– सय्यद मारुफ सय्यद महेमूद

आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या एका भाषणातून नुकतेच समान नागरी कायद्याचे जोरदार समर्थन केले आहे. तसे वृत्तही सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे. ‘समान नागरी कायदा’ वा त्याची ‘अंमलबजावणी’ हा २०२४ च्या निवडणुकीच्या प्रचाराचाच एक भाग अशी सर्वसामान्य बिगर-राजकीय बहुसंख्याकांची धारणा आहे. वरकरणी काही राजकीय पक्षांसाठीही हा निवडणूक प्रचाराचा भाग वाटत असला तरी तो खरोखरच तसा आहे का, हा महत्त्वाचा व विचार करण्याजोगा मुद्दा आहे.

भारत सोडण्यापूर्वी अखंड भारताचे दोन तुकडे करण्याचा डाव ब्रिटिशांचा होताच, त्याही आधीपासून त्यांची फोडा आणि झोडा ही नीती होती. पण आज अल्पसंख्यांकांकडे संशयास्पद दृष्टीने बघायचे, ते लव्ह जिहाद करत आहेत म्हणायचे, ते गझवा-ए-हिंदची तयारी करत आहेत म्हणायचे, त्यांच्याबद्दल संशय वाढवण्यासाठी सर्व काही करायचे, गोरक्षेच्या नावाखाली त्यांच्या हत्या करायच्या, घरवापसीच्या नावाखाली त्यांचा छळ करायचा, त्यासाठी कधी प्रशासनाला तर कधी समांतर व्यवस्थेला बळ द्यायचे हे सर्व कोण करत आहे? का करत आहे? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास ते विवेकीजनांच्या सहज लक्षात येईल.

हेही वाचा – अंगणवाडी सेविकांच्या खांद्यावर सरकारी योजनांचे ओझे…

पुन्हा ऐरणीवर आणला गेलेला मुद्दा ‘समान नागरी कायद्या’चा. विखारी प्रचार तंत्राचा वापर त्याबाबतही केला गेला नाही तरच नवल. आकडेवारी पहिली तर ‘मुस्लीम व्यक्तिगत कायद्या’चा सर्वाधिक फायदा केवळ हिंदूंनीच घेतल्याचे दिसेल. जितेंद्र माथुर नावाची व्यक्ती सुनीता नरुलाशी लग्न करण्यासाठी मुस्लीम नाव धारण करते (इस्लाम धर्म स्वीकारते -१९७८), हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्र दिलावर खान बनतो. (१९७९), प्रदीप कुमार – दीपा (१९८८), हरियाणाचे उपमुख्यमंत्री चंद्रमोहन हे अनुराधा बालीशी लग्न करण्यासाठी मुस्लीम होतात. याशिवाय राज बब्बर-स्मिता पाटील यांसारखी अनेक उदाहरणे देता येतील. या साऱ्या उदाहरणांचे वार्तांकन त्या- त्या वेळी वृत्तपत्रांतून झालेले आहे.

बहुपत्नीत्वाला होणाऱ्या विरोधासंदर्भातील हास्यास्पद तसेच लांछनास्पद बाब म्हणजे वेश्याव्यसायाला परवानगी द्यायची पण लग्न करणाऱ्यास कायद्याने मनाई, हे तर अनाकलनीय आहे. वेश्याव्यसायातून निर्माण होणाऱ्या समस्यांना (अनौरस मुले-त्यांचे सामाजिक प्रश्न, इ.) एकमेव पर्याय म्हणजे लग्न असे साधे सरळ गणित असताना लग्नास मनाई का? मानवी स्वभावाचा अभ्यास करणारे मान्य करतात की बहुभार्या पद्धती ही मानवासाठी एक नैसर्गिक बाब आहे. तरीही काही लोक अनैसर्गिक गोष्टच कशी नैसर्गिक आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, असा सगळा गोंधळ सुरू आहे. अशा बाबींकडे सामान्य जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून त्यांना हिंदू-मुस्लीम रंग देऊन दिशाभूल करणारे लोक सत्तेत व प्रशासनात असेपर्यंत या गोष्टी थांबणार नाहीत.

हेही वाचा – मंगोल ‘साम्राज्या’चा उदयास्त

ही झाली एक बाजू, पण समान नागरी कायदयाचा विषय फक्त एवढ्यापुरताच मर्यादित असू शकत नाही, तेव्हा दुसरी बाजू समजून घेताना पवित्र धर्मग्रंथ कुराणातील काही भाकिते आठवतात. दुसऱ्या अध्यायात (आयात नं. १२०) एक भविष्यवाणी केलेली आढळते (भविष्यवाणी हा शब्द योग्य वाटत नाही, त्यापेक्षा मुस्लिमेतरांच्या काही सवयी वा सुप्त इच्छा अधोरेखित केलेल्या आहेत असे म्हणणे पर्याप्त ठरेल) ती अशी ‘…आणि यहूदी व ख्रिश्चन (मुस्लिमेतर ) तुमच्याशी कधीही खूश होणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्यांच्या धर्माचे अनुसरण न कराल. (तुम्ही) सांगा की अल्लाहचे मार्गदर्शनच, मार्गदर्शन असते आणि जर तुम्ही, आपल्याजवळ ज्ञान घेऊन पोहोचल्यानंतरही त्यांच्या इच्छा अभिलाषांचे अनुसरण केले तर अल्लाहच्याजवळ तुमचा ना कोणी समर्थक असेल, ना कोणी सहाय्यक’- यावरून आजचे सत्ताधारी कुणाचा अजेंडा राबवत आहेत ते स्पष्ट होते. तसेच समान नागरी कायद्याची अपरिहार्यताही यावरून सिद्ध होते.

सद्दामने इराकमध्ये स्वदेशी शस्त्रनिर्मिती करणे पाहवले नाही. म्हणून रासायनिक अस्त्रनिर्मितीचे खोटे आरोप ठेवून इराक उद्ध्वस्त करणारे कोण होते? मुस्लिमांची राजकीय सत्ता नकोच नको म्हणून दोन महायुद्धे घडवून खिलाफत संपुष्टात आणणारे, वा आज सामान नागरी कायदा थोपविण्याचा प्रयत्न करणारे या प्रवृत्ती नावापुरत्या एकमेकांपेक्षा निराळ्या आहेत. काहीही झाले तरी दोषी मात्र मुस्लिमांनाच ठरविले जाईल व गोबेल्स पुन्हा एकदा यशस्वी होईल असे दिसते. दुर्दैवी बाब म्हणजे ज्यांना गोबेल्स नीतीचा सर्वाधिक फटका बसला तेच आता तीच नीती मुस्लिमांविरोधात वापरात आहेत. एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ विचार व कृतीने एकसारखे नसतात हे वैश्विक सत्य माहीत असूनही ‘एकाच देशात दोन कायदे कसे…?’ असा युक्तिवाद करणाऱ्यांची कीव येते. घटनाकारांकडे असणारी दूरदृष्टी इतरांकडे नाही. इथेच बरेच काही सिद्ध होते! विविधता हे मानवी समाजाचे वैशिष्ट्य आहे, एवढेही ज्यांना आजपर्यंत उमगले नाही, त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवायची?