विद्यार्थिदशेत वावरत असताना अनेकांना विज्ञान हा विषय क्लिष्ट वाटतो. तर निरनिराळ्या वैज्ञानिक संकल्पनांबाबत काही विद्यार्थी अनभिज्ञ असतात. तर काही विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाबाबत जिज्ञासा असते, मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी संबंधित क्षेत्रात वाटचाल करताना आणि विविध प्रकल्पांवर काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो. या बाबी लक्षात घेऊनच ‘नवनिर्माण विज्ञान प्रबोधन’ संस्था काम करत आहे.

आयुष्याच्या प्रवासात विज्ञानामुळे एखाद्या गोष्टीकडे चिकित्सक पद्धतीने पाहण्याची सवय लागते. हेच जाणून विद्यार्थ्यांमधील संशोधनात्मक वृत्तीला चालना आणि कल्पनाशक्तीला भरारी देण्यासाठी मुंबईत ‘नवनिर्माण विज्ञान प्रबोधन’ या संस्थेची स्थापना झाली. बदलत्या काळातील स्पर्धात्मक वातावरणात विचारात्मक आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून टिकायचे असल्यास वैज्ञानिक दृष्टिकोन असणे महत्त्वाचे आहे. आजचे विद्यार्थी, उद्याचे शास्त्रज्ञ झाले तर देशाची उत्तरोत्तर प्रगती होईल. हेच जाणून गेल्या २५ वर्षांपासून ‘नवनिर्माण विज्ञान प्रबोधन’ ही संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान प्रसार व प्रचाराचे कार्य करीत आहे. सध्या छोट्याशा घरातील तात्पुरत्या स्वरूपातील कार्यालयाचे कायमस्वरूपी कार्यालयात रूपांतरित करून कार्याची व्याप्ती वाढविण्याचा संस्थेचा मानस असून यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे.

International Microorganism Day Marathwada and Maharashtra need to get rid of harmful chemical farming
आता मराठवाड्यासह महाराष्ट्रात शेतीसाठी ‘जैविक संग्राम’ हवा!
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
कुलगुरू पदाची अवनती जुनीच… डॉ. रानडे हे त्यातील नवे पान!
loksatta editorial marathi news
अग्रलेख : दोन ध्रुवांवर दोघे
The impact of generative AI on education
शिक्षणावर जनरेटिव्ह एआयचा प्रभाव
Presvu Eye Drops
अग्रलेख : दावा, दवा, दुआ!
loksatta editorial on ajit ranade marathi news,
अग्रलेख : ‘माहेर’चे मस्तवाल!
loksatta editorial on noise pollution marathi news
अग्रलेख: नेमके काय साजरे केले?

हेही वाचा : शिक्षणावर जनरेटिव्ह एआयचा प्रभाव

संस्थेची सुरुवात

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे संशोधनात्मक प्रकल्पांवर आधारित ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ हा उपक्रम राबविला जातो. १९९९ साली मराठी विज्ञान परिषदेतर्फे पुण्याला एका आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रचारकांच्या परिषदेला बाळासाहेब जाधव गेले होते. त्यावेळी ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’च्या सदस्यांनी हा उपक्रम मुंबईत सुरू करण्यासाठी बाळासाहेब जाधव यांच्याकडे विचारणा केली. या उपक्रमाचे संबंधित शहरात समन्वयक म्हणून काम पाहण्याची जबाबदारी ही एका नोंदणीकृत संस्थेकडे दिली जाते. त्यामुळे ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदे’चे कार्य मुंबईत सुरू करण्यासाठी विज्ञानप्रेमी पालकांच्या मदतीने ‘नवनिर्माण विज्ञान प्रबोधन’ या संस्थेची २००० साली बाळासाहेब जाधव यांनी स्थापना केली. सध्या ही संस्था ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ या उपक्रमाची मुंबई जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहत आहे.

खडतर सुरुवात

संस्थेला सुरुवातीच्या काळात विविध अडचणींचा सामना करावा लागला. बाळासाहेब जाधव आणि त्यांच्या पत्नीने स्वखर्चाने संस्थेचा कारभार सांभाळला. नोकरीच्या वेतनातून मिळणारे पैसे खर्च करून त्यांनी विविध उपक्रम राबविले. प्रायोजकांकडून मदत मिळत होती, मात्र ती तुटपुंज्या स्वरूपात होती. सध्या बाळासाहेब जाधव यांचे चिरंजीव डॉ. भूषण जाधव हे सचिव म्हणून काम पाहत आहेत. तर जवळपास १०० स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने संस्थेसाठी विनामोबदला काम करीत आहेत.

