अवनीश पाटील
डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७-१९२५) यांच्या पुण्यस्मरणाची शताब्दी २४ ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण झाली. ते केवळ भारतविद्याविशारद नव्हते, तर एक दूरदृष्टी संपन्न समाजसुधारकही होते. सहा दशकांपर्यंत पसरलेल्या त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत, प्राचीन भारतीय इतिहास, धर्मशास्त्र, भाषाशास्त्र आणि पुरातत्त्व या क्षेत्रांना त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा खरा चिरस्थायी वारसा हा आधुनिक, चिकित्सक आणि विवेकनिष्ठ विचारांचा भारतीय पारंपरिक श्रद्धांशी सुयोग्य समन्वय साधण्याच्या त्यांच्या अद्वितीय दृष्टिकोनात सामावला आहे. जातिभेद आणि स्त्रियांचे दमन यांसारख्या सामाजिक रूढींना आव्हान देण्यासाठी प्राचीन संस्कृत ग्रंथांचे चिकित्सक विश्लेषण करण्याची त्यांची पद्धत ही त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख होती. या विशिष्ट दृष्टिकोनामुळेच त्यांना ‘वैज्ञानिक भारतविद्येचे जनक’ हा किताब मिळाला.
डॉ. भांडारकर यांच्या वैचारिक घडणीवर मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील शिक्षणाचा ठसा उमटलेला होता. या महाविद्यालयात एक विद्यार्थी आणि नंतर प्राध्यापक म्हणून काम करतानाच त्यांचा पाश्चात्त्य उदारमतवादी विचारसरणीशी गाढा परिचय झाला. सुरुवातीच्या काळात, ते जातिव्यवस्थेचे निर्मूलन करण्याचे ध्येय असलेल्या ‘परमहंस सभा’ या गुप्त संस्थेशी जोडले गेले, ज्यामुळे त्यांच्या विचारांना एक जहाल आणि क्रांतिकारक बैठक मिळाली. पुढे ते प्रार्थना समाजाचे प्रमुख सदस्य बनले आणि समाजसुधारणेसाठी त्यांनी एक संघटित आणि धर्मनिष्ठ दृष्टिकोन अंगीकारला. इतिहासकार सुमित सरकार यांनी भांडारकरांचे वर्णन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यापेक्षा ‘अधिक जहाल’ म्हणून केले आहे. भांडारकर यांचा दृढ विश्वास असा होता की सामाजिक सुधारणांची मुळे धार्मिक तत्त्वज्ञानात आणि शास्त्रांमध्येच शोधावी लागतील. धार्मिक सुधारणांद्वारेच समाजपरिवर्तन शक्य आहे, अशी त्यांची भूमिका त्यांना गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या धर्मनिरपेक्ष बुद्धिप्रामाण्यवाद्यांपासून आणि ज्योतिराव फुले यांच्यासारख्या मूलगामी जातिविरोधी भूमिकेपासून वेगळी करते.
डॉ. भांडारकर यांच्या सुधारणावादी दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी एकेश्वरवाद आणि मानवबंधुत्व या दोन तत्त्वांचा पाया होता. ‘ईश्वरपितृत्व आणि मानवबंधुत्व’ या संकल्पनेवर आधारित ‘नवा करार’ ही त्यांची विचारसरणी वैश्विक आणि सर्वसमावेशक होती. यासाठी त्यांनी हिंदू धर्मग्रंथांबरोबरच बायबलमधूनही तत्त्वे आत्मसात केली. त्यांच्या मते, धर्म हा केवळ कर्मकांडापुरता मर्यादित नसून तो व्यक्तीच्या नैतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी अत्यावश्यक असलेली एक प्रेरक शक्ती आहे. त्यांचा आग्रह असा होता की खरी धार्मिक तत्त्वे ही मूळ ग्रंथांच्या चिकित्सक अभ्यासातूनच निर्माण व्हायला हवीत, तरच त्यांना वैश्विक स्वीकृती आणि शाश्वतता प्राप्त होऊ शकेल. प्रार्थना समाज हे त्यांच्या याच तत्त्वज्ञानाचे व्यावहारिक अवतार होते, जिथे बाह्य आचार-विचारांपेक्षा विशुद्ध आंतरिक श्रद्धेला प्राधान्य देण्यात आले.
