विघ्नेश जोशी

उद्यापासून (२३ ऑक्टोबर) संगीतभूषण पंडित राम मराठे यांची जन्मशताब्दी  सुरू होत आहे. साडेसात हजारांच्या आसपास नाटय़प्रयोग, साडेतीन हजारांहून अधिक मैफिली करणाऱ्या आणि गाण्यावर अद्भुत प्रेम असलेल्या या कलावंताला त्याच्या शिष्याने वाहिलेली शब्दांजली..

Mohan Wagh Award for Best Theatre Production for Chinmay Mandlekar Ghalib Drama
“महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांच्या DNA मध्ये तीन नावं, एक असतं मंगेशकर…”, चिन्मय मांडलेकरचं विधान
physician Dr Ravindra Harshe passed away
सातारा: सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. रवींद्र हर्षे यांचे निधन
jarag nagar municipal corporation school
कोल्हापुरातील जरग नगरातील शाळेसाठी पालकांची सायंकाळपासूनच रीघ; महापालिकेच्या शाळा प्रवेशाचे अनोखे चित्र!
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन

आपल्या आयुष्यात काही काही योग असे येतात की त्या वेळी आपल्याला त्याची किंमत किंवा जाणीव नसते आणि मग कितीतरी वर्षांनी कळतं, आपल्याला काय मिळालं होतं आणि आपण आळशीपणामुळे किंवा अज्ञानामुळे काय गमावलं. माझ्या आयुष्यात १९८४ साली असाच योग आला. आम्ही मूळचे बदलापूरचे. १९८४ साली आम्ही ठाण्याला राहायला आलो, आणि माझ्या आई-बाबांनी मला पेटी शिकण्यासाठी म्हणून संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्याकडे पाठवायचं ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही गेलोदेखील. संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांचे चिरंजीव संजय आणि मुकुंद मराठे मला शिकवायचे. कधी कधी स्वत: रामभाऊदेखील मार्गदर्शन करायचे. परंतु एक गोष्ट सांगू का, ज्याने हातात सुईदेखील कधी धरली नसेल त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर किंवा बाजूला हातात तलवार देऊन उभं केल्यावर त्याची जी अवस्था होईल, ती माझी अवस्था होती. (रात्री गणपतीच्या मिरवणुकीत नाचलो म्हणून दुसऱ्या दिवशी आपण बिरजू महाराजांचे गंडाबंध शिष्य नाही होऊ शकत.)

आपल्याला कोण शिकवतो आहे, तो किती विद्वान आहे, याची पुसटशीदेखील कल्पना मला नव्हती. त्यांचा गळा आणि माझा पेटीवादनाचा हात याची तुलनाच होऊ शकत नाही. तेव्हाही नाही आणि आजही नाही.. पुढेही नाहीच.

हेही वाचा >>>आता निदान समलैंगिकता हा ‘रोग’ समजून उपचार तरी केले जाणार नाहीत…

मला त्यांचा सहवास पाच वर्षच मिळाला.. हो सहवासच.. मार्गदर्शन म्हणणार नाही मी.. कारण मी त्यांच्याकडे शिकलो असं म्हटलं तर त्यांच्या संगीत क्षेत्रात असलेल्या स्थानाला प्रचंड मोठा धक्का बसेल. (त्यांचं नाव खराब होईल.) त्यांच्यातलं गुरूपण आपण कल्पना करू शकणार नाही इतकं मोठं होतं आणि आहे. पण शिष्य म्हणून मी म्हणजे एकूण आनंदी आनंदच होता. इतक्या वर्षांत त्यांचं मोठेपण हळूहळू समजत गेलं. त्यांच्याकडे असलेली रागाची शुद्धता, मांडणी, दाणेदार तान, लयकारी, तालावरची हुकमत, बुद्धिमत्ता, ७-८ तास मैफिलीसाठी आवश्यक असणारी शारीरिक आणि मानसिक ताकद, हे सारंच विलक्षण होतं.

