भारतीयांसाठी क्रिकेट ही एक करमणूक असते, या आरोपात तथ्य वाटावे, याचा पुरावा चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० च्या सामन्यांनी दिला आहे. जगातील अनेक नामवंत संघांमध्ये खेळले जाणारे हे सामने सुरू कधी झाले आणि संपले कधी हेही कळू नये, इतके त्याकडे दुर्लक्ष झाले. कारण भारतीयांना क्रिकेटमध्येही ‘सेलिब्रिटी’ हवे असतात. त्यांना खेळाच्या आनंदापेक्षा कोण खेळतो, यात अधिक रस असतो. रोजच्या ताणतणावांमुळे जगणे जसे आक्रसायला लागले, तसे खेळात रस असणाऱ्यांनाही चटपटीतपणा हवासा वाटू लागला. ट्वेन्टी-२० हा त्याचाच आविष्कार ठरला. खेळाडू समाजातले हीरो झाल्याने, त्यांच्या खेळापेक्षा त्यांच्या हीरोगिरीलाच अधिक महत्त्व मिळू लागले. त्यामुळे चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्या ५० हजार धावा आणि राहुल द्रविडबरोबर निवृत्ती याचेच अप्रूप जास्त राहिले. आयपीएलपाठोपाठ मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली खरी, पण विश्वचषक किंवा आयपीएल, या सामन्यांची सर यंदाच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेला नक्कीच आली नाही. स्पर्धेच्या साखळी फेरीपर्यंत तर सामन्यांची काहीच चर्चा होत नव्हती. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतात क्रिकेटवर ही वेळ यावी, हे नक्कीच आश्चर्यकारक आहे; पण त्याला कारणेही तशीच आहेत. आयपीएलसारखीच ही लीग स्पर्धा असली तरी या दोघांचीही तुलना करता येणार नाही. आयपीएलच्या संघात अधिकाधिक भारतीय खेळाडू कसे दिसतील आणि परदेशातील नावाजलेले खेळाडू कसे खेळतील याची दखल घेतली. त्याचबरोबर ज्या पद्धतीने आयपीएलचे मार्केटिंग करण्यात आले, त्यामुळे आयपीएलला एक वलय प्राप्त झाले. पण चॅम्पियन्स लीगची मांडणी वेगळी होती. त्यामध्ये प्रत्येक देशाचे स्थानिक विजेते संघ सहभागी झाले. आता या लीगमध्ये ओटॅगो आणि लायन्स यांच्यामध्ये सामना असेल तर भारतीय तो का पाहतील, हा प्रश्न निर्माण झाला, याचे कारण क्रिकेटप्रेमींना खेळापेक्षा व्यक्तीमध्ये अधिक रस वाटू लागला आहे. संघ आणि त्यातील बरेचसे खेळाडू ओळखीचे नसल्याने चॅम्पियन्स लीग जास्त लोकप्रिय होऊ शकली नाही. वर्षभरापूर्वी ही स्पर्धा गुंडाळण्याचा प्रयत्नही झाला होता, पण तो असफल ठरला. चॅम्पियन्स लीगकडे लोकप्रियतेने पाठच फिरविल्यामुळे स्पर्धेची मिळकत कमी झाली. त्यामुळेच प्रसारण हक्काचे भावही घसरले आणि एकंदरीत ही स्पर्धा आता पांढरा हत्ती वाटू लागली आहे. स्पर्धेच्या साखळी सामन्यांपर्यंत कोणालाही रस नव्हता. कोण जिंकले, कोण हरले याच्याशी काहीही घेणेदेणे नव्हते. पण उपांत्य फेरीत भारताचे तीन संघ आल्यावर मात्र स्पर्धेने जम पकडला. स्पर्धेचा अंतिम सामना चांगलाच लोकप्रिय झाला तो सचिन आणि राहुल द्रविड यांच्या निवृत्तीमुळे. क्रिकेट विश्वातील हे दोघेही महान खेळाडू ट्वेन्टी-२० क्रिकेटला अलविदा करणार, हे कळल्यावर लोकांनी हा सामना उचलून धरला; पण या दोन्ही खेळाडूंनी साफ निराशा केली. पण उपांत्य फेरीत भारताचा एकही संघ आला नसता, तर ही स्पर्धा एवढी नक्कीच गाजली नसती. सध्याच्या क्रिकेट वर्तुळाचा केंद्रबिंदू भारत आहे, हे समजून घ्यायला हवे. आयपीएल त्यामुळे यशस्वी ठरले आणि चॅम्पियन्स लीग अपयशी. त्यामुळेच चॅम्पियन्स लीग कुठेही खेळवण्यात आली तरी ती अपयशी ठरणार असेल, तर बीसीसीआयला हा पांढरा हत्ती पोसण्यात कोणती धन्यता वाटते, कोणास ठाऊक .