डेव्हिड पिअर्सन, ॲलेक्सी ट्रॅव्हेली
‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ यासारख्या म्हणींचे अनेक दाखले आंतरराष्ट्रीय राजकारणात दिसतातच, त्यापैकी सर्वांत नवा म्हणजे दाखला म्हणजे चीन आणि भारत यांच्या संबंधांत सध्या दिसणारी सुधारणा. वास्तविक चीनची जगात जशी अमेरिकेशी स्पर्धा, तशी आशिया खंडात भारताशी स्पर्धा हे उघड आहे. नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनचे संबंध इतके दिवस बरे होते पण अर्थातच, भारतावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ५० टक्के आयातशुल्क जाहीर केल्यामुळे या संबंधांत मिठाचा खडा पडला.
यापैकी २५ टक्के आयातशुल्क ‘जशास तसे’ म्हणून, तर आणखी २५ टक्के ‘विशेष आयातशुल्क’ रशियाकडून भारत करत असलेल्या तेलखरेदीची शिक्षा म्हणून ट्रम्प यांनी लादले आहे. अमेरिकेत सत्तांतरे झाली, तरी भारताशी अमेरिकेचे संबंध गेल्या तीन दशकांपासून वाढत आहेत. विशेषत: गेल्या दहा वर्षांत तर, चीनच्या आर्थिक/ व्यापारी विस्ताराचा वरवंटा रोखण्यासाठी भारताशी अमेरिकेने मैत्री वाढवली होती, हेही उघड आहे. असे असताना गेल्या ऑक्टोबरपासून- म्हणजे अमेरिकेत ट्रम्प यांची सत्ता येणार की कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपद मिळणार, हेही ठरलेले नसताना- भारत व चीन यांच्या संबंधांतला तणाव धीम्या गतीने निवळू लागला. रशियातील कझान येथे १६ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी आलेले चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे मोदींना भेटले. तेव्हापासून संबंध पुन्हा वाढण्याचा मार्ग मोकळा झाला, असे मानले जाते. आता तर, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे भारत-भेटीस आले असून मोदी यांच्या चीनदौैऱ्याचा तपशील या भेटीत ठरणार आहे.
अर्थात आशियातल्या या दोन महाकाय देशांमध्ये अजूनही बरेच मतभेदाचे आणि संघर्षाचे मुद्दे धुमसत आहेत. भारत-चीन सीमारेषा २४८८ किलोमीटर आहे आणि तिच्या काही भागांतील नियंत्रण वादग्रस्तच आहे; भारताचे शत्रुराष्ट्र असलेल्या पाकिस्तानशी चीनचे गूळपीठ वाढते आहे आणि चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बहुराष्ट्रीय उत्पादकांना आकर्षित करण्याची भारताची महत्त्वाकांक्षा अजिबात लपलेली नसल्यामुळे, भारत हा आर्थिकदृष्ट्या चीनशी बरोबरी करू शकत नसला तरी चीनच्या स्पर्धेत आहेच.
चिनी आणि भारतीय सैन्यांदरम्यान गलवान येथील हिमालयीन सीमेवरच्या घातक संघर्षानंतर संबंध बिघडले. चिनी मालावर बहिष्काराची आवाहनेही भारतामध्ये करण्यात आली. पण २०२४ च्या ऑक्टोबरमध्ये मोदी आणि क्षी ही दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. ही भेटसुद्धा रशियासारख्या, अमेरिका ज्याला मित्रदेश मानत नाही अशा देशाच्या भूमीवर झाली, हे विशेष.
त्या चर्चेनंतर, दोन्ही देशांनी सावकाश- पण निश्चितपणे काही पावले उचलली. आधी प्रवास व्हिसा निर्बंध कमी केले आणि थेट उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासाठी आता बोलणी सुरू आहेत. दोनच महिन्यांपूर्वी- जूनमध्ये बीजिंगने भारतातील यात्रेकरूंच्या दृष्टीने पवित्र अशी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा खुली केली. चीन आणि भारत त्यांच्या हिमालयीन सीमेवरील तीन व्यापारी चौक्या पुन्हा सुरू करण्यासाठी चर्चा करत आहेत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गेल्याच आठवड्यात सांगितले होते.
चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी हे या पार्श्वभूमीवर भारतात येत आहेत. याआधी तीन वर्षांपूर्वी याच वांग यी यांनी भारतास भेट दिली, त्या वेळेपेक्षा आता संबंध नक्कीच सुधारले आहेत. या भेटीत मोदी यांच्या चीन-भेटीविषयी चर्चा होणार, याचा अर्थ मोदी आणि क्षी जिनपिंग यांची एकमेकांशी चर्चाही मोदी चीनमध्ये करणार. या चर्चेेच्या तपशिलाविषयी वांग यी हे भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी वाटाघाट करणार आहेत.
मात्र चीनबद्दल भारतातील जनतेच्या भावना आजही तीव्र आहेत. पहलगामच्या नृशंस दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम पार पाडली, त्या वेळी पाकिस्तानला चिनी टेहळणी यंत्रणांची मोठीच मदत झाल्याचा ताजा तपशील भारतीय कसा विसरतील? यामुळेच चीन-भारत संबंध सुधारत असल्याचा फारसा गवगवा होऊ नये, याची काळजी भारतीय सत्ताधाऱ्यांना- मोदी आणि जयशंकर यांना- घ्यावी लागते आहे. याउलट क्षी जिनपिंग यांना मात्र, भारतही आपला मित्रदेश ठरू शकतो हे जगाला दिसणे चीनच्याच पथ्यावर पडणार, याची खात्री असल्याचे दिसते. कझान येथील भेटीनंतर लगेच जिनपिंग यांनी ‘वाघ (चीन) आणि हत्ती (भारत) हे गुण्यागोविंदाने नाचू शकतात’ असे म्हटले होते.
