डॉ. आनंद नाडकर्णी

एखाद्या कल्पनेचा जन्म एखाद्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये होत असला तरी ती कल्पना प्रत्यक्षात येणे, विकसित होत होत बहरणे हा प्रवास अनेकांच्या यथार्थ सहभागाशिवाय अशक्य असते. काळाचे सातत्य आणि दर्जेदार आशय अशा दोन्ही निकषांना पूर्ण करत ‘वेध’सारखा कार्यक्रम शंभरी गाठतो तेव्हा या झाडाला फळे लगडलेली असतात. हे एखाद-दुसरे फळ नसते तर अनेक असतात. त्यांची रास रचणारे अनेक हंगाम असतात!.. म्हणून तीन दशकांनंतर हा विचार करूया की ‘वेध’ने आम्हाला काय दिलं?

lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?

प्रारंभ करूया, मानसिक आरोग्याच्या चळवळीला झालेल्या लाभांपासून. आपल्या समाजात ‘मानसिक आरोग्’ ही संकल्पना तीन दशकांपूर्वी अडकली होती ती ‘मनोविकार म्हणजे मनआरोग्’ या अपूर्ण आणि ऱ्हस्वदृष्टीच्या मांडणीमध्ये. ‘मनोविकास’ हा खरे तर सुदृढ मनाचा पाया आहे असे ठामपणे सांगणारे उपक्रम जवळजवळ नव्हतेच. अशा परिस्थितीमध्ये ‘वेध’ने वाट निवडली, अकृत्रिम शैलीतल्या थेट संवादाचा. यशामागची तपस्या असो की अपयशातून शिकण्याचे शहाणपण; व्यवसायातील तन्मयता असो की संघ बांधणीतील उत्साह, परिस्थितीवर मात करणारी कल्पकता असो की विविध विकलांगतांचा खंबीर सामना करणारी चिकाटी.. प्रत्येक माणसामध्ये एक शक्यता सतत दडलेली असते, अधिक चांगला माणूस बनण्याची. ती ठळक करणारा हा उपक्रम आहे. माणसाच्या वर्तनाचे अनेक त्रासदायक पैलू मांडण्याची तर माध्यमांमध्ये चढाओढच चालू असते. आपुलकी, चांगुलपणा, आस्था यांना आपण भोळसट आणि अवास्तव ठरवले. दर्जेदार उत्कृष्टतेला अपघात मानले. आणि उथळ कल्हईला सोन्याचा दर्जा दिला. पण याच वास्तवातली शेकडो ‘आदर्शवादी-वास्तववादी’ मंडळी ‘वेध’ने हेरली आणि समाजाच्या पुढे आणली. ही संख्या ७५० संवादांच्या पुढे असून त्यातील ३५० मुलाखती आपण अनुभवू शकता (आवाहन आयपीएच या यूटय़ूब चॅनेलवर, नि:शुल्क).

‘वेध’ हे विकासाच्या वाटेवरच्या कार्यरत प्रवाशांना सातत्याने प्रकाशात आणून त्यांच्याद्वारे, सुदृढ मनाचा व्यापक संदेश देणारे व्यासपीठ ठरले. डिस्ट्रेस म्हणजे मानसिक तणाव आणि विसंवादाचा सामना करतानाही स्वत:चे ध्येय गाठणाऱ्या अनेकांच्या कहाण्या सांगणारे ‘वेध’ हे एक माध्यम बनले.ठाण्यामध्ये (आणि नंतर पुणे, नाशिक या शहरांमध्येही) आयपीएच संस्थेच्या सेवांचा व्यापक सामाजिक स्वीकार झाला आणि होत आहे. त्यामध्ये ‘वेध’चा मोठा वाटा आहे. ‘वेध’ला येणारे हजारो प्रेक्षक, निरलसपणे काम करणारे असंख्य स्वयंसेवक, मनआरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक या साऱ्यांच्या सहभागाने मानसिक आरोग्यविषयक पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन कमी झाला. अनेकांची पावले फक्त आमच्या संस्थेकडेच नाही तर अन्य व्यावसायिकांकडेसुद्धा मदतीसाठी वळू लागली. आणि हे सारे एका नव्हे तर अनेक शहरांमध्ये होऊ लागले.