..या वर्षी गणेशोत्सवात मोहन बिल्डिंगमध्ये मी कार्यक्रमाला गेलो होतो. याच बिल्डिंगमध्ये गुरुवर्य हार्मोनियमसम्राट पं. गोविंदराव पटवर्धन राहायचे. तिथल्या गाडगीळ, बर्वे, पोंक्षे मंडळींनी – ‘‘गणपतीत रामभाऊ गोविंदरावांकडे पहाटे पहाटे यायचेच, सणकून गायचेच आणि मग उकडीच्या मोदकावर ताव मारायचे,’’ असं प्रचंड भारावलेल्या मनाने सांगितलं. एखाद्या गोष्टीची झिंग चढते म्हणजे काय होतं ते या मंडळींच्या बोलण्यातून जाणवत होतं. ५०-६० वर्षांपूर्वी रामभाऊंच्या मैफिली गिरगावात कुठे कुठे ऐकल्या याची अगदी तपशीलवार माहिती सांगत होते सगळे. ‘‘ एकदा झावबावाडीतल्या एकाच्या घरी रामभाऊ संध्याकाळी ५ ते ८ गायले. ‘देखो मोरी चुरीया’ने सांगता केली. आणि रात्री ९.३० ला ब्राह्मण सभेत गायला बसले ते पहाटे सव्वाचापर्यंत. आम्ही त्यांना विनंती केली, रामभाऊ, तिकडे ‘देखो मोरी चुरीया’ गायलात तेव्हा इकडे ‘शाम बजाये तोरी’ किंवा ‘रंग दे रंग दे’पैकी एक भैरवी म्हणाल का? पण शेवटी रामभाऊच ते ..तिन्ही भैरव्या गायले.. साथीला दोन पटवर्धन ..गोविंदराव आणि एस व्ही. मग काय रामभाऊ ऐकतायत कुणाला. आम्ही विचारलं, अहो, तीन भैरव्या कशाला हो? तर म्हणाले, अहो, जशी तुम्ही फर्माईश केली होती तशीच ब्राह्मण सभेच्या जोशींनीही ‘देखो मोरी चुरीया’ म्हणाच असं आधीच सांगून ठेवलं होतं. त्यांना नाराज कसं करणार? शिवाय गुरुवर्य मास्तर कृष्णरावांची गायकी दाखवायची तर देखो मोरी चुरीया न गाऊन कसं चालेल? मास्तरांवर प्रचंड भक्ती असलेले आणि त्यांची गायकी सही सही गाणारे हे असे आमचे रामभाऊ.. आता बोल.’’ मनात म्हटलं, अहो, बोल काय बोल, भले भले गप्प बसलेत. रामभाऊ समोर असले की मी काय बोलणार. रामभाऊंनी मला शिकवायची तयारी दाखवली हा त्यांचा मोठेपणा..

हेही वाचा >>>नारायण राणे यांच्या ‘मराठा अस्मिते’ला इतिहासाचा निर्विवाद आधार आहे?

