scorecardresearch

असे घडले होते भारतात बुद्धिबळातील फसवणुकीचे एक प्रकरण…

संयोजकांनी अचानक मेटल डिटेक्टरने सर्वांची तपासणी करायचे ठरवले आणि तो पकडला गेला…

A cheating case highlighted in Chess few years back...
असे घडले होते भारतात बुद्धिबळातील फसवणुकीचे एक प्रकरण…

आशीष थत्ते

मॅग्नस कार्लसनने सिन्कफिएल्ड कपमधून माघार घेतल्यामुळे बुद्धिबळ जगतात अक्षरशः धुराळा उडाला आहे. गेले सुमारे आठवडाभर नुसता गोंधळ सुरू आहे! त्यात भर टाकली ती हिकारू नाकामुराने. कोव्हिडकाळात बुद्धिबळाच्या थेट प्रसारणाचे पेव फुटले होते त्यात ग्रँडमास्टर नाकामुराला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली, कारण तो स्वतः उत्कृष्ट बुद्धिबळपटू आहे आणि त्याची बोलण्याची थोडीशी वेगळी शैली. या वादात त्यानेही उडी घेतली आणि हॅन्स निमनचे अनेक दोष दाखवून त्याने फसवणूक केल्याची शक्यता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यात मुखत्वेकरून सुरुवातीच्या चाली अतिशय वेगळ्या होत्या. मोठे खेळाडू सहसा खेळत नाहीत अशा चाली हॅन्स खेळला. त्यात काळ्या मोहऱ्यांनी जगज्जेत्याला हरवणं तसं अवघडच. तेही सुमारे ५४ डाव सलग पारंपरिक प्रकारात मॅग्नस हरला नव्हता. दुसरे म्हणजे हॅन्स स्वतःच्या खेळाचे विश्लेषण करतो, तेव्हा त्याचा दर्जा २७०० रेटिंग असल्याचा अजिबात नसतो असे नाकामुराने सांगितले. हॅन्सचे रेटिंग ज्या वेगाने वाढले ते थोडेसे अविश्वसनीय होते असेही नाकामुराने सूचित केले. हॅन्सच्या समर्थनार्थ काही बुद्धिबळपटू उतरले आणि त्यांनी हॅन्स कसा मेहनत करतो किंवा त्याला काही डाव कसे माहीत होते वगैरे मुद्दे मांडले. यात महत्त्वाचे म्हणजे स्वतः मॅग्नसने कुठेही हॅन्स चीटिंग करतो असे म्हटले नाही. पण त्याच्या फुटबॉल प्रशिक्षकांनीही तसे सूतोवाच केले, पण त्यांनीही कुठेही तसा थेट आरोप केला नाही.

हॅन्सनेदेखील भली मोठी मुलाखत देऊन आपली बाजू मांडली आणि स्पष्ट सांगितले की, त्याला खेळातून निष्कासित करण्यात मॅग्नस आणि नाकामुराने जे काही केले आहे त्याबद्दल तो त्यांना माफ करणार नाही. महत्त्वाचे म्हणजे सामनाधिकाऱ्यांना कुठलीही गोष्ट चुकीची आढळली नाही. पण खबरदारी म्हणून त्यांनी या स्पर्धेच्या खेळाचे थेट प्रक्षेपण सुमारे १५ मिनिटे उशिरा केले आणि थेट पटावरच्या खेळी दाखवण्यावर बंदी घातली. यामुळे संशय अधिकच वाढला. आता याचा दुसरा अंक मॅग्नस स्वतः याविषयी बोलेल तेव्हा सुरू होईल. या लेखाचा उद्देश या वादाची माहिती देणे नसून या खेळातील भारतात घडलेल्या आणि विस्मृतीत गेलेल्या एका मोठ्या फसवणुकीची आठवण करून देण्याचा आहे.

