विकासाच्या अनेक मुद्द्यांकडे देशातील अभिजन वर्ग डोळे उघडून पाहायचेच नाकारतो आहे आणि हीच मानसिकता दुर्दैवाने तळापर्यंत पसरत चालली आहे. संघ, भाजपचे आजच्या राजकारणावरील प्रभुत्व हे आपल्याला वास्तवापासून दूर नेणारे ठरते…
मिलिंद मुरुगकर,आर्थिक, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक
संघ-भाजपच्या गेल्या दहा वर्षांतील सततच्या धर्मवादी राजकारणाने आपल्या देशाला ग्लानी आली आहे आणि ही ग्लानी देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी चांगली नाही. भारताला, म्हणजे भारतातील अभिजन वर्गाला बौद्धिक ग्लानी आली आहे. धर्माभिमान, धर्मद्वेष आणि त्यावर ‘विश्वगुरू’ असल्याच्या भावनेचा लेप या त्रिगुण संयोगाने ही ग्लानी आली आहे. या ग्लानीची अनेक उदाहरणे देता येतील. अलीकडे आलेले दोन अनुभव- एका महाविद्यालयातील मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांना एक प्रश्न विचारला. ‘आपला देश आर्थिक प्रगतीच्या निकषावर जगात पहिल्या दहा देशांमध्ये आहे असे किती विद्यार्थ्यांना वाटते?’ निम्म्याहून अधिक हात वर झाले. पुढे विचारले पहिल्या २० देशामंध्ये आहे असे किती जणांना वाटते, मग आकडा ३०, ४० असा वाढवत नेला. जवळपास सर्व विद्यार्थ्यांना भारत पहिल्या २० देशांमध्ये आहे असे वाटत होते, पण भारत पहिल्या शंभर देशांतदेखील नाही, हे समजल्यावर त्यांना धक्काच बसला. देश जगात १३६ व्या स्थानावर आहे हे सत्य त्यांना स्वीकारताच येत नव्हते.
चीनदेखील अजून विकसित देश नाही. तो विकसनशील देश आहे, हादेखील त्यांना धक्का होता. २०४७ पर्यंत आपण विकसित राष्ट्र होणार अशी त्यांची खात्री होती आणि आज चीन आपल्यापुढे आहे म्हणजे तो विकसित असणारच असेही वाटत होते त्यांना, पण चिनी नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा पाचपट जास्त कमावतो आहे आणि तरीही चीन विकसित राष्ट्र नाही हे विद्यार्थ्यांना प्रचंड धक्कादायक वाटले. जगातील विकसित देश आणि भारत यांच्यातील अफाट अंतर त्यांना अविश्वसनीय वाटले. गेल्या दहा वर्षांत जगाला भारताबद्दल काय वाटते, जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत याची सदैव अतिरेकी चिंता करणाऱ्या भारतातील अभिजन वर्गातील हे विद्यार्थी होते. खरे तर विद्यार्थ्यांची ही समजूत त्यांच्या पालकांमुळेदेखील असते.
दुसरा अनुभव. प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या एका बाईंनी सनातन हिंदू धर्माचे अफाट कौतुक करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली. त्याला दिलेल्या प्रतिसादात मी लिहिले होते की ‘हिंदू परंपरेत अनेक सुंदर गोष्टी आहेत. इस्लामची बंदिस्तता त्यात नाही. मनाची विशालता सांगणाऱ्या खूप उदार परंपरा आहेत. पण या उदार परंपरेतील काही परंपरा, प्रथा अतिशय वाईट, हिणकसदेखील आहेत आणि त्यात शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या आणि आजही प्रभावी असलेल्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ केवळ काही दशकांपूर्वी आपली विष्ठा काही विशिष्ट जातींतील लोक हाताने काढायचे, डोक्यावरून वाहायचे आणि आजदेखील त्याच जातीतील लोक कचरा गोळा करतात. ड्रेनेजच्या पाइपमध्ये उतरतात आणि काही गुदमरून मरतात.’ माझ्या या वाक्यावर या बाई फणकारल्या की ‘माझ्या लहानपणी आमच्याकडे सेप्टीकचे संडास होते. कोणालाच मैला नाही वाहावा लागला.’ आता यावर काय बोलणार? सनातन हिंदू धर्माची महती गाणाऱ्या या बाईंनी आपली दृष्टी अचानक अशी अतिशय सूक्ष्म केली. त्यांची भूमिका स्पष्ट होती. त्यांच्या लहानपणी सेप्टीकचे संडास होते याचा अर्थ सनातन भारतवर्षात आपण कोणालाच विष्ठा वाहण्याची अमानुष वागणूक शतकानुशतके दिली असण्याची शक्यताच नाही.
स्पृश्य-अस्पृश्य, शुद्ध-अशुद्ध याबाबतीतील आपल्या ‘सनातन’ धारणा आजही भारताच्या विकासामध्ये कसा मोठा अडथळा आहेत, याची प्रभावी मांडणी डीन स्पीयर्स आणि डीयन कॉफे या दोन अर्थतज्ज्ञांनी अलीकडे केली आहे. उघड्यावर शौचाला जाण्याची पद्धत आणि भारतातील बालमृत्यूचे, कुपोषणाचे मोठे प्रमाण यांचा संबंध तर स्पष्टच आहे. विष्ठेतील जंतू जमिनीतून पाण्यात जातात. तेथून नवजात अर्भकांच्या शरीरात जातात. बऱ्याच मुलांचे पोट बिघडलेले असते. त्यातील काही मुले मरतात काही कुपोषित राहतात. जगलेली कुपोषित बालके जन्मभर बुद्धीचा विकास न झालेली असतात. आणि म्हणून दारिद्र्यात राहतात. देशातील लोकांचे आरोग्य आणि त्या देशातील लोकांची मिळकत याचा थेट संबंध असतो. ६० कोटी भारतीय उघड्यावर शौचाला जाण्याचा आकडा ‘स्वच्छ भारत मिशन’ सुरू होण्यापूर्वीचा असला, तरी आजही हे प्रमाण मोठे आहे. २०१८ साली उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनुक्रमे ३९ आणि ६० टक्के लोक उघड्यावर शौचाला जात होते.
हे दोन अर्थतज्ज्ञ या विषयाच्या खूप खोलात उतरतात. भारतात बालमृत्यूचे प्रमाण किती मोठे आहे? जागतिक बँकेकडे आकडेवारी असलेल्या १९४ देशांत भारताचा क्रमांक खालून ४४ वा लागतो. म्हणजे १५० देशांत बालमृत्यूचे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे. आपण ब्रिक्सचे सदस्य आहोत. या गटातील चीन, ब्राझील आणि रशिया या तीन देशांत बालमृत्यूचा जो दर आहे त्याच्या तिप्पट दर आपल्या देशातील बालमृत्यूचा आहे. बांगलादेश केनिया, रवांडा या देशांत बालमृत्यूचे प्रमाण आपल्यापेक्षा कमी आहे. फक्त गरिबी हेच कारण आहे का? धक्कादायक गोष्ट अशी की भारताइतक्याच गरीब देशांपेक्षा भारतात बालमृत्यूचे प्रमाण २० टक्के जास्त आहे. हे जे २० टक्के अधिकचे मृत्यू आहेत त्यांचे कारण फक्त गरिबी हे नाही. आपल्या देशात दरवर्षी आठ लाख २५ हजार मुले पाच वर्षांची होण्याआधीच मृत्युमुखी पडतात. आपल्या इतकीच गरिबी असलेल्या देशांइतकेच बालमृत्यूंचे प्रमाण असते तर हा आकडा सुमारे साडेसहा लाख इतका असता. म्हणजे फक्त गरिबी हे कारण असते तर एक लाख ७० हजार बालमृत्यू टळले असते. या उरलेल्या एक लाख ७० हजार मुलांच्या मृत्यूचा संदर्भ गरिबीशी नाही. हा अधिकचा बालमृत्यूचा आकडा किती मोठा आहे हे जागतिक संदर्भात समजावून घ्यायचे असेल तर हे लक्षात घ्यावे लागेल की दक्षिण आणि उत्तर अमेरिका खंडातील सर्व देशांत एकूण जितके बालमृत्यू होतात तेवढा मोठा हा आकडा आहे. स्पीयर्स आणि कॉफे हा मुद्दा मांडून मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक आजदेखील उघड्यावर शौचाला का जातात, शौचालये वापरली का जात नाहीत या प्रश्नाचा खोलवर शोध घेतात. हा प्रश्न आपल्या स्पृश्य-अस्पृश्यतेच्या, शुद्धतेच्या धारणा असलेल्या मानसिकतेशी, जातीप्रथेशी कसा जोडलेला आहे आणि म्हणून या समस्येचे मूळ सांस्कृतिकदेखील आहे अशी प्रभावी मांडणी ठोस आकडेवारी आणि तर्काच्या सहाय्याने हे अर्थतज्ज्ञ करतात. या जटिल समस्येवर उपाय सुचवतात.