..रामभाऊंची बराच वेळ गाण्याची क्षमता होती, गाण्याची हौसदेखील होती त्यांना आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा होती.. रामभाऊंचे पांढरी चारला तंबोरे जुळले, गुरुस्मरण करून कपाळाला अंगारा लावला की प्रचंड सकारात्मक वातावरण निर्माण झालंच म्हणून समजा.. ज्याप्रमाणे रामभाऊंचं गाणं फक्त तासभर ऐकून रसिकांचं समाधान होत नव्हतं तसंच फक्त तासभर गाऊन त्यांचंही समाधान होत नव्हतं. तळोजाला त्यांचे शिष्य राहायचे चौधरी म्हणून. त्यांच्याकडे पूजेच्या निमित्ताने रामभाऊंना दर्शनासाठी बोलावलं होतं. सोबत संजयदादा, मुकुंददादा, मी, अजून एक-दोनजण.. आम्ही सगळे गाडी करून गेलो. तिथेही रामभाऊ ..पत्र्याच्या खाटेवर सतरंजी, त्यावर चादर अशा रंगमंचावर दोन तास गायले.. ते झाल्यावर ‘‘तळोज्याला बिर्याणी छान मिळते बरं का’’ असं खास त्यांच्या शैलीत बोलून आम्हा सगळय़ांना घेऊन तिकडे.. तळोजा-पनवेलजवळ ‘वावंज पालं’ नावाचं गाव आहे. छोटंसं. माझ्या वडिलांचं आजोळ. तिथं रामनवमीच्या उत्सवात रामभाऊंचं गाणं ठरलेलं असायचं. रामभाऊंना सोयीचा असेल तो दिवस. कधी कधी असंही व्हायचं की, रामनवमीच्या उत्सवादरम्यान रामभाऊंच्या नाटकाचा दौरा असेल तर रामभाऊ रामनवमी झाल्यानंतर दुसरा कुठला तरी दिवस यायचे. पण गावातली मंडळी एवढंच म्हणायची, ‘‘ज्या दिवशी रामभाऊ आमच्या गावात येऊन गातात तोच आमचा रामनवमीचा उत्सव आणि तीच आमच्यासाठी रामनवमी.’’ रामभाऊदेखील तिथे रात्री नऊ-सव्वानऊला गायला बसले की पहाटे साडेपाचला उठायचे. अध्र्या तासाचा मध्यंतर तेसुद्धा शरीरधर्म आणि जुजबी चहापान ..या मध्यंतरात रामभाऊ चिवडा-लाडू काय खातील, कधी कधी दडपे पोहे काय खातील किंवा जे काही समोर ठेवाल ते.. केवढा स्टॅमिना आणि रसिकांविषयी असलेलं केवढं प्रेम. कार्यक्रम संपल्यावर १५१ रुपयांची (भरघोस?) बिदागी घेऊन रामभाऊ आनंदाने गाडीत बसायचे.. ‘‘पुढच्या वर्षी नक्की येतो रे’’ असं सांगत. आजकालची आम्ही मंडळी सलग दीड तास बसलो की आमची कंबर, गुडघे बोलायला लागतात. त्यांच्या गाण्याचे आणि खाण्याचे किस्से कितीतरी मंडळी अगदी उत्साहात सांगत असतात. पंडित सी. आर. व्यास यांचे चिरंजीव पंडित सुहास व्यास यांनी सांगितलं, ‘‘संजय आणि मुकुंद या मुलांच्या मुंजीचं बोलावणं करायला घरी आले. आमच्या आईने वाटीत लाडू ठेवले दोन आणि घ्या म्हणाली. रामभाऊ म्हणाले, अहो, दोन लाडवांनी काही होत नाही माझं, डबाच आणून ठेवा हो वहिनी.’’

..अतुल फणसे नावाचा एक मित्र आहे आमचा. ज्यांना ज्यांना दादरचं श्रीकृष्ण दुग्धालय माहिती असेल त्यांच्या सहज लक्षात येईल. २५ एप्रिल १९६६ ला त्याची मुंज होती आणि त्याप्रीत्यर्थ लोणावळय़ाला, त्याच्या आवडीचे गायक म्हणून पंडित राम मराठे यांचं गाणं ठेवलं होतं. साथीला वसंतराव वाचरेकर आणि गोविंदराव पटवर्धन. पहिला राग बागेश्री झाल्यावर रामभाऊ इतर कोणाला काहीही न विचारता पहिल्या रांगेत बसलेल्या अतुलला विचारायचे, अतुल आता मी काय म्हणू? अतुल सांगायचा, रामभाऊ तुम्ही जय शंकरा गंगाधरा म्हणा. की लगेच रामभाऊ गायले जय शंकरा. ते संपले की अतुलला विचारायचे, आता मी काय गायचं तुझ्यासाठी की तो सांगायचा रतीहुनी सुंदर म्हणा की रामभाऊ लगेच रतीहुन सुंदर म्हणायचे. ते संपल्यावर, हां अतुल, अजून काही ऐकायचं का? की तो सांगायचा, रामभाऊ बसंत की बहार आयी.. लगेच सुरू २२२२२. ज्या मुलाची मुंज आहे त्या आठ वर्षांच्या मुलाला आनंद मिळाला पाहिजे या भावनेने त्या दिवशी रामभाऊ फक्त अतुलसाठी गायले. रसिकांविषयी अगत्य असणे याला फार महत्त्व आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणाले होते तेच खरं रामभाऊ मराठे म्हणजे बुद्धिमत्तेचे पांडित्य, संगीतसाधनेतील सातत्य आणि रसिकांविषयी असलेलं अगत्य त्यामुळे रामभाऊंच्या गायकीत एक चारित्र्य आहे.

