चैतन्य प्रेम

उत्तम, मध्यम आणि सामान्य भक्तांमधील भेद कवि नारायणानं राजा जनकाला सांगितला. हे भेद वाचताना या श्रेणीत अवतारी सत्पुरुषांना जरी आपण उत्तम भक्त म्हटलं असलं, तरी ते आपल्याला कळावं एवढय़ापुरतं. जो भक्तीच्याच पुनस्र्थापनेसाठी आला आहे तो खऱ्या भक्ताची भूमिका जन्मभर पार पाडत असतो आणि भक्ती कशी करावी, हे कृतीतून शिकवत असतो. तेव्हा खरं पाहता अवतारी सत्पुरुषांचा विचार न करता आपण एका प्रश्नाचा विचार करू. हा प्रश्न असा की, भक्तीमार्ग एकच असताना या मार्गानं जे वाटचाल करीत आहेत अशा भक्तांमध्ये भेदच का निर्माण व्हावा? आपल्या मनात स्वाभाविकपणे हा प्रश्न येईल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, उत्तम, मध्यम आणि सामान्य भक्त या काही भक्तीच्या वाटचालीतल्या पायऱ्या किंवा टप्पे नव्हेत. म्हणजेच या वाटेवर पहिलं पाऊल टाकतानाच कुणी उत्तम भक्त असू शकतो किंवा अनंत काळ वाटचाल करूनही कुणी सामान्यच भक्त असू शकतो. तेव्हा उत्तम, मध्यम आणि सामान्य हा भेद आपल्याला कळावं यासाठी आहे. आता या भेदाचं मूळ कशात आहे आणि हा भेद का आहे? तर, याचं एकच उत्तर आहे ते म्हणजे तळमळीचं कमी-अधिक प्रमाण! ज्याला खरी तळमळ आहे त्याला ध्येयावाचून दुसरं काहीच दिसत नाही आणि अशीच ध्येयवेडी आणि ध्येयसंगत आयुष्य जगणारी माणसं आपापल्या क्षेत्रात मापदंड निर्माण करतात. अगदी त्याचप्रमाणे हा जो खरा भक्त आहे त्याला सद्गुरू बोधानुरूप जीवन जगण्यातच खरा आनंद वाटतो. तेच त्याच्या जीवनाचं ध्येय असतं आणि त्या ध्येयाशी सुसंगत जीवन तो जगत असतो. म्हणूनच तो उत्तम भक्त ठरतो. ज्याच्या मनात तळमळीचं प्रमाण प्रसंगपरत्वे  कमी-अधिक होत असतं, तो मध्यम भक्त ठरतो. भगवंताच्या अनुसंधानात जीवन जगण्याची इच्छा त्याच्या मनात अधेमधे अगदी तीव्रपणे जागी होते, पण ती सातत्यानं टिकत नाही. सद्गुरूवर त्याची निष्ठा असते, पण सद्गुरूभक्तांशी स्नेहभाव असतो, जे भक्ती मार्गाबद्दल अज्ञानी असतात त्यांच्याबद्दल त्याच्या मनात करुणा असते. त्यांनाही योग्य मार्ग लाभावा, त्यांनीही अध्यात्माच्या मार्गावरून वाटचाल करावी, अशा प्रामाणिक इच्छेतून तो त्यांना सद्गुरू मार्गाची माहिती सांगत असतो आणि त्यात कधीकधी ‘ज्ञानी’पणाची शाल आपल्या अंगावर पांघरून घेत असतो. जो भक्तीमार्गाचा विरोध करतो तो मात्र या मध्यम भक्ताला पापीच वाटतो. आता बारकाईनं पाहिल्यास एक गोष्ट सहज लक्षात येईल की सद्गुरूवर उत्तम आणि मध्यम या दोन्ही भक्तांची निष्ठा दृढ असते, पण उत्तम भक्त जे काही पाहतो, ऐकतो आणि जे काही त्याच्याकडून केलं जातं ते सगळं भक्तीमयच असतं. पण जो मध्यम भक्त आहे तो केवळ भक्तीकेंद्रित नसतो, त्याच्या मनात जगाचीही ओढ असते आणि या जगातील लोकांकडेही तो भेददृष्टीनं पाहात असतो. म्हणूनच तर काहीजण त्याला कृपापात्र वाटतात, तर काही पापी वाटतात! तेव्हा त्याची जी तळमळ आहे ती अस्थिर होण्याची अनंत कारणं बाहेरच्या जगात दडलेली असतात. त्याचेच तरंग त्याच्या आंतरिक जगात उमटत असतात. जो सामान्य भक्त आहे त्याच्या मनात तर भक्तीची आणि भक्ताची एक प्रतिमाच तयार असते. त्या प्रतिमेनुसार वागण्याचा तो प्रयत्न करतो, पण अंतरंगात तसा भाव नसल्यानं त्याची स्व-प्रतिमाही तकलादूच असते.