भारतात २००० सालानंतर स्मार्टफोन हे तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणात व परवडणाऱ्या किमतीत मिळू लागले होते. आमच्या काळात चक्क फोनवर बोलता बोलतादेखील खेळता यायचे! आता खेळताना फोन तर सोडाच साधे मनगटाचे घड्याळसुद्धा घालू शकत नाही. ही घटना घडली तेव्हा मी स्वतः खेळणे बंद केलेले होते, पण माहिती मात्र मिळत होती. भारतात दोन खेळाडूंचा अचानक बोलबाला सुरू झाला. त्यापैकी एक म्हणजे दिवाकर प्रसाद सिंग आणि दुसरा उमाकांत शर्मा. ज्या वेगाने विश्वनाथन आनंदही आपले रेटिंग वाढवू शकला नव्हता त्यापेक्षा जास्त वेगाने या दोघांनी रेटिंग वाढवले. नुसते वाढवले नाही तर २४०० ते २५०० पर्यंत म्हणजे जवळजवळ ग्रँडमास्टर पदाच्या रेटिंगपर्यंत नेले. उमाकांत यात आघाडीवर होता. उमाकांतबरोबर जे लोक खेळले त्यांनी अनेकदा सांगितले की त्याचा खेळ अविश्वसनीय होता, पण त्याच्या रेटिंगला साजेसा नव्हता. खेळाडूंना शंका होती, पण सिद्ध करता येत नव्हते. त्या वेळेला धातू संशोधक यंत्र (मेटल डिटेक्टर) ही सहज मिळत नव्हते. त्यातच नोव्हेंबर २००६च्या आसपास दिल्लीमध्ये एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उमाकांत ४ पैकी ४ गुण मिळवून राहुल शेट्टी या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय मास्टरबरोबर खेळायला उतरला. डोक्यावर कानटोपी घालणे काही दिल्लीच्या थंडीत नवीन नव्हते, पण उमाकांत काही तरी चुकीचे करतो आहे, याचा राहुलला अंदाज आला होता. डाव सुरू झाल्यावर संयोजकांनी अचानक मेटल डिटेक्टरने सर्वांची तपासणी करायचे ठरवले आणि अपेक्षेप्रमाणे उमाकांत पकडला गेला. त्याच्या टोपीमध्ये ब्लूटूथचे एक यंत्र शिवून ठेवले होते. तो त्याचा वापर नेमका कसा करायचा याबाबत फार काही माहीत नव्हते, पण राहुलच्या सांगण्याप्रमाणे अत्यंत हळुवारपणे कसला तरी आवाज यायचा हे त्याला नंतर उमगले. उमाकांतवर अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेने २००६ मध्ये १० वर्षांची बंदी घातली आणि त्यानंतर उमाकांत शर्मा कधी कुठे खेळल्याचे मला आठवत नाही. अशीच शंका नेहमीच टोपी घालून खेळणाऱ्या दिवाकर सिंगबाबतही होती, पण तो कुठे पकडला गेला नाही आणि हल्ली तोही फार खेळताना दिसत नाही. दिवाकरनेही एक्सरे, एमआरआय वगैरे करण्याची तयारी दाखवली. संघटनेने केलेल्या चौकशीत उमाकांतकडील त्या काळात कुणाकडेही न आढळणाऱ्या अत्यंत महागड्या फोनचाही उल्लेख आहे. फसवणुकीची आणखीही काही प्रकरणे आढळली, पण भारतात गाजलेले आणि तंत्रज्ञानाचा वापर होणारे कदाचित हे पहिलेच.

यापुढच्या काळात अशाच आणखी काही घटना घडल्या तर हॅन्स खरेच काही फसवणूक करत होता का आणि करत असल्यास कशी करत होता की पूर्वीच्या काही जगज्जेत्यांप्रमाणेच मॅग्नसचीसुद्धा उदयोन्मुख खेळाडूचे मानसिक खच्चीकरण करण्याची ही एक पटाबाहेरील खेळी होती, ते समजेल.

@AshishThatte

ashishpthatte@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-09-2022 at 10:15 IST
ताज्या बातम्या