“मराठा आणि कुणबींमध्ये फरक आहे. जरांगे-पाटील मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगतात. पण, तसं काही नाही. जरांगे-पाटलांनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा. मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे. मात्र, जरांगे-पाटील कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही, असं बोलत आहेत.” एवढेच बोलून केंद्रीय मंत्री नारायण राणे थांबले नसून “९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मीही आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही,” असेही म्हणाले आहेत. राणे यांची ही वक्तव्ये चित्रवाणी माध्यमातून, तसेच ‘लोकसत्ता’मधूनही प्रसृत झाली आहेत. त्यामुळे या विषयावर महात्मा फुले यांचे काही संदर्भ आठवले. महात्मा फुले हे त्यांचा ‘शेतकऱ्याचा असूड’ हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहीत असण्याच्या काळात त्यांना भेटायला एक गृहस्थ आले होते. त्यांना पाहून ते कोण किंवा कोणत्या जातीचे हे फुल्यांच्या लक्षात येत नव्हते. अशा परिस्थितीत त्या गृहस्थानेच संवाद चालू केला. तो खालीलप्रमाणे-

“गृहस्थ : तुम्ही ओळखले नाही काय?
महात्मा फुले : नाही महाराज, मी तुम्हाला ओळखले नाही. माफ करा.
गृहस्थ : मी मराठी कुळांतील मराठी आहे.
महात्मा फुले : तुम्ही मराठे परंतु तुमची जात कोणती?
गृहस्थ : माझी जात मराठे.
महात्मा फुले : महाराष्ट्रांत जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणांपर्यंत लोक आहेत, त्या सर्वासच मराठे म्हणतात. तरी तुम्ही अमुक जातीचे आहात याचा उलगडा तेवढ्याने होत नाही.
गृहस्थ : तर मी कुणबी आहे असे समजा.

drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
lokmanas
लोकमानस: वालचंद हे मराठीच होते..
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

वरील संवादावरून महात्मा फुले यांच्या काळात मराठे ही संज्ञा कोणाला उद्देशून वापरली जात होती, हे लक्षात यायला हरकत नाही. महात्मा फुले त्यांच्या पूर्वोल्लेखित ग्रंथाच्या उपोद्घातात लिहितात-

“वाचकहो, सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद आहेत. शुद्ध शेतकरी अथवा कुणबी, माळी व धनगर. आतां हे तीन भेद होण्याची कारणे पाहिली असता, मूळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करू लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी, जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागाइती करू लागले, ते माळी व जे ही दोन्हीही करून बकरी वगैरेचे कळप बाळगू लागले, ते धनगर असे निरनिराळ्या कामांवरून प्रथम हे भेद उपस्थित झाले असावेत. परंतु आता या तीन पृथक जातीच मानतात. याचा सांप्रत आपसात फक्त बेटीव्यवहार मात्र होत नाही. बाकी अन्नव्यवहारादी सर्व काही होते. यावरून हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच शेतकरी जातीचे असावेत.” हे लिहीत असताना फुले आपल्या तळटीपेत खालील उल्लेख करतात.

हेही वाचा – आरक्षण हवेच, पिढ्यानपिढ्या नको…

“शूद्रांचे कुलस्वामी जेजुरीचे खंडेराव यांनी शूद्र (कुणबी) कुळांतील म्हाळसाई व धनगरांतील बानाबाई अशा दोन जातींतील दोन स्त्रिया केल्या होत्या, यावरून पूर्वी कुळवाडी व धनगर यांचा आपसात बेटीव्यवहार होत असे.” येथे महात्मा फुले शेतकऱ्यांची वर्गवारी करताना मराठा शेतकरी, असा उल्लेखही करीत नाहीत, हे उल्लेखनीय आहे.

