उषा अशोक बढे
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला यश आले आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत मराठी मनात चैतन्य निर्माण करत आले आहे, वीरश्री जागवत आले आहे… या गीताच्या निर्मितीपासून त्याला राज्यगीताचा दर्जा मिळेपर्यंतच्या प्रवासाविषयी…
भारत स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष (२०२३) साजरे करत होता. तो आनंद आमच्याही घरात होताच, मात्र त्यादरम्यान आम्हाला एक बातमी समजली, जी आमच्या या आनंदावर कळस चढवणारी ठरली. आपल्या गीतांनी मराठी माणसाला चांदण्यात न्हाऊ घालणाऱ्या कवीश्रेष्ठ राजा बढे यांनी रचलेले ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्र राज्याचे अधिकृत राज्यगीत होणार असल्याचे कळले. राजाराम निळकंठ बढे म्हणजेच कविश्रेष्ठ राजा बढे यांनी आपल्या लेखणीने जे निर्माण केले त्याला मराठी साहित्य, कलाक्षेत्रात अढळस्थान आहे. त्यातीलच प्रत्येक मराठी मनावर कोरले गेलेले आणि ओठांवर अभिमानाने रुळणारे गीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ची ही कथा…

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळे मराठी माणूस जात-पात-पक्ष भेद विसरून एक झाल्यावर दिल्लीही हादरवू शकतो, हे देशाने पाहिले. मराठी माणसाच्या एकजुटीने १०५ हुतात्मे देऊन हा लढा यशस्वी केला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची घोषणा झाली. या प्रसंगात आपलाही सहभाग असावा या हेतूने एचएमव्ही कंपनीने महाराष्ट्र गीते ध्वनिमुद्रित करण्याचा निर्णय घेतला. राजा बढे आणि चकोर आजगावकर यांच्या प्रत्येकी एका गाण्याची निवड झाली. त्यांच्या शब्दांना संगीतात गुंफले श्रीनिवास खळे यांनी. शाहीर साबळे ही गाणी गातील, यावर शिक्कामोर्तब झाले. शाहीर तेव्हा एका मुक्तनाट्याच्या प्रयोगात व्यग्र होते. त्यांनी नकारच दिला, मात्र श्रीनिवास खळे म्हणाले, ‘मी स्वत: तुमच्याकडे येतो. आपण कसून रिहर्सल करू, पण हे गाणे तुमच्याच आवाजात व्हायला हवे.’ या साऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि हे स्फूर्तिदायक आणि स्वाभिमानयुक्त गीत रेडिओवर सर्वांत प्रथम शाहीर साबळेंच्या पहाडी आवाजात प्रसारित झाले…

‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत व्हावे, यासाठी माझे पती दिवंगत अशोक बढे अनेक वर्षे राज्य सरकारशी पत्रव्यवहार करत होते. कविवर्य राजा बढे हे अशोक बढेंचे चुलत बंधू राजा बढे प्रसिद्धीपराङ्मुख होते. घराच्या अंगणात लतामंडपाखाली ते आपल्याच विचारांत लिहीत बसायचे. हारतुऱ्यांसाठी त्यांचे लेखन कधीच नव्हते. विधानसभेतील सन्माननीय सदस्यत्वही त्यांनी नाकारले होते. मूळ नागपूरचे असलेले राजा बढे यांचे आदरातिथ्यही भारी, जिव्हाळ्याचे होते. लेखक, कवी, नाटककार, गायक, संगीतकार यांचा गोतावळा त्यांच्याभोवती असे. ते नावाप्रमाणेच रूपाने राजबिंडे व्यक्तिमत्त्व असलेले पण प्रवृत्तीने संत होते. ते लिखाण करत आणि ठेवून देत. कोणी विचारलेच तर ते लिखाण किंवा गीत देत असत. ‘काव्यशास्त्र विनोदेन कालोगच्छती धीमताम्’ या उक्तीची प्रचीती येत असे. त्यांचे साहित्य नि कलाकृती आठवणींसह लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून आम्ही पती-पत्नीने काही कार्यक्रम आयोजित केले. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेले ‘स्वरचादणं’ आणि ‘चांदणे शिंपीत जाशी’ हे दोन कार्यक्रम त्यातीलच. म्हणूनच आम्ही दोघांनी ‘राजा बढे – एक राजा माणूस’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात अनेक मान्यवरांचे लेख आहेत.

मराठी माणसाचा स्वाभिमान जागवणारा, महाराष्ट्राची महती, देदीप्यमान इतिहास, निसर्गसंपन्न भूमी, कृष्णा, कोयना, वरदा, गोदावरी या नद्यांचा उल्लेख, आसमानी सुलतानीला भिडणारी काळी सह्याद्रीसम छाती, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोट, डोंगरदऱ्या, शिवशंभूची गर्जना याचे दर्शन घडवणारे ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत व्हावे म्हणून अशोक बढे दोन वर्षे राज्य सरकारशी पत्रव्यवहार करत होते. वयोमानानुसार घराबाहेर पडता येत नाही, म्हणून ते पत्राद्वारे विनंती करत- ‘राजा बढे यांना कोणी पुढे आणले नाही. त्यांचे साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असेल तर हे राज्यगीत व्हायला हवे.’ अशात त्यांची प्रकृती खालावून ते अंथरुणाला खिळले. यावेळी त्यांचा नागपूरचा भाचा अजय राजकारणे त्यांना भेटायला आला असता त्यांनी त्याच्याजवळ ही इच्छा बोलून दाखवली. अजयने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योगायोगाने भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यगीताचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यासाठी तीन उत्तम गीतांची निवड करून त्यातील ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे ऐकून अंथरुणावर खिळून असलेल्या अशोक बढे यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. त्यांच्या मुखातून समाधानाचे शब्द आले, ‘माझ्या भावाला न्याय मिळाला’ आणि पुढे काही दिवसांनी त्यांनी देह ठेवला. शाहीर साबळे, शाहीर अमर शेखांपासून आताच्या स्वरनिनाद संस्थेचे सचिन झापडेकर, नरवीर प्रकाशनाचे लेखक, प्रकाशक विलास पायगुडे यांच्यापर्यंत हे महाराष्ट्र गीत कुठल्याही समारंभात गेले तरी अभिमानाने गातात. पण राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि अन्यत्रही हे गीत अभिमानाने म्हटले जाते याचा आनंद आहे. हे महाराष्ट्र गीत प्रा. भवानीशंकर पंडित यांनी १९७६ या वर्षी प्रकाशित केलेल्या ‘मंदिका’ या काव्यसंग्रहात प्रथमत: छापील स्वरूपात प्रसिद्ध केले होते. या सरकारमान्य गीतातील दोनच कडवी निवडलेली आहेत. अखेर प्रा. भवानीशंकर पंडित यांचे शब्द आठवतात, ‘राजा बढेंनी प्रदीर्घ काळ अगदी निष्कामपणे महाराष्ट्र शारदेची पूजा बांधली आहे. ती त्यांना योग्य काळी योग्य फळ दिल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी श्रद्धा आहे.’