संस्थेचे उपक्रम

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या प्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांचे प्रकल्प कसे उत्तम होतील, यासाठी संस्था मार्गदर्शन करते. तसेच विज्ञान शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यशाळांचेही आयोजन करते. आतापर्यंत मुंबईच्या २८ हजार ६१५ बालवैज्ञानिकांनी बाल विज्ञान परिषदेत सुमारे ६ हजार ६९४ संशोधन प्रकल्प सादर केले आहेत. यापैकी २२४ प्रकल्पांची निवड राज्य स्तरावर केली गेली. म्हणजेच जवळपास ४४८ विद्यार्थ्यांना विविध जिल्ह्यांना भेट देण्याची आणि राज्यभरातून येणाऱ्या विज्ञानप्रेमी प्रज्ञावंत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची, ज्ञान व माहितीची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेत २०१५ साली पाच कर्णबधिर विद्यार्थ्यांनी मिळून त्यांच्या जीवनाशी निगडित एका प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. त्या प्रकल्पाने संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक पटकावला.

हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’!

विज्ञान प्रसार आणि समाजकार्य

‘नवनिर्माण विज्ञान प्रबोधन’ ही संस्था दोन विभागात काम करते. विज्ञान शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासह ही संस्था समाजकार्यही करते. राष्ट्रीय विज्ञान दिन महोत्सव, भित्तीपत्रक आणि घोषवाक्य स्पर्धा, ताराबाई मोडक बाल विज्ञान स्पर्धा, विज्ञान पत्रकारिता कार्यशाळा हे विज्ञान प्रचारविषयक उपक्रम राबविले जातात. तसेच निसर्ग कोपरा आणि बीजारोपण, पर्यावरण स्वच्छता आणि जागरूकता, पर्यावरणस्नेही गणेशोत्सव स्पर्धा, पर्यावरण दहीहंडी, वृक्षदिंडी, वृक्षारोपण, वसुंधरा दौड हे पर्यावरणविषयक उपक्रम, कुमार विश्वकोश वाचन स्पर्धा हा साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम आणि जनजागृतीपर मानवी साखळी, पथनाट्ये, योगदिनविषयक कार्यक्रम असे विविधांगी उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी दहा हजार वृक्ष लावण्याचा संस्थेचा मानस आहे. करोनाकाळात आणि पूरस्थितीमध्ये या संस्थेने समाजकार्यात सहभाग घेतला. त्याचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विज्ञानाच्या प्रसारासह समाजातील विविध घटकांना मदत करण्यासाठी संस्थेला आर्थिक पाठबळाची गरज आहे.

बदलत्या काळानुसार संस्थेने डिजिटल पर्याय स्वीकारला आहे. संस्थेने सुरू केलेल्या ‘असीम ज्ञान’ या युट्यूब वाहिनीवर विविध वैज्ञानिक विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. या वाहिनीवर आतापर्यंत विविध विषयांवरील ११९ शैक्षणिक चित्रफिती प्रसारित केल्या गेल्या आहेत. तसेच विज्ञान प्रश्न मंजुषा, विज्ञान शिक्षण लघुपट महोत्सव, विविध विज्ञान प्रदर्शनांचे वृत्तांकन, वैज्ञानिक विषयांवरील तज्ज्ञांची चर्चासत्रे, नामांकित शास्त्रज्ञांच्या मुलाखती, व्याख्यानमालांचेही आयोजन केले जाते.

ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना विविध उपकरणे हाताळता यावीत आणि विविध प्रयोग करता यावेत, यासाठी ग्रामीण भागात पोहोचणारी ‘चालती – फिरती’ प्रयोगशाळा सुरू करण्याचा ‘नवनिर्माण विज्ञान प्रबोधन’ या संस्थेचा मानस आहे. विज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या संस्थेला कार्याची व्याप्ती वाढवून विज्ञानाचा प्रसार व प्रचार सर्वत्र करण्यासाठी आर्थिक पाठबळरूपी सहकार्याची गरज आहे.

