डॉ. आशीष र. देशमुख

राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर ही ‘भारत जोडो यात्रा’ दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. ६ नोव्हेंबरपासून ती महाराष्ट्रात आली आहे. १५ दिवस विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागांतून ही यात्रा जात आहे. काँग्रेसची ही यात्रा महत्त्वाची का आहे? या यात्रेमुळे कोणते राजकीय बदल होतील, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारत तुटलेला आहे म्हणून जोडायचा आहे का, ही यात्रा राजकीय आहे की नाही, असे अनेक प्रश्न चर्चेला येत आहेत. विविध संस्था, संघटना, विचारवंत, लेखक, राजकीय नेते हे या यात्रेला पाठिंबा देत असून, हा विषय फार महत्त्वाचा आहे.

modi made 20-25 billionaire but we will make millions millionaires says rahul gandhi
द्वेषपूर्ण भाषण; पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस
Sangli, Congress palm symbol, Congress,
सांगलीत सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह गायब
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !

लोकशाही म्हटले की, एक सत्ताधारी प्रमुख पक्ष राहील आणि सोबत काही विरोधी पक्षही राहतील, ही भारतीयांनी आतापर्यंत अनुभवलेली लोकशाही आहे आणि तीच खरी लोकशाही आहे. परंतु, सध्या भारतात विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. अलीकडच्या काही वर्षांत सत्ताधारी भाजपने एकपक्षीय लोकशाही निर्माण केल्याचे चित्र दिसते. विविध विरोधी पक्ष शिल्लक राहायला नकोत, आमचाच पक्ष राहिला पाहिजे, ही भाजपची मानसिकता आहे. आता पारंपरिक लोकशाहीसमोर जे आव्हान उभे आहे ते आहे भाजपप्रणीत एकपक्षीय लोकशाहीचे! भाजपतर्फे याचा बचाव असा केला जातो की, पूर्वीच्या काळात म्हणजेच काँग्रेसच्या काळात एकपक्षीय सत्ता नव्हती का? परंतु, सत्ता आणि पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. काँग्रेसची एकपक्षीय राजवट आपल्या देशात होती तशी ती आता भाजपची आहे, याला कोणाचीही हरकत नाही. परंतु, एकपक्षीय लोकशाही, हे एक मोठे संकट घोंघावत आहे. अलीकडच्या १५-२० वर्षांच्या काळात आपल्या लोकशाहीचे विचित्र संक्रमण सुरू आहे. बहुमताची लोकशाही बहुसंख्याक वादाकडे चालली आहे. हा लोकशाहीला मोठा धोका आहे. हा धार्मिक आणि हिंस्र वाद आहे. समाजात दरी वाढावी आणि आपण सत्ताधारी व्हावे, ही जी महत्त्वाकांक्षा बाळगली जात आहे, हा आपल्या लोकशाहीसाठी फार मोठा धोका आहे.

विशेषत: २०१४ पासून- नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सत्तेतून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रांत घुसमट दिसत आहे. आमच्याशिवाय कोणीच नको, ही भावना स्पष्टपणे नजरेस पडत आहे. त्यातून हा समाज दुभंगण्याचा धोका निर्माण झालेला आहे. या धोक्याच्या विरुद्ध कोणीतरी उभे राहण्याची गरज आहे. आपल्या देशात असे ठामपणे उभे राहणारे नेतृत्व शिल्लक राहिलेले नाही. जे उरले आहेत ते म्हणजे फक़्त राहुल गांधी आणि दोन-तीन अपवाद आहेत. राहुल गांधी हे सगळे प्रकरण सर्वांसमक्ष घेऊन चालले आहेत. यात राजकीय आणि राजकारणापलीकडचे याचा मिलाफ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

आजपर्यंत असे कधी घडले नाही की, कोणीच सरकारला जाब विचारू नये. जनता सरकारला जाब विचारत असे आणि सरकार उत्तरे देत असे. परंतु, आता तसे होत नाही. सरकार उत्तरेच देत नाही. मुळात प्रश्न विचारण्याची प्रवृत्तीच कमी झालेली आहे. कारण प्रश्न विचारायचे तर कोणाला? एकीकडे लोकशाहीचा संकोच होत आहे, दुसरीकडे सत्ता बेधुंदपणे वापरली जात आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. संजय राऊत यांच्या संदर्भात आलेला न्यायालयाचा निर्णय बघा… ‘त्यांची अटक बेकायदा होती’! अशा अनेक आव्हानांच्या विरोधात ही ‘भारत जोडो यात्रा’ आहे. हे भारत तुटल्याचे लक्षण आहे का? नाही… भारत एकसंघ आहे. मुद्दा हा आहे की, भारताच्या समोर जे धोके उभे ठाकलेले दिसत आहेत त्या धोक्यांच्या विरोधात ही ‘भारत जोडो यात्रा’ आहे. म्हणूनच या यात्रेचे स्वागत सर्व पक्षांकडून, अनेक संघटनांकडून होत आहे.

