– शिरीषकुमार गावित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहेब – कोण आहे रे तिकडे..? सरदारांना बोलवा आणि आज जनतेसमोर मला काय मुद्दे मांडायचे आहेत ते लिहून आणा.

सरदार – साहेब जनतेत गेल्यावेळीसारखी लाट तयार होताना दिसत नाही.

साहेब – होईल होईल, त्याची चिंता नको. हे सांगा की जनतेत सध्या कशाची चर्चा जास्त आहे?

सरदार – एकंदरीत बऱ्याच गोष्टी आहेत साहेब. पूर्वेपासून उत्तरेपर्यंत. कुठून सुरुवात करू समजत नाहीये.

साहेब – काय….? भव्य रामलल्लाचं मंदिर जनतेसाठी बांधलं त्याचं काहीच महत्व नाही काय? ही जनता समजते काय स्वतःला? नक्कीच यांच्या मागे हे विरोधक असणार. असं असेल तर तत्काळ त्यांच्यामागे ईडी- पिडा लावा आणि आम्हास शरण यावयास भाग पाडा. बरं तुम्ही पूर्वेपासून सुरू करा.

हेही वाचा – लेख : आमच्या उत्तराधिकाऱ्यांपुढचा काळ अधिक कठीण!

सरदार – हुकूम ते पूर्वेकडे मणिपूरच्या…

साहेब – पुरे… किती वेळा सांगितलं, की असे क्षुल्लक विषय मला सांगत जाऊ नका म्हणून. मी इतर देशी संमेलने करू की अशा छोट्या गोष्टींवर माझा वेळ वाया घालवू? पुढं बोला.

सरदार – साहेब ते आपल्या अरुणाचल भागावर शत्रू आपला हक्क सांगतोय आणि तिथल्या खेड्यांची नावं पण त्यांनी बदलली आहेत. खुद्द स्थानिक जनता आणि विरोधक खुलेआम बोलू लागले आहेत.

साहेब – हे बघा मी जनतेला कचाथीवू बेटाचा मुद्दा रेटून सांगतोय त्यामुळे जनतेला पूर्वेकडे काय चाललंय याचा थांगपत्ता लागता कामा नये. आपल्या सर्व माध्यमांना तसे आदेश द्या. जनता २४ तास केवळ आम्हासच बघेल, याची काळजी घ्या.

सरदार – पण… साहेब, माध्यम स्वातंत्र्याचं काय? दुसरी सरकारं यावर चिंता व्यक्त करतायत.

साहेब – त्यांच्याही मागे ईडी लावा मग.

सरदार – नाही साहेब ते आपल्या अखत्यारीत येत नाहीत.

साहेब – मग त्यांना कळत नाही का? अश्ववेगाने आमच्या राज्याची घोडदौड सुरू असताना असं काही बोलण्याची गरज का? असो त्यांचे अहवाल आपल्या भोळ्या जनतेला दिसणार नाहीत, याची व्यवस्था करा.

सरदार – जी हुजूर, पण ते लडाख प्रांतातसुद्धा धुसफुस सुरू आहे. आपण म्हणाला होतात, की त्यांना सहाव्या अनुसूचित समाविष्ट करू म्हणून, पण तसं न झाल्यामुळे जनता रस्त्यावर आली आहे.

साहेब – हे बघा, चुकून माझ्या तोंडून ते गेलं असेल. असं बऱ्याचदा होतं माझ्याकडून, हवं तर तो जुमला होता अस प्रसिद्ध करा. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घ्यायची गरज नाही.

सरदार – सरकार आपल्या देशी महागाई आणि बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, असं जनता म्हणतेय.

साहेब – हे आता काय नवीन घेऊन आलात? प्रत्येकाला १५ लाख रुपये रोख देऊनसुद्धा जनतेची ही मजाल? दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊनसुद्धा यांची हिंमत कशी होते यावर बोलायची? अगदीच कोणी उरलं असेल त्यांना पकोडे तळायचा सल्ला दिला होता मी. वाटल्यास मंदिरांच्याबाहेर जागा द्या अशा होतकरूंना.