‘करिअर’ नावाच्या प्रवासाला भौतिक यश, प्रतिष्ठा यापासून मुक्त करून ‘उत्कृष्टतेच्या ध्यासा’कडे नेणे हेसुद्धा ‘वेध’चे एक फलित आहे असे म्हटले पाहिजे. विद्यार्थी म्हणून ‘वेध’ अनुभवलेले अनेक विद्यार्थी आज या उपक्रमाचे सक्रिय हितचिंतक आणि स्वयंसेवक बनले आहेत. त्यातील काही गेल्या काही वर्षांमध्ये पाहुणे (फॅकल्टी) म्हणून व्यासपीठावर येऊ लागले आहेत. आपल्या स्वत:च्या कमाईतून ‘वेध’ला आर्थिक हातभार लावणारे अनेक आहेत. अशी अनुकरणीय व्यक्तिमत्त्वे सादर करताना ‘वेध’ने हेही दाखवून दिले की अर्थपूर्ण आणि आकर्षक सादरीकरण असेल तर सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरावरील लोक ‘ज्ञानानंदा’साठी हजारोंच्या संख्येने एकत्र येऊ शकतात. मनोरंजनाकडून (एन्टरटेनमेंट) ज्ञानरंजनाकडे (एज्युटेनमेंट) नेणारा प्रयोग म्हणून ‘वेध’कडे पाहायला हवे.

‘वेध’च्या निमित्ताने आमच्या संस्थेतील सर्वाना ‘उपक्रम नियोजनाचा’ (इव्हेंट मॅनेजमेंट) चा अनुभव मिळू लागला. कमीतकमी गोष्टी, बाह्य कंत्राटी स्वरूपामध्ये देऊन जास्तीतजास्त गोष्टी स्वत: करायच्या ही सवय लागली. स्टेजचे डिझाइन असो की प्रसिद्धी यंत्रणा, निधी उभारणी असो की अल्पोपाहार व्यवस्था.. सारे काही स्वयंसेवी उत्साहाने करायचे. ‘वेध’मुळेच ‘आवाहन’ या दृक्-श्राव्य विभागाला स्वत:चा चेहरा मिळाला. मनआरोग्यावरची ५० गीते माझ्याकडून लिहून झाली आणि त्यातील बहुतेक गाण्यांना चाली लावता आल्या. ‘वेध’च्या प्रत्येक शहरात ही गाणी गाणारे वाद्यवृंद तयार झाले. अनेक शाळांच्या उत्सवांमध्ये ही गाणी सादर केली जाऊ लागली. या कामाचा उगम झाला तो संगीताचा वापर करून प्रेक्षकांना तालावर आणून शिस्त लावायची यासाठी. अगदी सुरुवातीच्या वर्षांमध्ये गाणेही मीच म्हणायचो आणि ढोलकीही मीच वाजवायचो.