ही वाट दूरचीच आहे…

अलीकडच्या काही वर्षांत काँग्रेस पक्ष मृतप्राय झाला आहे. एकेकाळी देशातला सर्वांत मोठा पक्ष, ज्याची पाळेमुळे शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत पोहोचली होती त्या पक्षाकडे कार्यकर्तेच उरले नाहीत. म्हणजेच पक्षाचा कणा उरलेला नाही. त्यामुळे भाजप हा मोठा राष्ट्रव्यापी पक्ष म्हणून समोर आलेला आहे. गेल्या सलग दोन लोकसभा निवडणुकांत पराभव, पक्षांतर्गत गटबाजी, गांधी परिवाराला दिले गेलेले आव्हान, राहुल गांधींनी अध्यक्षपदाची निवडणूक न लढविण्याचा घेतलेला निर्णय या बाबी नाकारता येणार नाहीत. हे प्रश्न काँग्रेससमोर उभे ठाकले आहेत. ज्या गांधी-नेहरूंच्या नेतृत्वाचा आपण सतत उल्लेख करत असतो त्या नेतृत्वाला जी-२० गटाने आव्हान दिले. पक्ष मृतप्राय झाला आहे, संघटनेची घडी विस्कळीत झाली आहे. आज संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करण्याची गरज आहे.

चैतन्यनिर्मितीचा एक मार्ग म्हणजे पक्षाचा एक मोठा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असणे होय. यासाठीच राहुल गांधींना कदाचित असे वाटले असेल की, कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढावी. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तरुण वर्गाची गर्दी होत आहे. म्हणजेच एका नव्या वर्गाला काँग्रेस जवळची वाटत आहे. परंतु, हा प्रतिसाद लगेच मतांमध्ये परिवर्तित होईल का, हे आताच सांगता येणार नाही. लोकांच्या ‘प्रतिसादा’ला राजकीय ‘पाठिंब्या’मध्ये बदलण्याची प्रक्रिया संथ असते. क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये जो फरक असतो, तोच या प्रक्रियेतील फरक आहे. त्या काळी बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस अशा अनेकांच्या प्रचंड मोठ्या सभा होत. या सभांमधील फक्त १० टक्के लोकांनी आपापल्या उमेदवाराला मतदान केले असते तर ते सर्व उमेदवार विजयी झाले असते. पण एक टक्का मतेसुद्धा त्यांना मिळाली नाहीत. त्यांना मतपरिवर्तनासाठी १९८० च्या दशकापासून २०१४ पर्यंत वाट बघावी लागली. त्यामुळे राहुल गांधींना जो प्रतिसाद मिळत आहे, त्याला पाठिंब्यात बदलता आले तरच काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण होईल. यात्रा निघाली म्हणजे आजच मोठे यश मिळेल, असे म्हणणे गैर ठरेल. त्यामुळे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक दृष्टिकोनातून ही यात्रा बघावी लागेल. राजकीय विचारांनी प्रेरित नसणाऱ्या विविध संघटना, संस्था, लेखक, सामाजिक कार्यकर्ते या यात्रेला पाठिंबा देत आहेत. लोकशाहीच्या समर्थनार्थ हा पाठिंबा राहुल गांधींना मिळत आहे. सोबतच, काँग्रेसपासून दुरावलेली माणसे जोडण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. हे एक व्यापक दृष्टिकोनातून सुरू केलेले काम आहे.

वर नमूद केल्याप्रमाणे एकपक्षीय राजवटीचा धोका बघता सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही जिवंत ठेवण्याचा संकल्प केल्याचे दिसते. मोदींऐवजी भाजपचे वेगळे नेतृत्व असते तरी त्यांनीसुद्धा हेच केले असते. कारण भाजपची विचारसरणीच समाज विघटनासाठी कारणीभूत आहे.

… मग काँग्रेस पक्ष कसा वाढणार?

काँग्रेस पक्ष आजच्या घडीला सक्षम नेतृत्व नसणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. गेल्या दोन वर्षांपासून त्या वेळच्या नायकाला पक्षांतर्गत विरोध आहे. सतत होणाऱ्या पराभवांचे कारण म्हणजे पक्षाची दयनीय अवस्था. या पक्षात नेते आहेत परंतु कार्यकर्ते नाहीत. पक्षाचा चेहरा गेल्या अनेक वर्षांपासून बदललेला नाही. गेल्या ३०-३५ वर्षांपासून त्याच-त्या नेत्यांची नावे समोर येत आहेत. नवे चेहरे क्वचितच दिसत आहेत. परिणामी राजकीय करिअरसाठी काँग्रेसच्या विचारसरणीचे लोक इतर पक्षांमध्ये गले. त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असे अनेक पक्ष प्रभावशाली होत गेले. गांधींच्या नेतृत्वात आपण जिंकून यायचे आणि पक्षाचे काहीही होवो, ही मानसिकता या ३०-३५ वर्षांपासून दिसून येत आहे. तळागाळातील कार्यकर्ते यामुळेच पुढे जाऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

राहुल गांधी यांनी ही यात्रा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मदतीने पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे ठरवले तर त्यात गैर काहीच नाही. काँग्रेस पक्षातील व बिगरकाँग्रेसी नेत्यांकडून राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न करण्यात आला, त्या दृष्टीने सुद्धा ही यात्रा काढली गेली असेल तर ती स्वागतार्ह आहे. काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आणि राहुल गांधींना त्यांचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी झालेल्या चुका विसरून पुढे जायचे असेल तर त्यात इतरांची हरकत असण्याचे काहीच कारण नाही.

आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गांधी घराण्याच्या बाहेरचे आहेत. तेव्हा राहुल गांधी यांच्या बरोबरीने चालणारे जे मोठे नेते आहेत त्यांनी आता गुजरात व इतर राज्यांतील निवडणुकीसाठी पुढाकार घेऊन त्या निवडणुका जिंकून द्याव्यात. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून पक्षात चैतन्य आणावे आणि निवडणुकांना सामोरे जाऊन त्या जिंकूनसुद्धा द्याव्यात, अशी अपेक्षा या नेत्यांनी करू नये. राहुल गांधींवर दोषारोप न करता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, स्थानिक पातळीवरील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकर घेऊन चांगल्या पद्धतीने निवडणुका जिंकाव्यात. सर्वांच्या प्रयत्नांमुळे निवडणुकांचे राजकारण, संघटनात्मक राजकारण, संसदीय राजकारण, विधिमंडळ राजकारण यावर पक्ष चालत असतो.

कुठलाही राजकीय पक्ष एका व्यक्तीच्या भरवशावर चालत नसतो. विविध विषयांवर विचार करणारे, नियोजन करणारे, त्यावर कार्य करणारे ताकदीचे लोक पक्षात असतात, तेव्हाच पक्षाला बळकटी मिळते. काँग्रेसमध्ये अशा महत्त्वाच्या पदांवर ताकदीचे नेते नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षावर गांधी घराण्याचा पगडा राहील, असे वाटत असल्यामुळे तरुण वर्गाला राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा आहेत. या भारत जोडो यात्रेत तरुण वर्गाला राहुल गांधींबद्दल आकर्षण वाटू लागल्याचे दिसते. राहुल गांधी सर्वसामान्यांत मिसळत नाहीत, ही काही नेत्यांची ओरड या यात्रेमुळे थांबणार आहे. तळागाळातील कार्यकर्ते जोमाने भिडल्यावरच काँग्रेसला चांगले दिवस येतील.

आता गांधी घराणे काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून दूर आहे. त्यांच्या अनुपस्थितीत मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसला चांगले दिवस दाखवू शकतात का, हा मोठा प्रश्न आहे. किती नेते पुढे येऊन पक्ष-विस्ताराची धुरा सांभाळायला तयार आहेत? राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसप्रमाणेच राज्य स्तरावरील काँग्रेसलासुद्धा शैथिल्य झटकून टाकावे लागणार आहे. उज्ज्वल भविष्यासाठी विदर्भातील नेता कोण, मराठवाड्यातील नेता कोण हे प्रश्न काँग्रेसजनांनी स्वत:लाच विचारल्यास त्याचे उत्तर सापडणार नाही. परंतु, मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारल्यास बरीच नावे पुढे येतील. असे का? काँग्रेसची मानसिकता ही सत्ताकेंद्रित असल्यामुळे अशा प्रश्नांना उत्तर मिळत नाही. म्हणूनच, पक्षकेंद्रित मानसिकता निर्माण करण्याची नितांत गरज आहे. दीर्घ परंपरा असलेला पक्ष संपत नसतो. महाराष्ट्रातील काँग्रेसचे भविष्य हे येथील लोकांच्या हातात आहे. काँग्रेसला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मजबूत नेते आणि कार्यकर्त्यांचे नेटवर्क तयार करावे लागणार आहे. भाजप दोनवरून ३०० पेक्षा अधिक खासदारांपर्यंत कसा पोहोचला, याचा अभ्यास करून काँग्रेस आत्मपरीक्षण करू शकतो. पक्षातील राजकारण बाजूला ठेवून एक नवे मॉडेल उभे करू शकतो. जास्तीत जास्त खासदार व आमदार निवडून आणण्यावर भर देऊन संसदीय प्रणालीत सकारात्मक बदल घडवावेत. या बाबी होणार नाहीत, तोपर्यंत पक्ष वाढणार नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या यात्रेचे राजकीय परिणाम काय होतात, याची वाट न बघता समस्त काँग्रेसजनांनी कंबर कसून मेहनत करावी, जेणेकरून काँग्रेस पक्ष मोठा होईल आणि नवा भारत साकार करता येईल.

(लेखक नागपूरचे माजी आमदार आणि काँग्रेसच्या संसदीय मंडळाचे सदस्य आहेत.)