डॉ. भांडारकर यांनी इंग्लंडमधील सुधारणा चळवळींप्रमाणेच क्रमिक आणि सातत्यपूर्ण सामाजिक बदलाचे समर्थन केले. त्यांच्या मते, प्रगतीसाठी विवेकबुद्धी आणि नैतिकतेवर आधारित सक्रिय प्रयत्न आवश्यक होते. तथापि, धर्माला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या त्यांच्या सुधारणावादाला आगरकरांसारख्या बुद्धिप्रामाण्यवाद्यांकडून आणि लोकमान्य टिळकांसारख्या राजकीय नेत्यांकडून मोठे आव्हान मिळाले. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, सुशिक्षित वर्गातील अनेकांना भांडारकरांचे धर्माधारित विचार पूर्णतः पटले नाहीत, कारण ते जॉन स्टुअर्ट मिल आणि हरबर्ट स्पेंसर यांसारख्या विचारवंतांच्या ऐहिक आणि भौतिकवादी तत्त्वज्ञानाकडे अधिक ओढले गेले होते.
जातिव्यवस्थेबद्दल डॉ. भांडारकर यांना जो तीव्र विरोध होता, तो त्यांच्या मानवबंधुत्वावरील अढळ श्रद्धेपोटी निर्माण झाला होता. त्यांच्या मते, जातिव्यवस्था हा भारताच्या प्रगतीचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सर्वात मोठा अडथळा होती, आणि ती ‘ईश्वराच्या दृष्टीने सर्व माणसे समान आहेत’ या मूलभूत धार्मिक तत्त्वाचा भंग करत होती. या विरोधाची सकारात्मक अभिव्यक्ती म्हणून त्यांनी सहभोजन आणि आंतरजातीय विवाहासारख्या प्रगतिशील प्रथांना सक्रिय प्रोत्साहन दिले. त्यांची नात मालिनी पानंदीकर यांनी जेव्हा १९२७ मध्ये एका मुस्लिम तरुणाशी विवाह केला, तेव्हा त्यांच्या या विचारांना केवळ सैद्धांतिक पातळीवरच नव्हे तर वैयक्तिक पातळीवरही पाठिंबा मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या धाडसी पावलाचे कौतुक करून तिच्या ‘विशेष वारशा’ला यासाठी श्रेय दिले. डॉ. आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार, भांडारकरांच्या कुटुंबात जन्मल्यामुळे मालिनी यांना समाजसुधारणेचे मूल्य आणि धाडस याबद्दल स्वत:च्या घरातूनच शिक्षण मिळाले होते.
सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद (सन इ.स. १८९५) भूषवत असताना, डॉ. भांडारकर यांनी अस्पृश्यांच्या समस्यांना थेट वाचा फोडून सुधारणावादी चळवळीचा व्याप विस्तृत केला. याच संदर्भात त्यांनी जातीय संघटनांवर जोरदार टीका केली आणि त्यांना ‘जातिवादाचे प्रतीक’ ठरवले, कारण अशा संघटना राष्ट्रीय एकात्मतेसाठी घातक ठरतात, असे त्यांचे मत होते. मात्र, त्यांच्या सामाजिक विश्लेषणाच्या काही मर्यादाही होत्या. प्राचीन वैदिक परंपरांवर त्यांचे लक्ष अधिक केंद्रित होते, ज्यामुळे ज्योतिराव फुले यांच्या नेतृत्वाखालील सत्यशोधक समाजासारख्या समकालीन आणि क्रांतिकारी सामाजिक प्रयत्नांकडे दुर्लक्ष झाले.