..रामभाऊ मराठय़ांसारखा शिष्यदेखील होणे नाही. जगन्नाथबुवा पुरोहित असतील, मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर असतील, मिराशी बुवा असतील, मनहर बर्वे असतील अशा किती तरी गुरुजनांकडून ते काय काय आणि कधी शिकले हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. कारण संपूर्ण आयुष्यात साडेसात हजारच्या आसपास नाटय़प्रयोग, तीन साडेतीन हजार मैफिली. इतकं सगळं करताना ते शिकले कधी आणि रियाज कधी केला, मनन, चिंतन कधी केलं, हे सगळंच आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. चित्रपटातल्या तीन मिनिटांच्या गाण्यासाठीदेखील संगीत दिग्दर्शक स्नेहल भाटकर यांच्याकडे जाऊन रीतसर शिकून, स्वत:च्या अनेक हुकमी रागांपैकी एका रागात असलेल्या शंकरा..मधील ‘जय जय जय बजरंग’ हे गाणं एका टेकमध्ये गायलं. वेळ फुकट घालवणं हा स्वभाव नाही. स्टुडिओच्या दिलेल्या वेळेत त्यांचं रेकॉर्डिग व्हायचंच व्हायचं. मुंबई आकाशवाणी केंद्राचे रेकॉर्डिस्ट ओटावकर यांनी सांगितलं होतं, आम्हाला रामभाऊंच्या रेकॉर्डिगला कधीही रेकॉर्डिग बूथमधून खूण करायची वेळ यायची नाही. आता तीन मिनिटं राहिली, आता दोन मिनिटं राहिली.. रामभाऊंचं गाणं वेळेत म्हणजे वेळेतच संपणार. बरं रेकॉर्डिगच्या आधीसुद्धा उगाच काही तरी रियाज करत बसतील, इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसतील, जरा चहाच आणा, कॉफीच आणा, खायला काही तरी आणा, असला कुठलाही बडेजावी थाट नाही. साथीदार नवोदित असतील तर दोन-पाच मिनिटं बंदिशीचा मुखडा, लय दाखवणार. गोविंदराव पटवर्धन पेटीला आणि गुरुवर्य पं. भाई गायतोंडे तबल्याला असतील तर तेही नाही. ब्रह्मा विष्णू महेशासारखे जाऊन बसायचे आणि रेकॉर्डिग सुरू करायचे.

..हे वर्ष संगीतभूषण पंडित राम मराठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. शासनाने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एखाद्या नवोदित किंवा एखाद्या अनुभवी कलावंताला त्यांच्या नावाचा पुरस्कार द्यावा. तशी काही तरी योजना आखावी. त्यांच्या नावाने जोड राग संमेलन, नाटय़ संगीताचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करावेत, जेणेकरून या ऋषितुल्य गायकाचे यथोचित स्मरण होईल. जुन्याजाणत्या रसिकांना पूर्वस्मृतींना उजाळा देता येईल आणि नवोदित कलावंताला संगीतभूषण पंडित राम मराठे हे किती उच्च दर्जाचे गायक होते, जयपूर, आग्रा, ग्वाल्हेर अशा सर्वच घराण्यांवर, तालावर त्यांची असलेली हुकुमत, बुद्धिमत्ता याविषयी माहिती होईल. पुढील पिढीसमोर सांगीतिक आदर्श निर्माण होईल.

लेखक अभिनेते तसेच जाणकार संगीत रसिक आहेत.