प्रा. रमेश वाघ
महर्षी वेदव्यास म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्यांचे मूळ नाव कृष्णद्वैपायन. व्यास ही त्यांना त्यांच्या कर्तृत्वाने प्राप्त झालेली उपाधी आहे. व्यासांचा जन्म यमुना नदीमधल्या एका बेटावर झाला. बेटाला संस्कृतमध्ये द्वीप म्हणतात. व्यासांचा रंग सावळा होता. सावळा म्हणजे कृष्ण. म्हणून हे नाव ठेवले गेले. त्यांचा जन्म त्यांच्या मातेच्या विवाहापूर्वी झालेला असल्याने, जन्मानंतर आई त्यांना सोडून गेली. सांभाळ त्यांचे वडील पाराशर ऋषींनी केला. एका मच्छिमाराच्या अविवाहित मुलीच्या पोटी एका नदीतल्या निर्जन बेटावर जन्माला आलेला काळा सावळा मुलगा. आईविना वाढलेला पोर. अशी व्यासांची लौकिक जन्मकथा. परंतु त्यानंतर त्यांनी जे कर्तृत्व गाजवले, त्यामुळे नंतरच्या विद्वानांनी व्यासांना साक्षात ब्रह्म, विष्णू आणि महादेवाच्या पंगतीला बसवलेले आपणास दिसते.
‘अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरिः । अभाललोचनः शम्भुर्भगवान् बादरायणः ॥ ’ चार मुखे नसतील, पण ते ब्रह्मदेवच आहेत. त्यांना चार हात नसतील, पण ते साक्षात भगवान विष्णूच आहेत. त्यांच्या कपाळावर तिसरा डोळा नाही, पण ते साक्षात शिवशंकर आहेत… असे व्यासांचे करण्यात आलेले वर्णन हा त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे.
सुरुवातीला वेद हे एकत्रित होते. परंतु आपल्या चार शिष्यांच्या मदतीने त्यांनी वेदांचा विस्तार केला. एकेकाला एकेक शाखा नेमून दिली. विव्यास वेदान्। म्हणून त्यांचे नाव व्यास असे पडले. व्यासांनी सुमंताला अथर्ववेद दिला. जैमिनीला सामवेद दिला, वैशंपायनाला यजुर्वेद दिला आणि पैल याला ऋग्वेद दिला. सुरुवातीला वेदांसारख्या तत्त्वज्ञानाच्या विषयावर लिहिणारे व्यास विवाहानंतर थोडेसे बदललेले दिसतात. जाबाली ऋषींच्या वाचिका नावाच्या कन्येशी व्यासांनी विवाह केला. त्यानंतर त्यांनी अठरा पुराणांची रचना केली. विवाह केल्यानंतर व्यक्तीच्या स्वभावामध्ये बदल होतो, याचाच हा पुरावा म्हणावा लागेल.
पुराणे ही समाजामध्ये तत्त्वज्ञान गोष्टीरूपाने रुजवण्यासाठी केलेली क्लृप्ती होती. सर्वसाधारण समाजामध्ये तत्त्वज्ञानाच्या बाबतीमध्ये अरुची दिसते. कारण तत्त्वज्ञान सामान्यांना रुक्ष वाटते. ते त्यांना कथेमध्ये मिसळून देण्याचे कार्य व्यासांच्या पुराणांनी केलेले आहे. अठरा पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि भक्तीप्रधान पुराण भागवतपुराण मानले जाते. भागवताने समाजात भक्तीचा महिमा वाढविलेला आहे. म्हणून तुकोबारायदेखील भागवताचा गौरव करताना म्हणतात, ‘आयका जी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा।।’ जो भागवत वाचेल तो सत्यवचनी, सत्याचरणी बनेल- त्याला आपल्या हिताचा विचार सुचेलच, पण तो समाजाच्या हिताचाही विचार करेल. हे व्यासांच्या लेखणीचे सामर्थ्य आहे. संस्कृत भाषेतल्या ‘अष्टादशपुराणेषु व्यासस्य वचनं द्वयं। परोपकाराय पुण्याय, पापाय परपीडनं।।’ या ओळींतून पुराणांचे सार सांगण्यात येते आणि ‘पुण्य परउपकार, पाप ते परपीडा’ या जगद्गुरू तुकारामांच्या सरळसोप्या अभंगातून लोकांपर्यंत पोहोचते.
