मधु कांबळे

जातींच्या अस्मिता टोकदार होत जाण्याच्या सध्याच्या काळात जातिअंताच्या लढाईची अधिक व्यापक पातळीवर जाऊन चर्चा होणे आवश्यक आहे. दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने..

maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti offer cash reward for predict correctly voting
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

महाराष्ट्रात सत्तरच्या दशकात स्थापन झालेल्या दलित पँथर या संघटनेचा या वर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. तशी आज ही संघटना केवळ नावापुरती उरली आहे. तरीही तिचा सुवर्ण महोत्सव का साजरा करायचा, तर दलित पँथरने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक इतिहास घडविला आणि त्याची दखल जागतिक स्तरावरसुद्धा घेतली गेली. परदेशातील मानवतावादी, परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, समाजशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक यांचा पँथर चळवळ ही अभ्यासाचा विषय ठरली आहे. भारतातील सामाजिक बदलांच्या लढय़ाचा इतिहास दलित पँथरच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही. किंबहुना दलित पँथर हे त्या इतिहासातील सुवर्णाक्षरात लिहिलेले पान असेल.

धार्मिक व्यवस्था ही परिवर्तनवादी किंवा विद्रोही चळवळींना जन्म देण्यास कारणीभूत ठरल्याचे जगभरातील परिवर्तनवादी चळवळींच्या अभ्यासातून दिसून येईल. कारण जगातील सर्वच धर्मव्यवस्था या क्रूर, निष्ठुर, माणसांचे शोषण करणाऱ्या, त्यांना गुलाम बनविणाऱ्या आहेत. कार्ल मार्क्‍सलाही कामगार क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडताना, धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणावे लागले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही अडीच हजार वर्षांपासून बुद्धाच्या सामाजिक समतेच्या तत्त्वज्ञानावर चढलेली धार्मिक पुटे समूळ छाटून समाजक्रांतीचे तत्त्वज्ञान म्हणून बौद्ध धम्म या देशासमोर ठेवला. दलित पँथरच्या जन्मालाही या देशातील धर्मव्यवस्थाच कारणीभूत ठरली आहे. सत्तरच्या दशकात दलितांवरील अन्याय, अत्याचारांनी कळस गाठला, तेव्हा त्याविरोधात लढण्यासाठी दलित तरुण आणि साहित्यिक मैदानात उतरले. त्यांच्या लढय़ाचा संघटित आविष्कार म्हणजे दलित पँथर. अगदी पाच-सहा वर्षांचे संघटित आयुष्य लाभलेल्या या संघटनेने धर्मव्यवस्थेची उभी-आडवी चिरफाड करून तिचा दांभिकपणा वेशीवर टांगलाच, त्याचबरोबर तथाकथित विचारवंतांची, समाजशास्त्रज्ञांचीही झोप उडविली.

५० वर्षांच्या कालखंडानंतर आता या संघटनेकडे पाहताना दिसते की जातीय अन्याय, अत्याचारांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या लढाऊ तरुणांची जहाल संघटना म्हणून ती स्मरणात राहील. दलित पँथरचे संस्थापक कोण, तिचे वैचारिक अधिष्ठान काय आणि तिची शकले का झाली या तीन मुद्दय़ांमुळे ती कायम चर्चेत राहिली. मूळ दलित पँथरच्या उदय आणि अस्तानंतर एका तपाने म्हणजे ऐंशीच्या दशकात दलित पँथरची स्थापना कधी झाली आणि तिचे संस्थापक कोण हा वाद बराच गाजला. या संघटनेचे नेतृत्व राजा ढाले आणि नामदेव ढसाळ दोन वादळांनी केले. दलित पँथरचे संस्थापक कोण, ही चर्चा गेली ४० वर्षे सुरू आहे. त्यावर लेख, पुस्तिका, ग्रंथ लिहिले गेले. शरणकुमार िलबाळे, डॉ. लता मुरुगकर, डॉ. पी. जी. जोगदंड यांच्यासारख्या साहित्यिकांनी दलित पँथरच्या अभ्यासाचा भाग म्हणून पुस्तके लिहिली. परंतु महत्त्वाचे म्हणजे दलित पँथरच्या नेतृत्वाच्या फळीतील जे आघाडीचे साहित्यिक, नेते होते, त्या नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार यांनीही पँथरच्या स्थापनेबाबत वाद-प्रतिवाद करणारे लेखन केले. या चळवळीतील महत्त्वाची आणखी दोन नावे म्हणजे अविनाश महातेकर व जयदेव गायकवाड. त्यांनीही पँथरच्या वाटचालीवर आणि फुटीवर भाष्य करणारे लेखन केले आहे. अलीकडेच पँथर चळवळीतील आघाडीचे नेते अर्जुन डांगळे यांचे ‘दलित पँथर एक अधोरेखित सत्य’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. 