अशा स्थितीत भारतीय विश्लेषकांनी तसेच परराष्ट्र-संबंध क्षेत्रातील जाणकारांनी, ही स्थिती निव्वळ ट्रम्प यांच्यामुळेच उद्भवल्याचा सूर लावलेला आहे. ‘नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यातील संबंध बिघडणे हे बीजिंगच्या पथ्यावर पडणार, हे चीनला माहीत आहे… त्यामुळेच, भारत-अमेरिकेच्या व्यापारी संबंधांतील ताजा तणाव पाहून चीनला असुरी आनंद होत असेल, हेही उघड आहे’ असे मतप्रदर्शन बेंगळूरुच्या ‘तक्षशीला इन्स्टिट्यूशन’मधील हिंद-प्रशांत अभ्यास विभागाचे प्रमुख मनोज केवलरामानी यांनी व्यक्त केले आहे. तर भारताचे चीनमधील माजी राजदूत विजय गोखले यांच्या मते, चीन व भारत यांच्यात मतभेदाचे मुद्दे आजही अनेक असले तरी ‘ट्रम्प- कल्लोळा’च्या आजच्या स्थितीत चीनकडेच मोठे भांडवल आणि तंत्रज्ञान आहे; त्यामुळे चीन हा आजच्या काळात महत्त्वाचा समतोलबिंदू म्हणून काम करू शकतो- भारत तसेच अन्य अनेक देशांना बरोबर घेऊन चीनने तापमान-बदलाच्या मुद्द्यासह अनेक जागतिक मुद्द्यांवर सहकार्य घडवून आणले पाहिजे. गोखले यांचे असेही मत आहे की, पाच वर्षांपूर्वी होता त्यापेक्षा चीन आज थोडाफार सुधारू लागल्याचे दिसते.
चीनच्या सरकारी माध्यमांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील तणावाबद्दलचा आनंद अजिबात लपवलेला नाही! चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की मोदींचा आगामी चीन दौरा हा बीजिंगला ‘काबूत’ ठेवण्यासाठी नवी दिल्लीलाही सामील करून घेण्यात अमेरिकी राज्यकर्ते अपयशी ठरल्याचे लक्षण आहे. ‘चीन आणि भारत हे शेजारी देश आहेत, ते ज्या क्षेत्रांत सहकार्य करू शकतात याची यादी मोठी आहे,’ अशी साखरपेरणीही ग्लोबल टाइम्सने केली आहे. चीन कदाचित हिंदी महासागरातील सहकार्याचा प्रस्ताव भारतापुढे ठेवेल, अशी अटकळ आहे. चीनच्या ‘बेल्ट ॲण्ड रोड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापासून भारताने स्वत:ला अद्यापपर्यंत लांबच ठेवले आहे. ती भूमिका पुढल्या काळात मवाळ होणार का, हेही पाहावे लागेल.
‘परस्परांचा आदर, एकमेकांच्या चिंतांबद्दल संवेदनशीलता आणि समान हितसंबंध’ अशा त्रिसूत्रीवरच भारत-चीन संबंध पुढे जाणार असल्याचे भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले असले तरी आंतरराष्ट्रीय विश्लेषकांना या संबंधांवर चीनचा प्रभाव अधिक राहील असेच वाटते. अर्थात, भारत याला प्रत्युत्तर देऊ शकतो. ‘टिकटॉक’सह अनेक चिनी संगणक-उपयोजनांवर (ॲप्सवर) बंदी, चीनच्या ‘बीवायडी’ या प्रसिद्ध विजेरी मोटार कंपनीला भारतात कारखाना स्थापण्यास मज्जाव, अशी पावले भारताने यापूर्वीच्या काळातही उचललेली आहेत. पण यापुढल्या वाटाघाटी इतक्या सोप्या नसतील. ‘भारताला आता चीनशी संबंध वाढवायचे आहेत, याचे स्वागतच चीन करेल. पण भारताच्या तथाकथित राजनैतिक भूमिकांना समजून घेऊन त्याप्रमाणे चिनी नेते भारताला विशेष सवलती देतील, असे वाटत नाही’ अशी स्पष्टोक्ती शांघाय येथील फुदान युनिव्हर्सिटीतील दक्षिण आशियाविषयक अभ्यासक लिन मिनवांग यांनी केली आहे. मिनवांग यांच्या मते, पाकिस्तानशीही चीनचे सहकार्य सुरूच राहील.
थोडक्यात, चीनशी संबंध वाढवण्याचा दुस्तर घाट भारताला चढावा लागणार आहे.
डेव्हिड पिअर्सन, ॲलेक्सी ट्रॅव्हेली
दोघेही लेखक ‘द न्यू यॉर्क टाइम्स’साठी काम करतात. वरील मजकूर ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या पूर्वपरवानगीविना वापरण्याचे अधिकार द इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाकडे करारानुसार आहेत.
((समाप्त))