सरदार – साहेब अन् ते शेतकरी तुम्ही आश्वासन दिलेल्या पीक हमीभावाच्या अंमलबजावणीची वाट पाहतायत. काहींनी तर आपल्या दरबाराच्या दिशेने कूचसुद्धा केली आहे.

साहेब – काय? एवढी जुर्रत? तातडीने आपलं सैन्य पाठवा आणि त्यांचे रस्ते अडवा, लाठीमार करा कोणत्याही परिस्थितीत ते इथवर पोहोचता कामा नयेत. त्यांना गद्दार, खलिस्तानी वगैरे घोषित करा.

सरदार – जी हुजूर!

साहेब – आणि हो विरोधक जास्त प्रश्न विचारत असतील तर त्यांना जेरबंद करा त्यासाठी वाटेल ती किंमत मोजा. जे शरण येतील त्यांना शरण द्या, पण कोणी प्रश्न विचारता कामा नये याची दक्षता घ्या.

सरदार – साहेब आणि ते आपल्याला प्रचंड दान आलं आहे, त्याबद्दलदेखील बरीच चर्चा सुरू आहे दूरवर, अगदी आपल्या दरबारातील खजिनदार बाईंचे पतीसुद्धा काय काय म्हणत आहेत. साहेबांनी जगातला सर्वांत मोठा घोटाळा केलाय, ते धार्मिक ध्रुवीकरण करून जनतेला मूर्ख बनवतायत, एवढंच नव्हे तुम्ही राजगादीवर पुन्हा विराजमान झाल्यावर हुकूमशाही येणार असं सगळं म्हणताहेत ते.

साहेब – (मिश्किलपणे हसत) हे बघा, श्री कृष्णालादेखील सुदाम्याने भेटवस्तू दिल्याच होत्या ना मग मला देणगी आल्यावर त्यांना पोटशूळ का? असो माझ्या ‘मन की बात’ची वेळ झाली.

सरदार – आणि महत्वाचे हुजूर, की आपल्याच दरबारातील स्वामी नामक व्यक्ती तुम्ही पुन्हा राजगादीवर बसलात तर आपल्या राज्याचं वाटोळं होईल असं म्हणतायत. तसेच आपले पूर्वाश्रमीचे सोबती जत्यपाल म्हणत आहेत की केवळ आपणामुळे आपल्या सैनिकांचे जीव गेले.

साहेब – या सगळ्याचे खापर आधीच्या सरकारांवर फोडा आणि अशा बातम्या जनतेला कोणी दाखवत असेल त्याला आपला इंगा दाखवा. आणि हो आपण वेषांतर करून जनतेत काय परिस्थिती आहे याची शहानिशा करावी, असा आदेश मी दिला होता, त्याचं काय झालं?

सरदार – जी सरकार, मी वेषांतर करून गेलो असता रस्त्याच्या कडेला बसलेल्या भिकाऱ्याच्या पोराला मी विचारलं की राममंदिर बांधलंय तर खुश आहेस ना? म्हण बघू ‘जय श्री राम!’ तर तो काय म्हणाला माहितीये? उपाशी आहे साहेब दोन दिवसांपासून. पुढे जाऊन एका मुलीला विचारलं, की कसं चालू आहे ताई आपल्या रामराज्यात? तर म्हणाल्या, खूप छान… स्त्रियांची नग्न धिंड, बलात्कारींना राजांचे संरक्षण एकंदरीत छानच म्हणायचे.

हेही वाचा – ‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…

साहेब – मी रामराज्य आणल्याचं काही गांभीर्य आहे की नाही? भूक, बेरोजगारी, महागाई, बलात्कार असे मुद्दे महत्त्वाचे वाटूच कसे शकतात श्रीरामासमोर?

सरदार – बरं साहेब ते विरोधक बाहेर आले आहेत, आपल्या सोबत काम करायचं म्हणून आपली सदिच्छा भेट घेऊ म्हणताहेत.

साहेब – हे बघा त्यांच्या वरच्या सर्व ईडीपिडा दूर करा आणि त्यांना पावन करून घ्या आणि जोरात कामाला लागा.

(असे म्हणत साहेब ‘मन की बात’ करायला निघून गेले)

gavitshirish999@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A satire on government and challenges in front of it ssb
First published on: 16-04-2024 at 09:33 IST