दलित पँथरच्या जन्माआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीच्या विचारप्रेरणेने लिहू लागलेले तरुण लेखक प्रस्थापित साहित्याला, समाजव्यवस्थेला धक्के देत मैदानात उतरले होते. त्यातील बहुतांश साहित्यिक दलित पँथरमध्ये सहभागी झाले होते. दलित साहित्य चळवळीतील विद्रोहाचा कृतिशील सांघिक आविष्कार म्हणजे दलित पँथर चळवळ होय, हे अर्जुन डांगळे यांनी पँथरचे अत्यंत समर्पक व सार्थ वर्णन केले आहे. मात्र एक खरे की दलित साहित्यिकांमध्ये आंबेडकर-मार्क्‍स, आंबेडकर-बुद्ध किंवा निखळ आंबेडकरवादी साहित्यिक असा जो एक वैचारिक वाद होता, तो ते संघटनेत घेऊन आले आणि त्या संघर्षांच्या वादळात दलित पँथरनामक तारू दुभंगले.

दलित साहित्यिकांप्रमाणेच दलित पँथरमध्येही आंबेडकरवादी आणि मार्क्‍सवादी असे थेट दोन गट होते. एका बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हेच आमचे प्रेरणास्थान आहे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे बाबासाहेबांनी ज्या मार्क्‍सवादाची भारतातील समाजव्यवस्थेच्या संदर्भात चिकित्सा करून त्यावर भाषणातून, लेखनातून किमान दहा वेळा तरी फुली मारली असेल, तोच घेऊन त्याचा आंबेडकरवादाशी समन्वय साधण्यात काही साहित्यिकांची व तथाकथित विचारवंतांची हयात गेली. अनेकांनी त्यावर जाडजूड ग्रंथ लिहिले. भारतातील जातिव्यवस्था ही शोषण व्यवस्था आहे, तिचा आधार धर्म आहे आणि धर्माचा पाया धर्मशास्त्रे आहेत, ती उखडून टाकल्याशिवाय या देशातील जातिव्यवस्था म्हणजे शोषणव्यवस्था, सामाजिक विषमता नष्ट होऊन समता प्रस्थापित होणार नाही, इतकी सुस्पष्ट, वास्तव आणि सैद्धांतिक मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. तिचे नीट आकलन करून न घेताच, त्यांच्या तत्त्वज्ञानात काही तरी कमी आहे, म्हणून ते मार्क्‍सच्या विचाराने भरून काढायचे, असा बौद्धिक गोंधळ काहींनी गेली अनेक दशके घातला आहे.