७५० संवादांचे नियोजन आणि त्यातल्या सर्वाबरोबर झालेली दोस्ती हा तर माझा अफाट फायदा!.. आपापल्या कारकीर्दीमध्ये उमेदवारीच्या काळात असताना ‘वेध’ मध्ये आलेली आणि नंतर विख्यात झालेली अनेक नावे आहेत. नागराज मंजुळेंपासून तर मॅगसेसे पुरस्कार विजेत्या सोनम वांगचुक यांच्यापर्यंत. या संवादांमुळे माझ्या रसिकतेमध्ये, जाणतेपणामध्ये मोठी समृद्धी आली.या साऱ्या अनुभवातून जाता जाता आम्ही ‘वेध’चे नियोजन नेमके कसे करावे याचे पद्धतशीर रेखाटन करणारी पुस्तिका तयार करू शकलो. (एसओपी अर्थात स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स) त्यामुळे नव्या शहरातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणे सोपे जाऊ लागले. अर्थात उत्तम आखणी करूनही आयत्या वेळी येणाऱ्या अनेक अडचणींमुळे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे आपत्तीकालीन नियोजन उत्तम झाले आणि होत आहे. अशा अनुभवांवर वेगळे पुस्तक लिहिता येईल. ‘वेध’चा उपक्रम आपल्या शहरात आयोजित करायचा तर त्या शहरातील इच्छुक कार्यकर्त्यांसाठी साधारणपणे दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी काय करावे याचा आराखडा तयार झाला आहे. याचा दीर्घकालीन लाभ असा की तशी तयारी असलेले गटच टिकतात आणि पुढे जातात. अनुभवातून आलेल्या शहाणपणांमधले हे एक.

पूर्वी आम्हा मनोविकारतज्ज्ञांना, वेडय़ांचा डॉक्टर म्हटले जायचे आणि ओळखीचे लोकही सामाजिक समारंभात दूर पळायचे असे सांगितले जाते. ‘वेध’सारख्या उपक्रमांमुळे मला याच्या बरोबर उलटा अनुभव येत असतो. मानसिक आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्यांची ओळख, ‘मनोविकासतज्ज्ञ’ म्हणून होऊ लागली त्यात ‘वेध’चा मोठाच वाटा आहे.पण अर्थात मौल्यवान ठेवा कोणता असे विचाराल तर सांगतो आता! ‘वेध’च्या व्यासपीठावर आलेल्या, खास व्यक्तीबरोबर माझा संवाद सुरू होतो. हळूहळू आमची लय जुळत जाते. आता आमच्या दोघांच्या अस्तित्वामध्ये समोरचा प्रेक्षकवर्ग भावनेने जोडला जातो आहे असे जाणवायला लागते. माझ्या वृत्ती एकतान होतात. मन अतिशय शांत आणि तरीही दक्ष असते. व्यक्ती विरघळायला लागतात, आशय आणि भावनांचे नृत्य सुरू असते. अशा अवस्थेत ती मुलाखत संपते.

प्रेक्षक म्हणतात, हा अनुभव काही वेगळाच होता. खरंच, प्रत्येक अनुभव माझ्यासाठीही आगळाच असतो. संवादातून माझ्यामधले आणि सर्वामधले ‘चांगलेपण’ जणू सायीसारखे तरंगायला लागते. म्हणूनच तर आपण ‘वेध’ला म्हणतो सद्भावनेचे सामूहिक व्यासपीठ!लेखक आयपीएच अर्थात इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेचे संस्थापक, विश्वस्त आणि मनोविकासतज्ज्ञ आहेत.

१० शहरांत परिषदा
३२ वर्षांपूर्वी ठाणे शहरामध्ये ‘वेध’ व्यवसाय प्रबोधन परिषदेची सुरुवात झाली. आज ‘जीवन की पाठशाला’ अर्थात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यावर जीवनसंस्कार करणारे मनआरोग्याचे व्यासपीठ म्हणून हा आयपीएच अर्थात इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेचा हा प्रकल्प आकाराला आला आहे. महाराष्ट्रातील दहा प्रमुख शहरांमध्ये भरणाऱ्या या उपक्रमाचे शतकमहोत्सवी आवर्तन परभणीमध्ये २० नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न होत असून दिनांक २७ नोव्हेंबरला नाशिक तर १७, १८ डिसेंबरला ठाण्यामध्ये लगोलग ही परिषद भरणार आहे.

लेखक आयपीएच अर्थात इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेचे संस्थापक, विश्वस्त आणि मनोविकासतज्ज्ञ आहेत.