मंगला नारळीकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजकाल लोकांना समजू लागले आहे की जगण्यातील कोणतीही महत्त्वाची गोष्ट धर्माच्या नाही, तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारेच जास्त चांगल्या प्रकारे मिळू शकते. मानसिक समाधानासाठी धर्म आणि भौतिक प्रगतीसाठी विज्ञान हा फरक आता करता येतो. असे असेल तर सगळ्या धर्मामधील चांगल्या गोष्टी घ्यायला काय हरकत आहे?

एकूण मानवी समाजात धर्माचा उपयोग काय? व्यवहारात पाळायचे नियम, समाजाने आपल्या हितासाठी ठरवून दिलेले कायदे की एखाद्या अवास्तव, आकर्षक तत्त्वज्ञानाच्या प्रभावाची अफूची गोळी चढवून करवून घ्यायची कामे? भारतीय समाजात तरी हे सगळे धर्मविशेष दिसतात. त्यातले पहिले दोन जरुरी आहेत यात वाद नाही. प्रत्येक स्थिर झालेल्या, समाजाच्या हितासाठी काही नियम करणाऱ्या धर्माने ते विकसित केलेले दिसतात. पण तिसरी विशेषता नीट तपासून पाहायला हवी. अध्यात्मातील प्रगतीच्या नावाखाली भारतात या अफूच्या गोळीचे परिणाम अनेक शतके दिसत आहेत.

मला एक प्रश्न नेहमी विचारावासा वाटतो. जगात अनेक युगे वेगवेगळय़ा संस्कृती उदयाला आल्या, विकसित झाल्या, काहींचे अस्तही झाले. काही अजून खूप जुन्या संस्कृती टिकून आहेत. भारतीय संस्कृती त्यांपैकीच. ती सर्वश्रेष्ठ आहे, अतिशय चांगले अध्यात्म (?) तिने विकसित केले आहे असा अभिमान आपल्याला शिकवलेला असतो. पण जरा विचार करून सांगा, इतर संस्कृतींपेक्षा वेगळा आणि जास्त उपयोगी पडणारा, अधिक हिताचा ठरलेला असा आचार किंवा विचार आपल्याला भारतीय संस्कृतीकडून मिळाला आहे का? चोरी करू नका, खोटे बोलू नका, वडीलमाणसांचा आदर करा, परस्पर सहकाराने वागा, गरिबांना मदत करा, अशी शिकवण प्रत्येक धर्मात असते. मला तरी माझ्या प्रश्नाचे उत्तर निराशादायक वाटते. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण आहे असे सगळेच देव मानणारे धर्म मानतात, पण परमेश्वरानेच माणसा-माणसांत जन्मजात जातिभेद करून ठेवला, त्यांच्याकडून विवक्षित कामांची अपेक्षा ठेवावी, असे आमच्याच संस्कृतीत शिकवले जाते. लहानपणापासून हे मनावर बिंबवले जाते. कोणत्या तरी वेगळय़ा जातीचे लोक आपल्यापेक्षा खालच्या जातीचे आहेत, हे जरा सुखद वाटत असेल, पण ते तर पूर्ण असत्यावर आधारित आहे. हे असत्य अगदी लहानपणापासून अफूच्या गोळीप्रमाणे मुलांच्या व पुढे वयस्कांच्या मनावर परिणाम करते. कारण असा जन्मजात फरक असता, तर आजच्या प्रगत वैद्यकीय शास्त्राला त्याचा काही सुगावा लागला नसता का? हळूहळू आपले विचारी लोक व्यवस्थित समजू लागले आहेत, की आपल्याला कोणतीही महत्त्वाची गोष्ट विज्ञानावर आधारित अशा तंत्रज्ञानावरच चांगली मिळू शकते. पूजाअर्चना, मंत्र-तंत्र, यज्ञ, ईश्वराची संस्कृतमधून आळवणी यांचा काही उपयोग नसतो. मराठय़ांच्या राज्यात, गंगेवर बांधत असलेला पूल पुन्हा कोसळला, तेव्हा पूजा, अनुष्ठान, इत्यादींना नकार देऊन नाना फडणवीस यांनी युरोपियन इंजिनीअरला बोलावून त्याच्याकडून पूल बांधून घेतला, त्याला आता खूप काळ लोटला आहे. एखाद्या जोडप्याला अपत्य हवे असेल, तर आज आधुनिक वैद्यकाचा आश्रय घेतला जातो, पुत्रकामेष्टी यज्ञाचा नाही. सर्व पूजा-अर्चनांचा उपयोग फक्त आपल्या मानसिक समाधानासाठी होतो, वास्तविक भौतिक प्रगतीसाठी नाही हे आपण ध्यानात घ्यायला हवे. खरी प्रगती कोणत्या मार्गाने होऊ शकते याचा अजून अंदाज घ्यायला हवा का? पौराणिक कथांमधून शहाणपणाच्या गोष्टी शिकायला हरकत नाही, करमणूकही भरपूर होऊ शकते. धर्मस्थळे ही पर्यटनस्थळे होताहेत. ठीक आहे प्रवासाचा आनंद, निसर्गनिरीक्षण होत असेल, मन:शांती मिळत असेल, काही लोकांना उद्योगप्राप्ती होत असेल, पण तेथे जाण्यामुळे हवे ते मिळते, नवस पूर्ण होतात, भौतिक प्रगती होते हे बरोबर नाही. असेही होऊ नये की प्रसिद्ध मोठय़ा धर्मस्थळांना फक्त श्रीमंत लोकच सहज भेट देऊ शकतात.

सनातन धर्माने पुरस्कार केलेली असत्य आणि अन्याय यांचा पुरस्कार करणारी जातिसंस्था आपण अजून का सोडत नाही? अनेक पिढय़ा काही जातींवर प्रचंड अन्याय झाला आहे, हे आपण मान्य करणार नाही का? सगळे जग समता, स्वातंत्र्य यांची मागणी करत असताना आपल्यातील जातिभेद नष्ट करायचा प्रयत्न करायचा नाही का? आपल्या समाजात असे जातिभेदाचे कप्पे कायम ठेवून आपण समाजाला सामर्थ्यवान करत आहोत की फुटीरता, संशय आणि द्वेष वाढवत आहोत याचा समाजधुरीण विचार करतील का? की शतकानुशतके टिकवलेली ही प्रथा श्रेष्ठच आहे असा दुरभिमान बाळगत पुढेही चालू ठेवायची आहे?

आपल्याला इतर धर्मातील अनुकरणीय गोष्टी घेण्यास मुभा हवी. भुकेल्याला अन्न द्या, पण त्यापेक्षा त्याला अन्न मिळवण्यास सक्षम करणे अधिक महत्त्वाचे आहे असे सांगणारा मुस्लीम धर्म, गरीब व आजारी लोकांची सेवा करणे हे मोठे पुण्यकर्म आहे असे सांगणारा ख्रिश्चन धर्म, दु:ख व संकटाच्या काळात इतरत्र निरीक्षण करा व आपला मार्ग आपणच विचार करून शोधा असे सुचवणारा बौद्ध धर्म यातूनदेखील आपण शिकावे असे वाटते. तसे झाले, विविध धर्माशी प्रामाणिक संवाद चालू झाला, तरच पसायदानात ज्ञानेश्वरांनी उल्लेखलेली ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अवतरेल.

mjnarlikar@gmail.com

More Stories onधर्मReligion
मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good things in all religion importance of communication in religion communication in religion zws
First published on: 21-05-2023 at 02:29 IST