स्त्रियांच्या हक्क आणि विवाह प्रथांसंबंधी, भांडारकरांनी हिंदू परंपरांच्या गहन विश्लेषणाच्या आधारे बालविवाहाचा तीव्र निषेध केला आणि त्याला ‘नरमेध यज्ञ’ असे संबोधले. त्यांनी वैदिक ग्रंथांमधूनच पुरावे देऊन विधवा पुनर्विवाहाला शास्त्रसम्मत मान्यता दिली आणि या विचारास कृतीचे स्वरूप देण्यासाठी १८९३ मध्ये ‘विधवा-पुनर्विवाह मंडळा’चे अध्यक्षपदही स्वीकारले. १८९१ च्या संमती वयाच्या विधेयकावर चाललेल्या वादविवादात त्यांनी केवळ त्याचा पाठिंबाच दिला नाही, तर धर्मग्रंथांच्या उदाहरणांचा आधार घेऊन असे प्रतिपादन केले की प्रस्तावित संमती वयापेक्षा हे वय लक्षणीयरीत्या जास्त असावे. या स्पष्ट आणि धाडसी भूमिकेमुळे त्यांना सामाजिक समूहाच्या तीव्र विरोधाला आणि छळाला सामोरे जावे लागले, तरीदेखील ते आपल्या तत्त्वांवर ठाम राहिले.
डॉ. भांडारकर यांचा दृढ विश्वास होता की चिरस्थायी सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी कायदेशीर उपाययोजनांपेक्षा शिक्षण आणि नैतिक प्रबोधन हे अधिक मूलगामी आणि प्रभावी साधन आहे. ते स्त्री-शिक्षणाचे अग्रणी आणि अखंड समर्थक होते. १९१९ मध्ये पहिल्या महिला विद्यापीठाचे नेतृत्व करताना, त्यांनी भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण करतानाच पाश्चात्त्य ज्ञानशास्त्राचा उपयुक्त आशय आत्मसात करणाऱ्या एका समन्वयात्मक शैक्षणिक आदर्शाची निर्मिती केली. त्यांच्या दृष्टिकोनातून, खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी लोकमत जागृत करणे अत्यावश्यक होते. म्हणूनच त्यांनी भाषणे, लेखन आणि संस्थात्मक माध्यमांद्वारे जनजागृतीचा मार्ग अवलंबला, ज्यामुळे सुधारणा ही समाजाच्या आंतरिक गरजेतून नैसर्गिकरित्या उद्भवेल.
राष्ट्रवादी असूनही, डॉ. भांडारकर यांची विचारसरणी मवाळ आणि बुद्धिप्रामाण्यवादी होती. त्यांचा ठाम विश्वास असा होता की तात्काळ राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला प्राधान्य दिले पाहिजे, कारण तीच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्वातंत्र्याची पायाभूत पूर्वअट आहे. नैतिकता, करुणा आणि सत्य यांसारख्या मूलभूत मानवी मूल्यांबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. भांडारकरांचा हा वैचारिक वारसा केवळ कागदोपत्री न राहता, त्याने पुढच्या पिढीतील समाजसुधारकांवर ठसा उमटवला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांसारख्या नेत्यावर त्यांचा विशेष प्रभाव पडला होता. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना करून भांडारकरांच्या तत्त्वज्ञानाला एक संस्थात्मक स्वरूप दिले आणि त्यांच्या आदर्शांना कृतीत उतरवले.
सामाजिक भेदभाव आणि धार्मिक संकुचितता यांनी आजही ग्रासलेल्या आधुनिक भारतासाठी, भांडारकरांनी मांडलेली समाजसुधारणेची बौद्धिक चौकट एक अत्यंत प्रासंगिक आणि प्रभावी मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करून देते. भांडारकरांची एक अनोखी पद्धत होती. कोणत्याही प्रश्नाचे निराकरण करताना ते चिकित्सकपणे विचार करत, इतिहासाचा आधार घेत आणि धर्माच्याच मूळ तत्त्वांमधून सुधारणा करण्याचा मार्ग शोधत. त्यांच्या या पद्धतीत परंपरेचा मूळ आधार न सोडताही, पण तर्काच्या आधारे सुधारणा करण्याचा आग्रह अमलात आणला जातो. आजच्या जटिल सामाजिक-धार्मिक आव्हानांसाठी डॉ. भांडारकरांची ही पद्धत सार्थक आणि उपयुक्त ठरू शकते.
लेखक शिवाजी विद्यापीठात इतिहास विभागप्रमुख आहेत.
avnishpatil@gmail.com
((समाप्त))