प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत रंगनाथ पठारे त्यांच्या “सातपाटील कुलवृत्तांत” या विख्यात कादंबरीत पाटीलबाबा ऊर्फ शिवरामबुवा या पात्राच्या तोंडी पुढील मजकूर घालतात. मजकूर कादंबरीमधील पात्राच्या तोंडी असला तरी पठारे यांच्या चिंतनाचे सार त्यात आले असावे. तो मजकूर असा –
“…..तशे माळी, धनगर, मऱ्हाटी; समदे येकच लोक, समदे कुनबीच. मऱ्हाटी बी मेंढ्या वळितेत, बागायती बी करितेत. पन धंदा करता करता आलक जाती झाल्या आस्तीन. त्याच्यानी सभाव पण आलक व्हत गेला आसन. आन हीच बात बाकीच्या जातीची. आरं लढाईला जान्हारे फकस्ती मऱ्हाटी थोडेच हायेत? पार समदे माळी, धनगरं, वारीकं, शिंपी, कुंभारं, लव्हारं; कोनचेय बी जातेत. हालीच्या जमान्यात ह्ये देसमुक लोकं झाले. ते तरी कुठं आलक हायेत? तेयवी मऱ्हाटीच. स्वोताला उंच कुळीचे म्हन्त्यात. त्यांची कुळी उंच कोनी केली? मुसलमन राजांनी. बाकी फरोक काय नायी. त्यांच्यातयबी गंधर्व लागतो. अन गावाला जेवान धिलं का दोस खलास. आन नाय धिलं तर चार पिढ्यांनी आपाप खलास, आशी बात.” (शुद्धलेखन मूळ उताऱ्यानुसार)

थोडक्यात, आज ज्यांना मराठे म्हटले जाते, त्यांचा दर्जा १००-२०० वर्षांपूर्वी आजच्यासारखा स्वतंत्र नसावा. पुढे युद्धात भाग घेतलेल्यांचा दर्जा उच्च होत गेला. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे या वर्गाला इतर कुणब्यांपेक्षा अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. मराठा साम्राजाच्या काळात त्यांची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारल्यास नवल नाही. त्यातूनच मराठा जात अस्तित्वात आली असेल काय? रंगनाथ पठारे हे आपल्या पूर्वोक्त कादंबरीत “कुणबी मातला आणि मराठी झाला” या पुण्याच्या आसपास प्रचलित असलेल्या म्हणीचा उल्लेख करतात. थोडक्यात, जेव्हा कुणबी सर्वार्थाने सबळ बनतो, तेव्हा तो स्वतःला मराठा म्हणवितो. अशा सामर्थ्यवान मराठ्यांचे अनुकरण करून सामान्य कुणब्यांनीही स्वतःला मराठा म्हणवून घेण्यास सुरुवात केली असावी काय? बदलत्या काळात सामान्य मराठा समाजाला आपल्या आर्थिक दुरवस्थेची झळ पोहोचली असावी. आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या जाती पाहता पाहता आपल्या पुढे जातानाही त्यांनी पाहिल्या. आता ते आपल्या या भ्रामक प्रतिष्ठेच्या कल्पना बाजूला ठेवून जमिनीवरील वास्तवाला तोंड देत असावेत. म्हणूनच आता बहुसंख्य मराठ्यांना कुणबी म्हणवून घेण्याची जरुरी वाटत आहे.

हेही वाचा – क्रिकेटच्या चर्चेत राजकारण आहे, आणि काळाबाजारसुद्धा…

जरी नारायण राणे यांच्यासारख्या सधन आणि सत्तेचे लाभधारक असणाऱ्या मराठ्यांना कुणबी असल्याचे प्रमाणपत्र घ्यायचे नसले तरी बहुसंख्य गरीब मराठा त्यांच्याशी सहमत होतीलच असे नाही. तसेच त्यांच्या कुणब्यापासून स्वतंत्र असणाऱ्या मराठा अस्मितेला इतिहासाचा निर्विवाद आधार आहे, असेही वाटत नाही.

भारतात व्यवसायापासून जाती झालेल्या असाव्यात. प्रारंभी कुळधारक शेतकऱ्यांना कुणबी म्हणत असले तरी पुढे सर्वच शेतकऱ्यांना कुणबी हे नामाभिधान प्राप्त झाले असले पाहिजे. शेती करूनही जे समुदाय विशिष्ट व्यवसायाशी बांधले गेले, तेच पुढे धनगर, माळी इत्यादी जातीचे मानले गेले असावेत. जे केवळ शेतकरीच राहिले, ते कुणबी म्हणवले गेले असावेत. ज्यांचा लढाईशी आणि सत्तेशी सबंध आला त्यांनी स्वतःला कुणबी म्हणवण्याऐवजी मराठा असे म्हणवून घेतले असावे. थोडक्यात, मराठा – कुणबी यांच्याविषयी नारायण राणे जसे ठाम अभिप्राय व्यक्त करतात, तसे इतिहासाच्या आधारावर करता येणार नाहीत, असे वाटते.

harihar.sarang@gmail.com