडं विषयांतर भासेल, पण पूर्वी एक मोठा तात्त्विक वाद होता तो म्हणजे ‘कला नेमकी कशासाठी?’ काहींचं असं ठाम मत होतं की, ‘कला ही कलेसाठीच आहे’! दुसरा पक्ष मानत होता की, ‘कला ही जीवनासाठी आहे.’ एका शिष्यानं गुरुदेव रानडेंना विचारलं, ‘‘कलेसाठी कला, असं असू शकत नाही का?’’ त्यावर गुरुदेव उत्तरल, ‘‘या जगात अकारण अशी कोणतीही गोष्ट नाही!’’ त्या वाक्याचा पडताळा आपल्या या संग आसक्तीत घेता येतो. जिथंजिथं आपण असतो, आपला सहवास असतो, आपण गुंतून असतो त्यामागे काही ना काही कारण असतं, हेतू असतो, स्वार्थ असतोच असतो. त्या गुंतण्यातून आपल्या सुप्त मनातल्या काही ओढींच्या पूर्ततेची इच्छा कारणीभूत असते. त्यामुळे आपण कुठेच अकारण, अहेतुक नसल्यानं सर्वत्र असूनही नि:संग असण्याची स्थिती आपल्याला अशक्य कोटीतली वाटते. आकाशाचा ‘सर्व पदार्थी समत्वानं असूनही असंग’ असण्याचा जो गुण आहे ना तो अवधूताला विलक्षण भासला. नुसता विलक्षणच नाही, तर तो अनुकरणीयही वाटला. त्याच्या आचरण अभ्यासाचा तो विषय झाला. आपल्याला कोणकोणते भक्त प्रिय आहेत, ते भगवंतानं अर्जुनाला ‘गीते’त सांगितलंय. बाराव्या अध्यायातले ते श्लोक प्रसिद्धच आहेत. त्यातला एक श्लोक आहे, ‘‘अनपेक्ष: शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ:। सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्त: स मे प्रिय:।।’’ (श्लोक १६). म्हणजे, ‘जो माझा भक्त अनपेक्ष असतो म्हणजे अपेक्षांकडून अस्पर्शित असतो, पण तरीही कर्तव्यर्कम कौशल्यानं आणि शुद्ध रीतीनं पार पाडतो, पण त्याच्या परिणामांबाबत उदासीन असतो, जो दु:खमुक्त असतो, मानवी प्रयत्नांचा आरंभ ज्या हवं-नकोपणाच्या मूळ वासनेत आहे तिचाच त्याग ज्याच्याकडून झाला असतो, तो भक्त मला प्रिय आहे!’ या श्लोकाचं विवरण करताना ‘उदासीन’ या एका स्थितीचा भावानुवाद करताना माउलीही आकाशाचंच रूपक वापरतात आणि म्हणतात, ‘‘व्यापक आणि उदास। जैसें कां आकाश। तैसें जयाचें मानस। सर्वत्र गा।।’’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १२, ओवी १८०). ‘ज्याचं मन सर्वव्यापी, सर्वस्वीकारी असं व्यापक, पण उदासीन आहे; तो भक्त मला प्रिय आहे.’ आता उदासीन म्हणजे काय, हेच आपल्याला नीटसं उमगत नाही. या शब्दाप्रमाणेच असंग, अनपेक्ष या शब्दांचा खरा भावही आपल्याला उमगत नाही. तो आधी थोडक्यात जाणून घेऊ.