अशी मांडणी आजच्या आपल्याला ग्लानिर्भूत करणाऱ्या विश्वगुरूवादी, राष्ट्रवादी वातावरणात स्फोटक ठरणे आणि म्हणून दुर्लक्षिली जाणे स्वाभाविक आहे. पण बालमृत्यू, कुपोषण हा विकासाच्या संदर्भातील सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी फक्त एक मुद्दा. हा प्रश्न सोडवायचा असेल तर खुलेपणाने त्याकडे पाहावे लागेल. हा झाला एक मुद्दा. पण विकासाच्या अशा अनेक मुद्द्यांकडे देशातील अभिजन वर्ग डोळे उघडून पाहायचेच नाकारतो आहे. आणि हीच मानसिकता दुर्दैवाने खाली पसरत चालली आहे. संघ, भाजपचे आजच्या राजकारणावरील प्रभुत्व हे आपल्याला वास्तवापासून दूर नेणारे आहे. याची देशातील वैचारिक नेतृत्व करणाऱ्या उच्च माध्यम, मध्यम वर्गाच्या मानसिकतेवरील पकड दूर करणे देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने आज महाराष्ट्रात धार्मिक अस्मितेला छेद देणारे भाषिक अस्मितेचे राजकारण सुरू आहे. इथे तमिळनाडूच्या भाषिक अस्मितावादी राजकारणाची आठवण होणे स्वाभाविकच. शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांत या राज्याने इतर राज्यांच्या तुलनेत अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे. नागरिकांच्या दरडोई उत्पन्नाच्या निकषावर या राज्याचा क्रमांक नेहमीच वरचा राहिला आहे. तमिळनाडूच्या प्रगतीशी तेथील भाषिक अस्मितेच्या राजकारणाचा काही संबंध आहे का, याची चर्चा नेहमीच होत असते. कोविडच्या काळात प्राथमिक शाळेतील मुलांचे नुकसान त्यांच्या पुढील आयुष्यावर कायमचा परिणाम करणार आहे हे लक्षात घेऊन तमिळनाडूने त्या मुलांसाठी विशेष शिक्षण देण्यासाठी प्रभावी योजना आखली. त्याची जगभर चर्चा झाली. भाषिक अस्मितेचे राजकारण सर्वसामान्य गरीब लोकांच्या विकासाशी कटिबद्ध ठरू शकते याचे हे राज्य एक उदाहरण आहे. उद्धव आणि राज भाषिक अस्मितेचे राजकारण असे खोलवर नेतील, असे मानण्यास ऐतिहासिक आधार नाही, पण त्यांच्या एकत्र येण्याने विरोधी पक्षात थोडी धुगधुगी निर्माण होईल. हिंदी हिंदू हिंदुस्थान या विश्वगुरूवादी राष्ट्रवादाने समाजमनावर जी ग्लानी आली आहे ती उतरवणे अत्यावश्यक आहे. त्यामध्ये प्रबळ विरोधी पक्षाची मोठी भूमिका आहे. आज विरोधकांचा आवाज खूप क्षीण आहे. कदाचित त्यात ठाकरी वक्तृत्व, ठाकरी भाषा विधायक, परिणामकारक भूमिका बजावू शकेल.
milind. murugkar@gmail. com