मार्क्‍सचे तत्त्वज्ञान हे शोषणमुक्तीचे तत्त्वज्ञान आहे, परंतु ते भारतीय समाजव्यवस्थेला लागू होत नाही, कारण भारतातील सामाजिक विषमतेचे मूळ हे आर्थिक व्यवस्थेत नाही, तर जातिव्यवस्थेत आणि पर्यायाने धर्मव्यवस्थेत आहे. उदाहरणार्थ मार्क्‍सवाद म्हणजे श्रमिकांच्या, कामगारांच्या, मजुरांच्या शोषणमुक्तीचा विचार. कामगारांचे, श्रमिकांचे शोषण कोण करतो तर भांडवलदार. शेतमजुराचे शोषण कोण करतो तर जमीनदार. तर शूद्रातिशूद्रांचे शोषण धर्मव्यवस्थेत सर्वोच्च स्थानावर बसलेला उच्चवर्णीय करतो. परंतु एखाद्या कामगाराला किंवा श्रमिकाला संधी मिळाली तर किंवा कष्टाने भांडवलदार होता येते, शेतमजुरालाही कष्ट करून जमीनदार होता येते. किंवा सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, गरिबाला श्रीमंत होता येते, पण शूद्राला ब्राह्मण होण्याची भारतीय समाजरचनेत काहीही व्यवस्था किंवा तरतूद नाही. आणि तरीही भारतीय समाजक्रांतीसाठी आंबेडकरवाद-मार्क्‍सवाद असा समन्वयवादाचा घाट जे घालतात ते एक तर स्वत:चा बुद्धिभेद करून घेत आहेत किंवा इतरांचा तरी करीत आहेत, असे म्हणावे लागेल. आणखी एक गोष्ट, या देशात मार्क्‍सवाद, समाजवाद स्वीकारणे फार सोपे आहे, कारण त्यात जात आणि धर्म कायम ठेवण्याची सोय आहे. ई. एम. एस. नंबुद्रीपाद यांच्यापासून ते हरकिशनसिंग सुरजीत यांच्यापर्यंत त्याची उदाहरणे देता येतील. ते कट्टर मार्क्‍सवादी होते, परंतु त्यांच्या धर्माची ओळख त्यांनी कधीच पुसून टाकली नाही. त्याला काही अपवाद आहेत, नाही असे नाही. बरे मार्क्‍सवादी, समाजवादी असताना जातीचे, धर्माचे अस्तित्व कायम ठेवता येते आणि पुरोगामी म्हणूनही मिरवता येते, ही त्यातील आणखी चांगली सोय. अवघड आहे तो आंबेडकरवाद स्वीकारणे आणि आंबेडकरवादी म्हणून जगणे. कारण तसे करणाऱ्याला सगळय़ात आधी धर्माला आणि जातीला मूठमाती द्यावी लागते. तीच विचारधारा घेऊन दलित पँथरच्या किंवा आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीच्या केंद्रस्थानी आंबेडकरांनी विचारपूर्वक केलेली धम्मक्रांती आणण्याचा प्रयत्न करणारे एकमेव नेते म्हणजे राजा ढाले. मार्क्‍सवाद की आंबेडकरवाद या वादातून दलित पॅंथरमध्ये फूट पडल्यानंतर काही काळाने ढाले यांनी दलित पँथर ही संघटना बरखास्त केली. परंतु त्यानंतरही दलित पॅंथरच्या नावाने अनेक गट कार्यरत राहिले. मात्र पँथर बरखास्तीचे समर्थन करताना ढाले यांनी जे भाष्य केले आहे, ते फारच महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, ‘कोणत्याही संघटनेला वैचारिक आणि संघटनात्मक अशा दोन बाजू असतात. त्यातील विचार हे संघटनेचे तरल अंग असते. त्याची सतत वाढ होत असते. तर तिचे संघटनात्मक अंग बोजड असते आणि ते या वाढीला अपकारक ठरू शकते. म्हणजे दलित पँथर हा एक विचार होता, तसेच ती एक संघटना होती. आम्ही हा विचार बरखास्त केलेला नाही, तर त्याच्या स्वाभाविक वाढीला जाचक झालेले तिचे संघटनात्मक अंग विसर्जित केले आहे. लोक आज वाहून नेताहेत तो संघटनेचा सांगाडा आहे, विचार नव्हेत. संघटनेशिवाय विचार जगू शकत नाही, आणि विचाराशिवाय संघटना असू शकत नाही. विचारांसाठी संघटना हे आदितत्त्व आहे. संघटनेसाठी संघटना हा वाह्यातपणा आहे, हे या लोकांना कधी कळणार?’ ढाले यांचे हे भाष्य मौलिक आणि मार्मिक आहे. दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आपण पुढे काय घेऊन जाणार आहोत, सांगाडा की विचार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना, १९७२ मध्ये स्वातंत्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत दलित पँथरचा झंझावात निर्माण झाला. आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होताना दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे, म्हणजे आपण नेमके काय करणार आहोत? जातीयवाद संपला का? अत्याचार संपले का? आपण सामाजिक समतेकडे वाटचाल करतो आहोत का, या प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक आहे. दुसरे महत्त्वाचे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, लोकशाहीचा प्राण असलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्यच जायबंदी केले जात आहे. त्याच्या अंतात हुकूमशाहीचा जन्म होतो, किंबहुना हुकूमशाहीसाठी सर्वप्रथम अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा बळी घेतला जातो. दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना या प्रश्नांची आणि समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांची चर्चा होण्याची गरज आहे. madhukar.kamble@expressindia.com