महत्त्वाकांक्षी ‘बाल विज्ञान संशोधिका’

संस्थेला ‘करा आणि शिका’ या संकल्पनेवर आधारित ‘बाल विज्ञान संशोधिका’ सुरू करायची आहे. पुस्तकांच्या पलीकडे जाऊन विविध उपकरणे हाताळण्यासह संवादात्मक आंतरक्रियांना प्रोत्साहन देणारे ‘बाल विज्ञान संशोधिका’ हे एक शैक्षणिक केंद्र असेल. तेथे विद्यार्थ्यांसह विज्ञानप्रेमींनाही वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या जातील. तसेच प्रात्यक्षिकांमध्येही सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांचे गट करून संबंधित परिसरात ‘पर्यावरण सर्व्हेक्षण’ हा उपक्रम राबवायचा आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थी संबंधित परिसरात कोणकोणती झाडे आणि पाण्याचे साठे आहेत ते पाहतील. तसेच, मातीचे नमुने जमा करून विश्लेषणाद्वारे निष्कर्ष काढतील. या सर्व उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना भविष्यातील ‘शास्त्रज्ञ’ बनविण्यासाठी संस्थेची धडपड सुरू आहे.

हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा : हुशार, गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यादानाचा निरंतर यज्ञ

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘डिजिटल ज्ञान’

नवनवीन तंत्रज्ञान हाताळत असताना ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी ‘सुलभ वरिष्ठता – आरामदायी डिजिटल ज्ञान’ हे व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एका छताखाली ‘डिजिटल ज्ञान’ देऊन विविध डिजिटल क्रियांचे प्रशिक्षण दिले जाईल. शहरातील आणि ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना संगणकाबाबत प्राथमिक माहिती, स्मार्टफोन, इंटरनेट, व्हॉट्सअॅप, ऑनलाइन बँकिंग यासारख्या अत्यावश्यक डिजिटल गोष्टी वापरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांशी दूरध्वनी किंवा दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून वैद्याकीय सल्ला, डिजिटल पेमेंट प्रशिक्षण, ऑनलाइन फसवणूक ओळखण्याचे आणि विविध डिजिटल सेवांचा सुरक्षितपणे वापर करण्याचे शिक्षण देण्यासाठी व जागरूकता मोहीम राबविण्यासाठी ठिकठिकाणी संस्थेला केंद्रे सुरू करायची आहेत. विविध योजनांची डिजिटल माहिती देऊन ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुलभ करण्याचा संस्थेचा मानस आहे.

कायमस्वरूपी कार्यालयाची आवश्यकता

‘नवनिर्माण विज्ञान प्रबोधन’ ही संस्था मुंबईस्थित असून राष्ट्रीय स्तरावर काम करते. मात्र या संस्थेकडे कायमस्वरूपी कार्यालय नसून एका छोटाशा घराला तात्पुरत्या स्वरूपातील कार्यालय बनविले आहे. परिणामी विविध उपक्रमांची व्याप्ती वाढवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांना विविध उपक्रमांचे व्यवस्थित नियोजन करता यावे. त्याच ठिकाणी विविध उपक्रमही राबविण्यासाठी संस्थेला कायमस्वरूपी मोठी जागा असलेले कार्यालय सुरू करायचे आहे आणि त्यासाठी संस्थेला आर्थिक पाठबळाची गरज आहे. दानशूरांना सढळपणे मदत करण्याचे आवाहन केले जात आहे

मुलुंडमधील (पूर्व) लोकमान्य टिळक मार्गावरील हनुमान चौक येथील मारुती दर्शन इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर हे कार्यालय आहे. ‘नवनिर्माण विज्ञान प्रबोधन’ संस्थेतील पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनी व ई – मेल आयडीद्वारे संपर्क साधता येईल.

भ्रमणध्वनी क्रमांक : ८७७९५१५१७०, ९८६९०४३६१९ (व्हॉट्सअॅप क्रमांक),ई – मेल आयडी : officialnvp@gmail. com

देणगीसाठी बँक तपशील लवकरच प्रसिद्ध केले जातील.

बँकिंग पार्टनर

दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.