महाभारताच्या रूपाने मानवी वृत्तींचा इतिहास व्यासांनी लिहिलेला आहे. महाभारताच्या सुरुवातीलाच ते म्हणतात, हा जय नावाचा इतिहास आहे. महाभारतामध्ये सर्व प्रवृत्तीची चरित्रे आपल्याला दिसतात. ज्याला जीवनामध्ये निराशा सर्व बाजूने घेरूते, त्यानेसुद्धा पराभव न स्वीकारता, दृढ निश्चयाने लढायला उभे ठाकावे. त्याचा विजय निश्चित होतो, याचा साक्षात्कार करविणारे साहित्य म्हणजे महाभारत. महाभारतामध्ये वेदांचे सार आलेले आहे, असेही म्हणतात. जगामधला असा कोणताही विषय नाही, की जो व्यासांनी महाभारतामध्ये चर्चिलेला नाही. उत्कृष्ट चारित्र्य घडवायचे असेल, तर उगवत्या पिढीला महाभारतातून धडे घेणे आवश्यक आहे. काही भोळसट लोक महाभारत वाचले किंवा महाभारताशी संबंधित एखादी प्रतिमा जरी घरात असेल, तरी ‘त्यामुळे घरात महाभारत होईल’ असे मानतात. अशा प्रकारच्या अंधश्रद्धाळू गोष्टींचा प्रसार समाजामध्ये कालौघात झालेला आहे, तो कोणीतरी जाणीवपूर्वक महाभारत समाजामधून हद्दपार करण्यासाठी केलेला खटाटोप असावा, असे वाटते. परंतु महाभारत हे एक मार्गदर्शक, अजरामर महाकाव्य आहे. पीटर ब्रूक्स ते श्याम बेनेगल यांनी आपापल्या अभिव्यक्ती-माध्यमांतून महाभारताचे अर्वाचीनीकरण काही अंशी मांडले, असे प्रयत्न यापुढेही होत राहातील. कारण ज्यापासून प्रेरणा घ्यावी असे बरेच काही महाभारतात आहे. ते केवळ कथानक नाही, त्यात रसनिष्पत्तीतही आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी महाभारताचा भावार्थदीपिकेच्या पहिल्याच अध्यायात या रसनिष्पत्तीचा अत्यंत सार्थ गौरव केला आहे. ‘म्हणोनी हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो । एथुनि रसां आला आवो । रसाळपणाचा ॥’ (१.३३) ‘हा ग्रंथराज जितके काव्य जगाच्या वाङमयीन इतिहासात आजपर्यंत झालेले आहे, त्या सर्व काव्याचा राजा आहे. इथूनच सगळ्या रसांना डौल प्राप्त झाला आहे.’ या विषयावरच्या ओव्या जिज्ञासूंनी मूळ ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायात नक्की पहाव्यात. विषयाचे वैविध्य, व्यापकता आणि विस्ताराच्या बाबतीतही महाभारताएवढा दुसरा ग्रंथ नाही, हीदेखील माऊलींचीच साक्ष आहे.“म्हणऊनि महाभारतीं जे नाही । ते नोहेचि लोकी तिहीं । येणे कारणे म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥” (ज्ञा.१.४७)
याखेरीज व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिले. ब्रह्मसत्रामध्ये चार अध्याय, सोळा पाद आणि पाचशे पंचावन्न सूत्रे आहेत. उपनिषदे, श्रीमदभगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यांना ‘भारतीय तत्त्वज्ञानाची प्रस्थानत्रयी’ मानले जाते. म्हणजे, ज्यांना कोणाला भारत आणि भारतीय ज्ञान परंपरा जाणून घ्यायची आहे, त्यांनी किमान हे ग्रंथ तरी वाचायलाच हवेत. भारतीय तत्त्वज्ञानावर लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या कोणालाही व्यासांना वगळून पुढे जाता येणार नाही. माऊलीदेखील म्हणतात, मी जे काही बोलतो आहे ते बोलताना व्यासांच्या मतांचा मागोवा घेतो आहे.“तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकारातें वाट पुसतु । अयोग्यही मी न पवतु । कें जाईन ? ॥’ ( ज्ञा. १८.२२)
व्यासांच्या या समग्र कार्याचा विचार आपणास निश्चित म्हणता येते, की व्यास हे मानवी जीवनाचे भाष्यकार आहेत. मानवी जीवनाचे शाश्वत मार्गदर्शक आहेत. त्यांच्या इतका मानवी जीवनाचा दुसरा महान मार्गदर्शक कोणी असू शकत नाही. व्यासांच्या साहित्यात फक्त मनोरंजन नाही, तर मानवी जीवनाला आकार देणारं सळसळतं चैतन्य आहे.
आजची आषाढ पौर्णिमा, ही व्यासांची जन्मतिथी जगातील समग्र गुरूंच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. त्यांचा कार्याचा उचित गौरव एका कवीने केलेला आहे.
‘नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः ।। ’
म्हणजे विशाल बुद्धी असणाऱ्या, कमलदलाच्या उमललेल्या पाकळ्यांप्रमाणे नेत्र असणाऱ्या महर्षी व्यासांना नमस्कार, कारण त्यांनीच महाभारतरूपी विचारांचे तेल घालून ज्ञानाचा दीप अखंडीत प्रज्वलित ठेवला आहे!